Tuesday, April 23, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -26

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -२६
कलीयुगाचे लक्षण
आम्ही प्रात:काळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीस गेलो. धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते. त्यांची कारुण्यामृताची वर्षा करणारी अमृत दृष्टी साऱ्या साधकांना एका अगळया वेगळया अध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती. प्रभूंच्या चरणकमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो. श्री धर्मगुप्तांनी, श्रीपादांना, कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले ''साधकानों, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे. सूर्याला कालात्मक असे सुध्दा म्हणतात. धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरुन धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात. ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टीकल्प असे म्हणतात. आणि उरलेल्या भागास प्रलय कल्प असे म्हणतात. पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धाभाग शुक्लपक्ष आणि अर्धाभाग कृष्णपक्ष असे असतात. संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात. संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात. या रहस्य विद्येला तारक राजविद्या असे म्हणतात. तारक राजयोगात शरिरालाच ब्रह्मांड मानतात. समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असे म्हणतात. या शिरस्थानात आचार विचार असतात. नाभीमध्ये विष्णुलोक असतो. आपल्या हृदयात रुद्रलोक असतो. पितृलोक आपल्या वीर्यकणात जन्युदेवता स्वरूपात वास करतात. या जन्युदेवतांचे कार्य असे की मानवाच्या गत जन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपध्दतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते.''
कलियुगाचे लक्षण
पितृदेवता म्हणजे आपले दिगंवत झालेले पूर्वज नव्हे. स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता-पिता, आजी आजोबा यांच्या नांवाने आपण केलेल्या श्राध्दपक्षाचे फळ स्विकारून त्याना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्युदेवताच असतात. या जन्यु देवतांना जन्म नसतो. योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतुंचे दर्शन करतात. एका वर्षात बारा पौर्णीमा आणि बारा अमावास्या असतात. हे चोवीस पर्वच गायत्रीचे चतुर्विशंती छंद असतात. कालस्वरूपी श्री विष्णु भगवानांना कांही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात. या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात. प्रत्येक महिन्याचे एक अक्षर या प्रमाणे बारा महिन्यांची बारा अक्षरे मिळून यांचा एक मंत्र तयार होतो.
नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य, पशु, संपत्ती यांची अपार हानी होणे, भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे, सूर्य, चंद्राची गती बदलणे, दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे, आकाशात ''धूमकेतू'' तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत. द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती. हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात.
म्लेंछ जातीचा आविर्भाव
जिकडे पहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार, यज्ञ यागादी तपस्या याचाच जोर सर्वत्र चालू होता. या कारणाने कलिपुरुषास अत्यंत दु:ख झाले. त्याने भगवंताची प्रार्थना केली ''हे प्रभो, पृथ्वीवर सगळी कडे यज्ञ, याग, धार्मिक आचरण, नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू. आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्यच वाटत आहे.'' कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगत्प्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखविले. म्लेंछ जातीचा मूलपुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखविले. त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले. वास्तविक पहाता ते स्त्री पुरुष भाऊ-बहीण होते. परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात काम भावनेचे बीज पेरले. आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरीत केले. ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ति अदृष्य झाली. कालांतराने या जोडीपासून कलिधर्मांच्या मूळ म्लेंछ जातीचा अविर्भाव झाला. द्वापारयुगाच्या अंति म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर म्लेंछ देशात म्लेंछ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रत्येक सर्गपर्वात कथन केले आहे. नीलांचल पर्वता जवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्य धर्मास दूषण लावणारी, अभक्ष्य भक्षण करणारी, दुराचारी अशा संततीची वृद्धी केली.
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''मी कल्कि अवतार घेऊन कोटयावधि अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरपि सत्य युगाची स्थापना करणार आहे. हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"