॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -४०
भास्कर शास्त्रीं,शंकरभट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव
आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करीत होतो. कधी पायी, कधी दोन बैलांच्या गाडीने तर कधी घोडा गाडीने असा आमचा प्रवास चालू होता. असा प्रवास करीत करीत त्रिपुरांतक क्षेत्री येऊन पोहोचलो. तेथे त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले. या ठिकाणी आम्हास अनेक दिव्य अनुभव आले. आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या. आम्ही प्रवास करीत असताना श्रीचरण सुध्दा आमच्या बरोबर प्रवास करीत असल्यासारखे भासत असे. आम्ही पाऊले टाकीत असताना ती पाऊले आमची नसून श्रीचरणच आमच्या शरीरात प्रवेश करून पाऊले टाकीत असल्यासारखे वाटे. आम्ही बोलत असताना सुध्दा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे. श्रीपाद प्रभूच आमच्या द्वारे बोलत असल्याचे जाणवे. आम्ही जेवण करीत असताना. ते आमच्या मुखानेच भोजन करीत असल्याचा भास होत असे. आमच्या शरीरातील मांस, रक्त नाडयामधून श्रीप्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे. शास्त्रातील, ''जीवात्माच परमात्मा आहे'' हा सिध्दांत आम्ही ऐकून होतो. परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभुंचेच चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसताना सुध्दा अनुभवास येत होता. या प्रकारची लीला आम्ही पूर्वी कधी पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती.
श्रीत्रिपुरांतकेश्वराच्या अर्चकस्वामींचे नाव भास्करशास्त्री असे होते. त्यांना आमचा फारच अभिमान होता. ते पीठिकपूरमला वास्तव्यास होते. अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ति झाली होती. ते षोडशी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते. श्रीपीठिकापूर निवासीनी, कुक्कुटेश्वर महाप्रभूंची स्वामिनी श्रीराजराजेश्वरी देवीने स्वप्नात त्यांना मंत्रदिक्षा दिली होती. आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथि म्हणून रहावे अशी आम्हास त्यांनी विनंती केली. आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते. त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या. त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले ''बाळानो तुम्ही केवढे धन्य आहात. या पादुकांची भास्करशास्त्री पूजा करीत असत. या पादुका सध्या ताम्ररूपात आहेत. भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने त्या पादुका कांही वर्षानंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील. हिरण्यलोकातील कांही महापुरुषांनी त्या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता. त्यानंतर त्या पादुका कारण लोकांत असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या. त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशिर्वाद देतो. त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशिर्वाद देतो. त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिध्दि मिळते. यानंतर या पादुकांची अठरा हजार महासिध्द पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन माझ्या जन्म स्थानी पीठिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून जमीनीच्या तीनशे फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील. तेथे स्वर्णमय कांती असलेले दिव्य नाग माझी दर रोज अर्चना करतील. याच्या समवेत चौंसष्ट हजार योगिनी असतील. त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील. मी तेथे ऋषी संघटने बरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवीन. या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृष्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पीठिकापूरम आहे. हे योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभविता येते. माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहेत त्या ठिकाणीच पीठिकापुरम प्रतिष्ठापित होईल. यासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात रहा. भविष्यात अनेक चित्र-विचित्र घटना घडणार आहेत. माझ्या महा संस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यासारखी रांग लागेल'' ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो. अंगावर रोमांच दाटले, नेत्रातून अश्रूपात होऊ लागला. अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो ते कोणालाच कळाले नाही. श्रीभास्कर शास्त्री षोडशी राजराजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते. मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली.
श्री राजराजेश्वरी देवी विवेकाची खाण
ते म्हणाले,''हे बंधुनो, राजराजेश्वरीच्या चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन यापुढे विशाल सीमा ओलांडून पलिकडे जाणार आहे. राजराजेश्वरीच्या शुध्द आचरणाने आपले सर्वसाधारण मन मेधा शक्तीत परिवर्तित होईल तसेच आपली बुध्दि विवेकपूर्ण होण्यासाठी ती महामाता आपणास सहाय्य करेल. आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मुलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल.साधारण पणे शक्ति आणि विवेक एकाच व्यक्तीत एकत्रित दिसत नाहीत. परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ति आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तिमध्ये नांदतात. दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात ती समजण्याची बुध्दी या देवीकडून आपणास प्राप्त होते. विश्वातील विशाल भावांची वृद्धी करण्यास श्रीराजराजेश्वरीदेवी आपणास मुक्त हस्ताने सहकार्य करते. अत्यंत अद्भूत असे दिव्य ज्ञान मिळविण्यासाठी, शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती , मिळविण्यासाठी, विश्वातील महान कार्ये सफल होण्यासाठी, तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे. श्रीराजराजेश्वरीदेवी अनंत अशा विवेकाची खाण आहे. तिने कांही जाणण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते. तिला अगम्य असे या विश्वात काहींच नाही. सर्व विषय, सर्व जीव, त्यांचे स्वभाव त्यांना हलविण्याचे सामर्थ्य, या प्रपंचातील प्रत्येक धर्म, त्याला संबंधित योग्य असा काळ, या सर्व गोष्टी राजराजेश्वरीदेवीच्या स्वाधीन असतात. तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते. तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेषभावना नसते. साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्याना ती विश्वास पात्र समजून स्वत:च्या अंतरंगात स्विकारते. ही राज राजेश्वरीची शक्ति वाढवून साधक त्यांच्या विवेक बलाने विरोधी शक्तींचे निर्मूलन करू शकतात. ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते. ती विश्वात कुणाबरोबरही अनुबंध न ठेवता म्हणजे असंगत्वाने आपले कार्य करीत असते. ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावा प्रमाणे, गरजे प्रमाणे आपला व्यवहार ठेवते . ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही. साधना पूर्ण झाल्यावर ती आपल्या भक्तांना योग्यतेप्रमाणे प्रगति पथावर चालविते. अज्ञानांना त्यांच्या अज्ञान मार्गानेच जाऊ देते. त्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालन पोषण करून त्याच्या अपराधा बद्दल त्याना क्षमा करते. ते चांगले वागोत अथवा वाईट वागोत ती त्यांच्या कडे दुर्लक्ष करते. तिची करुणा अनंत आहे. ती या संसाररूपी सागरातून तारून नेणारी आहे. तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहेत. राक्षस, असुर, पिशाच या सर्वानाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागविते तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृतच असतो. परमात्म्याने आज्ञापिलेला मार्ग ती कोणत्याहि परिस्थितीत सोडत नाही. ती प्रयोगात आणते त्या शक्तीचे ज्ञान केंद्र ती स्वत:च असल्याने आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपणास ''सत्यज्ञान बोध'' होतो. राजराजेश्वरी देवीची शक्ति प्राप्त करावयाची असेल तर आपणास कर्तव्य दक्षता, सत्यशोधन या सारख्या गुणाचा अवलंब केला पाहिजे. यामुळेच आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल. मी पीठिकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपाद प्रभूंच्या कृपेस पात्र झालो. तसेच त्यांच्या कृपाप्रसादानेच माझी राजराजेश्वरी देवीची दीक्षा सुफलित झाली. आज माझा दीक्षा दिन आहे. आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस तसेच अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस. श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पीठिकापुरमहून निघून संचार करण्यास जातील, हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा घेतला. हा महाप्रसाद घेऊन तुम्ही सुध्दा धन्य व्हा.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"