Wednesday, April 17, 2019

*श्री दत्तात्रेय-गोरक्ष संवाद*

*श्री दत्तात्रेय-गोरक्ष संवाद* 

श्रीशैल ह्या नावाचा अर्थच मुळी "देवीचा पर्वत" असा आहे. तेथील ज्योतिर्लिंगही  प्रसिद्धच आहे. जटाजुट, भस्म, रुद्राक्ष अशी त्यांची अवधूतमूर्ती वैराग्याचे साक्षात प्रतीक. त्रिदेवांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांनी आपल्या मातेला अजपा साधनेचा उपदेश केला होता. गोरक्षनाथांनी गौरवलेली "न भूतो न भविष्यती" अशी ही सहज सोपी, कोणालाही करता येण्यासारखी पण अत्यंत प्रभावकारी साधना सर्वच योगसाधकांनी आचारावी अशी आहे. श्रीशंकराने दत्तात्रेयांच्या हस्ते मच्छेंद्रनाथांच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची गुढी उभारली. त्यामुळे दत्त संप्रदायाबरोबरच नाथ संप्रदायातही दत्तात्रेयांना मानाचे स्थान आहे. अशी मान्यता आहे की सिद्ध गोरक्षनाथ आजही दत्तसेवेत आहेत. याच विषयीची एक कथा पाहू.
स्त्री-राज्यातून मच्छिंद्रनाथांची सुटका केल्यावर मच्छिंद्र-गोरक्ष ही गुरू-शिष्यांची जोडगोळी नाना ठिकाणची भ्रमंती करत होती. एके दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचा मुकाम एका पर्वतावर होता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. जवळपास गावही दिसत नव्हते. भिक्षा मागायला जाणार कुठे या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावाती राणीचे बोल आठवले. स्त्री-राज्यातून निरोप घेताना तीने "कधीही भिक्षा मागायला या" असे सांगितले होते.  गोरक्षांनी योगसामर्थ्याने आपले भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री-राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने नाथाचे पात्र लगेच ओळखले आणि ती आश्चर्यचकीत झाली. तीलाही आपले शब्द आठवले आणि ही गोरक्षांचीच किमया आहे याची खात्री पटली. एवढ्याशा पात्रातली भिक्षा तीघांना (मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ) कशी पुरणार अशी काळजी वाटून तीने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढी भिक्षा घालावी तेवढे ते पात्र 
मोठे मोठे होत होते. अगदी मारूतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी अहंकार सोडून मनातल्यामनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. तक्षणी पात्र पूर्ण भरले आणि परत अवकाशमार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले.
वाटेत एका पर्वतावर अत्रिपुत्र दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे हे भिक्षापात्र पाहिले. त्यांना विस्मय वाटला. हे कोणाचे पात्र आहे ते विचारावे या हेतूने त्यांनी हातातला दंड वर केला. पात्र घेवून जाणारी सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दतात्रेयांनी तीला ठावठिकाणा विचारला आणि पुढे जाण्याची अनुमती दिली. सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षांनाथांकडे पोहोचली आणि म्लान वदनाने उभी राहिली. गोरक्षनाथांनी तीला उशीर होण्याचे कारणं विचारले. सिद्धीने झालेला सर्व प्रकार कथन केला.
आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले हे एकून गोरक्षनाथांचा क्रोध अनावर झाला. आपल्या योगसामर्थ्याचा अपमान करणाऱ्याला शासन करायला ते त्या पर्वतावर पोहोचले. गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. पर्वतावर दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन दातात्रेयांवर झेप घेतली. पण अघटीत घडले. गोरक्ष दत्तात्रेयांच्या शरीरातून त्यांना काहीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली तरी ते जसे अभेद रहाते अगदी तसे. गोरक्ष विस्मयचकीत झाले. दत्तात्रेयांनाही गोरक्षांची परीक्षा पहावी असे वाटले. ते गोरक्षनाथांना म्हणाले, "गोरक्षा! तुझ्या सिद्धींविषयी मी बरेच ऐकून आहे. तु सिद्धांचा सिद्ध आहेस असे ऐकले आहे. तुला ब्रह्मांडसमाधीचा अनुभव आहे म्हणे. जरा पंचतत्वात लीन होवून दाखव बरे. बघूया तुला शोधता येतय का ते."
गोरक्षनाथ अवश्य म्हणत तेथून गुप्त झाले आणि समुद्रात एक छोटा मासा बनले. दत्तात्रेयांनी ध्यान लावले आणि क्षणात गोरक्षांचा ठाव शोधला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते गोरक्षनाथांना म्हणाले, "आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास तर तू खरा सिद्ध. मग माझे सर्वस्व तुला दिले असे समज."
गोरक्षाने होकार देताच दत्तात्रेय अदृश्य पावले. गोरक्षाने चौदा भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व शोधले पण दत्तात्रेय काही त्यांना सापडले नाहीत. आपण हरलो असे लक्षात येऊन गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा धावा केला. मच्छिंद्रनाथ तात्काळ पर्वतावर प्रकट झाले. गोरक्षांनी झालेली हकीकत सांगितली. ती एकल्यावर मच्छिंद्र म्हणाले, "गोरक्षा! हा नक्कीच अत्रेय आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की तू लीन भावाने पंचतत्वात विलीन झालेल्या दत्तात्रेयांना मनोध्यानाने शोध." गुरू आज्ञेनुसार गोरक्षांनी तसे करताच दत्तात्रेयांचे दिव्य स्वरूप त्यांना दृगोचर झाले. "अलक्ष" शब्द गर्जून गोरक्ष त्यांना "आदेश" करते झाले आणि म्हणाले,
अलक्ष दत्तात्रेय अवधूत । तू निरालंब मायातीत॥
अध ऊर्ध्व अजपा जपत । अलक्षलक्षी जागसी॥
अलक्षचिन्नभी चिदद्वयचंद्र। तो अमृत स्त्रवे निरंतर॥
कोटी विद्युल्लता चंद्र भास्कर। अलक्षलक्षी जागसी॥ 
अलक्ष इडा पिंगला शुषुम्ना। मनोन्मन ध्यानधारणा॥
सहजसमाधी मनोपवना । अलक्षलक्षी जागृत॥
अलक्ष शुन्यभूवन श्रुत। ते सहस्त्र्दळहारीनिवांत॥ 
भ्रमरगुहा गुंजारवीत। अलक्षलक्षी जागसी॥
अलक्ष मी आदिनाथ पौत्र। मच्छेंद्रगुरूचा वरदपुत्र॥
तत्प्रसादे निगममंत्र। अलक्षलक्षी जागृत॥
अलक्ष चित्तचैतन्यचिद्रस। तेथे संलग्न समरस॥ 
गोरक्ष चौपदी अविनाश। अलक्ष लक्षे लक्षी पै॥
गोरक्षाच्या या ओळखीवर दत्तात्रेय उद्गरले, "गोरक्षा! अजून ऐक..
"मी वेदशास्त्र अगोचर। मी लोकत्रयाहूनी पर॥ 
मी नव्हेची गा निर्जर। यज्ञादी वर्ण नव्हे मी॥
मज नसे कुळ गोत्र याती। मज स्वर्ग ना अधोगती॥
मी ब्रहमैव अरूपस्थिती। मी परमार्थ तत्व जाण पां॥
मी पर ना अपर। मी क्षर ना अक्षर॥
मी शब्द ना ओंकार। अकार उकार नव्हे मी॥
मी कृपण ना उदार। मी प्रकाश ना अंधकार॥
मित्र ना रोहिणीवर। चटवारश्रुंग नव्हे मी॥
मी कर्ता ना अकर्ता। मी भोक्ता न आभोक्ता॥ 
मी सत्ता न असत्ता। आर्ता पाता नव्हे मी॥ 
मी जाणता न अजाण। मी सेव्य ना शरण॥
मी कारण ना अकारण। ज्ञान अज्ञान नव्हे पै॥ 
मी पाप ना पुण्य। मी कुरूप ना लावण्य॥ 
मी अल्प ना अगण्य। धन्याध्यन्य मी नव्हे॥ 
मी श्वेत ना सावळा। मी रक्त ना पिवळा॥ 
मी नीळ ना सुनीळा। रंगावेगळा असे मी॥ 
मी ब्रह्मचर्य ना गृहस्थ। मी वानप्रस्थ ना सन्यस्थ॥
मी स्वस्थ ना अस्वस्थ। वृत्तस्थ कुटस्थ नसे मी॥ 
मी नसे स्थावर जंगम। मज नसे क्रिया कर्म॥ 
वर्णाश्रम धर्माधर्म। अनामा नाम मज कैचे॥
मी खेचरी ना भूचरी। मी चाचरी ना अगोचरी॥
मी अलक्ष नव्हे निर्धारी। पवन मन नव्हे मी॥
जागृत स्वप्न सुषुप्ती तुर्या। हेही भेद भासती वाया॥
मी नसेची मच्छेंद्रतनया। छायामाया रहित मी॥
दत्तात्रेयांच्या या उत्तरावर गोरक्ष देहभान विसरले. त्या अवस्थेतच मच्छेंद्रनाथांनी गोरक्षांचा हात दत्तात्रेयांच्या हातात ठेवला. द्वैत नावालाही उरले नाही. केवळ सोहम भाव भरून राहीला.

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र

बाल योगी भये रूप लिए तब, आदिनाथ लियो अवतारों। ताहि समे सुख सिद्धन को भयो, नाती शिव गोरख नाम उचारो॥
भेष भगवन के करी विनती तब अनुपन शिला पे ज्ञान विचारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
सत्य युग मे भये कामधेनु गौ तब जती गोरखनाथ को भयो प्रचारों । आदिनाथ वरदान दियो तब, गौतम ऋषि से शब्द उचारो॥
त्रिम्बक क्षेत्र मे स्थान कियो तब गोरक्ष गुफा का नाम उचारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
सत्य वादी भये हरिश्चंद्र शिष्य तब, शुन्य शिखर से भयो जयकारों । गोदावरी का क्षेत्र पे प्रभु ने, हर हर गंगा शब्द उचारो।
यदि शिव गोरक्ष जाप जपे, शिवयोगी भये परम सुखारो। को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
अदि शक्ति से संवाद भयो जब, माया मत्सेंद्र नाथ भयो अवतारों । ताहि समय प्रभु नाथ मत्सेंद्र, सिंहल द्वीप को जाय सुधारो ।
राज्य योग मे ब्रह्म लगायो तब, नाद बंद को भयो प्रचारों । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
आन ज्वाला जी किन तपस्या, तब ज्वाला देवी ने शब्द उचारो । ले जती गोरक्षनाथ को नाम तब, गोरख डिब्बी को नाम पुकारो॥
शिष्य भय जब मोरध्वज राजा,तब गोरक्षापुर मे जाय सिधारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
ज्ञान दियो जब नव नाथों को, त्रेता युग को भयो प्रचारों । योग लियो रामचंद्र जी ने जब, शिव शिव गोरक्ष नाम उचारो ॥
नाथ जी ने वरदान दिया तब, बद्रीनाथ जी नाम पुकारो। को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
गोरक्ष मढ़ी पे तपस्चर्या किन्ही तब, द्वापर युग को भयो प्रचारों । कृष्ण जी को उपदेश दियो तब, ऋषि मुनि भये परम सुखारो॥
पाल भूपाल के पालनते शिव, मोल हिमाल भयो उजियारो। को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
ऋषि मुनि से संवाद भयो जब, युग कलियुग को भयो प्रचारों। कार्य मे सही किया जब जब राजा भरतुहारी को दुःख निवारो,
ले योग शिष्य भय जब राजा, रानी पिंगला को संकट तारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
मैनावती रानी ने स्तुति की जब कुवा पे जाके शब्द उचारो । राजा गोपीचंद शिष्य भयो तब, नाथ जालंधर के संकट तारो।।
नवनाथ चौरासी सिद्धो मे, भगत पूरण भयो परम सुखारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥

दोहा

नव नाथो मे नाथ है, आदिनाथ अवतार । जती गुरु गोरक्षनाथ जो, पूर्ण ब्रह्म करतार॥
संकट -मोचन नाथ का, सुमरे चित्त विचार । जती गुरु गोरक्षनाथ जी मेरा करो निस्तार ॥

श्री नवनाथांच्या संजीवनी समाध्यांची माहिती

१) मच्छिंद्रनाथ समाधी: 
अहमदनगर-  पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे. तेथुन तीन कि. मी. अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि. मी. अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि. मी. अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे. तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरूनसुध्दा रस्ता आहे.
२) जालिंदरनाथ समाधी: 
अहमदनगर - पाथर्डी - पाटोदा - बीड या रोडवरून रायमोह गावात उतरणे. तेथुन ५ कि. मी. अंतरावर जालिंदरनाथ देवस्थान आहे. तसेच डोंगरकिन्ही मार्गेसुद्धा रस्ता आहे.
३) कानिफनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी रोड किंवा बीड - पाथर्डी - नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरणे व तेथुन दक्षिणेला ३ कि. मी. अंतरावर कानिफनाथ गड किल्ल्याच्या स्वरूपात आहे. गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य बारवा आहेत. त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे. आसपासचा परीसर निसर्गरम्य आहे.
४) भर्तृहरीनाथ समाधी: 
बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावे. तेथे भर्तृहरीनाथांचे भव्य समाधी मंदिर आहे. येथे नागपंचमील यात्रा भरते.
५) रेवणनाथ समाधी: 
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटे गाव, यालाच रेवणसिद्ध असेही म्हणतात. येथे नाथांच्या स्वयंभू दगडी चिरा आहेत. रेवणनाथांची दोन प्राचीन मंदिरे आहेत. दर गुरूवारी आणि अमावस्येला भरपुर गर्दी असते.
६) वटसिद्ध नागनाथ समाधी: 
हैद्राबाद - परळी रेल्वे महामार्गावर हे तीर्थक्षेत्र येते. लातुर जिल्ह्यापासुन २५ कि. मी. अंतरावर चाकुर तालुक्यात वडवळ हे गांव आहे. येथे वटसिद्ध नागनाथांची संजिवन समाधी आहे. येथे फार जुन्या पद्धतीचे मंदिर आहे.
७) गहिनीनाथ समाधी:
जालिंदरनाथ येवलेवाडीहून सरळ रस्त्याने डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गेकुसळंब मार्गेचांचोलीला जावे. किंवा बीड - पिंपळवडी - कुसळंब मार्गे चिंचोली, किंवा जामखेडहून चिंचोलीला जावे. येथे गहिनीनाथांचे भव्य असे प्राचीन समाधी मंदिर आहे.
८) गोरक्षनाथ समाधी:
सौराष्ट्रात काठेवाडी प्रातांत जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ सेवेत आहेत. राजकोटहून जुनागड अंदाजे १०० कि. मी. अंतरावर आहे. गिरनारहून द्वारकाधाम प्रभासपाटन तीर्थरूप  (सोरटी सोमनाथ) जाता येते. गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मुर्ती आहे. नेपाळ प्रांतात गुरू गोरखनाथ बसलेले आहेत. म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गुरखा म्हणतात. महाराष्ट्रामधे नगर तालुक्यात डोंगरगण या ठिकाणीही मंदिर आहे.
 *
श्री चैतन्य गोरक्षनाथ, गर्भगिरी पर्वत* 

अहमदनगर-वांबोरी रस्त्यावर डोगरगण येथुन मांजरसुंबा याठिकाणी गर्भागिरी पर्वतावर श्री गोरक्षनाथ गड आहे. या ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले होते. हिरवाईने नटलेल्या डोंगरावर नाथांचे सुंदर मंदिर आहे. येथे श्री गोरक्षनाथांची काळ्या पाषाणाची प्राचीन स्वयंभू मुर्ती आहे. याठिकाणी दरवर्षी कार्तिक शुद्ध ञयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा होतो. या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे. डोंगरगण सह महाराष्ट्रात विविध भागात हा सोहळा साजरा होतो. या दिवशी आपल्या घरी देखिल नाथांची पुजा करुण नाथकृपेचा लाभ आपण घेऊ शकता. या दिवशी आपल्या घरी श्री नवनाथांची प्रतिमा वस्ञाने स्वच्छ पुसुन केशरी गंध लावावा.फुले अर्पण करुण हार घालावा. त्यानंतर धुप व तुपाचा दिवा लावावा. नैवद्यासाठी मलिदा अर्पण करावा. प्रतिमा पुजा नंतर आसनावर बसुन एकाग्र चित्ताने "ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः" या मंञाचा १०८ वेळेस माळ जप करावा व नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील गोरक्षनाथांचा जन्मकथा असलेला ९ वा अध्याय वाचावा नंतर आरती करावी. गाईला नैवद्य द्यावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा शक्य असल्यास यथाशक्ती अन्नदान करावे.

श्री गोरक्षनाथांची जन्मकथा

श्री सदगुरु मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगालात चंद्रगिरी गावास गेले. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेले. त्यांनी अंगणात उभे राहून 'अलख' शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठले असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले.
सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गाईच्या शेणाच्या गोठ्यात  त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले.
बारा वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. ''मुलगा कुठ आहे?'' नाथांनी विचारले. ''मला मुलगा झालाच नाही.'' तिने सांगितले. ''खोट बोलू नकोस! मी तुला १२ वर्षा पूर्वी जे भस्म दिले होते त्या भस्माचे काय झाले?'' नाथांनी प्रश्न केला. ''मी ते गाईच्या शेणाच्या गोठ्यात टाकले. असे ऐकल्यावर नाथांना क्रोध येतो. त्यावेळी ती स्ञी नाथांची माफी मागते. योगीराज, मला क्षमा करा!''. त्यावेळी नाथ म्हणतात, मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली. त्यावेळी सदगुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात, ''हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये!''. ''गुरुराया, मी इथे आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा.''मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. व गाईच्या शेणाच्या राक्षेतुन जन्म झाला म्हणुन त्यांचे गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले. अस्त्रविद्येतही निपुण केले. 
योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेकमार्तंड, गोरक्षबोध, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत. गिरनारपर्वतातील श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. त्याच प्रमाणे उत्तरप्रदेश येथिल गोरखपुर जिल्ह्यात गोरक्षनाथांचे भव्य मंदिर आहे. 

गोरक्षनाथ नामस्मरणाचे प्रतिपादन

एकदा गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत एका गावामध्ये आले. गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते, तेथे ते थांबले. एक-दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी नाथमहाराजांकडे येऊ लागली. प्रतिदिन येण्या-जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली. लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले. प्रपंचातील अडचणी सांगू लागले. तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले. काही वेळा ते एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करुन अचंभित करत आसत.
एके दिवशी गावातील मंडळी जमली असता नाथ त्यांना म्हणाले, "बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही; म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे." त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले, "प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते; पण ते शक्य आहे का? माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत नाही. मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे. तिला औषधपाणी करावे लागते. या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते. अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू?"
नाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते हसून त्याला म्हणाले, "काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का ? आजपर्यंत आपण काळजी करत आलात, त्याने तुंमच्या समस्या दुर झाल्या का? तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही. हे कळूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की, आतापर्यंत केली तेवढी काळजी पुरे. काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले, तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते. भगवंत सर्वशक्तीमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. तो आपल्या भक्ताच्या मार्गातिल काटे अलगत दुर ककतो. यासाठी जास्तीतजास्त वेळ भगवंताचे नाम स्मरण चिंतन करावे आपला वेळ त्यात जास्तित जास्त घालवावा." हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली. व तो नाथांना नमन करुन त्यांना शरण गेला नाथांनि आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकली व त्याला त्याच्या विवंचनेतुन बाहेर काढले. पुढे त्या गावात काही काळ व्यतीत करुन भगवंत भक्तिची गोडी लाेकांत जाग्रुत करुन नाथांनी पुढे गमन केले.
तात्पर्य:- मनाचे समाधान जर टिकवायचे असेल, तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे. काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. यासाठी जास्तीतजास्त वेळ नामस्मरणात घालवावा.

      *सं.-अनुजा ठोसर*
           🙏🌹🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"