Tuesday, May 21, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -47

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -४७
पीठिकापूर पासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता, पिता, आजी आजोबा आणि भक्त गणांचे विचित्र प्रयाण
श्रीपादांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळत असे. अन्नपात्रातून कितीही अन्न काढले तरी त्यातील अन्न संपतच नसे. हे मोठे दिव्य आश्चर्य होते. सर्व प्राणीमात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जलचरांना सुध्दा तो प्रसाद मिळावा या उद्देशाने अन्नपात्रातील उरलेले अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येई.
श्रीपाद प्रभू बापनाचार्युलुंना म्हणाले ''आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर सावित्रि काठक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील तेज शक्तिपातद्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्त भावाने प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. तसेच मनानेही त्याची कल्पना करता येत नाही. ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रेय प्रभूच जाणू शकतात. त्यासाठी आपण त्यांच्याच नांवाचा जयघोष करू या. मी देश कालावर मात करू शकतो. माझ्या इच्छेला पर्याय नाही. माझ्या गरजेनुसार मी माझ्या मताशी तुमच्या मताची एक वाक्यता करू शकतो. अंतराळातील सारे तारे, ग्रह माझ्या हातातील खेळणे आहेत. मी तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. आजोबा ! तुम्ही पूर्वी लाभादि महर्षी, नन्द, भास्कराचार्य झालात तेंव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली, आता बापन्नावधानुलु म्हणून आलात व मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीं नाही.''
यानंतर वेंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले ''हे सोन्या, हे कृष्णा, तुला सर्व कांही सोपे वाटते परंतु आम्हाला ते असाधारण आणि रोमांचकारी वाटते.'' यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''आजोबा मी पूर्णप्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्म-धर्मा प्रमाणे ज्याचे त्याला फल देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुध्दा पृथ्वी सहन करु शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ति जागृत केली तरी तुम्ही ती सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वता:ला सुरक्षित ठेवतो . जेंव्हा गरज पडेल तेंव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही. मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वांना पीठिकापुरमहून इतक्या थोडया वेळात पंचपहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी ''दत्त प्रभूच'' आहे. हे तुम्हास कळावे हाच उद्देश होता. नरसिंह वर्मा म्हणाले, ''सर्वजनांचे रक्षण करणारा एकमेव क्षत्रिय तूच आहेस. बाकी सारे नाममात्र क्षत्रिय आहेत.'' यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''क्षत्रियत्व हा माझा नेहमीचा स्वभावच आहे. शिवाजी महाराज या नावाने महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे अशी ईश्वरी इच्छा होती. या इच्छेनुसार शिवाजी राजाचा अवतार धारण करून महाराष्ट्रात हिंदवी राज्याची प्रतिष्ठापना करीन.''
यावर नरसिंह वर्मा म्हणाले ''सार्वभौम श्रीपादांचा जयजयकार असो'' श्रीपादांच्या आजी म्हणाल्या ''अरे बाळा ! तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत. तुझा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा झालेला आणि तुझ्या कपाळावर लग्नाच्या टिळा लाऊन, मुंडावळया बांधलेला, सर्व श्रुंगारानी नटलेला नवरदेव आम्हास पहायचा आहे.'' श्रीपाद म्हणाले ''आजी ! अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. मी कल्की अवतारात शंबल गावात जन्म घेईन. त्या वेळी पद्मावती नांवाच्या अनघालक्ष्मी बरोबर विवाह करीन. परंतु यासाठी कांही काळ लागेल. तुमची इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करीन.'' वेंकट सुब्बम्मा श्रीपादांना म्हणाली, ''हे कान्हा ! तू माझ्या हातानी दूध, दही, साय, लोणी खाऊन खूप दिवस झाले. माझ्या हाताने तुला खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे.''
मायानाटक सुत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा लीला विनोद
श्रीपाद म्हणाले ''आजी तू अवश्य खाऊ घाल. मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे'' तुम्ही पीठापुरमहून येताना दूध दही लोणी आणणार असे मला कळले होते परंतु एवढया लांबच्या प्रवासात ते चांगले रहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने बंधित होऊन अशी लीला केली की ते जसे होते तसेच चांगले राहिले. आजी, यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू. इतक्या दुरून अठरा घोडागाडयांना पंचदेव पहाड पर्यंत आणणे सामान्य आहे का ? माझे सारे अंग ठणकत आहे. माझ्या हातावर किती वळ उमटले ते बघ. खरोखरी श्रीपादांच्या हातावर फोड आले होते. वेंकट सुब्बम्माने अत्यंत मृदु भावाने श्रीपादांच्या हातांना लोणी लावले. आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरी मायानाटक सुत्रधारी श्रीपादांच्या लीला मोठ्या अगम्य होत्या. राजमंबा म्हणाली ''हे कृष्णा, तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ ये तुला खाऊ घालते.'' श्रीपादांच्या तीन आजींनी मिळून त्यांना तो मधूर हलवा खाऊ घातला. परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता. श्रीपादांनी ही लीला बऱ्याच वेळ पर्यंत चालू ठेवली . ते आजीला म्हणाले ''तुम्हा तिघींना माझ्या विषयी अत्यंत प्रेमभाव आहे. तिघींनी मिळून मला एकटयालाच हलवा खाऊ घातला तेंव्हा मला त्रास होणार नाही का ?'' यानंतर श्रीपादांनी आपल्या भावाला, बहिणीला, मेहुण्यांना तो हलवा आपल्या हातानी खाऊ घातला. तेथे आलेल्या भाविका मध्ये वेंक्कय्या नावाचा एक शेतकरी होता. त्याला श्री प्रभूंनी दीक्षा दिली आणि आपल्या हाताने हलवा दिला. राहिलेला हलवा गाडीवानांना व घोडयांना देण्यास सांगितले. ते चांदीचे भांडे वेंकय्यास भेट स्वरूपात दिले. अप्पळराज शर्मा म्हणाले ''बाळा, तू दत्त प्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून न कळत झालेल्या अपराधांची क्षमा कर.'' तेंव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले ''तात, आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करायची असते काय ? तुम्ही मला पूर्वी प्रमाणे आपला मुलगाच समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा. तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा.'' यावेळी श्री वेंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळयातून अश्रुधारा वाहात होत्या. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच जांवई आहे असे नाहीतर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जांवईच आहे. मी माझ्या दिव्य लीलांनी तुम्हास सुखवीत जाईन. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधु स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती महाराणीचे दु:ख दूर करीन. तिचा लाडका पुत्र, सर्वपुत्रांप्रमाणे, नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पहाता एका यतीच्या रूपात, वैराग्य धारण केलेला पाहून ती दु:खी झालेली आहे.'' श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले आई ! तू आणि अनसूया माता मला वेगळया वाटतच नाहीत. तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात नक्की पूर्ण करीन. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो. तुझ्या वात्सल्यामृतानेच माझे भरण-पोषण झाले. माझी बहिण वासवीने केवढे महान कार्य केले ते पाहिलेस ना ? मला भूक लागली असताना माझे लहान बाळात रूपांतर करून अनसूया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठवले.'' वेंकय्या त्यावेळी म्हणाले ''हे महागुरो ! आपल्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे, आपण ज्या असंख्य लीला या दरबारात केल्या. तो दरबार आणि याला लागून असलेला परिसर विश्व विख्यात व्हावा.'' श्रीपाद म्हणाले ''भविष्य काळात माझा दरबार पक्कया इमारतीत परिवर्तित होईल. यात गोधन सुध्दा असेल. त्यात माझ्या कितीतरी लीला प्रदर्शित होतील. हा माझ्या डोळयांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे.'' तेथे जमलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि कांही क्षणातच मी, तो संन्यासी, श्रीपाद प्रभू आणि त्यांचा संपूर्ण दरबार सारेच अदृष्य झाले. त्याचे काय झाले असेल याची मला हुर हुर लागली. हे सारे राक्षसी मायेने झाले असेल अशी मला शंका आली. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, ''माझ्या सान्निध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्या सर्वाना सुरक्षित रीतीने पीठिकापुरमला नेऊन पोहोचविले. ही एक महान अनुभूती होती. मला जे ज्या भावाने भजतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो. हे माझे व्रत आहे.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"