Wednesday, March 13, 2019

शरण ही वेण्णा आत्मारामा

*शरण ही वेण्णा आत्मारामा*

"महाराज, मजला माहेरास पाठवा."

सिध्दासनातील अर्धोन्मिलीत दृष्टी पूर्ण उघडली. अथांग सागराचा शांतभाव विलसणारें ते कमलनयन समोर कोण आहे याचा ठाव घेवू लागले.
समोर दास्यभक्तीची साक्षात् प्रतिकृतीच जणू, अशी वेण्णा उभी होती. सद्गुरूचरणांवर आपली दृष्टी ठेवून; विनितभावानें हात जोडून; चित्तातील सर्व व्याकुळता ओतून वेण्णा बोलत होती.

मुलीला पाहून आईचे वात्सल्य जसें जागे होते ना, तसे समर्थांचे वात्सल्य जागें झाले. वेण्णा एवढ्या वर्षांपासून रामरायांची सेवा करतेय, संपूर्ण जीवन तिनें संप्रदायाच्या कार्यासाठी घालवले पण कधी कधीच तिला माहेरी जावेसे वाटले नाही, मग आजच का? 
समर्थांनी ध्यान केलें. त्या सच्चिदानन्द गुरूतत्वास अंतर्ध्यानाने उमगले, वेण्णेला 'माहेरी' म्हणजे नक्की कोठे जायचेय् ते. अंतरस्थितीची खूण अंतरनिष्ठानें जाणली. परंतु सभोवारचा जनसंमर्द पाहून समर्थ वेण्णेस बोलले, "आताच एवढी काय घाई आहे? रघुनाथजींचा जन्मोत्सव सुरू आहे. रामनवमी आणि मारूतीरायांच्या जयंतीचा उत्सव होवून जावू दें. मग सज्जनगडीं गेल्यावर पाहू काय करावयाचें तें!"
आज्ञाधारकपणें वेण्णा निघून गेली.

शके १६००! (सन १६७८) श्रीरामनवमीच्या दिव्य उत्सवाकरिता सद्गुरूनाथ श्रीसमर्थ रामदासस्वामी शिष्यमंडळींसह चाफळास आले होते. श्रीरघुनाथजी व हनुमंतरायांच्या जयंतीचा उत्सव म्हणजे अवघ्या चाफळखोर्यात दिवाळीच!  पंधरा दिवस मंडळींना उसंतच नाही!

अखेर उत्सव सानन्द पार पडला. पौर्णीमेनंतर समर्थांसह सर्व शिष्यमंडळ सज्जनगडीं निघाले. वेण्णास्वामी आपल्या मिरजेच्या मठाकडे निघाल्या, परंतु समर्थांनी त्यांना आपल्यासह सज्जनगडावर यावयाची आज्ञा दिली.

मंडळी गडावर पोहोचली. नित्याचे सर्व दैनंदिन व्यवहार; व्यायाम, स्नानसंध्या, पूजा, जप, दासबोधवाचन, भिक्षा वगैरे सर्व पुर्ववत सुरू झाले. वेण्णास्वामी मात्र एकट्याच बसत. विचार करत. समर्थांची, रामरायांची सेवा मनापासून सुरू होतीच!

चैत्र वद्य एकादशीचा दिवस होता. प्रात:काली नित्यकर्मे आटोपून गुरूमहाराजांचें दर्शन घेवून शिष्यमंडळी आपापल्या कामास लागली. आपणही दर्शन घेवून यावे व मगच रांधपाला सुरूवात करावी हा विचार करून वेण्णास्वामी दर्शनास गेल्या. पुन्हा तोच प्रश्न विचारला,
"महाराज, मला माहेरी जायचेय्!"
"हो, आता तुझ्या माहेरी जाण्याचा मुहूर्त जवळच आलाय् बरं बाळ!" वात्सल्यानें समर्थ म्हणाले.
"तत्पुर्वी एक प्रार्थना आहे माझी."
वेण्णास्वामी विनम्रतेने म्हणाल्या.
"काय हवे आहे बाळ?"
"आपल्या स्वस्वरूपाचें दर्शन हवेय् माऊली!"
"तथास्तु!" समर्थांनी आश्वस्त केले.

त्या दिवसांत समर्थ भोजन आपल्याच कक्षात व एकांतातच करत. एकदा जेवावयास बसले की कुणी मधात गेलेले त्यांना चालत नसे. त्यामूळें जे काही वाढावयाचें ते एकदाच, नंतर वाढावयास जाणे नाही. त्याही दिवशी एकादशीस आक्कास्वामी व वेण्णास्वामींनी समर्थांचे पान वाढले. वेण्णास्वामी ते घेवून समर्थकक्षात गेल्या. समर्थ मध्यान्हसंध्या करत होते. वाढलेले  पान पाटावर झाकून ठेवून, पुढे दुसरा पाट मांडून सुबकशी रांगोळी काढून वेण्णास्वामी बाहेर आल्या व दार लोटून घेेतले. कोठीघरात गेल्यावर आक्कांनी सांंगीतले, "वेण्णे, कोशींबीर राहीलीच की गं वाढायची!"
"हो का? माझ्या तर लक्षातच राहीले नाही. असूदे. महाराजांची संध्याच सुरूय् अजून. पटकन् वाढून येते", असे बोलून कोशिंबीरीची वाटी घेवून वेण्णास्वामी परत समर्थांकडे निघाल्या. मघाशी निघताना त्यांनीच लोटून घेतलेलें दार त्यांनी परत उघडून आत गेल्या.

आणि आतमधील दृश्य पाहून त्यांना दरदरून घाम फुटला!!  वाटी हातून निसटली! तत-पप होवू लागली. सर्व शरिर थरथरावयास लागले!! सर्वांगास कंप सुटला! सर्व कक्षात सहस्त्रसूर्यांचा  प्रकाश पसरला होता, आणि-आणि-आणि-

पाटावर खुद्द बलभीम कपिवर्य मारूतीराय बसून जेवत होते!!!!
त्यांच्या प्रत्येक ग्रासागणिक 'श्रीराम जयराम जय जय राम' चा स्वर कक्षात घुमत होता!!

वेण्णास्वामी भांबावल्या, समाधीत गेल्या. काही कालावधीनें देहबोधावर आल्या. पहातात तो काय, आक्का त्यांना मांडीवर घेवून वारा घालत होत्या. कल्याण, गिरीधर, उध्दव चिंताक्रांत मुद्रेने जवळ बसले होते.

"वेण्णा! काय झाले होते बाळ?"
घनगंभिर मधुर ध्वनी कानी पडला. वेण्णास्वामींनी पाहीले, तिच ती परब्रह्मस्वरूप बलिष्ठ मूर्ति मायेनें डोक्यावरून हात फिरवत होती.
आता वेण्णास्वामींना राहवेना! त्या तटकन् उठल्या! "गुरूमहाराज! आपणासारखे कृपाळू दयाघन आपणच! दीनदासाची इच्छा पूर्ण करणारें आपणच! मजसारख्या सामान्य कन्येसाठी आपण एवढे सर्व केलेत! महाराज! आपणच आंजनेय, महारूद्र!! माझ्यावर कृपा करा माऊली!"

वेण्णास्वामींचे अष्टसात्विक भाव जागे झाले होते. पण जमलेल्या इतरांना काहीच कळेना! शेवटी समर्थांनी सर्वांना सांगीतले,
"बाळांनो, आजपासून तिसर्या दिवशी चतुर्दशीस वेण्णा माहेरी जाणार आहे. आक्का, त्या दिवशी तिच्या आवडीचे गोडधोड रांध! कल्याणा, तिला काय हवे नको ते बघ! जर तिची व्यवस्थित पाठवणी केली नाही तर रामराय मलाच बोलतील. जानकीमाता माझ्यावरच रागावेल, गुरू म्हणवतोस आणि वेण्णेची नीट पाठवणीही....केली..नाहीस....
असे.....म्हणतील. तेव्हा....तिची....योग्य... ती... काळजी..घ्या..."
यापुढे समर्थ सद्गुरूस बोलवले नाही. त्यांना खूप भरून आले. कंठ दाटला. ते तत्काळ उठून निघून गेले.

कल्याणस्वामींना सर्वच समजले. त्यांनाही गहिवर दाटून आला. तिन दिवस ते वेण्णास्वामींची कसोशीने काळजी घेवू लागले. वेण्णास्वामी मिस्किलपणें म्हणाल्या, 
"अरे बलभीमा, माझी काय सेवा करतोस, महाराजांच्या सेवेत खंड पडेल की!"
कल्याणाचा कंठ दाटून आला. तो भरून बोलला, "वेण्णे, तू तुझ्या भावाला सोडून जाणार?"

वेण्णास्वामींच्या धैर्याचा बांध फुटला. त्यांनाही गहिवरून आले. पण समजूतदारपणें म्हणाल्या, "कल्याण, आता तू, आक्का, उध्दव मिळून महाराजांची काळजी घ्या. त्यांची प्रकृति हल्ली ठीक नसते. आणि वेड्या, रडू नकोस! मी कुठें दूर चालल्ये? मी तर माहेरीच चालल्ये ना? तुलाही यायचेच आहे कधीतरी, आक्काही येईल, उध्दव, गिरीधर, फार काय स्वामीही येतीलच हो. मग माहेरी करूयात की भक्तीची दंगल! खुद्द रामरायासमोर!"
कल्याणस्वामींनी स्वत:स सावरले.

चैत्र वद्य चतुर्दशी! वेण्णास्वामींच्या माहेरी जाण्याची वार्ता संपूर्ण गडावर पसरली. लोकांना कळेना, त्यांना वाटले माहेरी म्हणजे कोल्हापूरासच जायचे की काय वेण्णेस!
परंतु खरे काय हे फक्त मोजक्यांनाच ठावुक होते. समर्थांनी सकाळीच सर्वांना सांगीतले,
"आज दुपारी भोजनानंतरच्या वामकुक्षीनंतर  वेण्णेचें किर्तन ठेवा. ते झाल्यानंतर मग ती माहेरीं जाईल!"

सर्वांची दुपारची जेवणे झाली. वेण्णेला स्वत: समर्थांनी तिचे आवडते पदार्थ भरवले! खूप कौतुक केले. कल्याण, उध्दव, आक्का, गिरीधर आपापली आसवे लपवीत वेण्णास्वामींना काय हवे नको ते पाहत होते.

भोजनानंतर मठाच्या शेजारीच किर्तनाची तयारी करण्यात आली. साथीला टाळ घेवू  समर्थ स्वत: बसले होते. मृदंग, पखवाज  तयार होते. सर्व भक्तगण बसल्यावर वेण्णास्वामी रंगशिलेवर उभ्या राहील्या. आज त्या प्रचंड तेजस्वी दिसत होत्या. स्वच्छ धुतलेले तांबडे आलवण, व्यवस्थित डोक्यावर पदर घेवून, श्रीराम व समर्थांना वन्दन करून, त्यांनी किर्तनास प्रारंभ केला व निरूपणाचा अभंग घेतला,

जय जय रघुवीर समर्थ!
श्रोता वक्ता श्रीराम समर्थ!
बंध विमोचन राम। माझा बंध विमोचन राम।।
भावभक्तीच्या सुलभ साधनी, पुरवील सकलही काम।।
सकलही ऋषीमुनी भजती जयांसी, तोची एक सुखधाम।।
सद्गुरूकृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम।।
शरण ही वेण्णा आत्मारामा, पावली पूर्ण विराम।।

वेण्णाच का ही? छे! साक्षात वाग्शारदा!! भगवती सरस्वती! सकलवेदान्त, पुराणे, अध्यात्मरहस्ये जिच्या जिव्हेवर फेर धरून नाचताहेत की काय! काय ते रसाळ निरूपण, किती गोड आवाज, किती संस्कृत व्याकरणाचे ज्ञान! अहाहाहाहाहा!! वेण्णास्वामींची किर्तने तर आजवर खूप झालीत, पण हे काही वेगळेच हो! रंगशिलेवर वेण्णा, टाळांवर खुद्द समर्थ, मृदंगावर कल्याण! काय हे रमणीय दृश्य! श्रीराम माता वैदेहीसह, तिन्ही बंधूंसह, व बलभीमासह श्रवणास आलेत असाच भास होतोय्!!

उत्तररंग संपत आला. माहेरी प्रयाणाची घटका जवळ येत चालली. अंतिमत: कळवळून वेण्णास्वामी म्हणाल्या,
"श्रोतेहो, रामरायाच्या नामास सोडू नका, तो तुमचा उध्दार करेल! गुरूमहाराज साक्षात् हनुमंत आहेत, त्यांना सोडू नका! त्यांची केवळ कृपादृष्टीही पाप्यांतील पाप्यास मुक्ती मिळवून देणारी आहे! अनन्य जे नर शरण रिघाले, त्यांना पावणारी ही रामदास माऊली आहे. या दयाघनास शरण जा! मला आनन्दानें निरोप द्या! मी आता माहेरी जात आहे...."

धिमी धिमी पाऊले टाकीत वेण्णास्वामी समर्थांकडे निघाल्या.भक्तसमुदाय तल्लीन होवून नामस्मरण करित होता,

रघुवीर रघुवीर स्वरूप सुंदर, सीताराम सीताराम।।
रघुवीर रघुवीर स्वरूप सुंदर, सीताराम सीताराम।।

वेण्णा समर्थांकडे आली. डोळा नीर दाटून आले. समर्थांच्या जगद्वंद्य चरणांवर मस्तक ठेवून प्रेमाश्रुंनी ते भिजवू लागल्या. पाहून मुखातून आपसूक स्तवन बाहेर आले,

"शुकांसारखें पुर्ण वैराग्य ज्यांचे।
वसिष्ठांपरि ज्ञान योगेश्वरांचे।।
कवी वाल्मिकांसारिखा मान्य ऐसा।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।"

भजनाचा स्वर आसमंतास भिडत होता,
रघुवीर रघुवीर स्वरूप सुंदर, सीताराम सीताराम।।

आपल्या चरणांवर पडणारे पवित्र  अश्रू थांबलेत की काय असा समर्थांना भास झाला. त्यांनी आक्कास्वामींना बोलावून वेण्णास्वामींना वर उठवले......

एकाएकी भजन थांबले.. आक्कास्वामींनी मोठ्यानें टाहो फोडला, "वेण्णा.........."

सज्जनगडाचा सर्व आसमंत स्फुंदून स्फुंदून रडू लागला. समर्थ समाधिवस्थेत गेले. बहुधा वेण्णास्वामींना माहेरी, नीजधामीं पोहोचवावयास गेले असावेत. बराच वेळानंतर त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागल्या. डोळे उघडल्यावर समोर दिसले कल्याणस्वामी! समर्थांनी कल्याणास पोटाशी धरले, आणि गद्गदून उद्गारले,
"कल्याणा, माझी वेण्णा गेली रे......."

©सुधांशू सुधीर कविमंडन

कृपया प्रस्तुत लेख लेखकाचे नावासहच शेअर करावा.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"