Thursday, April 4, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -8

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -८
दत्तावताराचे वर्णन
आत्मसाक्षात्कार कसा घडतो ? ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण
दुसरे दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्यिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले ''अरे शंकरभट्टा आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी पंधरा कला आपआपल्या भुता मध्ये लय पावतात त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्म स्वरूपात लय पावत असतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो, तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, विश्वास, आकाश, वायु, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकांतील विविध नावे त्यांना अग्नि सोळा कळा असे म्हणतात. श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्मावतार आहेत.''
अन्न हेच मन होय - सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते
विधात्याने प्रथम प्राणांची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राण शक्ती होय. त्या प्राण शक्तीस सूक्ष्मात्मा, हिरण्यगर्भ या नावाने सुध्दा संबोधिले जाते. प्राणमय कोषामध्ये स्थित जीवधातु शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्यास संतुलितरीत्या प्रवाहित केल्यास मनुष्यांचे भौतिक दु:खांचे निवारण होते. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. त्याच्या नंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टीच्या प्रारभांचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा अविर्भाव झाला. या पंचभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली. ह्यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली. या दहा इंद्रियावर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारा पासून बनते म्हणून मनुष्याने आपल्या आहारा विषयी अत्यंत सावध असले पाहिजे. कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच (सुक्ष्मांशाने) मनातील भावना प्रकट होतात. जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात. मनातील विचाराच्या धारेस क्रमबध्द करून नियंत्रित करणे यालाच ''मंत्र'' असे म्हणतात. यज्ञ-यागादिकांचे विधिपूर्वक आचरण करीत त्या त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधिपूर्वक करणे ह्यास ''कर्म'' असे म्हणतात. विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे. नामरूप विवर्जित जग असू शकत नाही. आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक एक देवता असतात. या देवतेच्या प्रभावाने ती ती इंद्रिये कार्य करीत असतात. समाधिस्त असलेल्या योग्यास जेंव्हा आत्म साक्षात्कार होतो त्यावेळी सोळा कला, मूलतत्वात लय पावतात. योग्याच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते. कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रियाने युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही.
अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ति होत नाही
मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहं म्हणजे मन आणि बुध्दि हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुध्द चैतन्यच होय. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहात नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योग्यास जेंव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेंव्हा श्रौत कर्म आणि त्याच्या प्रतिफलाचे ज्ञोंच्द्र महद अहंकार असून, मायाजालासहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो. परमात्मा व्यक्तित्व सहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे. कर्म व त्याच्या फलाचा नाश पाऊन योगी सिध्दावस्थेस प्राप्त करतो. जरी योगी कर्म फलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने, तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो. परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो. योगीक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यास झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचा गर्व हरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते. श्री बापन्नार्यानी श्रीशैल्य क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर कांही ठिकाणी सौर मंडलातून शक्तीपात केला होता. स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्चन मूर्तीत सुध्दा शक्तीपात केला होता. अग्निसंबंधित असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुध्दा अर्चना मूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते. स्वयंभू दत्त मूर्ती मध्ये झालेल्या शक्तीपाताचे रहस्य केवळ अंतर ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात. श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तीपात, हजारो लोक उपस्थित असताना श्री बापन्नार्यांच्या अध्वर्यत्वाने झाला होता. सूर्य मंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात ते लीन झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तीपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्ये आहेत. ती केवळ महायोग्याना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्या योग्यआहेत. श्रीशैल्यात झालेल्या शक्तीपात शांती विधान करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नि शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले. पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तीपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्याकारणाने तेथे शांती विधान किंवा अन्नदान झाले नाही. श्री बापन्नार्यानी अन्नदान करण्यास सुचविले असता, पिठापूरातील ब्राह्मण पंडितांनी तर्क, विर्तक करून श्री बापन्नार्याची सूचना फेटाळून लावली.
श्रीपाद षोडश कला परिपूर्ण
काळ आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता दोन वर्षाचे झाले. या दोन वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपर्णअसल्याचे अनेक बाललीलाद्वारे दाखवून या युगातील महा अवतार असल्याचे निदर्शनास आणले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले. त्यानंतर ते चौदा वर्षे पर्यंत कुरवपूर व आणखी कांही क्षेत्रात राहिले. परंतु त्यांची शरीरयष्टी सोळा वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती.
श्री दत्तात्रेयांचे षोडश अवतार :
सोळा या संख्येस एक वैशिष्ट्य आहे. श्री दत्तात्रेयानी पूर्व युगात सोळा अवतार धारण केले होते. ते असे 1) योगीराज, 2) अत्रिवरद, 3) दिगंबरावधूत, 4) कालाग्निशमन, 5) योगीजन वल्लभ, 6) लीला विश्वंभर, 7) सिध्दराज, 8 ) ज्ञानसागर, 9) विश्वंभरावधूत, 10) मायामुक्तावधूत, 11) आदिगुरु, 12) संस्कारहीन शिवस्वरूप, 13) देवदेव, 14) दिगंबर, 15) दत्तावधूत, 16) श्यामकमल लोचन.
श्रीदत्त प्रभू भोग व मोक्षाचे दाते होत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुका जवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरण कमली पडून असतात. श्री दत्तात्रेयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुध्दा असमर्थ होत. युगांतरी जेंव्हा वामनावतार झाला तेंव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षीचा सुध्दा जन्म झाला. त्यांच्या जन्म समयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशेंचे अवलोकन करून पुन: गर्भात निघून गेले. तेंव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवानी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मत: शुध्द ब्रह्मज्ञानी होते.
त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्म समयी सुध्दा घडले. ते केवळ ज्योती स्वरूप होते. याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म द्विज होते. ते संपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत, सच्चिदानंदघन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरू अशी व्युक्त नव्हती. वास्तवात, ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते. म्हणून त्या त्रैमूर्तिस अतीत असलेले चतुर्थतत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता, महायोगी, सिध्द पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते. चित्रा नक्षत्राचा अधिपति अंगारक (मंगळ) आहे. तो ग्रह पाप (नीच) स्थानी असता सकल जीव राशीस अमंगलप्रद ठरतो . सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असतांना श्रीपाद प्रभुंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते . श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्ते आहेत. ते हरी-हरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी तूळ राशीमधे जन्म घेतला. ते जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही. धर्म संकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्म पथप्रदर्शनाचा लाभ होतो. सूर्य हा ग्रहांचा अधिपति आहे. सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणुकांही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते.
श्रीदत्तप्रभूपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून तीन कोटी देव व त्यांच्या पासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्रीदत्त नामस्मरणाने सकल देवतास्मरण केल्याचे फल प्राप्त होते.
श्रीदत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषी पूजन करावे. विष्णुमुखास, श्री सत्यनारायण व्रत व विष्णु सहस्त्र नामाने पूजन करावे. त्यांच्या रुद्रमुखास, रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे. श्रीदत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिव्हेवर सरस्वतीचा निवास आहे. विष्णूमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे. रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे. सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादाच्या वामभागी व पुरुष देवता शक्ति दक्षिण भागी विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्त गिरीवर अवतरलेले श्री वेंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच. ''वें'' कार हे अमृत बीज व ''कट'' हे ऐश्वर्य बीज होय. म्हणून श्री वेंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. ''वें'' म्हणजे पाप व ''कट'' म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे. श्री वेंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत. तेंव्हा मी म्हणालो ''हे तिरुमलदास ! पूर्वी वर्णाश्रमधर्म काटेकोरपणे पालन करावा असे विद्वज्जनांचे म्हणणे होते. परंतु श्रीपाद प्रभूंचे मत याच्या विरूध्द होते असे मला वाटते. तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती.'' यावर तिरुमलदास म्हणाले ''अरे ब्राह्मणांने ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणात (प्राप्तीसाठी ) जीवन घालविले. तरच तो सद्ब्राह्मण म्हणवला जातो. विहित धर्म, कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल. त्याचे दुराचार वाढून तो गो हत्या व गो-मांस भक्षण करण्यास प्रवृत झाल्यास त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पाऊन त्याचे ब्राह्मतेज संपूर्णपणे क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवन कणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो. तेंव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने निरंतर तपाचरण केल्यास ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो. क्षत्रियांच्या शरीरात जन्मजात असलेल्या जीवनकणात तपाचरणाने बदल घडून, त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. या प्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते. शनीग्रहाचे तीन राशीत म्हणजे साडेसात वर्षे पर्यंत चलन असते. तेंव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडतो. जुन्या जीवन कणांचा नाश होऊन नूतन जीवन कणांचे सृजन होत असते. याची मनुष्यास कल्पना सुध्दा येत नाही.''
क्षत्रियांचे लक्षण
क्षत्रियाने क्षात्रधर्माचा त्याग करून शांतीरस प्रधान असलेले कृषी, गोसेवा, वाणिज्य, अशा धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील क्षात्रतेज टिकून राहत नाही. त्याच्या मन, बुध्दि व शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैश्यत्वास पावतो. ब्राह्मणाने क्षात्र धर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होतो. पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मत: ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षात्र धर्माचे पालन केले नव्हते का ? कुसुम श्रेष्ठी वैश्य असला तरी त्याने क्षत्रिय वृत्तीचे अवलंबन केले नव्हते का ? जन्मत: शुद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का ? निरंतर प्रयत्नाने (तपाचरणाने) शूद्र सुध्दा वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो. केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे यम, धर्म, शिक्षा आचरीत आहे किंवा नाही असे नसून, आपआपल्या शुभ कर्माच्या फलावर आपला वर्ण अवलंबून आहे. जन्मत: शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल. तसेच जन्मत: ब्राह्मण असलेल्यास पुढचा जन्म शुद्राचा सुध्दा मिळू शकतो. सामाजिक कारणासाठी वर्ण व्यवस्था करण्यात आली. परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व, बाहू क्षत्रियत्व, ऊरु वैश्यत्व व पाद शुद्रत्वाचे सूचक आहेत असा श्रीपादांनी एक पर्याय सांगितला. तू माझ्या अतिथ्याचा स्वीकार केलास. माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय.
कर्मरहस्य
निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरले आहे. जन्मत: नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक व अध्यात्मिक स्पंदने विषपूरित असल्याकारणाने तेथील वायुमंडल कलुषित झाले होते. या कारणानेच श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या अतिथ्याचा स्वीकार केला नाही. यातील हे रहस्य आहे बरे का ! जीव परिणाम क्रमाने किंवा विपरिणाम क्रमाने कर्मसुत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे. नाही का ? यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली. जाँन, हा जर्मनी देशाचा रहवासी असून सुध्दा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती. परिणाम क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला कुरवपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ति झाली. नरसावधानी पीठिकापुरमध्ये असून सुध्दा श्रीपाद, श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली. हे जाणल्यानंतर सुध्दा साधनाक्रमाशिवाय श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे अशक्य होय.
यावर मी म्हणालो ''स्वामी आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणांमध्ये बदल घडत असतो. तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय ? पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणातात. असे म्हणण्याचे कारण काय ?''
यावर तिरुमलदास म्हणाले ''प्रत्येक जातीस एक आत्मा असतो. तो शक्तीच्यारूपात असतो. ती शक्ती , दिव्यात्मा असल्या श्रीदत्तप्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे. सदैव या शक्तीचा संबंध परमात्म्याशी असल्या कारणाने, ती महाशक्ति होय. जात या शब्दाचा अर्थ तू जो समजतोस तसा नाही. जिवंत व्यक्तिमध्ये जसे चैतन्यवंत असे जीवकण असतात, असा आहे. त्याचप्रमाणे सामुहिक/सांघिक व्यक्तित्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ति -सामर्थ्य गुणगण अंतर्लीन होऊन असतात. तसेच प्रत्येक गावास, प्रत्येक शहरास, प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो. आपण राहतो त्या भूमीस सुध्दा आत्मा आहे. भूमीची जी अधिष्ठान देवता तीस आपण भूमाता'' असे म्हणतो. तीच्यातील आत्म्याचे, परमात्म्याचे अंश असल्या कारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे. तसेच हिमपर्वताच्या ठायी अधिष्ठित असलेल्या देवताशक्तीस हिमवंत असे संबोधित करतो. त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय. सर्वसाक्षी सूर्य भगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास, जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ति आहे असा अर्थ होतो.
जगातील सारे प्राणीमात्र, आपआपले कार्य करण्यासाठी सूर्यापासून उर्जा प्राप्त करतात. आकाशात विराजमान असलेले सूर्य बिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवतात्मा वेगळे. श्रीपाद वल्लभ वयाच्या तिसाव्या वर्षी गुप्त होतील असे मी तुला सांगितले होते. ते अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणु-रेणु मध्ये विलीन होतील. ते सर्वांतर्यामी आहेत ना ? पुन्हा विलीन होणे म्हणजे काय ? असा प्रश्न तू विचारू शकतोस. ते सर्वांतर्यामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोडया अंतरावर कोटयावधि ब्रह्मांडे आहेत. त्या ब्रह्मांडातील परिभ्रमणांचे व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्ति प्रभावाने त्या ब्रह्मांडास आपल्या जवळ आकर्षित करतात. संपूर्ण सृष्टीत परिणाम दशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रेयांचा अवतार होते. चुंबक लोहाचे आकर्षण करते. परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाची आकर्षण करण्याची शक्ति अत्यंत बलहीन होते. मलिनत्वास नाहीसे करून, सृष्टीतील प्रत्येक अणुचे आकर्षण करून, विश्वपरिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेंव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात.
पंच कन्यांचे विवरण
तेंव्हा मी म्हणालो ''स्वामी ! अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरस्तथा । पंचकन्याम् पठेन्नित्यम् महापातक नाशनम् ॥''-असे म्हणतात. हा विषय मला सुलभ रीतिने समजत नाही म्हणून ह्याचे विवरण करावे ही प्रार्थना.
तिरुमलदास यावर म्हणाले - ''अहल्येवर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला, कुक्कुट रूप धारण करून त्याने बांग दिली. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. पतिव्रता असल्या कारणाने इंद्र अहल्येस स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवता देवशक्तिसंपन्न असल्या कारणाने, त्याने अहल्ये मायेची अहल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहल्येशी समागम केला. माया अहल्येच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छामुळे उत्पन्न झाली होती. माया अहल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होवून त्या दोघांस शाप दिला. अहल्या म्हणाली ''हे मुनीवर, आपण हे काय केले ?'' अध्यात्मात अहल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती. अहल्येच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षंपर्यंत भ्रमिष्ठ होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले. अहल्येची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पावून शीळा झाली. श्रीरामाच्या चरण धुळीने अहल्येचे शाप विमोचन झाले. म्हणून अहल्या परम पवित्र आहे असे जाण.'' शापग्रस्त झालेला इंद्र पंच पांडव म्हणून जन्मास आला. पाच रूप, पाच मन असले तरी, त्यांस आधारभूत असलेला आत्मा एकच ! हा एक विचित्र असा विषय आहे. शचीदेवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला. ती अयोनिजा आहे.
खऱ्या सीतेस अग्नीदेवाने आपल्या गर्भात लपविले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली. म्हणून सीता महापतिव्रता आहे असे जाण.
भूचक्रात 12 राशीमध्ये 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांची जी अधिष्ठात्र देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती भर यौवनात असताना, गुरु ग्रहाचे अधिष्ठात्र देवता असलेले बृहस्पती , मोहित झाले व तिच्याशी विवाह केला. वृध्द पति यौवनवतीस तृप्त करू शकत नाही. हा विषय धर्म विरुध्द आहे. म्हणून विवाहसमयी केलेले शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवीच्या मनात बृहस्पती विषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती. तसे न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेले बृहस्पतीने, धर्म विरुध्द आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मन:प्रवृती प्रमाणे बदल घडले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते. ह्या प्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीस विवाह केलेली तारादेवी भिन्न होत. म्हणून तारा-चंद्र यांचे मिलन हे धर्म विरूध्द नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रांतून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय, गुरु ग्रहाचा नव्हे. जर गुरुग्रहाने असे केल्यास, धर्म विरूध्द होईल. कुठल्याही धर्म विरूध्द कार्याची अधोगती होते. म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारादेवी, चन्द्र मंडलाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हाच धर्म होय. बाबारे ! ह्या धर्मसूक्ष्मास अनुसरून तारादेवी महापतिव्रता होय.
भीष्माचार्य शरशय्येवर असता, युधिष्ठिरांस हितोपदेश केला. भीष्म म्हणाले ''कुकर्म घडत असता, शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे.'' यावर द्रौपदी खुदकन् हासली. त्यावर भीष्म म्हणाले, ''ज्या वेळी द्रौपदीचा मानभंग झाला, तेंव्हा माझे वागणे अनुचित होते. कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याच्या अन्न सेवनाने, माझे रक्त कलुषित झाले होते व बुध्दी भ्रष्ट झाली होती. आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून, बुध्दी कल्मषरहित झाली असून, ज्ञानोदय झाला आहे.''
जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो. थोडया जन्मात स्त्री तर थोडया जन्मात पुरुष होतो. मानव जन्माव्यतिरिक्त , पशू-पक्ष्यादिंचा सुध्दा जन्म घेतो. जन्मांतरी, मंदोदरीचा पुरुष जन्म होता, त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची व एक मृदु स्वभावाची, अशा तीन पत्नी होत्या. इहजन्मी, चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला, दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदु स्वभावाच्या पत्नीचा बिभीषण म्हणून जन्म झाला. कल्पांतरी, हे तिघे मंदोदरीचे पुरुषजन्म असता तिचे पत्नी होते. तर ती या जन्मी, चंचल वृत्ती असलेला वाली ह्याची पत्नी झाली व त्या पासून अंगदाचा जन्म झाला. तदनंतर, दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाचीभार्या झाली. रावण संहारानंतर, मृदुस्वभाव असलेल्या विभीषणाची पटराणी झाली. तर वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना व बिभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते. म्हणून मंदोदरी सुध्दा महापतिव्रता होय !
तेंव्हा मी म्हणालो - ''स्वामी ! स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एकपत्निव्रत असला पाहिजे असे म्हणतात तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना ?''
कर्मचक्र परिणाम :
तिरुमलदास म्हणाले - ''तुझे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मपर्यंत बाल विधुर होतो असे सांगीतले आहे. एखादा पुरुष चार-पाच स्त्रियांशी विवाह केल्याने, पुढील जन्मी, हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या चार-पाच स्त्रिया, त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने, पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एकाजन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो. जर विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी, एकाशी विवाह केल्याने दोष नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मा संबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे.''
पती-पत्नीमध्ये कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता, नपुंसक होतात व संसारसुखास वंचित होऊन दु:खी होतात. मांसाहार निषिध्द आहे. समजा एखादी व्यक्ति एका शेळीचा वध करून चार-चौघाबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते तिचे पीडित स्पंदन वायुमंडलात वावरत असतात. बाबारे ! वायुमंडलात पीडामय व आनंदमय स्पंदने असतात. सत्कर्मांमुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मांमुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृत शेळीने मारून खाल्लेल्या चार-चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राण त्याग झालेल्या कारणाने, मानव जन्म घेते व मांसभक्षण केलेल्या मानवांचा, शेळींचा जन्म होतो. म्हणून, मानवांनी क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ति शेळीस पाहिल्यावरही त्याचे मांस भक्षण करू इच्छित नाही. जरी ती शेळी पुर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते.
पीठिकापुरीच्या रहिवाश्यांचे सामुहिक पुण्य व सामुहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने, श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी श्रीपादांस श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले तर पापी जन श्रीपाद श्रीदत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागिदार होते झाले. श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यांस रौरवादि नरकाची प्राप्ति होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय. पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखांस मंगलारती करीत पायांवर खिळे ठेकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रेयांनी आपल्याअनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तिचा समावेश केला. पुण्यवान जनांस केवळ नामस्मरणाने अप्रयत्नांने सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळत. श्रीपादांचे अग्नि स्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्नि वस्त्र होय. ते पवित्र योगाग्नि स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद - उपनिषद सुध्दा त्यांच्या पादुकांचे वर्णनकरण्यास असमर्थ आहेत. किती युग झाले ? किती कल्प लोटले ? केवढे वेळा स/ष्टी, स्थिति, लय क्रम पूर्ण झाले ? पण श्री दत्त ते श्री दत्तच. ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत ! सृष्टीतील प्रत्येक अणु या परम सत्याचे साक्षीदार आहेत.
स्वयंभू दत्ताची पुन:प्रतिष्ठा
श्री पीठिकापुरास एका अवधूताचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिध्दपुरुष होते. त्यांचे वागणे अती विचित्र होते. कोणास आशिर्वाद द्यायचे असले तर शिवी-गाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता. कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे
पीठिकापुरवासीयांनी त्या सिध्दास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेंव्हा ते सिध्द पुरुष म्हणाले की, श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत. भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुन:प्रतिष्ठा, सर्वमंगलप्रद अशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री आप्पलराज शर्मा यांनी केली. त्या महोत्सवाचे अध्वर्यू श्री बापन्नार्य होते.
विद्यारण्यांचे प्राकटय :
मंदिरात मूर्तीची पुन:प्रतिष्ठा झालेल्या दिवशी, श्री बापन्नार्यानी, त्या सिध्दपुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी त्या सिध्दास श्रीपादांचे दर्शन झाले. केवळ दोन वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर, त्या सिध्दाच्या मनात पुत्र वात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद, मातुल श्री वेंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी चेष्टा करीत, सिध्दांकडे दृष्टी करून हासले. ते हास्य पाहून सिध्दास समाधी लागली. समाधी तून व्युत्थान झाल्यावर, श्रीपाद म्हणाले ''माधवा ! तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना, माझे वय 16 वर्षाचे झाले असता, बुक्कराय करील. तू हरिहर-बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे. विद्यारण्य महर्षि या नावाने तुझी ख्याती होईल. तुझ्या सहोदर सायणाचार्यांच्या वंशात येणाऱ्या शताब्दात गोविंद दिक्षिताचा जन्म होणार आहे. तो गोविंद दिक्षित कोणी नसून तूच असशील ! राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील.''
असे ऐकल्यावर आनंदाने सिध्दाच्या डोळयातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्याने श्रीपादांना आपल्याजवळ घेतले. इतक्यात श्रीपादांनी त्या सिध्दाच्या चरणांचे वंदन केले. सिध्दाने आश्चर्य व्यक्त करताच श्रीपाद म्हणाले -''तू विद्यारण्य या नावाने श्रुंगेरी पीठाधिपती होशील. तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्य कृष्णसरस्वती म्हणून तूच असशील. तुझ्या मनात माझ्या विषयी पुत्र भाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नृसिंहसरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्णसरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उध्दार करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा ह्यांची साक्ष असेल.
वशिष्ठ शक्ति पराशर त्र्यार्षेय प्रवरान्वित पाराशर गोत्रोद्भव ऋग्वेदांतर्गत , वाजपेययाजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होतील. बाबारे ! उद्या तुला आणखी चरित्र सांगिन असे म्हणून तिरुमलदासांनी, त्या दिवशीचे निरुपण तेथेच थांबविले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"