Wednesday, April 24, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -28

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -२८
श्रीपाद श्रीवेंकटेश्वर स्वामी आहेत 
विष्णु-महाविष्णु, लक्ष्मी-महालक्ष्मी, सरस्वती-महासरस्वति, 
काली-महाकाली यांच्या स्वरूपाचे वर्णन
तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्यका देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परम मंगल दिन होता. प्रात:काळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरुन चालत चालत पैलतीरावर पोहोंचले. आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पैलतीरावर आलो. त्यावेळी सकाळचे सात वाजले होते. तिरुमला महाक्षेत्रात श्री वेंकटेश्वर स्वामींची, श्री लक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चना इत्यादि स्वीकारण्याची ती शुभ वेला होती.
श्रीपाद श्रीवल्लभ, काल त्या शेताच्या मालकाने निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले. त्याच वेळी आम्हीसुध्दा गोशाळेत पोहोचलो. पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता. बघावे ते आश्चर्यच ! श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेज:पुंज होत होता. ते महातेज चारी दिशांना हळु हळु व्यापू लागले. त्या वेळी प्रभुंचे शरीर प्राकृतीक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तिप्रमाणे दिसत होते. थोडया वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले. सर्व साधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे. परंतु आज आश्चर्य घडले. त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती. चालतांना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत असत परंतु आज मात्र एक सुध्दा पदचिन्ह उमटले नव्हते. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढत होते. थोडयाच वेळात आमच्या दृष्टी समोरच श्रीपाद प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले. त्या सूर्यबिंबात आम्हास एका दिव्य शिशूचे दर्शन झाले. ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आम्हास काहीच दिसेनासे झाले. श्रीपाद प्रभु मंदहास्य करीत होते. त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यावेळी आम्हास पुनरपी सर्वकांही स्पष्ट दिसू लागले. आम्हाला सुध्दा त्यांनी सूर्याकडे पहाण्यास सागितले. आम्हास त्या लालबुंद सूर्य बिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्यतेज मूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्य वदनाने भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरपी काही दिसेनासे झाले. आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो. त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य केले तेंव्हा आम्हास पुन्हा सर्वकांही दिसू लागले. त्या बालिकेस श्रीपाद प्रभूनी अत्यंत प्रेमाने, आदराने उचलून घेतले. त्या वेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे व त्यांच्या सारख्याच दिसणाऱ्या त्या अजाण कन्येचे वय तीन वर्षाचे होते. तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केलेले असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणे सुध्दा घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत पुन्हा गेले. मी आणि धर्मगुप्त हे अद्भूत दृष्य अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पहात होतो. माझ्या मनांत शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना ? माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले ''अरे शंकरभट्टा ! हे कांही इंद्रजाल नाही. हा माझा स्वभावच आहे. ही माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पानेच ''भूमी'' ''आकाश'' होतात. माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. त्यावेळी निरनिराळी व्यक्तीत्वे निर्माण केली जातात. अदृष्य असलेली प्राकृतिक शक्ति साकार होते. सगुणरूपी सृष्टी व्यक्तिरूपाने साकार होते. मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे. या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णु स्वरूपाचे कार्य आहे. त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णु मीच आहे. सरस्वती आणि महा सरस्वती या दोघी वेगवेगळया आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी ''महा सरस्वती'' देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तुंची समृद्धी , धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचेच स्वरूप आहे. महालक्ष्मी, लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ति देणारे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्तिस्वरूप कालिका स्वरूपच आहे. ''महाकाली'' ही कालीस्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ति देणारे अनघा स्वरूपच आहे.''
अनघालक्ष्मीचे स्वरूप
अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्तस्वरूप होय. महासरस्वती, महालक्ष्मी, आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्वस्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा अविर्भाव. या कारणानेच अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तीन्ही रूपानी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे. या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्यशक्ति आहे. माझे अनघस्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून, या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ति रूपिणी अनघा, हिला माझ्या वामभागात धारण केलेले, असे माझे शक्ति स्वरूप आहे असे ध्यानात ठेव . त्रेतायुगातील ''सवित्रकाठचयन'' या यज्ञाचे फलस्वरूपच माझ्या भव्य दिव्य अशा ''अर्धनारीश्वर'' स्वरूपाच्या आधारानेच, पीठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला. आता तुम्ही पहात असलेले हे स्वरूप खरे पाहता, महालक्ष्मी महाविष्णूचेच स्वरूप आहे. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेले आहे. तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे. परंतु शक्ति मात्र तिघींची आहे. अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार, अतीत असलेली पराशक्ति स्वरूपच आहे. श्री वेंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला, विराटरूपी विष्णूला, प्रलयकाल रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेने धारण करून, त्यांचा आधार आणि त्याला अतित असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मायारूपी श्री पद्मावती वेंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असे समज.
श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो ''गुरु सार्वभौमांचा जयजयकार असो. आपण एकदा मी श्रीपद्मावती वेंकटेश आहे असे म्हणता. थोडयावेळाने मी अनघालक्ष्मी समवेत असणारा अनघ आहे असे म्हणता माझ्या मंदबुध्दिला याचा बोध होत नाही. आपण कृपा करून माझा उध्दार करावा.'' त्यावेळी दीनांचे नाथ सद्गुरु श्रीपाद प्रभू म्हणाले ''महालक्ष्मी आणि पद्मावती या मुलत: एकच तत्त्वाच्या आहेत. ती जेंव्हा महालक्ष्मी तत्त्व स्विकारते तेंव्हा माझ्यातून विष्णुतत्त्वाचा प्रादुर्भाव होतो. ती जेंव्हा पद्मावतीचे तत्त्व स्वीकारते तेंव्हा माझ्यातून तिचा प्रभु वेंकटेश्वर तत्त्वाचा अविर्भाव होतो. जेंव्हा जेंव्हा सगुण साकार तत्त्वांचा अविर्भाव होतो त्या, त्या तत्त्वांच्या मर्यादा, त्यांचे आचार आदि गोष्टींचे अचूक पालन करावे लागते. माझी ही दिव्य भगिनी, ही महाशक्ति कृष्णअवतारात योगमायेच्या रूपात अवतरीत झाली होती. नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली. आज तीच, श्रेष्ठ, तप:संपन्न अशा योगी, मुनी, महर्षी आदींच्या घोर तपस्येनेच वासवी कन्यका या रूपात प्रकट झाली आहे. कांही विशिष्ट कारणानेच मला पीठिकापुरम् येथे अवतार घ्यावा लागला. जे डोळयासमोर घडते ते पहात राहावे. माझे अवतारतत्त्व हे दिव्य, विनोदी लीला करण्यासाठीच आहे हे तुम्हास कळले असलेच. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''अरे शंकरभट्टा, या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचे, पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर. ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल . नाना शंका, कुशंकांचे त्यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल.'' या वक्तव्यावर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला. आम्ही आश्चर्य चकीत होऊन पहातच होतो तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा, श्री वेंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"