॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -४२
श्रीपाद प्रभू पीठिकापुरातून अंतर्धान
श्रीपाद प्रभूंचे माता-पिता, बापनाचार्युलू यांना दिव्य दर्शन
दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी शूद्राच्या घरी राहून दत्तदीक्षा दिली. दीक्षा विधीत केल्या जाणाऱ्या पूजा, अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास सांगितले. श्रीपाद प्रभूंनी दीक्षा घेणाऱ्याना सांगितले होते की ते स्वत:च दत्तात्रेय असून त्यांच्या स्मरण मात्रानेच भक्तांच्या पीडा, कष्ट निवारण होतात. या दीक्षेमध्ये शास्त्राची अवहेलना झाली असे कोणी समजू नये, असे प्रभू आवर्जून सांगत होते. परंतु पीठिकापुरम् मधील ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्या वेळी पीठाधीश असलेल्या शंकराचार्यांकडे या विषयीची माहिती तक्रारीच्या सुरात दिली. तसेच श्री बापनाचार्युलू आणि अप्पळराज शर्मा यांना ब्राह्मण कुलातून बहिष्कृत करावे, अशी सूचना सुध्दा ब्राह्मणांनी श्री शंकराचार्य स्वामींना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभू अंतर्ध्यानस्थ असल्याने ती चर्चा तेथेच थांबली. श्रीशंकराचार्याच्या अनुमती शिवाय अध्यात्मिक विषयात कोणताही बदल करता येणार नाही असा एक ठराव मान्य झाला. या संदर्भात सोळा वर्षाच्या बालकाने स्वत: दत्तप्रभूंचा अवतार असल्याचा निर्णय घेणे देवद्रोह केल्या प्रमाणे आहे असे मत अनेक ब्राह्मणानी व्यक्त केले. कांही ब्राह्मणांच्या मनात कपट असून सुध्दा ते वर वरची खोटी सहानभूती प्रकट करण्यासाठी बापनाचार्युलूच्या घरी आले. बापनाचार्युलू म्हणाले ''श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने दिपवीत आहेत. ते महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ बालरूपात आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करवून दिला. आमच्या नेत्रावर असलेला मायेचा पडदा त्यांनी दूर केला. आज ते आमच्या डोळयात किरण होऊन चमकत आहेत. त्यांच्या नयन मनोहारी, दिव्य दर्शनाने आम्हास भारावून टाकले आहे. आम्ही किती भाग्यवान आहोत याची गणतीच करता येत नाही.'' बापनाचार्युलूचे हे वक्तव्य ऐकून खोटी सहानभूती दर्शविण्यास आलेले ब्राह्मण एक शब्दही न उच्चारता तसेच परतले. त्यांच्या मनातील किल्मिष भाव पूर्ण पणे निघून गेला होता. थोडया वेळाने श्रीपाद प्रभू आपल्या घरी परतले. सुमती महाराणी, अप्पळराज शर्मा त्यांच्या बहिणी आणि भाऊ सर्वजण अत्यंत आनंदात होते.श्री अप्पळराज शर्मा म्हणाले ''श्रीपादाबद्दल आम्हाला या पूर्वी खूपच काळजी होती. परंतु आता आमच्या मनावरचे ओझे कमी झाले. आम्ही त्यांचे स्मरण केल्या बरोबर ते आमच्या मनोनेत्रा समोर प्रगट होतात. आम्ही मागितलेले सर्व कांही ते स्थूल रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात. श्रीदत्त प्रभूंना जन्म देणारे जननी-जनक झाल्यामुळे आम्हाला अत्यंत धन्यता वाटते. आम्हाला आता निरंतर आनंदाची प्राप्ति झाली आहे.'' एवढे बोलून अप्पळराज शर्मांनी आपल्या उपरण्याने डोळयातून ओघळणारे आनंदाश्रू टिपले. ब्राह्मणांनी जे गृहीत धरले होते त्याच्या पेक्षा येथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. वेंकटप्पय्या श्रेष्ठी सर्व ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले ''हे विप्रगण हो, आता पर्यंत आपण कांही क्षणांचा काळ श्रीपाद प्रभू बरोबर घालवत असू. परंतु या पुढे ते आपल्या मनोनेत्रात सदैव वास करणार आहेत. तसेच स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरीच निवास करणार आहेत.'' यानंतर नरसिंह वर्मा ब्राह्मणांना म्हणाले ''श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळया वरील मायेचा पडदा दूर केला. नित्य विनोद, दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आमच्या बरोबर उत्कट हास्य करीत आमच्या अवती भोवती असतील. पूर्वीपेक्षा अधिक उत्कटभावाने ते आम्हास स्थूल रूपात दर्शन देतील.'' श्रीपाद प्रभूच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कुक्कुटेश्वरातील दत्तभक्त संन्याशास आली. आणि त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. श्रीपाद प्रभू स्वयं साक्षात दत्तात्रय भगवान आहेत असे सुस्पष्टपणे सुचवून ते ध्यानस्थ झाले. श्रीपाद प्रभू एक वेगळे दैवत नसून त्यांचे उपास्य दैवत असलेले दत्तात्रेयच आहेत हे त्यांनी पटवून दिले. श्रीपाद प्रभूंचा विरोध करणारे कांही ब्राह्मण पीठिकापुरात होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता ''खरेच दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाच्या स्वरूपात अवतरले का ? हे जर खरे असेल तर आपण त्यांना त्रास देणे केवळ कठीणच नाही तर अशक्य सुद्धा आहे "
दत्तात्रेय प्रभून्चा स्वभाव फार वेगळा आहे ते स्वत: त्रास सहन करून, अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचा उध्दार करतात. हा त्यांचा स्वभावविशेष आहे. पीठिकापुरम् मधील अनेक ब्राह्मणांनी श्रीपाद प्रभूंना ब्रह्म रथात बसवून शोभा यात्रा काढली होती. मोठी धनराशी सुध्दा दक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली होती. दत्तदीक्षा देणारे संन्यासी केवळ गुरुदक्षिणा मिळावी या उद्देशाने दीक्षा देत होते. त्यांनी ते एक धनार्जनाचे साधनच केले होते. दीक्षा झालेल्या साधकांची इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असे संन्यासी सांगून मोकळे होत. इच्छा, आकांक्षा पूर्ण झाल्यास ते दत्त दीक्षेचे फळ आहे असे ते संन्यासी सर्वांना सांगत असत. त्या संन्याशाच्या मनात श्रीपाद प्रभूं बद्दल सदैव भिती असे. त्याना वाटे श्रीपाद प्रभू आपल्या दिव्य लीलांनी त्याचे सत्यस्वरूप सर्व लोकासमोर आणतील. त्यावेळी कुक्कुटेश्वर मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला. त्याचे नांव नरसिंह आणि गोत्र काश्यप होते. तो दूर असलेल्या महाराष्ट प्रांतातून आला होता. त्याने कुक्कुटेश्वराचे दर्शन मोठ्या श्रध्दाभावाने घेतले नंतर स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. त्या वेळी त्याला तेथे दत्तदीक्षा दिली जात असल्याचे कळले. दीक्षा देणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्याकडे तो वृद्ध ब्राह्मण गेला. त्याने त्या संन्याशाना मोठ्या नम्र भावाने नमस्कार करून गुरुदक्षिणेच्या रूपात त्याने आणलेली नाणी दिली. ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले. त्यांनी दीक्षा घेण्यासाठी त्या ब्राह्मणास आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितली. त्याच्या हातावर कमंडलुतील पवित्र जल घालण्यासाठी संन्याशाने आपला कमंडलु उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले. परंतु आश्चर्य असे की कमंडलुतील जलाबरोबर एक विंचु ब्राह्मणाच्या हातावर पडला. त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला. संन्याशाने हातातील पाणी पिण्यास सांगितले आणि म्हणाला ''अहाहा ! तू अनेक वर्षापासून केलेल्या तपश्चर्येचे फळ आज मला अर्पण केलेस.'' तेवढयात तो ब्राह्मण विंचवाच्या दंशाने जोरात ओरडला. मंदिरात असलेल्या कांही ब्राह्मणांना विंचवाच्या दंशाचा दाह कमी करण्याचा मंत्र येत होता. तो त्यानी घातला परंतु त्याने दाह कमी झाला नाही. या वेळी तो संन्यासी घाबरून देवळातील एका कोपऱ्यात लपून बसला. दाह कमी होण्यासाठी अनेक मंत्र जप केले, कुक्कुटेश्वराला अभिषेक करण्यात आला. स्वयंभू दत्तात्रेयांना विशेष कर्पूर आरती करण्यात आली परंतु कशाचाच काही उपयोग झाला नाही. ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडून होता. त्याच्या मुखातून फेस येत होता. हा फेस पाहून कांही लोकांना वाटले की ब्राह्मणास साप चावला असेल. परंतु कांही ब्राह्मणांनी त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हातावर कमंडलुतील पाण्याबरोबर पडलेला विंचु पाहिला होता. ब्राह्मणाचा दाह कमी करण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु उपयोग झाला नाही या सर्वासाठी संन्यासीच कारणीभूत असल्याचे सर्वाना वाटले. ब्राह्मणास होणाऱ्या वेदना न सहन झाल्याने तो थोडा वेळ गडबडा लोळत होता व नंतर मूर्छित झाला.
थोडया वेळाने ब्राह्मण शुध्दिवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला उचक्या लागत होत्या. तेवढयात तेथे एक शेतकरी आला. तो त्या वृद्ध ब्राह्मणास म्हणाला, ''आमच्या कुलातील व्यंकय्या नांवाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तींनी श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता दिल्या आहेत. त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रध्दा भावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्राक्षता हातात घेऊन थोडया आपल्या मस्तकी धारण केल्या. आणि आश्चर्य असे की कांही क्षणातच ब्राह्मणाच्या साऱ्या वेदना नाहिशा झाल्या व तो पूर्ववत् स्वस्थ झाला. या सर्व प्रकाराने लोकांचा संन्याशा वरील विश्वास उडाला. सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्या कडून परत घेतली आणि त्या संन्याशाला पीठिकापुरम् मधून हाकलून दिले. संन्याशाकडून परत घेतलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी बापनाचार्युलूंना विचारले, तेंव्हा ते म्हणाले, ''त्या द्रव्याने अन्न सामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे. अन्नदानामुळे श्रीदत्त प्रभू प्रसन्न होतील. वेगळी दत्त दीक्षेची गरज नाही.'' बापनाचार्युलूंच्या सांगण्याप्रमाणे कुक्कुटेश्वराच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला. तेथे मोठ्या प्रमाणात अन्नसंतर्पण झाले. भोजनोत्तर सर्व लोकांनी ''दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा'' या दिव्य नामाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्य वाणी श्रीपाद प्रभूनी पूर्वी केली होती.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"