Sunday, March 24, 2019

संत निरंजन रघुनाथ

संत निरंजन रघुनाथ.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

योगीराज गुळवणी महाराज जेव्हा गिरनार यात्रेला गेले होते, तेव्हा त्यांना श्री निरंजन रघुनाथ यांचे स्मरण झाले. निरंजन रघुनाथ यांची कथा महाराजांनी अनेक वेळा अनेक जणांना सांगितली. ती कथा प्रासादिक व नाविन्यपूर्ण आहे, ती कथा अशी आहे...

निरंजन रघुनाथ हे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, रघुनाथ हे त्यांच्या गुरूंचे नाव. निरंजन रघुनाथ एकदा कीर्तन ऐकत असताना त्यांना उपरती झाली आणि त्यांनी तिथेच अशी प्रतिज्ञा केली की भगवान दत्तात्रय यांचे शडभुज रुपी दर्शन एक वर्षात झाले नाही तर प्राणत्याग करीन. अश्या तऱ्हेने घोर प्रतिज्ञ करून दृढ निश्चयाने ते दत्त चिंतनात निमग्न राहू लागले. श्री दत्ताचे दर्शन व्हावे हा एकच ध्यास मनी घेतला होता. सर्वसंग परित्याग करून ते दत्तदर्शन साठी तळमळत होते. वर्षाचा अवधी संपत आला, थोडे दिवस उरले. सह्याद्री शिखरावर श्री दत्तात्रय यांचे पीठ म्हणजे बसायची जागा आहे हे ओळखून गिरनार पर्वता वर चढायला सुरुवात केली. सर्व पायऱ्या चढून ते चौथऱ्यावर आले, पादुकांचे दर्शन घेऊन सदगदीत अंतकरणाने प्रार्थना केली की, मी प्रतिज्ञा केली आहे आपले साक्षात दर्शन व्हावे, अन्यथा प्राणत्याग करीन. वर्ष संपण्यास ३ दिवसाचा अवधी उरला होता. वर चौथऱ्यावर जोराचा वारा, जास्त वेळ तिथे बसता येत नाही तिथे वस्तीला राहणे तर दूरच. निरंजन रघुनाथ यांचा निश्चय पक्का होता. त्यांनी रात्री तिथेच मुक्काम केला. तहान नाही, भूक नाही, झोप नाही, मनात एकच विचार, दत्तात्रय दर्शन फक्त. 

पहिल्या रात्री स्वप्न पडले, भगवान दत्तात्रय स्वप्नात आले व म्हणाले 
"कलियुगात प्रत्यक्ष दर्शन होत नाही, करिता हेच दर्शन समजून परत जावे !
निरंजन रघुनाथ परत फिरले नाहीत, मनात निश्चय एकच की प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय परत जायचे नाही, प्राणाची पर्वा नाही. दुसरे दिवशी स्वप्नात परत दत्तमहाराज आले आणि प्रसाद देऊन म्हणाले
"हा प्रसाद घ्या आणि संतुष्ट व्हा, आणि माघारी फिरा !"
प्रसाद होता खिचडीचा, स्वतः देवाने प्रसाद दिला तरीसुद्धा निरंजन रघुनाथ यांचा निश्चय कायम होता, प्रत्यक्ष दर्शन किंवा प्राणसमर्पण अश्या ठाम निश्चयाने तिसरे दिवशी तिथेच राहिले. 

तीन दिवस पुरे झाले आणि वर्षाचा अवधी संपला, दर्शन झाले नाही म्हणून निरंजन रघुनाथ प्राणत्याग करण्यास सिद्ध झाले. पाषाणाच्या पादुका तिथे होत्याच, जीव एकवटून मस्तक पादुकावर जोराने आपटले, डोक्याच्या कवटीची दोन शकले झाली. शडभुज मूर्ती भक्तवत्सल, भक्त अभिमानी राजाधिराज श्री दत्तात्रय प्रत्यक्ष रुपात अवतीर्ण झाले, मस्तकाला हस्तस्पर्श होताच मस्तक जोडले गेले. निरंजन रघुनाथ शुद्धीवर आले, श्री दत्तात्रेयांना स्वतःच्या डोळ्याने पाहिले, त्यांचे दर्शन घेतले आणि पायावर डोके ठेवले. भगवान दत्तात्रय म्हणाले, 
"कलियुगात असे दर्शन नसते, दुराग्रह धरू नये "! 
दर्शन देऊन भगवान दत्तात्रय अंतर्धान पावले. निरंजन रघुनाथांच्या मस्तकावर जखमेची खूण कायम राहिली. डोक्यावर कवटीला उभी सरळ रेष कायम दिसत होती. 

ही सर्व कथा महाराज काळजी पूर्वक सांगत कारण ही कथा अलौकिक आहे, अलीकडच्या काळात घडलेली आहे व उद्बोधक आहे. निरंजन रघुनाथांनि हे सर्व वर्णन आपल्या गुरू समोर बसून लिहले, म्हणून त्याला जास्त महत्व आहे. निरंजन रघुनाथ यांनी काही ग्रंथ रचना केली, निरंजन रघुनाथांच्या ग्रंथ म्हणून ती प्रसिद्ध आहे. मिरज येथून ते एकत्रीत प्रसिद्ध झाले होते. अमृताअनुभव वरील त्यांच्या ग्रंथात काही कूट ओव्यांचा अर्थ उलगडून दाखवला आहे. निरंजन रघुनाथांच्या पूर्व सुकृता मूळे व चालू जन्मातील साधने मुळे त्यांना दर्शन झाले. त्यांनी डोके फोडून घेतले तो प्रकार इतरांनी करणे हा आततायी पणा ठरेल, उत्तम उपासना करावी हेच उत्तम.

"आठवणीतील गुरुदेव"
 या पुस्तकातून 
लेखक:- श्री. नारायण भालेराव.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"