"चांगल्या कामाला मुहूर्त कशाला हवा? "
©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
आपल्या सणांमध्येच एक प्रकारचं रिलॅक्सेशन आहे. वेळ नाही, आवडत नाही, स्टेटस ला शोभत नाही, सुटी नाही, रजा नाही अशा हजारभर कारणांमुळे अनेकजण सणच साजरे करत नाहीत आणि या रिलॅक्सेशनला मुकतात. 'असा मी असामी' मध्ये पु.ल. म्हणतात, "होळी पेटल्यानंतर बोंबलावयास लाजणे हा पुरूषार्थ नव्हे, काय समजलास बेंबट्या?" मनात साचलेल्या नकारात्मक भावनांना चारचौघात जाहीरपणे वाट करून देण्याची व्यवस्था होळीपौर्णिमेला करूनच ठेवलेली आहे. पण, आपण ते योग्यप्रकारे स्वीकारूच शकलो नाही.
पतंग उडवणं, रंग खेळणं, श्रावणात झोके घेणं, मेंदी काढणं, मंगळागौर जागवणं, कोजागिरी पौर्णिमेला गच्चीवरचं चांदण्या रात्रीतलं दुग्धपान, वारी, दहीहंडी, गणपतीत कोकणात करतात तो बाल्या डान्स, दशावतारी हे सगळं काय आहे? हे सगळं खरं तर रिलॅक्सेशनच आहे.
सणावाराला किंवा दर गुरूवारी-शनिवारी घरोघरी साग्रसंगीत आरत्या व्हायच्या. चांगल्या १२-१५ आरत्या खड्या स्वरात झांजा-टाळ वाजवत म्हटल्या जायच्या, बाकीचे लोक टाळ्या वाजवत असत. ते काय होतं? ते रिलॅक्सेशनच होतं. आधुनिकतेच्या नावाखाली आपण दिलं सोडून..
दर अंगारकीला घरी अथर्वशीर्षाची सामूहिक सहस्रावर्तनं चालत, नवरात्रात मंत्रजागर असायचा. एका जागी तास-दोन तास बसून एकाग्रतेने अथर्वशीर्ष विशिष्ट स्वरात आणि बेंबीच्या देठापासून खोल स्वर लावून म्हणणं, हे काय होतं? ते रिलॅक्सेशनच होतं. आपण सोडून दिलं. घरच्या चांगल्या परंपरा आधी मोडीत काढल्या आणि आता वर्षातून एक दिवस पावसात भिजत पहाटे रस्त्यावर बसून अथर्वशीर्ष म्हणायला हजारो महिला जमतात. वाईट वाटून घेऊ नका, पण त्यातलं रिलॅक्सेशन जर अनुभवायला मिळत असेल तर ते दररोज घरोघरी का बरं चालत नाही?
नवरात्रातल्या श्रीसूक्ताच्या आवर्तनांमधलं रिलॅक्सेशन मी अनुभवलंय आणि आजही ते अनुभवतोय. सांगली-मिरजेच्या परिसरातले लोक दर पौर्णिमेला नामस्मरण करत नरसोबाच्या वाडीला पायी चालत जातात, अगदी नित्यनेमाने जातात. तेही रिलॅक्सेशनच...!
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळच्या जक्कलच्या मळ्यात रात्री भजन असायचं. माझ्या बाबा-काकांसोबत मी त्या भजनाला जात असे. तेव्हा टाळ वाजवायला मिळत, म्हणून जायचो. आता त्यातलं रिलॅक्सेशन टेक्निक उमगतंय. नरसोबाची वाडी, औदुंबर, कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या पालखी प्रदक्षिणांना अगदी आवर्जून जा आणि त्याचा अनुभव घ्या. ते रिलॅक्सेशनच आहे.
गावोगावची रात्रीची भजनी मंडळं बंद झाली, शारीरिक-मानसिक ताणाचा निचरा करून देणारी वाटच बंद झाली. आता गणपतीची आरती आणि मंत्रपुष्पांजली म्युझिक सिस्टिमवर लावतात. मंगळागौर जागवण्याची काॅन्ट्रॅक्ट्स दिली जाऊ लागली. घरात हौसेनं रूखवत करायचं सोडून विकतच्या गोष्टी केवळ शो म्हणून मांडायला सुरूवात केली. त्याचा क्रिएटीव्हीटी आणि रिलॅक्सेशनचा मूळ गाभाच आपण हरवून टाकला. आपण हे सगळं का सोडतो आहोत, याचा विचार कधी करणार?
संक्रांतीच्या आदल्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून मोठमोठ्या रांगोळ्यांच्या पायघड्यांनी रस्ते सुशोभित करण्यात काय सुरेख आनंद मिळतो, ते मी सोलापुरात असताना अनेक वर्षं प्रत्यक्ष अनुभवलंय. शेकडो कलावंत कार्यकर्त्यांसोबत घेतलेला तो आनंदाचा अनुभव आजही मनात ताजा आहे. चैत्रगौर सजवण्यात काय सुंदर रिलॅक्सेशन असतं, हे ती गौर ज्यांनी सजवली आहे, त्यांनाच माहीत. बाकीच्यांना त्यातली गंमत नाही समजणार.
आपली संस्कृती आऊटडेटेड झालेली नाही आणि होणारही नाही. आपण तिचा अर्थच समजून न घेता अनेक गोष्टी सोडून दिल्या आणि म्हणूनच मानसिक ताणाच्या विळख्यात अडकलो आहोत. होळी पेटवायची म्हटलं की आपल्याला पर्यावरण आठवतं, रंग खेळायचा म्हटलं की आपल्याला वाया जाणारं पाणी आठवतं, दीपोत्सवात तेलाचा अपव्यय होतो असं वाटतं, ढोलताशात ध्वनिप्रदूषण दिसतं. हे सगळं नेमकं सणावारालाच आठवतं, बाकीच्या कुठल्याच दिवशी यातलं काय आठवतं आपल्याला?
सिग्नल्सना उभं राहिल्यावर गाडी बंद करणं आपल्याला जमत नाही, हाॅर्न न वाजवणं आपल्याला जमत नाही, वाढदिवसाच्या दिवशी रात्री बाराला फटाके वाजवू नयेत, हेही आपल्याला जमत नाही. सणावाराच्या, उत्सवाच्या नावाखाली ट्रिपल सीट बसून हाॅर्न वाजवत, पेट्रोल जाळत गावभर उंडारताना प्रदूषण होत नाही का? हे तर २४ तास चालणारं प्रदूषण आहे. त्याला कधी कुणी विरोध करताना दिसत नाही. हा कृत्रिम विरोधाभास कशासाठी? आपल्याला एसी किंवा फाॅल्स सिलिंग्ज वापरणं कमी करून साधी विजेची बचत करणं जमत नाही आणि आपण सणांमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या गप्पा मारतो? हाच खरा घोटाळा आहे.
विचार करून पहा, मर्म समजून घेण्याचा प्रयत्न करा, पटलं तर पुन्हा नव्यानं सुरूवात करा. चांगल्या कामाला मुहूर्त कशाला हवा?
©मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक - प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"