Friday, May 24, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -51

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -५१
जलोदरा पासून रक्षण-ग्रंथ पारायण महिमा
मी कुरवपुरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली. त्या दिवशी हस्त नक्षत्र होते. कृष्णानदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले. ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो. तेंव्हा प्रभू म्हणाले ''अरे शंकरभट्टा ! मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पावून या कुरवपुरात गुप्त रूपाने संचार करीन नंतर नृसिंहसरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उध्दारासाठी अवतार घेईन. तू लिहीत असलेला ''श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ,'' महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. तो ''अक्षर सत्य'' ग्रंथ असेल.'' ''दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा'' या माझ्या नांवाचा जयघोष सर्वत्र होईल. या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल. या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्यासमान मानला जाईल. तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील. तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील. हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद केला जाईल तो बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभ मंगल होऊन त्याचे सकल व्याधिपासून रक्षण होईल.
भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभय वचन
श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले ''तू माझी खूप सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून तू दु:खी होऊ नकोस. तू तीन वर्षे येथेच रहा. या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन. तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईन.''
श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान
''हे शंकरभट्टा ! तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत '' ग्रंथ माझ्या पादुकाजवळ ठेव . त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील. सर्वाना माझे मंगलमय आशिर्वाद. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले. त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून, आई पासून दुरावलेल्या निरागस बालका सारखा स्फुंदुन स्फुंदुन रडू लागलो. श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो. तेंव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"