Friday, April 12, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -16

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -१६
श्रीमन् नारायण वृतांत
मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो. स्वामी कुरुगड्डीला (कुरवपुरला) असल्याचे कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती. मार्गात एक उसाचे शेत दिसले. शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता. शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गुळ करण्याचे काम चालू होते. त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्याने मोठ्या नम्रभावाने मला बोलाऊन उसाचा रस दिला. तो फारच मधूर रस होता. मी श्री श्रीपादांच्या दर्शनास जात असल्याचे ऐकून त्या शेतकऱ्यास खूप आनंद झाला तो शेतकरी मला म्हणाला आहो काका ! माझे नांव श्रीमन् नारायण मल्लादी. आमचे गांव मल्यादीपुरम होते परंतु कालांतराने त्याचे नांव मल्लादी असे अपभ्रंशाने पडले. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांचे आडनाव सुध्दा मल्लादी असे होते ते ब्राह्मण होते परंतु आम्ही चौधरी आहोत. त्यांचे आणि आमचे अगदी जवळचे संबंध असताना आम्ही मल्लादीपूरम गांव सोडून पीठीकापुरम गावी आलो. त्या वेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती. सारी स्थावर जंगम मालमत्ता विकून टाकून, अंगावरील एका कपडयाने आम्ही येथे पीठीकापुरमला आलो. श्रीबापनाचार्युलु यांनी आम्हास मोठ्या प्रेमाने जेऊ घातले त्यांचे शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखविली. त्या दिवशी श्रीपाद घरी होते. ते म्हणाले बापनाचार्युलुंच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते. देवाच्या कृपे शिवाय हा प्रसाद मिळत नाही. बापनाचार्युलुचे दर्शन मिळणे सुध्दा दुर्लभ आहे. तुमच्या पुण्याइनेच घडले आहे. बापनाचार्युलु आम्हास म्हणाले, ''आम्ही आमचे शेत करण्यास दुसऱ्यांना दिले आहे. कांही कारण नसताना त्याना काढून टाकणे धर्माविरुध्द होईल. आता तुम्ही एक मूठभर उडिद एका कपडयात बांधून घेऊन पश्चिम दिशेंस जा. तुमच्या मनोकामना पूर्ण होताच ते कुळीथ (उडीद) टाकून द्या. परमेश्वर अत्यंत दयाळू आहे. तो खडकात असलेल्या बेडुकाला सुध्दा अन्न पुरवितो तो तुम्हाला अन्न पुरविणार नाही का ? तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल.'' आम्ही जेवण केले व निघताना धोतराच्या सोग्यात मूठभर कुळीथ बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने प्रवासात अन्न पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही. न मागताच आम्हास जेवण मिळत होते. हे केवढे आश्चर्य. चालत चालत आम्ही आंध्रप्रांत ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला. मार्गात आम्हास अनेक पर्णकुटया दिसल्या. त्यात राहणारे लोक वृद्ध होते. त्यांच्या जवळ धन संपत्ति वगैरे कांही नव्हती. एका पर्णकुटीत आम्ही प्रेवश केला तेथे एक वृद्ध जोडपे राहात होते. ते जातीने चौधरी होते. त्यांचा एकुलता एक मुलगा सर्प दंशाने मरण पावला होता. त्या मुलाची पत्नी कृष्णानदीत स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्याना संतान नव्हते. या वृद्ध दंपतीला आता कोणाचाच आधार उरला नव्हता. त्यांचे शेजारी मात्र त्यांच्या बरोबर मधुर भाषण करीत व वेळो वेळी त्याना मदत करीत असत. या वृद्ध जोडप्याने आमचे उत्तम आदरातिथ्य केले व घरी ठेवून घेतले. जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू त्या वेळी काहीतरी अडचण येई व आमचे जाणे स्थगित होई. शेवटी एका शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो परंतु त्याच वेळी त्या वृद्ध गृहस्थास उलटयांचा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा आम्हास रहाणे भाग पडले. एकदोन दिवसात त्या गृहस्थास बरे वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो. आमच्या तेथील चार पांच दिवसांच्या वास्तव्याने त्या वृद्ध कुटुंबाच्या मनांत आमच्या विषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता. आम्हाला निरोप देतांना त्यांच्या डोळयात प्रेमाश्रू दाटून आले व आम्ही सजल नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला. धोतराच्या सोग्यात बांधलेल्या कुळीथाला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले. आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांनी आमच्या कडून काहींच घेतले नाही. त्यांची निरिच्छ वृत्ती पाहून आम्हास अतिशय आश्चर्य वाटले. त्या वृद्ध दंपतीच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता. त्याला त्यांनी बोलावले. तो घरी आल्यावर त्या वृद्ध गृहस्थास म्हणाला तुमच्या घरी आलेले जे अतिथी आहेत ते अतिशय अमंगळ आहेत त्यांच्या वास्तव्याने तुम्हाला दारिद्रय प्राप्त होईल. त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालवून द्या. ते वृद्ध दंपती म्हणाले, ''पंडितजी ! त्यांच्या वास्तव्याने आलेल्या दारीद्य्राचा परिहार करण्याचा शास्त्रास कांही तरी उपाय असेल ना ? आपण तो सांगावा त्या साठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ. त्या अतिथीचे अमंगल्य नष्ट करण्यासाठी जो पूजाविधी असेल तो सांगण्याची कृपा करावी. परमेश्वराच्या इच्छेनेच सारे विश्व चालते. सर्व देवाना मंत्राच्या सहाय्याने प्रसन्न करून घेता येते. प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचे विधान तुम्ही जाणता. यामुळे धरतीवर तुम्ही ईश्वरच आहात. तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती.'' त्या ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्याची विनंती मान्य करण्याशिवाय मार्गच नव्हता. तो ज्योतिषी म्हणाला धान्य उगवण्या साठी पाण्याची गरज असते त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी कर. यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात. प्रत्यक्ष देवसुध्दा यज्ञ करणाऱ्याची स्तुती करतात. यज्ञाचे पांच प्रकार आहेत. 1) देवयज्ञ 2) भूतयज्ञ 3) मनुष्ययज्ञ 4) ब्रह्मयज्ञ आणि 5) पितृयज्ञ श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भूत, आश्चर्यकारक होत्या. त्या वृद्ध दांपत्याने दिलेल्या द्रव्याच्या सहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्य सिध्दीसाठी यज्ञ केला. या यज्ञामुळे आमच्या जन्म पत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले. त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याइने आम्हास परम पवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले. या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते. प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता त्या प्रत्येक देवतेने तोंड भरून आशिर्वाद दिले होते. गाय, वेद, ब्राह्मण, पतिव्रता स्त्रिया, सत्यप्रिय आणि दानशूर लोकामुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते. शेती करण्यास ज्या प्रमाणे बैलाची नितांत गरज असते तेवढीच गरज इहलोक सिध्दिसाठी यज्ञ यागाची असते आणि तितकीच गरज परलोक सिध्दीसाठी गोमातेची असते. शिवाय गायीमुळे आपणास दूध, दही, तूप लोणी, इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच.
भूमातेचे सात गुण
सर्वधर्मांची तत्वे वेदांवरच आधारलेली आहेत. धरतीमातेला सुध्दा वेदांचाच आधार आहे. ब्राह्मण लोक आपल्या यजमाना द्वारा यज्ञ करवून समाजास सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात. अशा सत्कर्माने भूमातेस सामर्थ्य प्राप्त होते. पतिव्रता स्त्रिया आपल्या पातिव्रत्याने धर्माचे रक्षण करतात. पतिव्रता स्त्रियांमुळे धरणीमाता समृद्ध होते. सत्यभाषण करणाऱ्या सत्य-संकल्पी लोकांमुळे सुध्दा भूमी आनंदित होते. निर्लोभी लोक आपली लोभीवृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाटतात. तर दानशूर लोक पुण्यमार्गाने मिळालेले धन दीन-दुबळया अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात. या सप्त गुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न, सामर्थ्यवान आणि भरपूर अन्नपाणी पुरविणारी होते. बापनाचार्युलु सारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्तमात्र करून यज्ञपुरुष श्री श्रीपाद वल्लभ ह्यांच्या समक्ष आम्हास धन्य केले.
श्रीपाद श्रीवल्लभांकडून भक्तांचे रक्षण
यज्ञ निर्विघ्नपणे, मोठ्या आनंदात संपन्न झाला. ते वृद्ध दंपती आम्हास आपल्या मुला सारखे मान देऊन वागवीत होते. हे त्यांच्या भाऊ बंदाना आवडले नाही. आम्हाला एक मिरचीचे शेत होते त्याला चारी बाजूनी ताडीच्या झाडाचे कुंपण होते. या ताडीच्या झाडाचा रस गौड लोक येऊन काढून घेऊन जात. एकदा मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती ठेऊन घरी जाण्यास सिध्द असलेले मी पाहिले. मी एकटाच होतो परंतु ते दहा लोक होते. याच वेळी एक आश्चर्य घडले. एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पीत होते. एवढयात त्याचा झोक गेला आणि ते खाली पडले त्या अस्वलाला जवळ आलेले पाहताच आमचे भाऊबंद घाबरून पळून गेले. अस्वलाच्या विषारी नखांनी होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती. मी श्रीपादांचे नामस्मरण करीत बैलगाडीत बसलो व ती गाडी चालू लागली. ते अस्वल श्रीपादाच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले व आमच्या बरोबर चालत आमच्या घरी आले. त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दंपतीच्या घरा जवळचे शेजारी आश्चर्य चकित झाले. त्या रात्री आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे भजन केले तर ते अस्वलसुध्दा आमच्या बरोबर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते. भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला. तो त्या अस्वलाने आनंदाने खाल्ला. यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्या प्रमाणे राहात होते. ते आमच्याशी प्रेमाने राही परंतु आमच्या शत्रूंना त्याची भीती वाटे. त्याच्या भीतीमुळे शेताचे रक्षण करण्याचे काम अनायासे अस्वलच करीत. आमच्या घरी दत्त प्रभूंच्या लीलाकथांचे कीर्तन आणि श्रीपादाचे नामस्मरण नित्य नेमाने चाले. एकदा असेच शेतात गेले असतांना ते अस्वल शेतात आले. माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले. मी श्रीपाद स्वामींचे नाम घेण्यास सुरवात करताच ते मोठ्या आनंदाने नाचू लागले.
आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याने काही उपासना करून शक्ति प्राप्त केल्या होत्या त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन लुबाडून घेऊन संग्रहीत करीत होता. आमच्या भाऊ बंदानी त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता. त्याने अस्वलावर मंत्र प्रयोग केला त्यामुळे त्याची सारी शक्ति नष्ट झाली असल्याप्रमाणे अगदी निचेष्ट होऊन पडला. दुसऱ्या मंत्राने त्याने अस्वलाच्या साऱ्या शक्ति स्वत: आकर्षून घेतल्या. रामायणातील वाली प्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती जिच्या प्रयोगाने समोरील शत्रुपक्षाची अर्धी शक्ति त्यास प्राप्त होत असे. या कारणामुळेच श्रीरामानी वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता व त्याने त्याचा अंत झाला.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या शिष्यांना कर्मबंधनापासून मुक्तता
श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत. त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे. कारणा शिवाय कोणतेही कर्म संभवत नाही. इंद्राची पूजा गोकुळवासीयानी, प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागाऊन, त्याने गोकुळावर अतिवर्षा केली. तेंव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला व त्या खाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले. ज्या प्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुलवासीयांचे रक्षण करून आपल्या गोपाल धर्माचे पालन केले त्याच प्रमाणे श्रीपाद वल्लभानी मांत्रिकाच्या योग शक्तीला तिच्या आज्ञे प्रमाणे करू दिले. अस्वल त्या शक्तीला बळी पडले त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामींचे भक्त झाले होते. त्या मांत्रिकाच्या शक्ति प्रयोगाने निचेष्ट पडलेले अस्वल मंदगतीने रडत होते. दु:खी जीवांचे ऋदन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येते. ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात. श्रीमन्नारायणाच्या घरी दत्तकथा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण, कथा, कीर्तने नित्य नेमाने चालत असे. तेथे येणाऱ्या भक्तातात काही भक्त श्रीपादाच्या चरणी अनन्य भावाने शरण जाणारे होते तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता. नामसंकीर्तन चालू असतांना एक अद्भूत घटना घडली. ते मृत -प्राय पडलेले अस्वल श्रीपादांच्या नाम घोषाने एकदम चेतना जागृत होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागले. श्री दत्तात्रेयांचे योगसामर्थ्य सर्वापेक्षा काही वेगळेच आहे. त्यांच्या करुणेनेच त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानव तांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले. तेथील लोकांनी त्या अस्वलास दोरीने बांधून अरण्यात सोडून दिले. ते मनुष्य रूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले ''लोकहो, मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजा वर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो. अधिक व्याजाचा दर लाऊन मी लोकांना छळीत असे. धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे. अशा दुष्कत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला. परंतु माझ्या पूर्व पुण्याईने या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत. त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानव देह प्राप्त झाला. त्या मांत्रिकाने अनेक पापकर्मे केली. त्याने माझ्या सारख्या मूक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला. या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी योग्य ते शासन केले. ''शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन'' असे ब्रीद असलेल्या स्वामीची जे अनन्य भावाने,श्रध्दायुक्त अंत:करणाने सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचे कृपाछत्र सदैव असते. देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि पर-धनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाहीत. आपल्या पाप कर्मावर पश्चाताप होऊन व योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर कांही दुष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणे आहेत.'' तो मनुष्यरूपी अस्वल पुढे म्हणाला, ''मी श्री स्वामींच्या नामस्मरण पारायणाने सद्गतीस प्राप्त झालो. मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्त गणांना अत्यंत आश्चर्य वाटले व आनंदही झाला. ते श्रीस्वामीचा मोठ्याने जय जय कार करू लागले.''
हे नाम संकीर्तन चालू असतांना एक अद्भुत घटना घडली अकस्मातपणे तीन नाग (देवता) तेथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मयतेने डोलू लागले. याच वेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. तेथे आलेल्या नागांनी त्या मृत देहास तीन प्रदक्षिणा घातल्या व निघून गेले. ते नाग कोठून आले होते. कशासाठी आले याचा कोणालाच अर्थबोध झाला नाही. त्या मनुष्य रूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पध्दतीने दाह संस्कार करण्यात आले.
आम्हास श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाचेच सतत ध्यान होते व त्यांचाच जीवनाला आधार होता. ते तीन नाग वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले. त्यांची आम्हाला व दुसऱ्या दत्त भक्तांना भिती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भिती वाटे व ते आमच्या घरी येत नसत. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण, भजन सुरु करताच ते नाग तन्मयतेने डोलू लागत. त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या भाऊबंदानी अन्यायाने लुबाडली होती. त्या जागेस पंचानी विवादग्रस्त अशी घोषीत केली होती. परंतु त्या जमीनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती. आमच्या भाऊबंदानी गावातील प्रतिष्ठित लोकाना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते. त्यामुळे त्या विवादित भूमीचा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता.या विवादास्पद जागी एक नागाचे वारूळ होते. नागपंचमीला लोक त्या वारूळात दूध आणून घालीत. दूध घालणारे भाविक जन ''नागदेवता नागदेवता आमची संकटे दूर कर'' अशी नम्र प्रार्थना करीत असत. दूध घालणाऱ्या कांही लोकांना माहीत होते की त्या वारूळात एकही नाग नाही. एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वारूळातून ते तीन नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारूळात निघून गेले. हे दृष्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारूळात दूध घालण्यास कोणी आले नाही.'' नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला. त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलाऊन स्वागत केले. तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्रसामर्थ्याने वश करून घेत असे. अशी त्याची प्रसिध्दी होती. तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्रशक्तीने जिवंत करीत असे. त्याच्या तळहातावर गरुडाचे चिन्ह होते. अशी गरुडरेषा असलेल्या व्यक्तीस सर्प वश होतात असे शास्त्र वचन आहे. ही मंत्र विद्या त्यास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्या पुढे नतमस्तक होत असत. त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्ति बरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारूळाच्या चारी बाजूनी आग लावली. तो त्या आगीजवळ बसून जोर जोरात मंत्रोच्चार करीत होता. व विचित्र हावभाव करीत होता. त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल असे आम्ही त्याला दूर उभे राहून सांगत होतो. परंतु आम्ही तेथे काहीच करू शकत नव्हतो. त्या वेळी आम्ही त्या निरपराध सर्पांचे रक्षण करावे अशी श्रीपादाचे चरणी प्रार्थना केली. त्या मंत्राच्या प्रभावाने ते तिन्ही सर्प वारूळातून बाहेर आले. परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती. त्याला काहींच करता येत नव्हते. तो मोठ्याने मंत्रोच्चार करीत होता परंतु त्याचा कांहीच उपयोग होत नव्हता. ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नि श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे. आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेने त्या तीन्ही सर्पासाठी मार्ग मोकळा करून दिला होता. ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्न पणे निघून गेले. थोडयाच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला. हे दृष्य पाहून त्या मांत्रिकाचे अनुचर पळून गेले. त्याच वेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुलास सर्प दंशाच्या खुणा दिसून आल्या. थोडयाच वेळात त्याचे शरीर सर्पाच्या विषाने काळे निळे झाले. दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली. त्या मांत्रिकाने पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्या मांत्रीकाच्या हातावरील ती गरुडरेषा हळू हळू लहान होत अदृष्य झाली. गावातील लोकांना खूप भीती वाटली. या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद श्रीवल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता. त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमीनीवर पडला. श्रीपाद प्रभूंची लीला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही. गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्साबोक्शी रडू लागले परंतु आम्ही करू शकलो नाही. ''अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले पूर्व स्थितीत येतील.'' असे आम्ही त्यांना सांगितले. निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधितच गतप्राण झाला. त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर गाव प्रमुखांच्या घरासमोर ठेवले होते. आमचे भाऊबंद भीतीने थरथर कापत होते. वातावरणात सारीकडे दु:खाची कळा पसरली होती. त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधिसाठी नेला. चितेवर ते शरीर ठेऊन अग्नि संस्कारास प्रारंभ करताच एक मोठे आश्चर्य घडले. त्या मांत्रिकाच्या मृत देहात चैतन्याचा संचार झाला. तो त्याचे अग्नि पासून रक्षण करण्यासाठी आरडा ओरड करू लागला. श्रीपादाच्या कृपेने त्या मांत्रिकातील दुष्टभाव अग्निचा स्पर्ष होताच जळून खाक झाला. आणि एक शुध्दात्मा त्या लाकडामधून बाहेर आला. हे सगळे करण्यामागे श्री स्वामींची अगाध लीला दिसून येते; ते सज्जनांचा उध्दार आणि दुर्जनाना योग्य ते शासन करीत असतात. तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गाव प्रमुखांच्या घरी उडया मारीतच आला. आम्ही सर्वानी जमून त्या मुख्याच्या घरी दत्त महात्म्य वर्णन करणारे कीर्तन केले. त्यानंतर ''दत्ता दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा'' या भजनाने सारा आसमंत भरून टाकला. श्रीपाद प्रभूंच्या स्थूल रूपातील आणि सुक्ष्म रूपातील दिव्य किरण सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करीत होते. सारी ब्रह्मांडे या दिव्य किरणांनी पवित्र झाली होती. स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेला महाकारण देह महत विश्रांतीत होता. त्यातून निघणारे दिव्य किरण सायुज्य, सालोक्य आणि सामिप्य मुक्ति प्रदान करणारे होते. अवधूत, अंशावतार आणि महासिध्दि प्राप्त महायोगी सुध्दा या दिव्य किरणांनी पवित्र होत होते. श्रीपादांचे अत्यंत श्रध्दा आणि भक्तियुक्त अंत:करणाने नामस्मरण केल्यास, अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वाना दर्शन देत. लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे आह्लाददायक आरामदायक वाटते तसेच श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे. अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणांच्या संकिर्तनात रंगून गेला. त्याला श्रीपादवल्लभ दिगंबर अवस्थेत असल्या सारखे दिसत होते त्याला वाटले की आपण केलेल्या पापांचे कर्मफल म्हणून स्वामी तसे दिसत आहेत. किती तरी सर्पांच्या त्याने आपल्या मंत्र विद्येने आहुति दिल्या. अनेक महान संन्यासी व दिगंबर विभूतींना त्याने त्रास दिला होता. या सर्वाचा त्याला पश्चाताप झाला होता. त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक झाला. जेंव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेंव्हा त्याचा द्वेषाग्नी शांत झाला. श्रीपाद प्रभूंनी आपले उत्तरीय त्याला पांघरण्यास दिले. ते घेतल्यावर तो मांत्रिक अत्यंत आनंदाने नाचू लागला. सुर्योदय होण्यापुर्वीच त्या ग्राम प्रमुखाच्या धाकटया मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली. श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुध्द आली आणि थोडया वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला. तो मांत्रिक सर्व संग परित्याग करून साधु होऊन दूरदेशी निघून गेला. गावातील पंचानी त्या वृद्ध दंपतीची जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला.
तीन सर्पराज असलेल्या वारूळातून तीन औदुंबराची झाडे उगवली. कांही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले. हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करीत असत. एका शनीवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदानी दिला. श्रीपाद श्रीवल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांडयात हलवा देत असे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन नांवाचे संकेतरूप असे तीन औदुंबर वृक्ष होत. (या संकेतरूपी वृक्षाच्या बीजांचे फलस्वरूप म्हणून पीठीकापुरम गांवात एक औदुंबर वृक्ष आहे. या पुण्यप्रद वृक्षाच्या गर्द छायेत वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यावर एक सुंदर से मंदिर बांधण्यात आले. या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनीवारी प्रदोषकाळी हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्याना सर्व सुखे, संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल.) श्रीपाद श्रीवल्लभांचा हा वृतांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरूगड्डीच्या दिशेने निघालो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"