॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय - ३
पळनीस्वामी दर्शन - कुरवपुरचे
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा
विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला. मार्गात अन्न-पाण्याची व्यवस्था ईश्वरकृपेने होत होती. चवथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोंचलो. तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ''ॐ भिक्षांदेहीं'' असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली. ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोडयाच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किंमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालविले. मी आपणाबरोबर येतो. दोघे मिळून भिक्षा मागू या. मी म्हटले समस्त जीवांना अन्न-पाणी पुरविणारे सर्वव्यापी असलेले श्रीदत्तप्रभूच आहेत. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करु या. आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून, श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो. भूक लागल्याने आवाज सुध्दा अगदी बारीक येत होता. इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे. राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे. आपण आमच्याबरोबर घोडयावर चलावे. मी म्हणालो ''मी एकटा येणार नाहीं. माझ्या बरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन.'' त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली. आम्हा दोघांस घोडयावर बसवून ते दूत राजवाडयाकडे निघाले. त्या गावचे लोक आश्चर्याने पहात होते. राजवाडयात पोहोचल्यावर, राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला, ''तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुध्द पडला. आम्ही घाबरुन गेलो. राजवैद्यांना बोलावले, परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुध्दीवर आला. त्याने डोळे उघडून ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'' अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरूवात केली. थोडया वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुध्द असताना एक सोळा-सतरा वर्षाचा अजानबाहु अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला. त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली. राजाने विचारले ते यती कोण होते ? श्रीदत्तप्रभूंशी त्याचे काय नाते आहे ? हे सारे विस्तार पूर्वक सांगावे.''
मी सांगितले युवराजाला दिसलेले सोळासतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती, श्री श्रीपाद श्रील्लभ होते. त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली. ते श्रीदत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखाने जयजयकार केला. राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्णमुद्रा दान दिल्या. त्या घेऊन आम्ही निघालो. राजाच्या राजगुरुने म्हटले ''आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्तमहिमा कळला. आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो. आपणच आम्हास खरा मार्ग दाखविला.'' आमच्याबरोबर माधव नंबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुध्दा कुरवपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला. आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने , राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली. तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले. त्यानंतर ती श्री श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली.
मी आणि माधव नंबुद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो. सध्याच्या गुंटूर (गर्तपुरी) मंडलातील नंबुरु गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. मळियाळ देशातील राजाने नंबुरु येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता. हेच ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नांवाने प्रसिध्द झाले. हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रध्दा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नंबुद्री लहानपणीच माता-पित्याच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता. त्याची श्री दत्तप्रभुंवर मात्र गाढ श्रध्दा होती.
चिदंबरमला गेल्यावर तेथे श्री पळनीस्वामी नांवाचे एक सिध्द महात्मा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळनीस्वामींनी आम्हाला बघून ''माधवा ! शंकरा ! दोघे मिळून आलात ! आमचे अहोभाग्य'' असे म्हणाले. प्रथम भेटीतच नाव माहित नसताना आम्हास नांवाने हाक मारणारे हे सिध्द महात्मे आहेत, यात तिळमात्र संशय नव्हता. स्वामी म्हणाले ''बाबांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात तीनशे वर्षे आहे. या देहाचा त्याग करुन नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्षे रहावे अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवनमुक्त झालेले जनन-मरण रूप सृष्टी क्रमाला अतित असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपाद श्रीवल्लभ ! पुढे पळनी स्वामी म्हणाले, ''अरे शंकरा ! तू विचित्रपुरीतील कणाद महर्षिंच्या कणाद सिध्दांता विषयी बोलला होतास, त्याचे वर्णन करुन सांग.''
कणाद महर्षिंचा कण - सिध्दांत
स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो ''स्वामी मला क्षमा करा. कणाद महर्षिच्या विषयी व त्यांच्या सिध्दांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभुनीच माझ्या तोंडून वदविली होती. हे तर स्वामींना ज्ञात आहेच'' करुणास्वरूप पळनी स्वामींनी कण सिध्दांत सांगण्यास सुरूवात केली. ते म्हणाले, ''समस्त सृष्टी सुध्दा परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने, विद्युत शक्ति उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात. त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुध्दा आपल्या केंद्रबिंदुस अनुसरुन परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे. या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्त प्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळयांपेक्षाही सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळविणे जितके सोपे आहे, तितकेच कठीण सुध्दा आहे. प्रति कणाचे अनंत भाग केले असता, एक एक कणाचा भाग शून्यासमान होतो. अनंत अशा शून्यांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे. पदार्थ सृष्टी ज्याप्रकारे होते, त्याचप्रमाणे व्यतिरेकी पदार्थाची सुध्दा असते. या दोहोचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. पदार्थाचे गुणात सुध्दा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता, ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तिमध्ये असतात. गायत्रीमंत्र सुध्दा ह्या शक्तिमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु या मंत्रात चौथा पाद सुध्दा आहे. तो असा ''परोरजसि सावदोम'' चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते.
कुंडलिनी शक्ति चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे आहेत. चोवीस संख्येला गोकुळ असे सुध्दा नांव आहे. ''गो'' म्हणजे दोन ''कुळ'' म्हणजे चार. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही. ''परिवर्तनातीत'' असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते. आणि ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शविणारी आहे. श्रीपाद श्रीवल्लभाचे भक्तगण त्यांना ''दो चौपाती देवलक्ष्मी'' असे म्हणत असत. सर्व जीवांचा पतिस्वरूप परब्रह्मच आहे. म्हणून पतिदेव म्हणजे नऊ संख्या. लक्ष्मी म्हणजे आठ संख्या, दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून ''दो चौ पती लक्ष्मी'' याचा अपभ्रंश होऊन ''दो चौपाती देवलक्ष्मी'' असा झाला. हे सर्व जीवांना 2498 या संख्येची आठवण करून देत असे. गोकुळामध्ये परब्रह्म पराशत्तिच् हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानेच आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुकेसमान आहे.'' स्वामी पुढे म्हणाले ''बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे.'' श्रीपाद श्रीवल्लभ पीठिकापुरम येथे मानवशरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्षे या प्रदेशात आले होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रुपात ते कुरवपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते येथे आले होते. त्या वेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील काही महायोगी बद्रीकेदार तीर्थ क्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते. ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांवर येऊन पडत. हे दृश्य आम्ही स्वत: नेत्राने पाहिले होते. पळनीस्वामीच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागले. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय ? ते कोठे मिळतात ? त्या फुलांनी पूजा केली असता श्रीदत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरुन कळाले. तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे.
ब्रह्मकमळाचे स्वरूप
माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळनीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पहात म्हणाले ''श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री विष्णुंच्या नाभीतील कमळाला सुध्दा ब्रह्मकमळ असेच म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते. अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असतांना सभोवतालचा परिसर अद्भूत सुवासाने भरून जातो. हिमालयातील साधक माहात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतुपासून वसंतऋतु पर्यंत हे बर्फामध्येच असतात. चैत्रमासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथ मधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुध्द पोर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते. हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिध्द पुरुषसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. योग सिध्दीतील विघ्ने नष्ट होतात. या कमळाच्या दर्शनाने योगी, तपस्वी, सिध्द पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्म कमळाचे दर्शन असते, त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते.''
श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले. ''बाबा शंकरा ! मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे. दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करवा. साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृत देहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे , अशी माझी आज्ञा आहे, असे सांगावे.''
श्री पळनीस्वामी बसलेल्या आसनावर समाधिस्त झाले. मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणित होतो. दर्शनास आलेल्या कांही भक्तांना तांदुळ, दाळ, पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते. ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरविले . सरपणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले. ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला. त्याच्या बरोबर एक भक्त सुध्दा होता. माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले , इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला. त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळानिळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला. दोघा तिघांनी मिळुन त्याला गुहे जवळ आणले. ते दृष्य पाहून मी घाबरून गेलो. काय करावे ते सुचेना. तेंव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पूरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरूवात केली. इतर भक्तांनी मला मदत केली. त्या खड्डयात तो मृतदेह ठेऊन मी आलो. तेवढयात तेथील गावातील कांही लोक एका सतरा आठरा वर्षाच्या, सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवची दुर्घटना, नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले. मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली. गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले. रोज स्वामींच्या दर्शनाला तीनचार लोक येत असत. त्यांना मी दर्शन घडवून आणित असे. असे दहा दिवस गेले. अकराव्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर श्री पळनीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा ! माधवा ! अशा हाका मारू लागले. मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली. स्वामींनी मला समजविले. त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले. तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलन वलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले. नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले, आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा ! माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून कुरुवपुरात असलेल्या श्री चरणांच्या सान्निध्यात आहे. कांही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे. ती कोणी ओळखू शकत नाही. काळ, कर्म, कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे. ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे. असे श्री पळणीस्वामी म्हणाले, स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृत देह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले ''माधवास दंश केलेल्या नागराजा ! श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळनीस्वामींच्या जवळ यावे.'' अशी साद घातली.
श्री पळनीस्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवडया काढल्या व त्या मृत देहाच्या चारी बाजूस ठेवल्या . थोडयाच वेळात त्या कवडया उंच उडाल्या व आकाशात चारी दिशानी गेल्या. पाच दहा मिनिटातच उत्तरे कडून एक साप आला. स्वामींच्या चार कवडया त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. त्यामुळे तो त्रस्त होऊन फुस, फुस असा ध्वनी करीत होता. स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता. तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले. श्री पळनीस्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांना मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या पद कमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला.
श्रीदत्त भक्तांना अन्नदान केल्याचे फळ
श्री पळनीस्वामी म्हणाले ''अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. तिने आयुष्यात थोडे पाप, थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्तभक्ताला जेवू घातले होते. हा पुण्याचा भाग होता. यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाले, ''तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलेस, त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे. तुला पाप प्रथम भोगायचे आहे का पुण्य फल ? ती स्त्री म्हणाली, ''थोडे आहे ते मी प्रथम भोगते.'' त्याप्रमाणे तिला पापयोनीत-सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे. ती स्त्री, मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता. तिच्या पूर्व पुण्याईनेच माधवास तिने दंश केला होता. माधव मात्र पूर्व जन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता. कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली.
योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ
श्रीदत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोडया सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्रीदत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ति योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. अन्नाच्या थोडया भागाने मन बनते. अन्नदात्याचे मन, बुध्दि, चित्त, अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते. यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ति उत्पन्न होते. पुढे पळनीस्वामी म्हणाले ''इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष. ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमांनी चालत असते.''
श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा
श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारे आहे. त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे ! श्री चरणांच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरास कांही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा, दया, भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले. श्री पळनीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले. ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोडया वेळाने पाणी दिले.
नागलोकांचे वर्णन
माधव पुनर्जिवित झाल्याने. आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरूवात केली, ''मी सूक्ष्म शरिराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले. श्रीपाद श्रीवल्लभ आजानुबाहु आहेत. त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रति करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत असते. मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्ताना मी दिसत नव्हतो. श्रीवल्लभांनी ''कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा,'' अशी आज्ञा केली. मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागांतून खोलामध्ये गेलो. भूमीमध्ये खोलांत भुकेंद्राजवळ अनेक प्रासाद, वरांडे असल्यासारखे भासले. ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली. स्थूलता पहाणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात. माझ्या सारख्या सूक्ष्मरूआहे अशी खात्री झाली. स्थूलता पहाणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात. माझ्या सारख्या सूक्ष्मरूप धारित शरिराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. तेथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूपधारण केलेले होते. त्यांना इच्छा असलेले रुप धारण करण्याची शक्ति होती. त्यांना साधारणत: नागरुपांतच संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महा सर्पांना पाहिले. कांही सर्पांना हजार फणे होते. फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते. अन्य नाग योगमुद्रेत असल्यासारखे फणे उकलुन मौन मुद्रेत होते. आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला हजार फणे होते. त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमहाविष्णूंसारखे शयन करीत होते. तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते. चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्रीदत्त प्रभुंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली.
श्री दत्तात्रेयांचा महामहिमा
तो म्हणाला ''श्री दत्तप्रभु नेपाळ देशात असलेल्या चित्रकुटातील ''अनसूया पर्वतावर'' अत्री अनसूयेच्या पुत्र रूपाने पूर्वयुगात अवतरले. ते अवतार न संपवता सुक्ष्मरूपात नीलगिरी शिखरावर, श्रीशैल शिखरावर, शबरगिरी शिखरावर, सहयाद्रीमध्ये संचार करीत असतात. त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योगमार्गाचा उपदेश दिला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगीरूपात दर्शन दिले. श्री दत्तप्रभु देश काळाहून अतीत आहेत. श्री प्रभूंच्या सान्निध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत. सगळेच नित्य वर्तमानच असते.''
अनघा समेत दत्तात्रेयांचे दर्शन
तो महासर्प पुढे म्हणाला,''बाबा ! माधवा ! आम्हाला ''कालनाग ऋषिश्वर '' म्हणतात. श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला. ते कांही वर्षे नदीमध्ये अदृष्य राहिले. त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही अनुचर, परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पहात होतो. परंतु ते आमच्या पासून लपण्याचा प्रयत्न करीत होते. ते आम्हाला माहीत होते. ते परत जलसमाधीत जाऊन थोडया कालांतराने (वर्षानंतर) वर आले. या वेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते. दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो. त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला. त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ति रूपिणी अनघालक्ष्मी देवी आहे, याचे आम्हाला स्मरण झाले. पुनरपि त्यांनी ह्या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्येचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला.''
श्री कुरुवपुराचे वर्णन
श्रीदत्तात्रेयप्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे हे आजचे परम पवित्र कुरवपुर आहे. ते जलसमाधीमध्ये असताना आम्हीसुध्दा आमच्या सूक्ष्मस्पंदनाने ह्या सूक्ष्मलोकांत योग समाधिमध्ये होतो. कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष ''कुरु'' महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरवपुरच हे पवित्रस्थळ आहे. बाबा ! माधवा ! ह्या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदिशेषास सुध्दा नाही.
सदाशिव ब्रम्हेंद्रांची पूर्वगाथा
श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला. त्या वेळी प्रभु अत्यंत करुणापूर्ण अंतरंगाने म्हणाले. ''वत्सा ! हे दिव्य भव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्य योगच आहे. तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योती रूपानेच अंतर्धान पावेल. तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. श्री पीठिकापुर सुध्दा माझे अत्यंत प्रियस्थान आहे. पीठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म, कर्म अत्यंत दिव्य आहे, ते एक गोपनीय रहस्य आहे. तू श्री पीठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठास्थळापासून पाताळात जाऊन, तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये.''
श्री पळनीस्वामी मंदहास्याने म्हणाले ''बाबा ! माधवा ! पीठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू. आपण सत्वरच स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावे. अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥