॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -४८
श्रीपादांचे स्त्री, पुरुषाना संबोधन
श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पाऊले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे. त्या पद्मावर श्रीपादांच्या पाऊलांचे चिन्ह उमटत असे. ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुध्दिला न उलगडणारे एक कोडेच होते. एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुध्दा एक अद्भूत विषय होता. थोडे दिवस हे सर्व पहाणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादाची ती साधारण लीला वाटू लागली. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत. सायंकाळ पर्यंत सत्संग चालू असे, नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पैलतीरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रध्दाभावाने त्यांचा जयजयकार करीत. रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहात. पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्या मध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे. प्रत्येक शुक्रवारी ते विवाहेच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशिर्वाद देत. महिलांना हळकुंड देत. श्रीपाद प्रभू स्वत:पेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना ''अम्मा सुमती'' अथवा ''अम्मा अनसूया तल्ली'' असे संबोधित त्यांच्या पेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना ''अम्मा वासवी'' किंवा ''अम्मा राधा,'' ''अम्मा सुरेखा'' अशा नावाने बोलवित. त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असलेल्या पुरुषांना ते ''अय्या'' किंवा ''नायना'' असे संबोधीत. त्यांच्या पेक्षा लहान असलेल्या मुलांना ''अरे अब्बी'' किंवा ''बंगारू'' या नावाने बोलावित. त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृध्दांना ''ताता'' असे बोलावित. वृद्ध स्त्रियांना ''अम्ममा'' असे संबोधीत.
श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार (सत्संग)
गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग, श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरुगड्डीस होइ तर कधी पंचदेव पहाडावर. रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत. त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेम कुशल विचारून त्यांच्या अडचणी, प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवित आणि अभयवचन देत. सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत. त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत. मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा बोध करण्यासाठी असे. यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाय योजना सांगत. बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे. गुरुवारी गुरुतत्त्वाबद्दल विवेचन असे. यानंतर भक्तांच्या आधि-व्याधि श्रीप्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा उपाय सांगत. या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वाना पोटभर सुग्रास भोजन असे. या जेवणाचे वैशिष्टय असे की श्रीपाद प्रभू पंगतीत स्वत: कांही पदार्थ वाढीत असत. कांही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत. त्यांच्या कडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे. शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत. आणि सर्वाना विधिपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत. शनिवारी शिवाराधना महात्म्याबद्दल बोध करीत. श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत. श्रीप्रभूंचे भक्त भाजीपाला, ज्वारी, रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेले धान्य आणीत. दररोज भक्तांना अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई, त्या दिवशी सर्व पदार्था बरोबर एक पक्वान्न केले जाई, ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात असे. श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मृदु होते. त्यांना भक्तांची दु:खे पाहवली जात नसत. त्यांच्या सत्संगात आलेला दु:खी श्रोता जातांना अत्यंत आनंदाने घरी जात असे. श्री दत्तात्रेयाच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तत्काळ अनुग्रह होत असे. अशी ही श्रीप्रभूंची माया कोटी मातेच्या प्रेमा पेक्षा अधिक असे. रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे. परंतु माझ्या बरोबर आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूनी राहण्याची सम्मति दिली. मला सुध्दा रात्री कुरुगड्डीस रहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले. दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्याचा आदेश दिला व अंतकाळापर्यंत तेथेच राहाण्यास सांगितले. स्वयंपाकाची भांडी घासणे, स्वयंपाक करणे, येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती. दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे. जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांना सुध्दा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे. ज्या वेळी शिजविलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील जल भोजन पदार्थावर सिंचन करीत. त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतर ही शिल्लक राहात. या प्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या. रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत. सकाळ होताच ते महाप्रभूंचा आशिर्वाद घेऊन स्वस्थानी जात. कांही वेळा हिमालयातून कांही योगी येत ते सुध्दा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत. त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत. या योग्यांना श्रीपाद प्रभु स्वत: जेवण वाढीत. श्रीपादांचे जेवण म्हणजे मूठभरच असे, ते वऱ्याचे तांदुळ असोत किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो. त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वत:चे पोट भरल्याची संतृप्ति प्राप्त होत असे. रविदास नावाचा एक रजक होता. त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते. परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुध्दा वाईट प्रवृत्ति त्याला त्रास देत होत्या. त्यांच्या निवारणासाठी श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला. श्रीपाद प्रभू सांगत असत की ''पितरांचे विधियुक्त श्राध्द केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ति मिळते. अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्म कर्मा प्रमाणे फळ भोगावे लागते. त्यात पक्षपाती दृष्टी नसते. आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही. माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल.'' कित्येक जन्माच्या पुण्य फळानेच श्रीपादाचे दर्शन लाभते. अशा आलेल्या संधीचा पुरेपुर फायदा करून घ्यावयास हवा. या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरुंचे दर्शन होणे कठीण आहे. या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये एक लाख पंचविस हजार महासिध्द पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्या द्वारेच या सृष्टीला सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो. श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिति, स्थिति आणि लय होत असते. भक्तगण जेंव्हा गुरुंना श्रध्दाभावाने नमस्कार करतात तेंव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वत:च्या गुरुंना पोहोचवितात. या प्रमाणे आपण आपल्या गुरुंना केलेला नमस्कार अनेक गुरुंना पोहोचतो. देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. प्रत्येक शिष्याला गुरुंचा आशिर्वाद लाभतो. गुरुंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ति होते. श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते.
हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्मांचे आचरण
कुरुगड्डीचा विशेष महिमा नित्यक्षेत्रा सारखा आहे. येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे. या क्षेत्रात अनेक देवता, महर्षी, महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात. येथे त्यांचे स्थान ठरलेले असते. हृदयामध्ये देवाचे नांव भरून, सदाचरणाने राहून विहित कर्म करीत रहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्य कर्म करून त्याचा कर्ताभाव स्वत:कडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पैलतीरी जाईल.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"