Monday, April 1, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -5

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -५
शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे काणिपाकात तिरुमलदासांची भेट 
श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाची शनिपीडा निवारण
मी माझ्या प्रवासात परम पवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री वेंकटेश्वरांना स्त्रीमूर्तिरूपात पहिले. बालत्रिपुरसुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ति थोडया क्षणां तच परमेश्वराच्या रूपात बदलली, आणि थोडया वेळाने महाविष्णुच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बाल यतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वाच्छल्यानुरागाची जणु वर्षाच होत होती. एवढयातच त्या बालयतीजवळ काळया रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, ''श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू ! आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे.'' करुणांसागर प्रभु म्हणाले, ''अरे शनेश्चरा ! तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करवून त्यांना कर्मविमुत्तच् करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्या पासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ.'' श्रीपाद महाराज आणि शनैश्चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवन्मूर्तिचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरूवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहुन तिरुपतीला आलो.
तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक न्हावी मला बळजबरीने थांबऊन म्हणाला, ''तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या आहेस ना ? तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्या बरोबर संसार कर. मुलाबाळासहित सुखी रहा. तेव्हाच मी म्हणालो, ''अहो, मी शंकरभट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण. वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत, असे ऐकून कुरूगड्डीला प्रयाण आरंभिले आहे. परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुबय्या न्हावी नाही.''
परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या रीतिने माझी निंदाच करीत होता. मला सुब्बय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुब्बय्याचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले, या पुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, ''सुब्बय्या दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे. याचे क्षौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल.'' मी सुब्बय्या नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौर कर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी, मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळयातील पवित्र यज्ञोपवित सुध्दा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूत वैद्याला बोलावण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कांपरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविधप्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुब्बय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुध्दा स्तब्धच झाले होते. ह्या नगरात आलेला वाटसरू सुब्बय्याच आहे, त्याला एका ब्रह्मराक्षसाने बाधले आहे असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते, संध्या वंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुब्बय्यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे, त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे. असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगीतले.
घावाने झालेल्या त्रासाने मी चक्राऊन गेलो. माझे रुदन केवळ अरण्यरुदनासारखेच झाले. शुध्दीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्या सारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समाऊन गेला. माझ्याशी तदाकार झाला. साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्टकाळ आहे. याची कल्पना मला आली. श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढया तापात सुध्दा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबडया, बकऱ्यांची बळी देत, चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुब्बय्याला ब्राह्मण भूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला, याचे मनाला बरे वाटले. तीन दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुध्दा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरिरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधून मधून चाबकाने मारत होता. ''श्रीवल्लभा शरणं शरणं'' अशी दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्रीदत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा कशी असते, याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढयातच विचित्र घडले. माझ्या शरिरावर चाबकाचा मार बसला परंतु मला किंचित सुध्दा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहात होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचेच जेवण जेवत होतो परंतु ते सुध्दा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरूवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबडया बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासाखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र, पूजा वगैरे करून वेळ घालवीत होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरीसुध्दा सगळयांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले. सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुब्बय्याच्या घरी येऊन म्हणाला, ''सुब्बय्याला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले.''
वेताळ वगैरे अनेक क्षुद्रशक्तींना प्रसन्न करण्यास, अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील, त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहित होते. विधिचे विधान मानून मान खाली घालून, सुब्बय्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार ? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो. याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढया क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुब्बय्याच्या आई-बापांना म्हणालो, ''माझे माय बाप ! तुमच्या सर्व स्थावर संपत्तिची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्बेत चांगलीच आहे. मी तुम्हाला आई-बापासारखेच मानतो.'' तेवढयावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुब्बयाचे आई-वडील अत्यानंदीत झाले. त्यांच्या डोळयातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी. धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये, अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो.
माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बय्याच्या पत्नीला बघून म्हणालो. ''माझ्या बाबतीत तू काय समजतेस ? मी खरा खरा सुब्बय्याच आहे यावर तुझा विश्वास आहे का ?'' त्यावर ती म्हणाली. ''मी दोन वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाहि माहित नाही. नूतन यौवनांत पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरूष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुध्दा मला पत्नी या नात्याने स्विकारले नाही. स्पर्श केला नाही, हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्या विषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचराला अनुसरून धर्मानेच जीवन कंठायचे ठरवले आहे. आपण माझे पति असल्यास या चरण दासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली. माझा विवाह बालपणातच झाला तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरुंच्या चरणी ह्या जटिल समस्येचे धर्मसम्मतिपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन.''
तिचे वक्तव्य मला युक्ति संगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, ''श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरांतच आहेत. आपल्या भक्तीभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरुसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास, तेच परमात्मा आहेत असे सिध्द करतात. तू सुध्दा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळयांना आनंदमय परिणाम लाभतील.''
त्या दिवशी वाडयात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाडयातील सर्वजणांना थोडयाच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भूत प्रकारे सांगत असे. त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून, त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुब्बय्याच्या जनकांच्या समजूतीसाठी तो आमच्या घरीसुध्दा आला. माझ्या हातात थोडया कवडया देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या, त्यानंतर गणित घालुन त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरूवात केली. ''प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदुकूर ह्या शहराच्या थोडयाच दूर असलेल्या मोगलीचर्ला ह्या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिध्द स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली . त्याचा मित्र जिंकल्यास हयाने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले . या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरूवात केली. ''
आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकरभट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले, ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करूनन तिला वक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्या बद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे. तसेच खेळामधे आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्यांच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सूज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडाकाळ दत्त सेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ति असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्बय्या या नावाने क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुब्बय्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमल शास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बय्या परत येईल. त्या दिवशी शंकरभट्टाची सुटका होईल. शंकरभट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसांतच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेऊन अनुचित संकल्प केल्यास अथवा, अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठींनातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्बयाच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतिने काम करीत असतो, ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्म कधीहि करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म पत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्ती नंतर थोडया शतकांनी त्रिपुर देशातील अक्षयकुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरत श्री प्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे 'श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ' या नावाचा ग्रंथ प्रकाशीत होईल.''
श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे ? दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता. सुब्बयाच्या पत्नीस मी माझी बहिण मानले. सुब्बय्याच्या माता-पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्हयातील काणिपाकं ग्रामास पोहोंचलो.
काणिपाकं हे ग्राम चित्तूरहून थोडयाच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ,मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिध्दी विनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरसिध्दिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोडावेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढयाच उंचीचा होता. आज ह्या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीति वाटली. परत वरसिध्दिविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. ''बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परत मधे येतो आहेस याचे कारण काय ?'' असे त्याने विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ''ते निष्कारण कोणाला कांही इजा करित नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्रीदत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे, असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिध्द नाही, तरी सुध्दा तो या देवळामधे येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो . मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधुन देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू दोनच कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून दोन कुत्रे आले का ते पाहू या'' असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते चारी कुत्रे माझ्या चारी बाजुंनी आले आणि त्यानी मला घेरले. पुजारी म्हणाला ''कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा. तुला शुभकारकच होईल.''
माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्बय्याच्या घरात घडलेल्या घटने वरून कुळ, मत भेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मणकुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म प्रवाहात वाहत जात असतो
शंकरभट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद
मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मणजन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मियांसारखेच दिसत होते. वरसिध्दिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली.
आइनविल्लिचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले
ते म्हणाले ''बाबा ! आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे ! आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल, माल्याद्रीपुराचे आणि श्रीपीठिकापुर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहातो आहे. बाबा ! शंकरभट्टा ! वरसिध्दि विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशिर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासाने ह्याचा पूर्व वृतांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो. परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गाईचेवासरू जुन्या चिंधिस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेऊन मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईनेच गर्तपुरी (गुंटुरू) मंडळातील पल्यनाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्याद्रीपुर कालांतराने मल्लादि या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादि नावाची दोन घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे महापंडित कौशिक गोत्रीक होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ''आइनविल्लि'' या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्विकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमयकांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वत: संपूर्ण कलेने गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत तिघे नास्तिक होते. ते म्हणाले, ''दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे.''
काणिपूर विनायकाचा महिमा
होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलु लागले. ''मुर्खानो ! त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने, बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णुने, महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने, भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने, सर्व सिध्दी सिध्द होण्यापूर्वी सिध्दमुनींनी, प्रंपचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने, याच प्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभीष्ट प्राप्त केले. सगळया शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्वशक्तिमान आहे, राक्षस शक्ति सुध्दा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नकर्ता मीच, सर्व विघ्नहर्ता सुध्दा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात ? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच. विष्णुरूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्तारूपात गणपती, षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुध्दा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्वकाळ त्रिमूर्ति स्वरूपच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेशचतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्या मधे सुब्रह्मंण्याचे तत्त्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्ता तत्त्वामुळे ते रूप समस्त धर्म, कर्माचे आदि, आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार माता-पित्याच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योतिस्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल.'' श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे. सत्यस्वरूप पाहुन सुध्दा ते असत्यआहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्या पैकी एक आंधळा जन्मेल. सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्या पैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त , त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल.
बाबा ! ते तिघेही या काणिपुरात भावंडाच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तिना दूषण दिल्यास, घोर अनर्थ होतो. ही तीन भावंडे, एक एकर जमिनीत, याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले, फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागुन रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणीसुध्दा विहीरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळयाने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रत्तच्स्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली.
त्या वरसिध्दी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्यऋषिश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिध्दी विनायक त्यांना म्हणाले. ''महाभूमी मधून या लोकात आलो. पृथ्वीतत्त्वावर अवतार घेतला. हे तत्त्व कालांतराने अनेक रूपांत रूपांतर होईल. जलतत्त्वात, अग्नीतत्त्वात, वायुतत्त्वात, आकाशतत्त्वात माझे अवतरण झालेलेच आहे. आइनविल्ली मधे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यामधे कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामधे शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामधे, काशीमधे, बदरीमधे, केदारामधे, एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. श्रीधरा तुझ्या घरचे नांव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या अडनावाने ओळखले जातील.''
बाबा ! शंकरा ! मल्यादिपुरातून सत्य ऋषिश्वर आणि श्रीधर पंडित पीठिकापुरत निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नांव रविदास आहे. तो कुरवपुरात राहात आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणिपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून रहात आहे. तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वेंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेंव्हा अनेक महत्वाच्या विषया बद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभु, वेंकटप्पय्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारीत असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुध्दा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ट संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशिर्वाद लाभेल. तू लिहीलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतिने माहिती देणारा असणार नाही, ही श्री चरणांची आज्ञा आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"