Friday, May 17, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -39

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -३९
नागेंद्र शास्त्रींबरोबर
मी कालनाग मण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरवात केली. श्री पीठिकापुरम क्षेत्रास केंव्हा पोहचेन अशी मनाला तीव्र ओढ लागली होती.
कालनागाचे स्वरूप
प्रवासात असतांना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले. त्या ब्राह्मणाचे नांव नागेंद्रशास्त्री असे होते. तो मंत्रशास्त्रविद्येत अत्यंत निपुण होता. त्याच्या घरात अनेक नाग, साप निर्भयपणे फिरत होते. ते कोणाला चावत नसत. नागेंद्रशास्त्री या नाग, सर्पाना आपल्या अपत्या प्रमाणे संभाळीत असत. ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत. दिव्य नागांना मणी असतो. अनेक वर्षापासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे. त्याने ''कालनाग'' नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती.
नाग मण्याचा प्रभाव
नागेंद्रशास्त्री आम्हास म्हणाला ''हे बंधूनो, आजचा दिवस अत्यंत शुभदिवस आहे. आपल्या सारख्या थोर व्यक्तींचे चरण कमल माझ्या या कुटित विसावले. मी पंधरा वर्षाचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. पीठिकापुरम क्षेत्रातील कुक्कुटेश्वराचे मंदिर आणि पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले. मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्ती जवळ एक कालनाग पाहिला. त्यांच्या फणीवर एक मणी होता. कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात. कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षि प्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो. मानवांनाच नव्हे तर नागांना सुध्दा वेगवेगळया स्थिती असतात. साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही. कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यामध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ति असते. या नागमण्यामुळे अशुभ स्पंदनांचा लय होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटित होतात. त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते. मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात. जसे घरच्या लोकांचा विरोध, बांधवांचा, मित्रांचा विरोध, ऋण, बाधा, कन्येच्या विवाहास विनाकारण विलंब, कोणत्याही कामात समर्थता असून सुध्दा यशप्राप्ति न होणे इत्यादी. स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली. तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व कांही मिळाल्या सारखे होईल.''
श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा नागदोष निवारणार्थ नियम
मी नरसिंह वर्माच्या घराजवळून जात होतो. श्रीपाद प्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात लीला विनोद करीत होते. त्या बरोबरच झाडांना पाणी घालणे सुध्दा चालू होते. श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते. त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते. त्याला चांगले पाणी मिळावे या साठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातास श्रीपादांच्या पायाच्या ताम्र पादुका लागल्या. त्या बारा वर्षाच्या मुलाच्या, सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या. तितक्यात नागेंद्रशास्त्रीची हाक कानावर आली. मी आश्चर्याने त्यांच्या जवळ गेलो. नरसिंह वर्मा त्या पादुकांना शुध्द जलाने व नंतर नारळाच्या जलाने धूत होते. त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या पाद पद्माजवळ ठेवल्या . त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते. परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता. त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कुरवाळले. नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले. ते म्हणाले, ''नागेंद्र शास्त्री तू ''कालनागा जवळ'' असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पहात होतास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनाग ज्या दिव्य पादपद्माची आराधना करून त्याच्या दिव्य मण्याने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे. या दिव्य पादुका माझ्याच आहेत. त्याचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा. आधि-व्याधींनी पीडित जन तुझ्याकडे येतील. त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे. ते प्राशन करताच त्यांची व्याधींपासून सुटका होऊन ते त्वरीत शांत होतील.'' श्रीपाद प्रभूंनी नंतर नागदोष परिहारार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले. आणि म्हणाले, ''अहो नागेंद्रशास्त्री ! माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा. लोक कल्याणासाठीच नागशास्त्र विद्येचा उपयोग करा.''
दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ
श्रीपाद प्रभू म्हणाले ''हे नागेंद्रशास्त्री ! कालांतराने शंकरभट्ट, धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील. माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्य मणी नक्की प्राप्त होईल. तो पर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर. शरीर धर्माचा सुध्दा एक काळ असतो तसेच मनाचा, प्राणाचा एक काळ असतो. परंतु आत्मा मात्र कालातीत आहे. त्या त्या ग्रह नक्षत्राप्रमाणे तो तो काळ असतो. वृद्धी किंवा क्षय काळा प्रमाणे होत असतात. अनेक ब्रह्मांडाचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते. कांही काळ त्यांची एक स्थिती असते नंतर ते सर्व लय पावतात हा अंत म्हणजे काल महिमाच आहे. या प्रकारचा काळस्वरूप ही माझ्या आधीन आहे. माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो . भूत-प्रेत पिशाचादि महाशक्ति सुध्दा दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडवू शकत नाहीत. किंवा कांही वाईट करू शकत नाहीत. या सृष्टींत असलेल्या सर्व प्राण्यापेक्षा जास्त बलवान मीच आहे. माझ्याकडून बल प्राप्ति करून घेऊन जीवराशी वृध्दिंगत होतात. गर्वाने मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो. गर्वाला, अहंकाराला आणि सर्व अनिष्ट स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो. माझी आराधना करीत सर्वदा शांतीरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्यसंतुष्ट ठेवून आनंदरूप करतो.''
त्या महापुरुषांनी माझी वर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. श्री वर्मा हे स्वत: अन्नदाते आहेत. दत्तात्रेयांना सुध्दा अन्नदानाची खूप आवड होती. कोणताही जीव भूकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे. ते त्याच्या जेवणाची व्यवस्था करीत. ते सर्वभूत हितकारी होते. मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघालो होतो या स्थळी मी आश्रम उभारला होता. जो कोणी माझ्या कडे येई त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे. श्रीपाद प्रभू मला म्हणाले ''तुझी मंत्र शास्त्रविद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण. पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर. लोकांनी स्वेच्छेने दिलले तेवढे धन स्वीकार कर. अधिक धनाची अपेक्षा करू नकोस.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"