" आल्लख निरंजन " - एक सत्यकथा
लेखक - प्राध्यापक : दयानंद सोरटे
वाचक मित्रांनो , मी आज या ठिकाणी एक सत्यकथा सादर करणार आहे. या कथेमार्फत माझा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही, आपण केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने हि कथा वाचू शकता.
हि घटना माझ्या आईच्या आईने म्हणजे माझ्या आज्जीने मला सांगितली होती. आणि हि सत्यकथा आहे. कुणाचा विश्वास असो अथवा नसो पण माझा माझ्या आज्जीवर पूर्ण विश्वास होता. माझे आजोळ हे एक ऐतिहासिक गाव आहे. सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात कटगुण नावाचे एक खेडेगाव आहे. याच गावामध्ये महाराष्ट्राचे आद्यसमाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता. आणि कर्मधर्मसंयोगाने हेच माझे देखील आजोळ आहे. बहुधा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मामाच्या गावाला जायचो आणि रात्रीच्या वेळेस आज्जीच्या कुशीत शिरून तिला गोष्टी सांगण्याचा हट्ट करायचो. तिने सांगितलेल्या गोष्टींपैकी हि सत्यकथा आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे.
त्यावेळी आज्जी गरोदर होती. म्हणजे माझा तुकाराम मामा तिच्या पोटामध्ये होता. त्यावेळी बैलगाडीशिवाय गावामध्ये आजच्यासारखी प्रवासाची अशी विशेष साधने उपलब्ध नव्हती. पण पोटोश्या बाईने बैलगाडीने प्रवास करायचा नसतो असं मोठी माणसं म्हणत. कारण गावचे रस्ते ओबड - धोबड़ , खाच खळग्याचे. त्यामुळे गरोदर बाईच्या पोटातील बाळाला इजा होऊ शकते. म्हणून गरोदर बायका बैलगाडीने प्रवास करणे टाळत असत. आजोबांची तब्बेत काही कारणाने बरी नव्हती त्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते. आणि गावाच्या बाजाराला जाणे तर गरजेचे होते. म्हणून मग आज्जीने शेजारच्या एका वयोवृद्ध आजीला सोबत घेऊन बाजाराला जाण्याचे ठरविले. आजोबांनी तिला जाण्यास विरोध केला पण घरामध्ये खाण्याच्या वस्तू संपलेल्या होत्या. त्यात गावाचा बाजार आठवड्यातून एकदाच भरतो. मग पुन्हा आठवडाभर थांबावे लागणार होते म्हणून आज्जीने , आजोबांची समजूत काढून बाजारला जाण्याचे ठरविले.
मूळ रस्त्याला सोडून आडवाटेने रानातल्या वाटेने गेल्यास पुसेगाव म्हणून एक गाव होते. तिथेच आठवड्याचा बाजार भरत असे. आज्जी त्या म्हाताऱ्या बाई ला सोबत घेऊन हातात एक आधारासाठी काठी घेऊन पुसेगावच्या बाजाराला निघाली. गरोदर असल्यामुळे तिला पटपट चालता येत नव्हते. पाय जड झाले होते. अधून मधून थोडं झाडाखाली थांबून त्या दोघी बाजाराच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागल्या. खूप वेळानंतर त्या दोघी पुसेगावच्या हद्दीमध्ये पोहोचल्या. तिथे जवळच उसाचे मोठे शेत होते. बाजूलाच गुऱ्हाळ चालू होते. गुऱ्हाळ म्हणजे उसाच्या रसापासून गुळ बनविण्याची प्रक्रिया त्याला ग्रामीण भाषेत गुऱ्हाळ असे म्हणतात. तिथे दहा - बारा स्रिया व माणसे काम करताना दिसली. त्यांना पण थोडे हायसे वाटले. चालून दम लागल्यामुळे आज्जी तिथेच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली विसाव्याला बसली. तिथल्या काही बायकांनी आज्जीची विचारपूस करून तिला उसाचा रस प्यायला दिला.
तितक्यात तिथे एक २५ एक वर्षाच्या आसपास दिसणारा एक तरुण ऊसाचा रस मागण्यासाठी आला. त्या तरुणाचा पोशाख थोडा वेगळाच होता. डोक्यावरील केस लांब वाढलेले बहुदा जटाच त्या , तितकीच लांब दाढी , मळकट कपडे नेसलेला आणि काखेला झोळी अडकविलेला फकीर वजा अवलिया दिसणारा हा तरुण तिथल्या लोकांकडे उसाच्या रसाची मागणी करू लागला. तिथल्या काही वाईट मनोवृतीच्या लोकांना त्याचे तिथे येणे आवडले नाही. आणि त्यांनी त्याला धक्का बुक्की करून तिथून हाकलून लावले. त्यालाही खूप वाईट वाटले. कारण उन्हाने त्याचा घसा कोरडा पडला होता. तो तरी काय करणार ? तो काहीही न बोलता थोड्या अंतरावर गेला तिथून एका छोट्याश्या पाटाचे पाणी झुळझुळ वाहत होते. ते पाणी पिण्यासाठी तो गुढगे टेकून घाली वाकला तर काय आश्चर्य त्या पाटाच्या पाण्यातून उसाचा रस वाहू लागला आणि जिथे ऊस गाळला जात होता तिथे उसातून नुसतेच पाणी येऊ लागले. हा चमत्कार पाहून तिथल्या लोकांना खूपच पश्चताप झाला. त्यांनी लगेच त्यांचे पाय धरले. लोकांच्या लक्षात आले कि हा कुणी साधारण माणूस नसून कुणीतरी मोठा अवलिया आहे. शेवटी चमत्काराशिवाय नमस्कार मिळत नाही हे त्या अवलियाला लोकांना दाखवून द्यावेच लागले. मित्रांनो ते दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात पुसेगावचे थोर संत श्री सेवागिरी महाराज होते. ज्यांनी केवळ आल्लख निरंजन मंत्राचा उच्चार करून झाडाच्या खोडातून पिठाचा पाऊस पाडला होता. आजही ते झाड त्या इतिहासाचे साक्षीदार आहे. दार वर्षी डिसेम्बर महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनाला याठिकाणी जमलेले असतात. माझी आज्जी खरोखरच खूप नशीबवान होती जिला अशा महान अवलियाचे दर्शन झाले. आल्लख निरंजन !...
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"