Sunday, April 7, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -9

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -९
कर्मफल मिमांसा
आज गुरुवार आहे. सकाळी सूर्योदयासमयी, गुरुंचा होरा चालू आहे. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सूर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य ! त्या कोवळया सूर्य किरणांत श्रीपाद श्रीवल्लभांचे आम्हां दोघांस दर्शन झाले. सूर्य किरणांच्या प्रवेशाने आम्ही भानावर आलो. परम पूजनीय, अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षाचे श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दर्शन घडणे केवळ परमप्रभूंच्या अव्याज करुणेचे फळ होय. क्षणभर दर्शन देवून ते रूप अंतर्धान पावले.
श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेविले होते. सूर्य किरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतर पावले. ह्याचे मला आश्चर्य वाटले व मन दु:खी पण झाले. प्रभूंचे दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणे हे काही विशेष सूचक आहे का ? अशी माझ्या मनात शंका उद्भवली.
श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरवात केली. ''बाबारे ! शंकरभट्टा ! आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुरवपुरास जा, अशी श्रीदत्तप्रभूंची आज्ञा झाली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे.'' मी म्हणालो ''स्वामी ! रोज श्रीदत्तप्रभूंचे स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ घालवित होतो. आज नैवेद्य म्हणून दाखविलेले चणे लोहखंड झाले ह्यांची खंत वाटते. माझ्या या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना.''
श्री तिरुमलदास म्हणाले - ''बाबारे ! कांही शताब्दिनंतर कली प्रबळ झाल्याने, नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचे निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी , प्रभू चित्र विचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्मसंस्थापनेसाठी सगळया कार्यक्रमात बीज रूपाने या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील.''
खनिजांमध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिजस्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजामध्ये अनेक रसायनिक प्रक्रियामुळे प्राणाची उत्पत्ती होते. प्राणामध्ये मन अंतर्लीन असते. प्राणरूपात चैतन्य अर्ध-निद्रावस्थेत असते. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्याच्या सेवनाने, मनुष्य त्याच्या देहात ह्या स्थितीचा अनुभव करतो.
प्राणशक्ती रूपाने व्यक्त झालेले चैतन्य तत्व परिणामक्रमाने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते. ही स्थिति तुला पशुमध्ये आढळते. पशूचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मन:शक्ती पूर्णपणे कार्यरत असते. तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असते. मानव योगसाधनेने परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्रारात नेऊन सविकल्प, निर्विकल्प समाधि स्थितिस प्राप्त करून घेतो. परम ज्योतिस्वरूप असलेल्या श्रीगुरुशी तादात्म्य स्थितिचा अनुभव घेतो. त्या स्थितिमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वर्तनूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते. म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचे स्वरूप अचिंत्य, अगम्य व कल्पनातीत असून महाप्रचण्ड वेगवान असते. अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचे आहे. प्रत्येक क्षणात कोटयावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकार करतात. धर्मसम्मत असलेल्या प्रार्थनास तात्काळ प्रचीति देऊन दु:ख निवारण करतात. धर्मबध्द असलेल्या प्रत्येकांचा इच्छा पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कूर्मगतीवत् असून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचण्ड व कल्पनातीत आहे. महाप्रचण्ड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना, प्रभूंच्या दिव्य तेज:पुंजा द्वारे प्रभूस पोहोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. सर्व लोक प्रकाशमान होण्याचे कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरे काही नाही. अनेक कोटि ब्रह्माण्डात प्रकाशमान असणारे सूर्य, नक्षत्रादींचे संयुक्त्त प्रकाश सुध्दा त्यांच्या तेजा पुढे सूर्यास दिवटी दाखविल्या समान होय. बाबारे ! हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे-खुरे तत्त्व होय. अनंत शक्ति , अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व, असलेल्या त्या निर्गुण, निराकार स्वरूपास सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करूणे पोटी, सगुण साकार मनुष्य देह धारण करून, श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन देत आहेत. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे.
श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य स्वरूप
मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे तसेच देव सुध्दा अनंत परिमितीना लांघून निम्नस्तरात जन्म घेतात. ह्यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योगक्रिया आहे. सृष्टी मध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिध्द, प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य, ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्यास सृष्टी मध्ये स्थापना करण्याच्या संकल्पाने दिव्य, भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो - ''स्वामी ! आपल्याशी चर्चा करीत असता, मला किती तरी नवीन विषयांचा उलगडा झाला. तरी श्री गुरु स्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचे हे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व त्यांना कसली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकले आहे. आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहात. तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावे अशी विनंती.'' श्री तिरुमलदास म्हणाले ''बाबारे ! तुझ्याकडून श्रींचे चरित्र लेखन कार्य व्हावे असा संकल्प पूर्वीच झाला असून, तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील या विषयास लेखणीबध्द कर, तुझ्या व्याख्यांची इथे आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र स्वत: श्रीच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. ह्या उपर विचार करणे व्यर्थ आहे.'' मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये, मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. मनुष्याचे कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणे एवढेच. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे, तुझे कर्तव्य अन्न मिळविणे असा विधिचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्या करणाने, तो स्वेच्छेचा अनुभव घेतो. म्हणून खरे-खोटे, बरे-वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेले अन्न पचन करून शरीरास शक्तिसंपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे, असा विधिचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडत असते. शरीरा संबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने, अप्रयत्नाने, मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे, सृष्टीमधील सगळया क्रिया-प्रतिक्रिया, या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय-सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह-नक्षत्रादींचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुल्लंघनीय शासन आहे. म्हणजे ह्याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणिमात्राविषयी करुणेमुळे सृष्टी विधान सुरळित करतात. कृतयुगामध्ये संकल्पमात्रे सकल सिध्दी प्राप्त होत तर त्रेतायुगामध्ये यज्ञ-यागाने, द्वापर युगामध्ये मंत्र, शस्त्रास्त्राने सकल सिध्दी प्राप्त होत तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्र प्रयोगाने, कलियुगी यंत्राने सकल सिध्दी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्ति –युक्तींचा स्तर या आधारावर सृष्टी विधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो.
तीन अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केल्याने, त्यांचे ध्यान करणाऱ्यास, श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उध्दारासाठी दहा लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू त्यांचे अंशावतार, सिध्द, योगी, महासिध्द यांच्या करवी, या सृष्टीचे पालन करीत असतात.
पूर्वयुगातील श्री दत्त हेच श्रीपाद आहेत का ? अशी शंका तुझ्या मनात बीजरूपाने असल्या कारणाने, श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखविलेले चणे लोहखंडात रूपांतर केले. माता अनसूयाने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी प्रत्यक्ष दत्त आहे हे दर्शविण्यासाठी असे केले. तुझ्या कुंडलीत गुरु व्याधी स्थानात आहे. गुरु ग्रहास चण्यांचा संबन्ध आहे. गुरु ग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती, बीज रूपाने असून, त्या अंकुरित न होण्यासाठी चण्यांचे लोहखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणले. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षूंनी अवलोकन न केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसेच, त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही, हे परम सत्य आहे. सत्यवस्तू संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठीत असल्या कारणाने, त्या ज्ञानाची प्राप्ती झालेले, या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर, ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती , चिरंजीव मुनि, अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वाचेच अंश आहेत. मानव विनाशी तत्वाचे अंश आहेत. अविनाशी तत्त्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ति एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते स्वेच्छा तत्त्व आहे परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन व नित्य नूतन आहे. कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे. सर्व कारणांस व सर्व कार्यास एकमेव असे तत्वच आधार आहे. ते अतीत व अगम्य आहे. त्यालाच दत्त तत्त्व असे म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण, प्रथम श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार या पीठिकापुरत घेतला. अशा श्रीपाद श्रीवल्लभांचे वर्णन करण्यास सहस्र फणी आदिशेषास सुध्दा सामर्थ्य नाही.
बाबारे ! श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बरेचवेळा सूचित केले होते. हिरण्यकयू श्यपाने विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असे वाटत होते. दिलेल्या वरदानाविरुध्द न जाता, कल्पनातीत अशा विधानाने श्री नृसिंह भगवानानी हिरण्यकश्यपाचा वध करून, परमभक्त असलेल्या प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहेत असा प्रल्हादणे निर्धार केला. प्रभू स्तंभातून प्रगटले. देव आहे किंवा नाही ? असा संशय या कलीयुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलीयुगातील हिण्यकश्यपांचा मद नाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्त प्रभुंचा श्री नृसिंहसरस्वतींचा अवतार होणार आहे. देव आहे हे सिध्द करण्यासाठी नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य . श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंहसरस्वतींचे अवतार दैवदूषण करणाऱ्यांचे मद नाश व देवभक्ती करणाऱ्यांचे, डोळयास पापणीसारखे, रक्षण करणे, या दोन प्रधान उद्देश्याने झाले. श्रीपाद श्रीवल्लभांस साध्यासाध्य असे काही नाही.
तिरुमलदास बोलत होते, मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयाने घर केले. मी भूर्जपत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहित होतो. भविष्यकाळात, लोक कुठल्या पत्रावर स्वामींचे चरित्र लिहितील बरे ! शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहेत. हूण शक प्रचारात येणार असल्याचे स्वामींचे म्हणणे आहे. खरे पाहता श्रीकृष्णाचे निर्याण कधी झाले ? हे कलियुग कोणत्या दिवशी कुठल्या घटिकेस/विघटिकेस आरंभ झाले. भविष्यकाळातील लोकांच्या कालगणने प्रमाणे, भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्रीवल्लभ लिहून दाखवित असतील तर श्रीपाद खरेच श्रीदत्ताचे अवतार आहेत ह्याचा मला विश्वास होईल.
माझ्या मनातला सशंय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता, ते जे सांगत होते ते ऐकण्याचे सोंग करीत लोहखंडात परिवर्तित चण्यांकडे मी बघत होतो.तेवढयात तिरुमलदासांचे कंथस्वर क्षीण होऊन वाकशक्ति नष्ट झाली. कानठळया बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झाले. एका क्षणात मला बधिरत्व व तिरुमलदासांना मूकत्व प्राप्त झाले. तिरुमलदास बोलण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला काहींच ऐकू येत नव्हते. मनात सारखा एकच विचार होता - नको ते संशय मनात आले व परिणाम बधिरत्वाचि प्राप्ती. आयुष्यभर आता बधिर म्हणून असावे का ? काय माझे नशीब ! मी काय करू ? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे, अर्थात, लोहखंड, तेलुगु भाषेत ''श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये'' अशा अक्षरात रूपांतरीत झाले. त्याच्यावर पांढरे शुभ्र असे पत्र दिसून आले. आम्ही बघता बघता, त्या पत्राचा आकार वाढून दीर्घचतुरस्र झाला. भूर्जपत्रा पेक्षा अतिशय पातळ, स्पर्शास मृदु वाटत होते. त्यावर, काळया रंगाचे सुंदर अक्षर उमटले. तेलुगु लिपीत त्यावर असे लिहिले होते - श्री कृष्णाचे निर्याण, खिस्त पूर्वी 3102 साली, फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2 वाजून 27 मिनिटे, 30 सेकदास झाले. प्रमादी नाम संवत्सर, चैत्र शुध्द प्रतिपदा, शुक्रवार, अश्विनी नक्षत्र, श्रीकृष्ण निर्याणानंतर, कलियुगाचा प्रवेश झाला. हे विचित्र पाहिल्यावर माझ्या अंगास दर-दरून घाम फुटला. अति स्वेदनाने, शरीर शक्तिहीन झाले. शरीर कंपायमान झाले. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला. मनात विचार आला कि ''काय माझे दुर्दैव ! कुरवपुरास जाणे आता एका स्वप्ना सारखे आहे. श्रीपाद नरसिंहावतार धारण करून माझा वध केला तर काहींच आश्चर्य नाही. वस्त्र धुवून, पिळून वाळत टाकतात तसे, शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू ? तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळुन वाळत टाकतील. ब्रह्मज्ञाना संबंधित विषयांचा, आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून, क्वचित गुरु आपल्या शिष्य वर्गास बोध करीत. द्रव्यार्जन हेतुने एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील. तो शिष्य अमक्या गुरुने माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवित असतो. गुरु-शिष्य दोघेही दोषाचे भागीदार होत. रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी, ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे, हा श्रीपादांचा चमत्कार होय. परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. त्यांच्यामध्ये या गहन चरित्रा विषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती. आता मला श्रीपादांच्या शरणी जावे लागेल.''
मी तिरुमलदासांच्याकडे पाहिले. त्यांचे मुख ब्रह्मतेजाने झळकत होते. माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून मी रजक आहे. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. नैवेद्यात दाखविलेले चणे लोहरूप त्यजून यथावत झाले. श्रीपादांनी मला क्षमा केली असे वाटत होते. कांही क्षणांत ते शुभ्र पत्र (कागद) अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले - ''बाबारे ! शंकरभट्टा ! कलियुग लोहयुग आहे. कल्मषपूरित असे हे युग आहे. माझ्या देहावसानानंतर, कांही काळ मी हिरण्यालोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्ह महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे.''
''स्वामी ! श्रीपादांनी तुम्हास पण मृत्यूनंतर जन्म घेण्यास आज्ञा केली ? अवश्य हा वृतांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावे अशी विनंती.'' तिरुमलदास म्हणाले ''एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेवून गेलो. सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादांस कडेवर घेवून खेळवित होते. ''दत्त दिगंबर ! दत्त दिगंबर ! दत्त दिगंबर ! अवधूता !'' असा घोष करीत होते. श्रीपादांचे वय दोन वर्षाचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होते. अनायासे माझ्या मुखातून ''श्रीपादवल्लभ ! दत्तदिगंबर !'' असे निघाले. श्रीधरावधानींनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात, श्रीपाद ''नृसिंह सरस्वती ! दत्त दिगंबर !'' असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून, प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ व पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती.
समर्थ सद्गुरु शिर्डी साईबाबाच्या रूपाने अवतरतील
श्रीपाद म्हणाले ''आजोबा ! नृसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासांस सुध्दा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे.'' श्रीधरावधानी अवाक झाले. मी म्हणालो - ''कुठल्याही जन्मी, कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीति आहे.'' श्रीपाद म्हणाले ''तिरुमलदासा ! तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीन दलित व दु:खी जनांच्या सेवेत पुनीत होशील. धीशीला नगरीत ''साई बाबा'' या नावाने यवन वेषात माझा समर्थ सद्गुरु रूपात अवतार होईल. तुला यवन वेषात समर्थ सद्गुरु असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ति होईल. तुला बाळकृष्ण रूपांवर प्रीति असल्या कारणाने, ''गोपाला ! गोपाला ! देवकीनंदन गोपाला !'' या नाम मंत्राचा जप करशील. या शरीराच्या पतनानंतर, क्वचित काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर, गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान !'' श्रीधरावधानी या सगळया संदर्भात मायेच्या आवरणात होते. त्यांना काही कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी, त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले. श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. मी म्हणालो ''स्वामी ! श्री कृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे. तर श्रीपाद या नियमाचे उल्लंघन न करता कर्म नाश कसे बरे करतील ?''
सद्गुरु, सत्पुरुषांस, योगियांस दिलेल्या दानाचे फळ
तिरुमलदास म्हणाले-''श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्या शिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्नावस्थेत सुध्दा भोगू शकता. स्थूल शरीराने 10 वर्ष भोगावयाचे कर्म, मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधिल मानसिक व्यथेमुळे कांही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो, सत्पुरुषांस, योगियांस दान-धर्म केल्याने, दैवी कृपे मुळे पाप कर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्या कारणाने, आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात.''
पुण्यपुरुषांस केलेल्या दान-धर्मामुळे, किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदला बदली होते. समर्थ सद्गुरुंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अदलाबदली होते. सद्गुरु त्यांच्या शिष्याकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्याचे पाप कर्म आपल्या वर ओढुन घेतात व आपले तप:फल शिष्यामध्ये संक्रमित करतात. परंतु पाप कर्माचे फळ भोगल्या शिवाय चुकत नाही. देव, सत्पुरुष, सद्गुरु, अवतारपुरुष, महातेजोमय असून अग्नीस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पाप कर्मांस दग्ध करण्याची शक्ति त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र, फल पुष्पादिंच्या माध्यमाने सुध्दा पाप पुण्याची अदला बदली घडत असते. आपली आर्तता, भक्ति , शरणागती जेवढी तीव्र असते तेवढयाच तीव्रगतीने ही अदला बदली घडत असते. कांही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफल, निर्जीव असलेले दगड-धोंडयावर फिरवित. त्या दगड-धोंडयास फोडून, किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पापकर्मांचे निर्मूलन करीत. यास अनुसरून एक दृष्टांत सांगतो. लक्षपूर्वक ऐक.
श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करवू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नीशमन दत्तास नैवेद्यापुरते एवढेच दूध द्यायची. बाकी दूध आपल्या वासरास पाजायची. त्या गाईची ही एक विचित्र प्रवृत्ती होती.
कालाग्नीशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध, कधी कधी, नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जावून प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी, श्री आपलराज, गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतिचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी, नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले त्या दिवशी, ते दूध श्रीपाद प्राशन करीत. त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देवू शकत नाही, या विचारांनी माता-पिता चिंतित होते. वेंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांनी, भरपूर दूध देणारी एक गाय आपलराजांस दान देण्याचा प्रयत्न केला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले. कारण दान स्वीकार न करण्याचे आपळराजांचे व्रत होते. दान घेतल्याने पाप संग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेद शास्त्र संपन्न असून केवळ वेद सभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्विकार करीत होते. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते. फक्त वेंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास जात असत. ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे. आपलराज आपले सासरे श्री सत्यऋषिश्वर (श्री बापन्नार्य) यांजकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा जन्म दिवस असल्या कारणाने श्वसुरगृही भोजन करीत. वैशाख शुध्द तृतियेस आपलराजांचे जन्मदिवशी पण श्री बापन्नार्यांच्या घरी भोज करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे.
कुटुंबाच्या या दुस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली ''नाथ ! आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्ठिक श्रौत्रीय संस्काराचे आहेत. मल्लादी वंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यात मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिति नाही. आपण या विषयाचा शांत पणे विचार करावा ही विनंती.'' आपलराज म्हणाले ''सौभाग्यवती ! तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्यऋषिश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही. पण या विषयास शास्त्र सम्मती असणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वी पासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास, आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दुध दिले असते नाही का ! किंवा तुझ्या स्तन्य क्षीराची समृद्धी झाली नसती का ! बरे ! मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा व लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहेत. श्रीपाद त्यांचे अंग वैकल्य नाहीसे करून त्यांना विमुक्त करू शकतात ना ! तू या विषया बाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर, येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे.''
सुमती महाराणीने या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. बापन्नार्य मंदहास्य करीत म्हणाले ''अम्मणी ! हे सगळे श्रीपादांचे लीला विलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याचे योगदृष्टीने मी जाणले आहे.'' आपल्या घरी गोसमृद्धी आहे. गाय देण्यास केवळ माझी सम्मती नसून, महानंदप्रद पण आहे. दत्तप्रभूंस गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसम्मती आवश्यक आहे. अहो ! काय विधि वैपरीत्य आहे ! श्वसुराकडून संपती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जामातांची या जगामध्ये कमी नाही. पण माझा जामात अग्निहोत्रासमान आहे. त्यांचे नियम भंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो . सृष्टीतील पंच महाभूतांनी स्पष्ट रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही. श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्रा प्रमाणे राहू शकत नाहीत. जगद्गुरु होवून लोकोध्दारासाठी घर सोडून जाईल. म्हणून चुकुन सुध्दा त्यांचे अंगवैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादासमोर इच्छा दर्शवू नको. सगळे कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या आधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात क्षीर समृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्व गुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून पलायन करतील. श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ति सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील.'' मी म्हणालो - ''स्वामी ! श्रीपादांच्या बंधूस अंग वैकल्य येण्याचे कारण काय ? वंशपरंपरेने आलेले कर्म दोष आहे का ?''
तिरुमलदास म्हणाले ''श्री दत्ताचा अवतार सायं संध्ये समयी झाला. श्रीपादांचा उष:काली झाला. पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी, अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायं संध्येनंतर तिमिराचे आवरण येते. जीवन निद्रावस्थेत असते. म्हणून दत्तअवतारात योगसाधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवांस सुख निद्रा दिली . कोठे जावे, काय करावे, परिणामस्वरूप कोणत्या दिशेस जावे या उद्विग्न मन:स्थितीत जीव असतो, हाच गाढ अंधकार आहे. जीवास नकळत परिणाम सिध्दि प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्टय. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंत:चैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो हे केवळ भूमंडळास सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उष:काली झाले. उष:समयी, सूर्य भगवान सगळी शक्ति एकाच वेळी प्रयोग करून जीवांस पुनित करीत असतो. श्रीपादांचे सूर्या हे प्रतीक आहे. जीवांतील विविध शक्ति जागृत होवून नाटय करीत वैविध्याने परिणामस्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. मध्यांदिन मार्तंडाचे चण्ड-प्रचण्ड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दशदिशांस प्रसार करतो तसे जीवांस जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवतारचे प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्व व्याप्त चैतन्याचा विषय होय. दत्तावतारात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरांमध्ये काळरात्र होती. तिचे केवळ महांधकाराचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर, होती ती स्थिति म्हणजे, संशय, नास्तिकवाद, कुतर्क, वक्रभाष्य वगैरे. ह्याचे प्रतीक म्हणून, लहान बंधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला. कुठलाही जीव, अंधकारा सादृश तामस वृत्तीचे निरसन करून, संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादिंचे त्याग केल्यावर, श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. ह्यातले रहस्य हेच होय. हे जगातील प्राण्यांच्या परिणाम दशेस संबंधित विषय आहेत.''
वंशपरंपरेने आलेले कर्मदोष सुध्दा आहेत. श्री आपलराज शर्मा वेलनाड्डु मंडलातील वैदिक ब्राह्मण होते. तरी त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते. श्रीपादांचे पितामह आईनविल्ली या ग्रामाचे अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास अधिकार देण्याची परंपरा होती. श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधररामराज शर्मा होते. ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणामध्ये आपल्या नावास ''राज'' या शब्दास जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचविण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत. ग्रामात पीक पिकले किंवा पिकले नाही तरी, कराच्या रकमेची भरपाई जमिनदारांना करणे अनिवार्य होते. ग्रामाधिकाऱ्यावर कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती. श्रीधर रामराज शर्माना त्यांच्या आवडी निवडींस बाजूला सारून जमिनदारांच्या आज्ञेनुसार, वेळ प्रसंगी हिंसेच्या प्रयोगाने कर वसूली करावी लागे. हे त्यांचे ग्रामाधीकारी या नात्याने कर्तव्य धर्म होते.
पण दैवाच्या दृष्टीने हे पाप कार्य होते. आपलराजांच्या ज्येष्ठ भ्रात्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झाले. पितामहांच्या पापकर्मामुळे, मोठा असलेला श्रीधरराज शर्मा व धाकटा श्रीरामराज शर्मा या उभयतांस अंग वैकल्य प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पाप कर्माचे प्रभाव त्यांना पण अनुभवावे लागले, म्हणून त्यांना दूधाची समस्या उद्भवली. विश्व प्रभूंनी रचलेला नियम सर्वांस लागू होतो. स्वत: अवतरित होवून कर्म फल त्यांनी पण भोगून आपले मार्गदर्शन केले. श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी व श्री वत्सवाई नरसिंह वर्मा, श्रीपादांस आपल्या पौत्राप्रमाणे मानीत, म्हणून श्रीपादांच्या दुधाची समस्या नाहीसी करण्याचा बराच विचार केला. श्री वर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले की या समस्येचा परिष्कार तुम्ही करावा. श्री नरसिंह वर्म्यांच्या येथे गायत्री या नावाने प्रसिध्द अशा गाईची संतती होती. त्यांतील सर्वशुभ लक्षण असलेल्या एका गाईंस श्रेष्ठीनी वर्म्याकडून क्रय केले. विक्रय केलेल्या धनास वर्मांनी आपल्या जवळ जपून ठेवले . पौरोहित्याच्या निमित्ताने आपलराज वर्म्यांच्या घरी आले. गोविक्रय केलेने धन वर्म्यांनी आपलराजांस दक्षिणा म्हणून दिली. साधारण पणे पौरोहित्यानिमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते. आपलराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचे होते तेवढेच घेवून उरलेल्या धनाचा अस्विकार केला. वर्म्यांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला. सुक्षत्रीय वंशात माझा जन्म झालेला असून दान दिलेले द्रव्य परत घेवू शकत नाही असे म्हणाले. हा विवाद श्री बापन्नार्यापर्यंत पोहोचला. ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली. परिषदेत श्री बापन्नार्यानी घोषणा केली की ''आपलराज शर्मानी अस्विकार केलेले हे धन ज्यांना घ्यावयाचे असेल त्यांनी घ्यावे.'' अनेक ब्राह्मण ते धन आपणास मिळावे या हेतूने त्यांच्यात चढा-ओढ सुरु झाली. हे सगळेच बघण्यास विचित्र वाटत होते.
तेवढयात तरुण असलेला पापय्या शास्त्री या नावाचा ब्राह्मण म्हणाला ''श्रीपाद दैवांशसंभूत अवतारी पुरुष नाही. देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी काय आली ? श्री दत्तच असल्यास त्यांच्या दोघा भावांचे अंगवैकल्यापासून रक्षण का बरे केले नाही ? ज्या कांही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत. तिळाचे पर्वत करून सांगणे महापाप आहे. मी दत्तभक्त आहे. श्वेतार्करक्षा पण गुरुंकडून प्राप्त करून घेतली आहे. दर रोज किती तरी जप करतो. मी कुठलेही दान घेतल्याने मालिन्य येत नाही. योग्य असलेला अशा मला हे धन द्यावे.'' ब्राह्मण परिषदेने पापय्या शास्त्रीस ते धन द्यावयाचा निर्णय केला. ते धन एका चांगल्या गाईस विकत घेण्यास पुरेसे होते.सभा समाप्त झाल्यावर विजय गर्वाने पापय्या शास्त्री घरी गेला. तेथे त्याचे मामा आले होते. कुशल प्रश्न, इष्ट गोष्टी झाल्या. भोजन करून जाण्यास पापय्या शास्त्रींनी त्यांना विचारले. पर्यायाने वर्षातून एकदा भोजन करतो. सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून घाई-घाईने तेथून निघुन गेले.
मामा निघून गेल्यावर, पापय्या शास्त्री विचार करीत बसले होते. त्यांची पत्नी जवळ येवून म्हणाली ''स्वामी ! आता आलेले तुमचे मामा हूबे-हूब, गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखे दिसतात नाही का ?'' पापय्या शास्त्री हादरुन उठले . त्यांना एकच मामा होते. ते पण गत वर्षी निधन पावले. आता आलेले हे मामा कोण ? माझी बुध्दी केवढया भ्रमात फसली ? मामाच्या नात्याचे इतर काही नाती असले तरी शंभर टक्के या मामा सारखे दिसणारे कोणी नव्हते. मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना मी पाहिला ? त्याच्या हृदयाचे ठेके वाढत चालले. भूत प्रेत पिशाचांच्या मंत्र-तंत्रा विषयी त्याला काही ज्ञान नव्हते. त्याचे उपास्य दैवत असलेल्या दत्तांच्या अनुग्रहाचे पतन तर होत नाही ना ? येणारा पुढचा काळ कष्ट दायक तर नाही ना ? मामांनी जाता-जाता ''शीघ्र आपण भेटू याची अपेक्षा करतो'' असे म्हटलेले वाक्य सतत त्याच्या मनास भेडसावू लागले. लौकरच आपण मरण पावून परलोकात आपल्या मामास भेटणार का ? या विचारांनी त्याचे मन जड झाले. ''ॐ द्रां दत्तात्रेयाय नम:'' मंत्राचा जप त्याने सुरु केला. त्या दिवशी मंत्र जप करणे सुध्दा एकाग्र चित्ताने होत नव्हते. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यास गेला. दत्त मूर्तीचे ध्यान करण्यास बसल्यावर ध्यानात शिर नसलेली दत्त मूर्तीं दिसली. तिथे पण जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हते. अर्चकाने प्रसाद दिल्यावर असे वाटले की विषपूरित कलशातून काढून दिले कि काय. अर्चक हसत हसत कांही म्हणत होते. परंतु पापय्या शास्त्रीस असे ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लौकर मरण पाव. ते घरी परत आले तेंव्हा त्यांना त्यांच्या पत्नींच्या कपाळावर कुंकू दिसले नाही.
मी जिवंत असताना कपाळावरचे कुंकू का बरे काढलेस असे म्हणून तिच्यावर चिडले. रुपया एवढे कुंकू कपाळावर मिरवित असता पापय्या शास्त्रींचे चिडणे तिला थोडे विचित्रच वाटले. पापय्यांस वेड लागले असे म्हणून पिठापुरीत अफवा उठली . किंवदंती, अफवा यांचे प्रमाण पिठापुरत जास्त होते. पापय्यास मानसिक व भूत चिकित्सा सुरु झाली. त्यांना वेड नाही असे पापय्या पदोपदी सांगत होते, तरी लोक मानण्यास तयार नव्हते. वेडा पण कधी कधी तर्कयुक्त भाषण करतो असे म्हणायचे. पापय्याच्या पत्नीस एक उपाय सुचला. तिच्या पतीने अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली याचे कर्म भोग आहेत असा तिचा निर्धार झाला. पाषाणातील देवास शरण जाण्या ऐवजी सशरीर असलेले श्रीपादांच्या शरणी जावे असा तिने विचार केला.
ती श्रीपादांच्या घरी गेली. श्रीपादांना तिने कडेवर घेवून लाड केले. कोणी नसल्याची संधी साधुन तिने श्रीपादांना आपली दु:स्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले ''आत्या ! या सगळयाचा एक लहान उपाय आहे. तू माझ्या मातेसमान असल्या कारणाने तुला मी हे रहस्य सांगतो. तू काही वेळ न घालवता नूतन गृहाचे निर्माण कर, तू व मामा वास्तूपूजा करून त्या नूतन गृहात प्रवेश करा. लागलीच सगळे काही बरे होईल.''
श्रीपादांची अशी आज्ञा झाल्यावर तिने असे सांगण्यास सुरुवात केली की, ही विपदा भाडयाच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली. म्हणून शिघ्रातिशीघ्र स्वत:चे घर बांधायचे असे तिने आपल्या बांधवास पटवून दिले. मग काय विचारता. कोणी एकाने पापय्यास एक जीर्ण झालेले घर भूदान म्हणून दिले. लागलीच घरातील सगळी संपत्ती, धन इत्यादिंचा विक्रय करून जीर्ण घरास पाडून नूतन गृह निर्माण कार्य सुरु झाले. गृह निर्माणासाठी रुण रुण रुण ऋण सुध्दा घ्यावे लागले. पर्वतशिला आणून त्यांची शकले करून गृह निर्माणात वापरण्यात आली. नूतन गृह प्रवेश केल्यावर, पापय्या शास्त्री स्वस्थ झाले.
बाबारे ! शंकरभट्टा ! पापय्याची मृत्यू दशा चालू होती. त्यांचे अपमृत्युच्या संकटापासून श्रीपादांनी रक्षण केले. त्याला मानसिक त्रास, अपमान, धनव्यय इत्यादी कष्ट देवून कर्म ध्वंस केला. तेवढेच नव्हे, पापय्याच्या पापकर्मांचे शिलांमध्ये आकर्षित करून, त्या शिलांचे शकलेकरवून पाप कर्मांचा नाश केला. कर्मध्वंस करण्यास सिध्द, अवधूत विविध व चित्र-विचित्र मार्गांचे अवलंबन करतात. स्वस्थ झालेल्या पापय्या शास्त्रीस श्रीपाद म्हणाले ''तू केवढा बुध्दीहीन आहेस. तू मन:पूर्वक आराधना करीत असलेला श्री दत्त सशरीर रूपाने तुझ्या समोर उभा असला तरी तू ओळखले नाहीस, म्हणजे तुझे केवढे दुर्भाग्य. कुक्कुटेश्वर मंदिरात असलेली पाषाणमूर्ती तुझे रक्षण करील असा तुझा निर्धार होता. म्हणून तुझे संचित पाप पर्वत शिळांवर फिरवून त्यांची शकले करवून तुझे कर्मफळ नाहीसे केले. तुला नूतन गृह करून दिले. सशरीर असलेल्या या दत्तांस शरण आला असता तर तुझे संचित संस्कार या शरीरावर ओढुन घेवून तुझे कर्म क्षय केले असते. भक्ताच्या भावनेनुसार भगवंताचे अनुग्रह फल असते.'' ही लीला घडल्यावर पापय्याने श्रीपाद श्रीवल्लभच दत्ताचे अवतार आहेत असे ओळखले.
श्रीपादांच्या दूधाच्या समस्ये विषयी, श्री श्रेष्ठी व श्री वर्मा चिंतित होते. हा विषय घेवून ते श्री सत्य ऋषीश्वर (श्री बापन्नार्य) यांजकडे जावून म्हणाले, ''हे राजर्षी ! आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असून ब्रह्मज्ञानी आहात. ब्रह्मामध्ये लीन आहात. आमची एक लहानशी इच्छा आहे. ती आपण पूर्ण करावी. श्री बापन्नार्य म्हणाले'' इच्छा व्यक्त केल्याशिवाय कसे बरे वचन देवू. नि:संकोच तुम्ही मला तुमची इच्छा सांगा. तुमची इच्छा धर्मबध्द असल्यास निश्चित पूर्ण करेन.'' श्री श्रेष्ठी म्हणाले ''मी श्री वर्म्यांकडून गायत्री नावाच्या गाईच्या संतति मधली एक शुभ लक्षणांनी युक्त अशी एक गाय विकत घेतली. आमचे कुलपुरोहित असलेले श्री आपलराज शर्मा यांस ती गाय देण्याचा विचार केला होता. त्या गाईचे क्षीर श्रीपादांच्या सेवेत उपयोगी यावे या शिवाय आमची दुसरी इच्छा नाही.''
श्री श्रेष्ठींचे म्हणणे झाल्यावर, श्री बापन्नार्य म्हणाले ''बरे ! बरे !, तुम्ही असे करा, ती गाय माझ्या गोठ्यात आणून बांधा, मी ती गाय आपलराजांस देण्याचा प्रयत्न करतो. शुभलक्षणी गाय आपलराजांच्या घरी असणे, दात्यास व ग्रहीतास शुभप्रद व श्रेयस्कर आहे.'' गोमातेस बापन्नार्यांच्या घरी आणले. गोदान घेण्यास आपलराजांनी नकार दिला.
हिमालयात सतोपथ नावाचा एक प्रांत आहे. त्या प्रांतातून युधिष्ठिरादिंनी स्वर्गारोहण केले. तेथे श्री सच्चिदानंदावधूत नावाचे महात्मा होते. त्यांचे वय कांही शताब्दींच्या पेक्षा जास्त होते. ते कैवल्यश्रुंगी येथे असलेले श्री विश्वेश्वरप्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वत: पीठिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने असून, त्यांचे बाल्य रूपाचे दर्शन घेवून, कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सच्चिदानंदास झाला. श्री सच्चिदानंदावधूत पीठिकापुरस आले. श्री बापन्नार्यांनी त्यांचे आदराने स्वागत केले. त्यांच्यापुढे श्रीपादांच्या दुधाची समस्या आली, तेंव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की आपलराज शर्मानी गोदान घेतले पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्त प्रभू असून, व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून गोक्षीर अर्पण करण्याचे महद्भाग्य आपल्या हातून दवडू नये असे ठासून सांगीतले.
ब्राह्मण परिषदेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागीतला. पंच महाभूतांचे साक्ष तुम्हाला देतो असे अवधुतांने सांगीतले.
श्रीपाद हे श्री दत्त असल्याचे पंच महाभूतांची साक्ष
यज्ञारंभ होताक्षणी भूमातेने साक्ष दिली. श्रीपाद श्री दत्त असल्याकारणाने आपलराज शर्मा यांनी गोदान स्वीकार करावे. श्वसुरांपासून जामातास प्रीतिपूर्वक दिलेले, ''दान'' होत नाही म्हणून सत्य ऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठीकडून दान घ्यावे व भेट वस्तू म्हणून जामातास द्यावे. हे भूमातेचे वचन होते. यज्ञारंभ झाल्यावर, यज्ञस्थळ सोडल्यास इतर स्थळी पाऊस पडत होता. ही दुसरी साक्ष. यज्ञातील हविर्भाग स्वीकारण्यास स्वत: अग्निदेव आले व गोदान घेतल्याने दोष नाही असे सांगितले. ही तीसरी साक्ष. यज्ञ मंडपाव्यतिरिक्त , इतर स्थळी, वायूदेवाने आपला प्रताप दाखविला. ही चवथी साक्ष. आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त आहेत. ही पाचवी साक्ष. असे पंच महाभूत साक्षी झाल्यावर आपलराजांनी गोदानाचा स्वीकार केला. गोदानाचे फळ श्रेष्ठीस प्राप्त झाले. त्या कारणाने, गाईच्या विक्रीची किंमत नरसिंह वर्माने आपलराज शर्मा यांस देण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे, अवधूतांच्या सन्निध्यात श्रेष्ठी व वर्म्यांस अपूर्व अशा पुण्याचा लाभ झाला.
भविष्य काळात कोकनद (काकिनाडा) या नावाने वायसपुर अग्रहार प्रसिध्द होईल. श्यामलांबापुर (समर्लाकोटा) श्री पीठिकापुर एकत्र होऊन महानगराचे स्वरूप धारण करील. जगातील सगळया देशांचे, सगळया धर्माचे किंवा पंथाचे लोक कुठल्या तरी जन्मी, एके दिवशी पीठिकापुरी येतील व श्रीपादांचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. ''श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत '' हा ग्रंथ श्रीपादांच्या आशिर्वादाने प्रसिध्द होईल. भूर्जपत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या संकल्पाने अदृश्य रूपाने श्रीपादांच्या जन्मस्थानी सात मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील. त्यांच्या जन्मस्थानी श्री पादुकांची स्थापना व मंदिराचे निर्माण होईल. श्रीपादांस गोदान केलेले महा पुण्यशाली वेंकटप्पय्या श्रेष्ठी खरोखर धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात धन-धान्याची समृध्दी असेल. ते हिरण्यलोकात थोडा काळ राहून पुन्हा महाराष्ट्र देशात ऐश्वर्यवंत वैश्य कुळात जन्म घेवून श्री नृसिंह सरस्वती अवताराचे सुध्दा दर्शन घेतील. बाबारे ! शंकरभट्टा ! हे गोदान अत्याधिक विशेष शुभप्रद आहे. तू कुरवपुर प्रयाणाची तयारी कर. श्रीपाद श्रील्लभ सदैव तुझी रक्षा करतील.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"