Thursday, April 11, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -15

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -१५
बंगारप्पा, सुंदरराम शर्मा वृतांत
मी (शंकरभट्ट) श्रीदत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरवात केली. रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो. पाणी काढण्यासाठी तेथे एक पोहरा सुध्दा होता. मी पाणी किती आहे ते पहावे या उद्देशाने आत डोकावले तेंव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले. विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ति वर खाली कोलांटी उडया घेत होता. त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला, ''अरे शंकर भट्टा !'' मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल. मी त्याला उत्सुकतावश विचारले, ''आपणास माझे नाव कसे कळाले.'' तो अपरिचित गृहस्थ म्हणाला ''नुसते नांवच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डीस जात आहेस हे सुध्दा मी जाणतो. तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पहात आहे.''
त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो. माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती. माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्य पुरुष म्हणाला, ''प्रापंचिक बंधाने संसार कुपात पडलेला मानव तू बंधरहित असलेल्या या विचित्र योगप्रक्रिये मधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढु शकणार ? माझा मीच उठेण . आपल्याला शक्ति कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करूणेने शक्तीचा अनुग्रह करतात.''
असे म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता. मी संभ्रमित झालो. तो म्हणाला ''माझे नांव बंगारअप्पा. तू तहानलेला दिसतोस, मी तुझी तहान भागवतो'' असे म्हणून त्याने त्या पोहऱ्याने भराभर पाणी काढले. आणि तो स्वत:च ते पाणी गटा गटा प्याला. परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्याला तहान मात्र माझी भागली. याचे मला आश्चर्य वाटले. नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला. त्याने बोलण्यास सुरवात केली, ''मी स्वर्णकार कुटुंबातील आहे. मी मंत्र तंत्रामध्ये प्राविण्य मिळविले होते. माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुध्दा मला अवगत होती. भूत-प्रेत, पिशाच्च यांच्या सहवासात सुध्दा मी राहिलो होतो. माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत. ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूत प्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत. माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पाऊन भूत प्रेतांची असलेली विकृत कळा, क्रूरस्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला. माझ्या संचारामध्ये एकदा पूर्व पुण्याईने पीठीकापुरम लागले. श्रीदत्त प्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या कुतंत्राला, परस्पर कलहाला काही कमी नव्हते. श्री बापनार्युलु आणि श्रीपादां विषयी अनेक चित्र-विचित्र गोष्टी मी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. मी सर्वात प्रथम बापनार्युलुंना मारून टाकावे असा विचार केला. मी एका ओढयाजवळ जाऊन ओंजळी ओंजळीने पाणी पीत होतो. मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते. त्या पैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी पिले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. मी त्या ओढयातील पाणी पीत असताना श्रीपाद प्रभु बापनार्यांच्या जवळ होते. श्रीपाद प्रेमाने बापनार्युलुच्या पोटावरून हात फिरवित तेंव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाई. मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापनार्युलुंवर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले. माझी विद्या का फळली नाही याचे मला दु:ख झाले.'
श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासकास शिक्षा
''मला एक सर्प मंत्र येत होता. त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे. मी बापनार्युलुंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प बापनार्युलुच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले. परंतु ते बापनार्युलुंना काहीच करू शकले नाहीत. दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले. माझा दुसरा प्रयत्न सुध्दा फसला होता. माझ्या अंकित असलेले भूत-प्रेत बापनार्युलुंच्या घराजवळ सुध्दा फिरकू शकत नाहीत. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले. एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही. मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणीकेची बाहुली करून त्याला बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात. एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा दुष्ट बेत माझा होता. परंतु हा प्रयत्न सुध्दा फसला. एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले. त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापनार्युलुंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्या कडे येऊन मलाच दंश करू लागले. श्रीपादांच्या पिठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचविल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असहय वेदना होऊ लागल्या, नरकयातनांचा अनुभव येऊ लागला. मी श्रीपाद वल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो. माझ्या अंत:दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. ते म्हणाले ''बंगारअप्पा ! तू केलेल्या महापापाला अनेक वर्षे इहलोकांत दु:ख भोगल्यानंतर नरकात सुध्दा दु:खाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे. तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुध्दा नाश करीत आहे. तरीपण, कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंत:दृष्टीस दिसल्यास तू स्वत: पाणी पिऊन त्याची तहान भागऊ शकशील. कोलांटी खात झुलणे ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ति करून घेशील. आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्विकार करून जगशील. माझ्या मातापित्यांच्या घरी किंवा श्री बापनार्युलुंच्या घरात पाय ठेवण्यास सुध्दा बहु जन्मांचे पुण्य असावे लागते. तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही. जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुध्दा त्याचाच आहे. माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात. त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो. तू आपल्या क्षुद्र विद्येने किती तरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ तुला शंकरभट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील. नंतर नि:शेष होईल. तो शंकरभट्ट माझे चरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते. ही घटना घडली तेंव्हा श्रीपादांचे वय सात-आठ वर्षाचे होते. त्या दिवसापासून मी तुझी वाट पहात आहे. आज माझा चांगला दिवस आहे.'' असे बंगारप्पा म्हणाले. ही घटना गोंधळात टाकणारी होती. नंतर मी असंमजस पणे म्हणालो, ''तुम्ही पाणी पिले तर दुसऱ्याची तहान कशी भागते. यातील मर्म काय ?'' त्यावर बंगारप्पा म्हणाले, ''एका योग प्रक्रियेने मी इतर जीवाच्या प्राणमय शक्तिमध्ये अनुसंधान साधतो. त्याद्वारे हे तादात्म्य भावनेने साध्य होते. रामायण काली किष्किंधा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रिये द्वारे त्याच्या समोर युध्दास आलेल्या योध्दयाच्या शक्तीच्या दुप्पट शक्ति प्राप्त होत असे. या कारणानेच श्री रामानी झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता.''
विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना बला, अतिबला नांवाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता. या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिध्दि करता येते. मानवाच्या शरीराच्या शुध्दी क्रमाच्या बारा अवस्था आहेत. श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता. श्रीपादांचा देह सुध्दा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ति , अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व सहजसिध्द असे आहे.
साधन मार्गातील सात भूमिकांचा विचार
मानव त्याच्या विकासात सप्त भूमिकेत असतो. पहिल्या भूमिकेत स्थूलदेहेंद्रिये, सूक्ष्मदेहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणू शकतो. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियांच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते. वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो. गौतम ऋषींनी अहल्येस शाप दिला तेंव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता. ती श्रीरामाच्या दर्शना पर्यंत त्याच स्थितीत राहीली. अहिल्येचे शरीर शिला स्थितीत गेले होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते. म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली. श्रीरामाची पायधुळ लागताच तीचे मनोपुष्प विकसित झाले. आणि ती स्वत:च्या सहज स्थितित आली. चवथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योग शक्ति लाभते. यासाठी आपल्या योग शक्तींचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधानुसार विनीयोग केला तर उच्चस्थिती प्राप्त होते. परंतु पाप कार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ति वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भिती असते. त्यानंतर अनेक हजारो जन्मा नंतर मानव जन्माला येता येते. पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात. सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात. संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्कारा बरोबर प्रापंचिक कार्यकलापसुध्दा चालवितात. भावज्ञानी साधकांना प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो. सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ति करून घेऊ शकतात.
अवतारी पुरुष व साधकातील भेद
बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात कांही संदेह निर्माण झाले त्यांचे निराकरण करण्यासाठी मी (शंकरभट्ट) प्रश्न केला ''महाराज, जीवनात केवळ परिणाम क्रम असतो का ? काय हे अवतारी पुरुषांना सुध्दा लागू पडते ?'' यावर बंगाराप्पा म्हणाले ''अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात. मानव जेंव्हा भगवंत होतो तेंव्हा त्याला समर्थ सद्गुरु असे म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. मच्छ पाण्यात वेगाने पोहू शकतो. कुर्म पाण्यात व जमिनविर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. वराह म्हणजे खड्गमृग भूमिवर सहजपणे चालू शकणारा प्राणी. सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी. नरसिंह अवतारात भगवान विष्णुनी सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते. याचना प्रवृत्ती असणारा तमोगुणप्रधान असलेला वामन अवतार. रजोगुण युक्त असलेला परशुराम अवतार. सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार. त्रिगुणांच्या अतीत असलेला, निर्गुणतत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार. कर्मप्रधान असलेला तो बुध्द अवतार. समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वत:मध्ये समाऊन घेणारा, अत्यंत अद्भूत, अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभावतार. श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध नसलेले योगसंप्रदाय, मते, धर्म, नाहीतच. श्रीपादांची स्थिती बुध्दीवानांना सुध्दा समजण्यासारखी नाही. त्यांच्या सारखे तेच आहेत. सर्व सिध्दांतांचा, सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे. या सृष्टीचा आदि बिंदु व अंतिम बिंदु सुध्दा तेच आहेत. स्पंदनशील असलेल्या जगद्व्यापाराचे निरीक्षण करणारे, संकल्प करणारे, क्षय करणारे तेच आहेत. हे गूढ असे देवाचे रहस्य आहे. सप्तऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगु ? बाबा ! शंकरभट्टा तू धन्य आहेस. त्यांचे अव्याज कारुण्य लाभेल तो धन्य होय. अन्य जीव व्यर्थ होत.
सत्कर्म व दुष्कर्मांचे फल विवरण
मी (शंकरभट्ट) विचारले ''महाराज मला एक शंका आली आहे. समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोडयाना चांगले थोडयांना वाईट असे जन्माला का घालतो ?'' त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसले व म्हणाले,''तू चांगला प्रश्न विचारलास. सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे. मृत्युचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुध्दा मुलावर प्रेम करणार नाही. वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे. पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही. तो देहाहून निराळा असून अजन्मा, अव्यक्त , अचिंत्य, आणि विकाररहित आहे. मानवात व प्राणीमात्रात एकच आत्मा वास करतो. मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे. या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो. देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ति असतात असे नाही तर कांही विघटनकारक, विनाशकारक शक्ति सुध्दा असतात. त्या त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलन-वलन सुव्यवस्थित चालविण्याचे कर्म देव करीत असतात.मनुष्यांच्या जन्मात सुख आणि दु:ख ही पूर्वकर्मानुसार येत असतात. दु:ख येत असल्याने मानवास सुखाचे महत्व कळते व तो सुख मिळविण्याचीच आकांक्षा करतो. सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट, कुकर्मी, नास्तिक, जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी, प्रामाणिक, सदाचारी सच्छील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते. अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुध्दा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मांत काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे. तसेच अत्यंत प्रामाणिक सच्छील, सज्जन लोक आज जी दु:खे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पाप कर्मांचे फलस्वरूपच. मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही, त्यास काही वेळ लागतो. परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते. चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते. समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट, दुराचारी लोकांकडून सज्जनांचा, संतांचा छळ होऊ लागतो त्या त्या वेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी, दुराचारी लोकांचा नाश करून, धर्माचे, संत सज्जनांचे रक्षण करतात.
हजारो वर्षापासून आकाशात तारे, ग्रह, चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे, सुव्यवस्थित नव्हत्या. कालांतराने या तारा मंडलातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले. अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले. पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. या ग्रहांच्या आकर्षण, विकर्षणानेच सृष्टी चलित आहे. ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते.
परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक अस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. ज्या लोकांमध्ये परमेश्वरा विषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतात. या दोन्ही प्रकारच्या कर्माना ते स्वत:च आधार असतात.
वेलुप्रभू महाराजांचा गर्वभंग
पीठीकापुरम या नगरीत वेलुप्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते. ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत. एकदा त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांना भेटण्याची इच्छा झाली. त्यानी आपल्या सेवकास अप्पळराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना तत्काळ घेऊन यावे. घरात स्वामींचे आजोबा बापनाचार्युलु होते. सेवकानी त्यांना राजाज्ञा सांगितली. आजोबानी स्वामीना सांगितले पीठीकापुरमच्या महाराजाने तुला भेटीस बोलावले आहे. श्रीपाद म्हणाले ''तात राजाच्या मनांत भक्तीभाव नाही. तो अहंकारपूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते. आपण म्हणू तसे झाले पाहिजे. परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही. मी महाराजांच्या भेटी साठी जाणार नाही.'' स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले ''तुमचे महाराज केवळ या पीठीकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजाना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वत: आपण आमचे घरी यावे. येतांना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटास शोभेल असा नजराणा घेऊन यावे.'' हे स्वामींचे वक्तव्य ऐकून, अप्पळराज व त्यांचे पिता बापनाचार्यलु यांनी आपसात विचार विनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले. सेवकांनी स्वामीचा निरोप राजास कळविला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले ''मी या नगरीचा महाराजा आहे. माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो'' एवढे वाक्य बोलताच भोवळ येऊन सिंहासना वरून खाली पडले. सारे सेवक सिंहासना जवळ धावले. त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची सर्व शक्ति गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक यातना होऊ लागल्या. तत्काळ राजपुरोहित श्रीकोटसुंदर शर्मा यांना बोलावणे पाठवले. त्यांनी महाराजाची परिस्थिती पाहून स्वत: श्री दत्तात्रेयांची श्रध्दा भावाने पूजा करून, तीर्थ प्रसाद महाराजाना आणून दिला व विभूती कपाळी लावली. राजपुरोहित म्हणाले, ''पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम. आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे. कारण ते स्वत:च श्री दत्त प्रभूंचे अवतार आहेत. त्यांच्या पूजेने लहान सहान सिध्दि प्राप्त होतात. बापनाचार्युलुना सुध्दा त्यांच्या मुळेच मंत्र सिध्दि प्राप्त झाली आहे. श्री वेंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिध्दि प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो. महाराज आपण बलवान असला तरी श्री स्वामीना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही.'' महाराज राजपुरोहिताला म्हणाले ''श्रीपाद श्रीवल्लभांनी कांही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हास त्रस्त केले आहे. यावर आपण कांही उपाय सुचवावा'' राजपुरोहित म्हणाले ''महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्त पुराणाचे पारायण करून घ्यावे. स्वयंभू दत्तात्रेयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान, सुवर्णदान, अन्नदान करावे. असे केले असता श्री दत्त प्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील.'' राजाने राजपुरोहितांच्या सांगण्या प्रमाणे विद्वान ब्राह्मणां करवी श्री दत्त पुराणाचे पारायण प्रारंभ केले. परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्या पासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले. महाराजांना त्या रात्रीच स्वप्नात आपले पितर दिसले. ते अगदी क्षीण अशक्त आणि दीनवाणे दिसत होते. ते म्हणाले ''अरे वेलू ! तू आम्हास श्राध्द भोजन देत नाहीस आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास कांही करीत नाहीस'' महाराजा म्हणाले ''तात ! मी शास्त्रानुसार श्राध्द कर्म करतो ना'' पितर म्हणाले ''परंतु ते आम्हाला काही मिळत नाही. ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रध्दायुक्त अंत:करणाने मंत्रोच्चारासह श्राध्द कर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ति होईल.'' पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुध्दा आली नाही. याच वेळी त्याची उपवर, सुंदर अशी कन्या भूत बाधेने पिडित होऊन, केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तु रागाने घरा बाहेर फेकू लागली. ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून देई. तिच्या अंगावरील कपडयांना एकदम आग लागे. अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूनी संकटानी घेरले. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली
राजास सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुध्दा अत्यंत शोचनीय झाली होती. त्याची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागली. त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले . त्याला जेंव्हा भूक लागली तेंव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा ठेऊन तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरवात केली. पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपऊन जेवण करून घरी येताच त्यांना घरी धुमाकूळ घालणारी भूत प्रेते दिसत होती. ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात. ती भूते ब्राह्मणाना म्हणत ''तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली. आम्हास आमच्या पतीपासून दूर करून आतोनात छळ केला. तुम्ही राजाने वाम मार्गाने मिळविलेले धन दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हास त्रास देतआहोत. ही सर्व परिस्थिती पाहून, ब्राह्मण, राज पुरोहित आणि स्वत: महाराज अगदी घाबरून गेले. त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना. अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्त पुराणाच्या पारायणामुळे सर्व दु:खे नाहिशी होऊन सुख प्राप्ति होईल असे वाटले होते. परंतु सारे कांही विपरितच घडले. त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला. महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले. ते सर्वजण स्वामीना शरण गेले आणि क्षमा याचना केली. क्षमाशील, दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंत:करणाने त्यांचे अपराध क्षमा केले. ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो. मी जेंव्हा प्रसन्न होतो तेंव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती जास्त फळ प्रदान करतो. परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो. मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे. कालाग्नी रूपात असलेले ते श्रीदत्तरूप माझेच आहे. मी जीवांच्या उध्दारासाठी या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलो आहे. श्रध्दायुक्त अंत:करणाने माझी भक्ति केल्यास मी प्रसन्न होतो. माझे आईवडिल सौ. सुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष श्रीलक्ष्मी आणि भगवान विष्णुच आहेत. माझे आजोबा एका जन्मामध्ये ''लाभाद'' महर्षि होते. माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला.''
मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्युलुंसारखा दिसेन. मी त्या अवतारात जेंव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्या वेळी भूत, प्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करीन. विपुल धन, दौलत शक्ति सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती ही सत्यमार्गानी मिळविलेली असावी. वाम मार्गानी मिळविलेली नसावी. वाम मार्गानी मिळविलेली संपत्ती दु:ख, क्लेश, अशांती, वैमनस्य, आपपर भावासच कारणीभूत होते. प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद श्रीवल्लभा, दत्तात्रेया, दिगंबरा, अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापाचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन. हे महाराजा तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले. श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्त पुराण या ग्रंथाचे पारायण करून सुध्दा त्याचे फळ न मिळता नुसती संकटेच झेलावी लागली. श्रीदत्त प्रभू स्वत: श्रीपाद श्रीवल्लभ .
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"