🌹 *श्रीदत्तात्रेय नमस्काराष्टक* 🌹 ज्याच्या कृपेचा मज लाभ झाला । जन्मान्तरीचा गुरुराज आला । श्रीदत्त ऐसा मज बोध केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला । नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ १ ॥ अखंड माझ्या हृदयांत आहे । सबाह्यदेहीं परिपूर्ण पाहे । टाकूनि मजसी नाहींच गेला । विसरु कसा मी गुरुपादुकाला । नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ २ ॥ स्वरुप माझे मज दाखविले । देहीच माझे मज हीत केले । ऐसा जयाने उपकार केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला । नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ३ ॥ संसारव्याळे मज डंकियेलें । परमार्थ बोधे विष उतरिले । माझ्यावरी हा उपकार केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला । नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ४ ॥ शुकादिकांला सुख प्राप्त झाले । तसेंच तू रे मजलागि दिलें । माता पिता तूं बंधूहि मजला । विसरु कसा मी गुरुपादुकाला । नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ५ ॥ निजात्मरंगे मज रंगविलें । स्वानंदलेणें मज लेववीले । बोधोनि ऐसा परिपूर्ण केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला । नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ६ ॥ सुखात्मडोही मज बूडविलें । घेवूनि हस्तें सुख दाखवीले । विवेक पूर्ता भवताप गेला । विसरु कसा मी गुरुपादुकाला । नमस्कार माझा श्रीदत्तात्रेयाला ॥ ७ ॥ नमस्काराष्टक संपूर्ण ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"