Thursday, April 25, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -29

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -२९
श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश
आम्ही कुरुगड्डीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्या समीप बसलो. तेंव्हा प्रभू म्हणाले ''अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. हे श्रोतेहो हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कोठेही होत असलेल्या, भूतकाळात घडलेल्या आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देश कालाचा शास्ताच आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्या बद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्मांचा परित्याग करून, तुमच्या अंतरंगातील अंतर्यामीरूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवन्मुक्त करीन. केवळ माझ्या शब्दानेंच मी सृष्टीमध्ये शासन करतो यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिध्दी पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपु सारखाच असेल. त्यांच्या समस्या, भाव आणि आचार-विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून हिरण्यकश्यपूसारखे वरदान सुध्दा सृष्टी मातेकडून मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप, निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवातर घ्यावा लागेल. यासाठी मी ''नृसिंह सरस्वती'' या नाम रूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिध्द होईन.'' एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हास सुध्दा ध्यानात बसण्यास सांगितले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"