॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -२२
गुरुदत्त भट्टाचा वृतांत -ज्योतिष्य शास्त्रा प्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू
गुरुचरण, कृष्णदास आणि मी (शंकरभट्ट) श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचे संभाषण ज्योतिष शास्त्राकडे वळले. मी दत्त महाशयाना म्हणालो ''महाराज, ज्योतिष्य शास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का ? फळात बदल करता येतो का ? मानवजीवनातील पूर्व कर्मे निर्देशित असतात ?'' यावर श्री दत्त गुरुदत्त भट्ट म्हणाले,'''भ' चक्र ही नक्षत्र कक्षा आहे. हिची सुरवात अश्विनी नक्षत्रा पासून होते. हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे. आणि रैवतपक्ष नांवाची दुसरी पध्दत्त आहे. रेवतीनक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही. अश्विनीनक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे. परंतु 1800 अंशावर असलेले चित्रानक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात सहा (6) ही राशी मिळविल्यास ती अश्विनी होऊन चैत्रपक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते. अश्विनीनक्षत्र ''तुरग मुखाश्विनी श्रेणी'' तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे. तोच 'भ' चक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे. कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हा अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत 1800 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्मनक्षत्र आहे. 1800 अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्तकेंद्रित करण्याचे कार्य करतो. मनुष्य, त्याचे पूर्वजन्म कृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसंपुटिने जन्माला येतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाहीत. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी, विविध स्पंदनाने त्या त्या काळी, त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात. अनिष्ट फळाच्या परिणामा पासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनाना दूर करावे लागते. हे आपण 1) मंत्र -तंत्राने 2) ध्यानाने आणि 3) प्रार्थनेने तसेच 4) योगशक्तीचे सहाय्याने साध्य करू शकतो. पूर्वजन्मकर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान कांही करू शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्य रेषा बदलून टाकू शकतात. या प्रमाणे आपली भाग्य रेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी कांही ना कांही चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितित हे साधणे कठीण आहे. सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्य कलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम, करुणा यांच्या महा प्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ति निस्तेज होऊन जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्यस्वरूप आहेत. योग्य वेळी प्रगट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे.
मी (गुरुदत्त भट्ट) अज्ञानी दशेत ज्योतिष्य शास्त्रातील महा पंडित समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगु भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानेच मला पीठिकापुरमला जाण्याची संधि प्राप्त झाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. माझे कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत. मी पादगया क्षेत्र असलेल्या पीठिकापुरम् मधील कुक्कुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो. भक्ति श्रध्दायुक्त अंत:करणाने देवतेचे दर्शन घेतले. मी ध्यानात बसलो असताना माझी अंत:वाणी स्पष्टपणे म्हणाली ''अरे मुर्खा तुला मरून किती दिवस झालेत ? तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवित आहेस. पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेऊन नवस पूर्ण करणार आहेस ? का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटविणार आहेस? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असे गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनविली होती. त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्तप्रभु सन्मुख असेन. मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले. नाडी चालत नव्हती. हृदयावर हात ठेऊन पाहिले ते सुध्दा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला. माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेत कळा आली होती. मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले. मला गर्व करण्यासारखे काय उरले होते ? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्च तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. स्वयंभु दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी, त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले. त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले. माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही, असे वाटले. देवता आनंद स्वरूप असतात. ते आनंदाच्या उच्च स्थितित असतात. माझी स्थिती फारच दु:ख दायक होती. माझा जीव अतिशय दु:खी होता. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात. माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता, जिवंत असल्या प्रमाणे निर्बंध स्थितीत हृदयस्पंदनाना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती. अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली. पाषण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता. पाषाणाच्या मूर्तीला नाडी स्पंदन, हृदय स्पंदन कोठे असते ? श्रीपादांना नाडी स्पंदन आणि हृदय स्पंदन आहे ना ? महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परम पवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्विकारून जातो. तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे. श्रीपाद महाप्रभूच मल्लादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास आले केवढे हे आश्चर्य ! काय ही वंचना ? असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो. त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतूल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो. असा मला मनापासून पश्चाताप झाला.''
मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. दहा वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले. ते गुरुदत्तभट्टाला पाहून म्हणाले ''ये रे ये, मूर्खा ! जिवंत असल्याचे नाटक करतोस. मृतवत् असलेल्या तुझ्या सारख्या मानवरूप पिशाच्चाला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेषधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का ? ते दत्तात्रेय कोण ते माहित आहे का ? ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे. त्यांचे नुसते नांव घेतले तरी राक्षस पिशाच्च गण थर थर कापू लागतात. ते दत्तात्रेय मीच आहे. तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो, तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुध्दा घेऊ शकतो. तू जिवंत असल्या प्रमाणे दिसत असलास तरी मृतवत आहेस, तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस. मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू. प्रथम तू तुझ्या विषयी सांग'' हे ऐकून मी (गुरुदेव भट्ट) गर्भगळित झालो आणि माझा थरकाप उडाला. इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या. त्या म्हणाल्या ''कृष्णा, कन्हैय्या हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे ? तू आत ये तुझी दृष्ट काढते.'' यावर श्रीपाद म्हणाले ''माते हा अजून अघोरी झालेला नाही. परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्याचा येणार आहे. त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे. आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे. श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला. श्रीपादांनी तो गुरुभट्टास दिला. आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले. गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळया जागेत बसून खाल्ला. तो खाताच त्याची दुरावस्था नाहिशी झाली. तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला. तेंव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानांत गेले होते. श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवित होते. श्रेष्ठी स्वत: तांदुळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते. तेंव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले ''आजोबा आज दशमी आहे. बाबांना किती दक्षिणा देणार ?'' तेंव्हा श्रेष्ठी म्हणाले ''आपणा दोघात काही भेद नाही. तूला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस. तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे. ते दृष्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण. श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद प्रभू म्हणाले ''आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली. गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला. तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा'' असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखविले. या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठऊक. ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही. ते श्रीपादांना म्हणाले, सोनुल्या ! श्रीपादा ! गणेशाला जेंव्हा भूक लागेल तेंव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गूळ नैवेद्यासाठी घेत जा. तेवढयात अखंड सौभाग्यवती वेंकट सुब्बमंबा तेथे आल्या, त्यानी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले. अरे, शंकर भट्टा ! कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी (गुरुदेव भट्ट) अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यांत जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले. मला नुसते सोडले असते, माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते. सद्गुरुंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात. यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ति खर्ची घालतात. श्रीपाद प्रभुंची जन्म पत्रिका सांध्रसिंधु वेदातून पाहता येते. श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगु भाषेबरोबर संस्कृत भाषा सुध्दा बोलली जात असे. हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू, अप्पळराज शर्मा, बापनाचार्युलु बोलत असत. संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती. त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णनातीत होती. ही भाषा पीठिकापुरम् मधील केवळ श्रीपाद प्रभू, बापनाचार्युलु अप्पळराजू शर्मा यानांच बोलता येत असे. सत्यऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापनाचार्युलु बरोबर असतांना श्रीपाद म्हणाले ''आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य कांही बोलत नसत. ते केवळ कर्तव्य बोधक होते.'' त्यावर बापनाचार्युलु म्हणाले, कन्हैय्या, नेहमी सत्यच बोलावे. औषधाला सुध्दा खोटे बोलू नये. हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले. त्या दिवशी बापनाचार्युलुंच्या घरी वेंकट सुब्बया श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्युलुंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्विकारावी. हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्यांचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील. ही इच्छा बापनाचार्युलु पूर्ण करतील का नाही या बद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापनाचार्युलुंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली. बापनाचार्युलुंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्विकारण्याची अनुमती दिली. या सम्मतीने श्रेष्ठीच्या आनंदाला पारावार नव्हता.
श्रीपाद प्रभू बहु चमत्कारी होते
महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्विकारलेले बापनाचार्युलु आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टींचा विसर पडला. महालया अमावास्येचा मध्यान्ह समय आला. श्रेष्ठी बापनाचार्युलुच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले ''आजोबा, वाग्दान करू नये. केल्यास त्या प्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करून ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्युलु दोघांनाही आपली चूक लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रितीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले ''तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानवात मी, मी करणारे एक चैतन्यरूप आहे. जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर 'मी' असे चैतन्यरूप सुध्दा ग्रहण करतो. या 'मी' अशा चैतन्याला विश्व प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच. गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले वाग्दान परिमित होऊन नाम स्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या 'मी' च्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्यातरी एका काळात बापनाचार्युलु वंशाची एखादी व्यक्ति , श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल. ते केंव्हा , कसे, कशा प्रकारे ते मला विचारु नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते. सूक्ष्ममयी असते. कांही कांही कर्मात भौतिक काल, योगकाल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते. योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते.
यावर मी (शंकरभट्ट) म्हणालो ''अरे गुरुदत्त भट्टा ! भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ? ते मला विवरण करून सांग.'' श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले ''भौतिक काळ, भौतिक देश, मानसिक काळ मानसिक दशा तसेच योगकाळ आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षापर्यंतचे वय असते. तो नेहमी सोळा वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुला सारखा निरंतर विद्याआश्रमात असतो. त्याचा भौतिक काल साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ वीस वर्षे निर्धारित केलेला आहे. वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते. जवाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ वीस वर्षे असतो. तो शरिराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ साठ वर्षे आहे. या प्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही. तो वेगवेगळा असू शकतो.''
काशीमध्ये अथवा पीठिकापूरममध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका.
काशीवासाचे फल - पिठापुरम् निवासाचे फल
श्रीपाद प्रभू म्हणाले ''मी कालातीत आहे. ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ति होते. भौतिक दृष्टया तो कोणत्याहि प्रदेशात असला तरी मानसिक दृष्टया त्याचा निवास काशीतच असतो. भौतिक दृष्टया काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही. ज्या प्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळयास गंगास्नानाचा लाभ होत नाही. एखादा साधक भौतिक रूपाने पीठिकापुरमला राहात असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुध्दा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पीठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योग देश अध्यात्मिक शक्ति संपन्न असलेल्या व्यक्तिलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केंव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे.''
देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला
क्षेत्र वासाचे फल मिळणार नाही
सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दु:ख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरुंच्या कृपेमुळे आपण त्या पासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पीठिकापुरममध्ये नरसिंह वर्मांच्या घरी एक सेवक होता. त्याचे नांव शिवय्या असे होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले. तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडले. आणि असंबध्द बोलू लागला. ''मी सृष्टी स्थिति आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मीच सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्या पासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे.'' नरसिंह वर्माना शिवय्याची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभु शिवय्यास स्मशानात घेऊन गेले. त्यांच्या बरोबर नरसिंह वर्मा सुध्दा होते. औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेऊन शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले. या मुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंह वर्माना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले ''आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे ? तो सृष्टी , स्थिती, लय याचा कारक आहे म्हणे, तो आदिमूल आहे म्हणे, हे सारे खोटे आहे. थोडयाच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता. मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली. आपल्या शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंज्यातून सुटका केली.''
अरे शंकरभट्टा ! पीठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले. श्रीपाद प्रभूंच्या महा संकल्पाने ग्रहांचे फलित ठरविले जाते. कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष्य फलाने निर्धारीत केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. ते योग काल पाहून योगदेश पाहून यांचा निर्णय होतो.
कश्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म - मरण चुकवू शकते
श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिष्य शास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात म्हणून योग काल तेच ठरवितात . दूर घडणारी घटना सुध्दा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुध्दा ते करू शकतात. संघटना सर्व देश कालात ते घडवू शकतात. श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छे प्रमाणे बदलता येतो. एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वत: श्रीपादानी तो नारळ फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे, तुकडे केले. श्रीपाद म्हणाले ''आजोबा, आज तुमचा मरण योग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला.'' सायंसंध्येची वेळ झाली. श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवल्ली ओढयाकडे मार्गस्थ झालो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"