Monday, April 29, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -33

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -३३
रमणि आणि नरसिंहरायडु यांचा विवाह श्रीपादांनी स्वत:च करविला
आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली. ते म्हणाले,''बाबांनो तुम्ही येथून निघून श्रीपीठिकापुरास जावे. माझे मंगल आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.'' श्री महागुरुंची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही दोघे कृष्णा नदी पार करून पलिकडील तीरावर पोहोंचलो. तेथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली. नित्य श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत असत. श्री चरणांची चरण कमले तेथे पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि अत्यानंद झाला.
आम्ही पंचदेवपहाड या ग्रामास पोहोचलो. तेथे अल्पोपहार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत केले. खाण्यास मधुर फळे आणि गोड ताक दिले. त्याचे नांव नरसिंहरायडु असे होते. त्याने स्वत:चे घर शेतामध्येच बांधले होते व तो तेथेच रहात असे. एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. आम्ही त्याच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तेथे राहिलो. त्याने श्रीचरणांचे लीलावैभव सांगण्यास सुरुवात केली. ''बाबांनो माझे नांव नरसिंहरायडु आहे. मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो. माझे माता-पिता मी लहान असतानाच दिवंगत झाले. मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो माझी मामी फारच तापट स्वभावची होती. घरात भरपूर काम करावे लागे शिवाय शेतातील कामे पण करावी लागत. माझ्या मामाची एक मुलगी होती. तिचे नांव रमणि असे होते. तिचे सौंदर्य, पूर्ण गावातील आमच्या कुलस्थांच्या सगळया मुलीपेक्षा अपूर्व होते, ती सद्गुण संपन्न असून तिच्यात देवभक्ति होती. श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानीत असे. माझी मामी मला शिळे अन्न खाण्यास देत असे. हे तिला सहन होत नसे. माझा आहार फार स्वल्प होता. माझ्या बद्दल आदर असा घरात कोणास नव्हताच. कामाचा मात्र पहाडच असे. चोरून रमणि मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणुन देत असे. कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीस पडल्यास माझ्या बरोबर तिची सुध्दा पुजा होत असे. माझे मामा स्वभावाने फार चांगले होते, परंतु बायकोपुढे त्यांचे काहीच चालत नसे, तिच्या समोर ते असमर्थच होते. कधि-कधि माझी मामी आमच्या कुलस्थातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलावून मला मारायला सांगत असे. माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीने दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला. माझ्यापेक्षा वयाने लहान पण सशक्त मुलांसमोर सुध्दा मी असमर्थ असहायच वाटत होतो. ते माझी टिंगल करीत. अशा प्रकारे कष्टमय जीवन मी जगत होतो.''
आमची रमणि सौंदर्यवान असल्याने गांवातील आमच्याच कुलातील सगळया युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. परंतु तिला माझ्याशी लग्न करावयाचे होते. माझ्या जवळ पैसा अडका तर नव्हताच, शिवाय दुर्बल शरीर आणि भित्रा स्वभाव यामुळे ते कसे जमणार हा प्रश्न होता. आमचे मामा धनवान, श्रीमंत होते. ते स्वभावाने चांगले होते पण त्यांना पैशाची आशा फार होती. मामी दुष्ट होती, परंतु तिची स्तुती केली की, ती फसत असे. आमची रमणि कसेहि करून मीच तिचा पति व्हावा अशी श्रीकृष्णा जवळ दररोज प्रार्थना करीत असे. एकदा आमच्या गावांत एक ढोंगी साधु आला. तो कालीचा भक्त असून भूत, भविष्य आणि वर्तमानाचे त्याला ज्ञान आहे, असा साऱ्या गावात प्रचार झाला. त्याच्या जवळ भूत-भविष्य जाणण्याची विद्या होती. गावात त्याने सांगितलेले भविष्य शंभर टक्के खरे झाले होते. आमच्या मामीवर त्याने माया केली आणि तिला, घरात कालिपूजा करावी असे सांगितले. सगळी तयारी करून घेतली. त्याने रमणिची पूजेतिल कृष्णाची मूर्ति घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितले, त्या गोष्टीला मामीने होकार दिला. रमणि तळमळू लागली. विलाप करू लागली परंतु सगळे कांही व्यर्थ झाले. त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली. अनेक कोंबडयांचा बळी दिला, त्या कोंबडयांच्या रक्ताने सारे देवघर बघवेनासे झाले. घरात माणसाची कवटी आणि स्मशान साधन सामुग्री सुध्दा ठेवण्यात आली. ती पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके ठिकाणी विशेष अपार धनलाभ होईल. त्या संपत्तीने ह्या कुटुंबात एैश्वर्यसंपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी साधूने सर्वांना विश्वासात घेतले. त्या साधूस वशिकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या साहयाने आमच्या रमणिचे शील हरण करण्याचे त्याने योजिले. त्यासाठी तो चित्र-विचित्र पध्दतीच्या पूजा घरात करत असे, त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली. तिच्या वागणुकीत पण फरक पडला. अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करू लागली. कोंबडे बकऱ्या मारून तिला ते रक्त देण्यात येत होते. तिच्या अंगात कालिका मातेचा प्रवेश झालेला आहे. त्या मुळेच ती रक्त पिते. रक्ताशिवाय माता शांत होत नाही. आणि अपार संपत्तीपण मिळणार नाही. तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत् होईल असे त्या साधूने सांगितले. घरात बिभित्सपणाला उत आला होता. अचानक घरातील स्वयंपाक केलेले भांडे विहिरीत पडत होते. अर्ध्यारात्री घरात माणसांचे सापळे दिसत तसेच चित्र-विचित्र आकार दिसत आणि अक्राळ-विक्राळ आवाज ऐकू येत. आमचे घर स्मशान भूमिसारखेच दिसत होते. त्या साधूला घरातून पिटाळण्याचे धैर्य आमच्या मामा मध्ये नव्हते. हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ति मिळेत ह्या आशेने मामी दिवस काढीत होती. एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती. अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणि जवळ गेला. तिचे वशिकरण झालेलेच होते. ती सांगितल्यासारखे ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करील या विचाराने तो साधु तिच्याकडे आला आणि तिच्या अगदी समीप गेला. रमणि जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एक वजनदार वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला. ती असे वर्तन करेल असे तिला सुध्दा वाटले नव्हते. वशिकरण केल्यावर सुध्दा व्यक्ति अशा प्रकारे प्रवर्तन कसे करते याचा साधूला उलगडा झाला नाही.
श्रीपादांचे आर्त त्राण परायण तत्व
दुसरे दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेस आला. आमच्या घरी भूत-प्रेतांचे जास्त वास्तव्य आहे. हवे असले तर आपण त्यांना भिक्षारूपाने घ्या असे रमणि त्या ब्राह्मणाला म्हणाली. त्याला त्याने नकार दिला. त्या ब्राह्मणाचे मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्वल होते. आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले आमच्या घरची परिस्थिति अत्यंत चिंताजनक आहे, त्या परिस्थितिच्या कारक दुष्टशक्तीचा आपण दान म्हणून स्वीकार करावा. तेवढयातच मामी पण बाहेर आली आणि म्हणाली आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही. आमच्या घरचे दारिद्रय आपण भिक्षा म्हणून स्विकारावे. त्यावेळेस मी पण तेथेच होतो. मी म्हणालो,''स्वामी माझ्याकडे वंशपारंपारिक असलेले एक चांदीचे ताईत आहे. आपली सम्मति असेल तर तो ताईत मी अर्पण करतो ते भिक्षा म्हणून स्विकारावे.'' त्याचा त्याने स्वीकार केला. इतक्यातच ढोंगी साधू स्मशानातून माणसांचे कपाल घेऊन आला. तो अट्टाहासाने म्हणाला, अरे भिक्षुक ब्राह्मणा ! तू नाकारलेस तरी मी ह्या मानव कपालाची भिक्षा घालीन, तिचा स्विकार कर ! त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा अस्विकार केला. तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणिवर पडले आणि ती एकदम पूर्ववत् झाली. मामीला पक्षवात होऊन ती धरणीवर पडली. मामांना भितीने सर्वांगास कापरे भरले. मला मात्र विपरीत धैर्य आले. माझ्या शरीरात शक्तिचा प्रवेश होऊन माझे मलाच मी अत्यंत बलवान वाटू लागलो. त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला. त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचे एका मानवरूपात रूपांतर झाले. ते आर्तत्राण परायण, समस्त देवीदेवतास्वरूपी, आदि, मध्य आणि अंत रहित असलेले दिव्यभव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभच होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले ''कालिमाता खरे पहाता मानवात लपलेल्या कामक्रोधादि राक्षसांचा ध्वंस करते. ती कोंबडया, बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही. या प्राणमय जगातील राक्षसशक्तिच कालिकारूप धारण करून निरनिराळया प्राण्यांचे बळी मागते. खऱ्या खऱ्या कालिमातेची शुभलक्षणे प्रेम, शांती, दया वगैरे असतात.'' या प्राणमय विश्वातील राक्षसीशक्ति , असुरी शक्ति , भूत-प्रेतादी शक्ति , आम्ही देवता आहोत असे सांगून क्षुद्र विद्येचे प्रदर्शन करतात. क्षुद्र मांत्रिक त्यांची उपासना करून, या लोकांत भलतेच उपद्रव निर्माण करतात. या जगातील निरनिराळया प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करता येते हे लक्षात ठेवा पण त्या त्या देवतेची दैविशक्ति मात्र त्यांना नसते.'' श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असे मी वचन दिलेले आहे. त्याला अनुसरून धर्मसंस्थापनार्थ श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला आहे. हा अवतार दया, शांति, प्रेम, करूणा अशा अनंत शक्तींचे मिश्रण आहे. आमच्या घराची शुध्दी करून, ढोंगी साधूला पिटाळून लावले. श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली.
श्रीपादांनी आम्हाला आशिर्वाद देऊन, माझा आणि रमणिचा विवाह स्वहस्ताने केला. तेंव्हा ती जेमतेम 12 वर्षाची मूर्ति होती. श्रीप्रभूंचे वास्तव्य पीठिकापुरातच होते माया रूपाने ते पंचदेव पहाड या ग्रामात सुध्दा राहात. त्यांनी आम्हास ह्या अक्षता दिल्या होत्या, शंकरभट्ट आणि धर्मगुप्त या नावांचे दोघेजण येतील त्यांना थोडया अक्षता द्याव्या असे त्यांनी सांगितले होते. अहा ! किती लीलामय स्वरूप आहे श्रीवल्लभांचे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"