Saturday, April 27, 2019

साखरपुडा

साखरपुडा :

वधू वराची परस्पर पसंती झाल्यानंतर साखरपुडा हा विधी निश्चित केला जातो. शास्त्रामध्ये  साखरपुडा या  विधीचा  उल्लेख  नाही .परंतु ज्याप्रमाणे विवाह विधी मध्ये "वाग्निश्चय" हा विधी असतो त्या प्रमाणे संपूर्ण समाज, आप्तेशष्ठ, नातेवाईक या सर्वाना साक्षी ठेऊन विवाह निश्चित करण्याचा कार्यक्रम म्हणजे साखरपुडा.

वराच्या आई-वडिलांनी वधूला साडी, ब्लाउजपीस, अलंकार, गजरे, इ. द्यावे.  नंतर वधूच्या आईवडिलांनी वराला चौरंगावर बसवून पोशाख वगैरे देऊन त्याचा सत्कार करावा.  दोन्ही व्याह्यांनी समोरासमोर बसून गणपतीपूजन व वरुणपूजन करावे. वधू-वर कपडे  बदलून आल्यानंतर वराच्या आईने वधूला हळद-कुंकू लावावे. मनगटावर अत्तर लावून तिला पेढा भरवावा.  वराकडील ५ सुवासिनींनी वधूची ५ फळांनी ओटी भरावी.  वराच्या वडिलांनी वधूला पेढ्यांचा पुडा द्यावा. नंतर वधू- वरांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घालून पेढा भरवावा.

 

केळवण :

विवाह निश्चिती  व   साखरपुडा झाल्यानंतर  वराकडील  तसेच  वधूकडील  नातेवाईक  व आप्तेष्ट हे "केळवण" करतात.

केळवणाचा पौराणिक संदर्भ : पूर्वीच्याकाळी विवाहासारखे मोठे विधी हे अनेक लोकांच्या (नातेवाईक  व आप्तेष्ट) सहकार्याने पार पाडले जात.

त्याकरता आजच्या प्रमाणे स्वतंत्र सेवा व्यवस्था जसे कार्यालय , इव्हेंट म्यानेजमेंट (Event Management),केटरिंग  (Catering) इत्यादी उपलबध नव्हते.

त्यामुळे आपल्या घरच्या विवाह कार्यासाठी जी जी मंडळी मदत तसेच कार्यभाग उचलणार आहेत त्यांच्या गाठीभेटी या केळवण या सामूहिक आनंद सहभोजन कार्यक्रमात होत. व त्याद्वारे सामुदायिक रित्या केल्या जाणाऱ्या कामाची किंवा उचलल्या जाणाऱ्या जबाबदारीची खात्री नातेवाईक वधू तसेच वर पित्यास देत असत.

केळवणाचा आधुनिक संदर्भ : वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या स्थितीला विवाह विधीची   जबाबदारी हि  इव्हेंट म्यानेजमेंट करणाऱ्या  कंपनीला  देण्याकडे  सर्वांचा  कल असतो. त्यामुळे विवाहातील  नातेवाईक तसेच आप्तेष्ठांचा  सहभाग  हे केवळ  शुभाशीर्वाद  व सहभोजनापुरता मर्यादित असतो. व त्या दिवशी  वधू वर पक्ष  खूप  गडबडीत  असल्यामुळे  त्यांच्याशी  प्रत्यक्ष संवाद  साधणे किंवा त्यांना  शुभेच्छा  देणे शक्य होत नाही. या गोष्टीला पर्याय म्हणून नातेवाईक तसेच आप्तेष्ट लग्नाच्या काही दिवस आधी वधू वरास घरी बोलावून आनंद भोजन करतात ज्यास केळवण असे म्हणतात.

 

देवांना निमंत्रण :

पत्रिका पूजन : कन्यापक्षीय व वरपक्षीय यांनी इष्ट काळ कळावा म्हणून मुहूर्त पत्रिकेची (आमंत्रण पत्रिका ) / मुहूर्त रुपी सरस्वतीची पूजा करण्याची पद्धत आहे .

निमंत्रणाच्या पत्रिका छापून झाल्यावर वर प्रमुख तसेच वधूप्रमुख आणि घरातील इतर वडिलमंडळी हे सर्व घरातल्या देवांना तसेच गावातील ग्रामदेवता ,शक्य झाल्यास कुलदेवता यांच्या मंदिरात जाउन आमंत्रण करतात. मंदीरात गेल्यावर देवाला/देवीला हार, फ़ुले नारळ विडा ठेउन देवीचे मंदीर असेल तर सुवासिनी खण – नारळाने ओटी भरतात. पत्रिका ठेवतात. नमस्कार करून आपल्या घरी जातात. नंतर इतर आप्तेष्टांना आमंत्रण करतात. कार्यामध्ये कोणतेही विघ्न येउ नये म्हणून प्रथम देवांना निमंत्रण देण्याची पद्धत आहे.

 

ग्रहमख (ग्रहयज्ञ संस्कार ) : ग्रहशांती निमित्त करण्यात येणारा हा यज्ञ लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा आधी आठ दिवस केला तरी चालतो . कोणतेही मंगल कार्य करण्याआधी नवग्रहांची कृपा व्हावी म्हणून हा यज्ञ केला जातो . यात नवग्रहांच्या पूजेला तसेच वरुण देवाच्या पूजेला महत्व दिले जाते. ग्राहमकाच्या  दिवशी वराचे ( वधूचे ) घरचे केळवण तसेच वराच्या घरी वधूच्या आईवडिलांना पित्याच्या घरची मेजवानी – व्याही भोजन करण्याचा प्रघात आहे.

 

घाणा भरणे: लग्न दिवसाच्या आधीच्या दिवशी  करावयाचा हा विधी असून तो सकाळी शक्यतो पारोशाने (आंघोळ न करता) करायचा असतो.  हा विधी लग्ना अगोदर करायचा असेल तर लग्नापूर्वी तीन , सहा व नववा दिवस वर्ज्य करावा.

घाणा भरणे : पौराणिक संदर्भ :धान्य कांडण्यामागे कार्याला आलेल्या सर्व आप्तांसाठी अन्न तयार करणे हा उदेश आहे. हळद लावण्यामागे देखील शास्त्र आहे . आयुर्वेदात हळद हे anti-septic व चांगली कांती देणारे सांगितले आहे. तेल हे त्वचेला मऊपण देणारे आहे .हळद व तेलामुळे वधू वराला सुकांती प्राप्त व्हावी असा हेतू आहे.

विधी : ४ पाट मांडावेत व त्यावर शाल घालावी.  पाटाभोवती रांगोळी काढावी.  पाटावर यजमान, त्याच्या उजव्या हाताला पत्नी, वधू / वर  व करवली या क्रमाने सर्वांना बसवावे.  प्रथम यजमानास कुंकू लावून नारळ द्यावा.  यजमानाच्या पत्नीची ५ सुवासिनींनी ओटी भरावी.  ज्याचा संस्कार करावयाचा आहे त्या वधू-वरास कुंकू लावून नारळ द्यावा व मुंडावळ बांधावी.  करवलीला कुंकू लावून साखर द्यावी.

रोवळीला बाहेरून ब्लाउजपीस बांधावा.  त्यात तेल लावून उडीद घालावेत.  रोवळीत मुसळांची जोडी ठेवावी. मुसळांना हळद-कुंकू, आंब्याचा डहाळा, सोन्याची साखळी बांधावी.  सर्व सुवासिनींनी मिळून उडीद कांडावेत.  त्यावेळी घाण्याच्या ओव्या  म्हणाव्यात.  बारीक झालेले उडीद, जाते सुपात ठेवून, त्यात घालावेत व दळावेत.  वाटीत तेल घेऊन त्यात हळद पातळसर कालवावी.  सर्व सुवासिनींनी आंब्याची पाने दोन्ही हातात घेऊन ती  हळदीत बुडवून सर्वांच्या अनुक्रमे पाय, गुडघा, मनगट, खांदा, कपाळ इत्यादि ठिकाणी चढवावी.  नंतर सर्वांनी  गरम पाण्याने आंघोळ करावी.  ( जर वधू-वरांची घरे जवळपास असतील तर तेल-हळद घेऊन प्रथम वधूकडील ५ सुवासिनींनी वराच्या घरी जावे व वराला ती तेल-हळद लावावी. त्यातलीच थोडी परत आणून ती वधूला चढवावी. याला 'उष्टीहळद' असे म्हणतात ).

 

मेंदी व बांगडया :

कोणत्याही शुभकार्याला मेंदी लावणे हा खरा राजस्थानातला रिवाज. पण आता तो महाराष्ट्रातही अमाप लोकप्रिय झाला आहे. मेंदीची पाने वाळवून वाटून केलेल्या पावडरीमध्ये निलगिरीचे तेल घालून ती पाण्यात भिजवून त्याचे कोन तयार करतात. या कोनाच्या सहाय्याने वधूच्या तळहातापासून ते मनगटापर्यंत व हाताच्या पाठीमागच्या भागावरही, तसेच पावलांवर घोटयापर्यंत नाजुक कलाकुसरीची मेंदी काढली जाते. वधूचे सौंदर्य खुलविण्यासाठी ही मेंदीची प्रथा आहे. मेंदी काढणा-या खास स्त्रिया असतात. तसेच सौंदर्यगृहातूनही अशा प्रकारची सेवा उपलब्ध होते. मेंदीचा कार्यक्रम हा बहुधा लग्नाच्या दोन दिवस आधी केला जातो. वधूबरोबरच लग्नासाठी जमलेल्या व-हाडातील स्त्रियांनाही मेंदी काढतात. मेंदी रंगल्यावर वधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिरव्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगडया, त्यावर कोणतेही सोनेरी नक्षीकाम नसते. चुडा भरताना एकेका हातात सात-सात किंवा नऊ-नऊ बांगडया घालतात. त्यासाठी लग्नाच्या मंडपात कासारालाच बोलाविण्याची पध्दत आहे. वधूचे चुडा भरणे झाल्यावर व-हाडातील इतर स्त्रियांनाही आवडीनुसार हिरव्या बांगडया भरतात. हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगडया व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे.

 

देव प्रतिष्ठा : देवक ठेवणे वधूपिता, वाधुमाता व वधू तसेच वरपिता, वरमाता व वर आपल्या घरी किंवा विवाहस्थळी वेगवेगळे देवक ठेवतात . यावेळी प्रथमत: गणेश पूजन, वरूण पूजन-कुलस्वामी-मंडप देवता यांचे पूजन करून कार्य निर्विघ्नपणे  पार पाडण्यासाठी यांची प्रार्थना केली जाते . तसेच ब्राह्मणांचे आशीर्वाद ग्रहण केले जातात. आंब्याच्या पानांनी हळद चढविणे , यजमान – नवरा ,नवरी यांना आप्तेष्टांच्या भेटी किंवा आहेर , सुवासिनींकडून लामण दिव्यांची कुरवंडी वगैरे गोष्टींचा या संस्कारात समावेश होतो.

वाङ् निश्चय :- (वाक् = वाचा, निश्चय = निश्चिती ,शब्द देणे ) = वाङ् निश्चय म्हणजे शब्द देणे.

पौराणिक संदर्भ :पूर्वीच्या काळी विवाह हा चार दिवस चालत असे त्यामुळे परगावी असणाऱ्या वधूप्रमुखाकडे वरप्रमुखाने जाऊन वाङ् निश्चय केला जात असे. आता १ दिवसाच्या कार्यात आदल्या दिवशी वाङ् निश्चय केला जातो. प्रथम वरप्रमुखाकडून वधूप्रमुखाकडे मुलीची मागणी केली जाते. हि मागणी करताना दोघांच्या मागील तीन पिढ्यांचा उच्चार केला जातो.

 विधी :सासूने वधूचे पाय धुवावेत.  पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. तिला हळद, कुंकू लावून साडी, ब्लाउजपीस, मुंडावळ, सोन्याचा दागिना, गजरा, इ. द्यावे.  त्यानंतर, वराच्या व वधूच्या वडिलांनी समोरासमोर बसून गणपतीपूजन व वरुणपूजन करून ५ सुपाऱ्या व हळकुंड एकमेकांच्या उपरण्यात बांधून विवाहनिश्चिती करावी.  वधू साडी नेसून आली की तिच्या गळ्यात हार घालावा, अत्तर लावावे व तिच्या तोंडात पेढा भरवावा.  वराच्या आईने असोला नारळ, हळकुंड, सुपारी, तांदूळ, इ. वस्तूंनी वधूची ओटी भरावी.  नंतर वराकडील आणखी ४ सुवासिनींनी फळ व तांदूळ घालून तिची ओटी भरावी. शेवटी पाचही जणींनी मिळून तेलाच्या दिव्याने वधूचे औक्षण करावे.

 

ज्येष्ठजावई  पूजन  : वधूच्या आई-वडिलांना ज्येष्ठ जावई असेल तर त्याचा प्रथम आहेर देऊन सन्मान करावा व नंतर वराचे सीमांतपूजन करावे.

 

व्याहीभेट :
व्याह्यांनी एकमेकांना भेटून आहेर द्यावा. वधूच्या वडिलांनी वराच्या वडिलांना चांदीचा पेला किंवा फुलपात्र देण्याचा रिवाज आहे.

 

सीमांतपूजन :  पौराणिक संदर्भ :विवाहविधी मुलीच्या मंडपामध्ये करण्याचे शास्त्र आहे,पण लग्नापूर्वी हा विधी मंडपामध्ये न होता तो गावच्या सीमेवर होत असे.सीमांत पूजन म्हणजे सीमेवर केले जाणारे पूजन. वाङ् निश्चय झाल्यानंतर नियोजित दिवशी वर वधूच्या गावी गेला कि त्याचे गावच्या सीमेवर पूजन केले जात असे. यात वराची पूजा करून त्याला यथाशक्ती अलंकार घातले जात. यामध्ये वराचे पाय धुवून त्याला नवीन वस्त्रे देण्यात येत . विहिणीचे देखील पाय धुवून तिला साडी-चोळी व शिधा देण्यात येतो. वराचे पूजन करण्यापूर्वी सीमांत पूजनाचा संकल्प वधूपिता करतो . निर्विघ्नतेसाठी गणेश पूजन करून वरपूजन करतात .

विधी : वराला चौरंगावर बसवावे. गरम पाण्याने त्याचे पाय तस्तात (रुंद अशा पात्रात) धुवावेत.  वधूच्या आईने पायावर पाणी घालावे.

वधूच्या वडिलांनी ते धुवावेत व वधूच्या आईने पुसावेत.  पायावर कुंकवाची स्वस्तिके  काढावीत. वराला गंध व अक्षता लावून त्याला पोशाख, मोत्याचा नारळ, मुंडावळ, वरदक्षिणेचा बटवा द्यावा.  अत्तर लावावे व पेढा भरवावा. नंतर वधूकडील ५ सुवासिनींनी मिळून तेलाच्या दिव्याने त्याचे औक्षण करावे.

नातलगभेट :
वराकडील ५ प्रमुख पुरुष मंडळी व वधूकडील ५ प्रमुख पुरुष मंडळींनी एकमेकांना भेटावे व आपली ओळख एकमेकांना करून द्यावी.

 

विहीणभेट :
वराच्या आईला चौरंगावर बसवावे  . वधूच्या आईने तिचे पाय धुवावेत. दोन्ही पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. हळद-कुंकू लावून, अत्तर, गजरा, पेढा द्यावा.  साडीची घडी मोडून द्यावी व वेळ असल्यास साडी नेसून आल्यावर ओटी भरावी.  ओटीमध्ये साडी, ब्लाउजपीस, गजरा/वेणी, देण्याचा प्रघात आहे.  तेलाच्या दिव्याने औक्षण करावे.

नंतर वधूच्या आईला चौरंगावर बसवावे.  हळद-कुंकू लावून, अत्तर, गजरा, पेढा द्यावा.  साडीची घडी मोडून द्यावी व वेळ असल्यास साडी नेसून आल्यावर ओटी भरावी.  ओटीमध्ये साडी, ब्लाउजपीस, गजरा/वेणी द्यावी.  तेलाच्या दिव्याने औक्षण करावे.   जर इतर काही 'मान-पान' करावयाचे असतील तर ते करून घ्यावेत.  ( उदा: वराची बहीण, करवली, काकू, आत्या, मामी, मावशी, वहिनी, आजी, काका, मामा, आत्याचे यजमान, मावशीचे यजमान, आजोबा, इ.)

रुखवत फराळ :
पौराणिक संदर्भ : रुखवत हा न्याहारी देण्याचा एक प्रकार. सात्विक आहार म्हणून हा द्यावा.  उपाशीपोटी असलेल्याला मुलगी देऊ नये असे शास्त्र सांगते (कन्यादानाचे वेळी वराने उपहार केलेला असावा.)

विधी : वर, त्याचे आई-वडील, करवली, बहिणी, भाऊ, मित्र, लहान मुले, यांना रुखवताच्या फराळाला बसवण्याचा प्रघात आहे. लाडू, करंजी, अनारसे, बटाटा भाजी, साखरभात, पापड, कुरडया, चटणी, खीर, इ. पदार्थ पानात वाढावे.    सर्वजण येऊन बसल्यानंतर मान म्हणून प्रथम वधूच्या आईने तस्त डाव्या हाताने खाली धरून त्यावर  किमान वर व त्याचे आई-वडील यांच्या हातावर पाणी घालावे व त्यांना हात पुसायला रुमाल द्यावा. नंतर, वराला तुपाची आपोष्णी ( चमचाभर तूप पिण्यासाठी ) द्यावी.

फराळ झाल्यानंतर वराला १ केळं खाण्यास द्यावे. वराने ते अर्धे खाऊन अर्धे वधूला खाण्यासाठी पाठवावे. (एकमेकांचे उष्टे खाण्यास सुरुवात झाली असे समजण्यास हरकत नाही).  नंतर वधूच्या आईने वराला १ रुपया घातलेला विडा द्यावा.  वराने तो चावून तिथेच पानाखाली ठेवावा.  नंतर दुसरा विडा खाण्यासाठी द्यावा.   वराला फुलांची मुंडावळ द्यावी व वराच्या करवलीने ती वराच्या कपाळाला बांधावी.
नंतर वराने हातात मोत्याचा नारळ घेऊन कार्यालयाच्या मुख्य दारात यावे.  (तिथे त्याच्यावरून एखाद्या नोकराकडून भात ओवाळून टाकावा.  ओवाळून टाकणाऱ्याला वराच्या वडीलांनी मानाचे पाकीट द्यावे) . तिथेच वधूच्या आईने  वराच्या पावलांवर पाणी – दूध – पाणी असे  क्रमाने घालून त्याचे पाय पुसावेत व औक्षण करावे.   वधूच्या वडीलांनी वराच्या हाताला धरून कार्यालयात आत घेऊन यावे.

मधुपर्क :
हा विधी म्हणजे वराचा विशेष सन्मान होय. वराला पाटावर बसवावे.  वधूच्या आई-वडिलांनी त्याच्यासमोर बसावे. वराचा प्रथम उजवा व नंतर डावा असे दोन्ही पाय धुवावेत.  त्याला अर्घ्य, आचमन, इ. द्यावे.  नंतर ३ वेळा मधुपर्क ( १ पळी तूप, १ पळी मध व २ पळ्या दही एकत्र केलेल्या मिश्रणाला मधुपर्क म्हणतात) त्याच्या हातावर द्यावा. वराला गाय दान द्यायची असते. पण ते शक्य नसल्याने इच्छा असल्यास, वराला काही दक्षिणा द्यावी. नंतर गंध, फुलांचा हार, वस्त्र, जानवे वगैरे देऊन वराचा मान करावा.  जर वराला भाऊ असतील तर त्यांचाही मान आहेर देऊन करावा.

तेलफळाची ओटी :
लग्नाच्या दिवशी पहाटेच मुलाकडील सुवासिनी मुलीसाठी तेलफळ आणतात. गौरीहरापाशी पहिली ओटी भरावी असे शास्त्र आहे. येथे तिची ५ फळे व हिरवी साडीचोळी, एखादा दागिना देऊन ओटी भरली जाते.ह्या ओटीसह मुलगी विवाहाच्यावेळी उभी राहते. हा विधी सर्वांकडेच केला जातो असे नाही.

पौराणिक संदर्भ : अनेक देव्यांपैकी एक तेलफळ देवी. पौष पौर्णिमेला या देवीचा उत्सव असतो.  बाजरीचा रवा काढून तो शिजवून, उकडवून  त्याची गोलाकार फळे करतात व त्यात तेल घालतात. त्याला तेलफळे म्हणतात.  ही या देवीला फार आवडतात. औरंगाबाद जिल्ह्यातील गोलटगाव हे या देवीचे मूळ क्षेत्र आहे.

विविध धान्यांपासून तेल काढतात. उदा: जवस, मोहरी, तीळ, करडई, इ. या नावांचेही पूर्वीच्या काळी दैत्य होते (तिलासूर, करडासूर, वगैरे).  ते उन्मत्त होऊन ऋषीमुनींना त्रास देऊ लागले. त्यांनी ही गोष्ट योगेश्वरीला सांगितली.  योगेश्वरी म्हणजे कुमारी पार्वती.  ती शंकराशी विवाह करण्यास जाणार होती.  ती स्नानास आलेली असताना ऋषीमुनींची दारुण अवस्था तिने पाहिली, ती दैत्यांवर चाल करून गेली व त्यांचा नाश केला. या आवेश अवतारात तिच्या अंगाची लाही लाही झाली म्हणून शंकराने तिच्यासाठी चंदनाचे तेल पाठवले व ते तेल ऋषीमुनींनी तिला लावून स्नान घातले व नंतर तिची ओटी भरली.  देवी शांत झाली व विवाहासाठी गेली अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून वराकडील सुवासिनी वधूची ओटी ती गौरीहरापाशी बसलेली असताना भरतात.

विधी :

वधूला हिरवी साडी, ५ फळे, असोला नारळ, फुलांची मुंडावळ, दागिना, तेलाचे भांडे, डाव, कुंकवाचा करंडा व फणी देतात. वराची आई वधूची ओटी भरते. नंतर वधूच्या आईचीसुद्धा पाय धुवून ओटी भरायची असते पण सर्वांना हे माहीत असतेच  असे नाही.

गौरीहरपूजन :

पौराणिक संदर्भ : दाक्षायणीने कठोर तपश्चर्या करून शंकराला प्राप्त करून घेतले. महादेवासारखा पती मिळावा या चांगल्या हेतूने ही पूजा केली जाते. सजवलेल्या मंडपिमध्ये तांदुळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची स्थापना करून गौरीहराची पूजा केली जाते, काही ठिकाणी बाळकृष्ण ठेवण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी लाकडी बोळकी मांडतात तर काही ठिकाणी  मंडपी ठेवून त्यात गौर ठेवतात.  बाजूला समई ठेवतात. ती वधूपक्षाकडील असते. तेलाचे भांडे, तेल व डाव वरपक्षाकडील असते.  वधूच्या उंचीचे सूत घेऊन त्याची वात करून समईत लावावी. वधूने पिवळी साडी नेसून समई लावावी व गौरीहरपूजन करावे. अन्नपूर्णा म्हणजेच दाक्षायणी. शंकरासारखा पराक्रमी, बलवान, पती प्राप्त व्हावा म्हणून हे पूजन. "गौरी गौरी सौभाग्य दे, दारी पाहुणा येईल त्यास आयुष्य दे" असे म्हणत दोन्ही हातांनी थोडे तांदूळ देवीला सतत वाहत राहावेत. तिथेच बाजूला गडू व त्यावर लाडू ठेवतात. या गडूमधे देवी (बाळकृष्ण असल्यास तोही) ठेवून वराने नंतर लक्ष्मीपूजना- साठी न्यायची असा संकेत आहे.

आधुनिक संदर्भ : अन्नपूर्णा देण्यामागे ज्या घरी ही मुलगी राहणार आहे त्या घरी तिने अन्नपूर्णेप्रमाणे वागून घरातील सर्वांची अन्नदात्री बनावे अशी धारणा. मंडपीची रचना करण्या मागे सुशोभित छताशिवाय देवाची आराधना करू नये असा संकेत आहे. लग्नाला उभी राहताना मुलगी मामाने दिलेली पिवळ्या रंगाची साडी नेसते. यालाच अष्टपुत्री म्हणतात. हे वस्त्र लग्न लागल्यानंतर दान करायला सांगितलेले आहे, ते दान करणय मागचा हेतू असा कि  वधू या भूमिकेतून मुलगी आता पत्नी या भूमिकेत गेलेली असते म्हणून ते वस्त्र तिने परत नेसायचे नसते.

मंगलाष्टके: मुहूर्त जवळ आल्यावर मंडपात मध्यभागी पूर्व पश्चिम अश्या तांदुळच्या राशी घालून राशीच्या मध्यभागी कुंकवाने दोन्ही बाजूंनी काढलेला अन्तःपट धरण्यात येतो. वधूला पश्चिमेकडच्या राशीवर पूर्वाभिमुख आणि वराला पूर्वेकडच्या राशीवर पश्चिमाभिमुख उभे करतात. वधूवरांना समोरासमोर येण्याचा हा पहिलाच प्रसंग असतो.

मंगलाष्टक म्हणजे मंगल वचनांचे अष्टक म्हणजेच आठ श्लोकांचे असावे, मुहूर्ताची घटिका भरेपर्यंत हि गायली जातात, हल्ली दोन्ही पक्षांकडील नातेवाईक मंडळी हौसेने हि मंगलाष्टके म्हणतात.
वराने पश्चिमेकडे तोंड करून उभे राहावे.  अंतरपाट धरून एखादे मंगलाष्टक झाल्यावर, वधूच्या  मामाने वधूला हाताला धरून वरासमोर आणून पाटावर उभी करावी.  अंतरपाट दूर झाल्यावर प्रथम वधूने वराला हार घालावा व नंतर वराने वधूला.  एकमेकांना फुलांचा गुच्छ द्यावा.  वराच्या व वधूच्या मागे प्रत्येकी २ करवल्या कलश व दिवा घेऊन उभ्या असतात.    त्यांनी वर- वधू दोघांच्याही डोळ्यांना कलशातले  पाणी लावून दिव्याने औक्षण करावे. नंतर उपस्थित ब्रह्मवृंद- गुरुजी मंत्र म्हणत असताना दोघांनीही एकमेकांच्या डोक्यावर अक्षतारोपण करावे.
विवाहाच्या वेळी वधूची आई गौरीहरापाशी असते.  अंतरपाट दूर होऊन वाजंत्री वाजल्यावर तिने दुधात साखर घालावी, सुईमध्ये दोरा ओवावा. गौरीहराच्या बोळ्क्यांना हळद-कुंकू लावावे.  दोन्ही कुटुंबे एकत्र आल्याचे हे निदर्शक आहे.  मंगलाष्टके वधूच्या आईने न ऐकण्याचे कारण भावनिक विवशता  इतकेच आहे. वधूच्या आईने वधू-वराजवळ येऊन दोघांच्या डोक्यावर अक्षता घालाव्यात.

 

वरमातेची ओटी भरणे :

वराच्या आईला चौरंगावर बसवावी.  वधूच्या आईने तिची साखरेची ओटी भरावी. यात साडी, ब्लाउजपीस, तांदूळ, नारळ, विडा, (दागिना), गजरा व साखरेचा पुडा असतो.

 

कन्यादान:

योग्य स्थळी कन्यादान होऊन चांगली प्रजा निर्माण झाली  म्हणजे कन्यादानाची सांगता झाली असे मानण्यात येते .कन्यादानाच्या वेळी कन्येचा वधू म्हणून स्वीकार करताना येणारी जबाबदारी – बंधने यांची वराला जाणीव दिली जाते .

विवाह सर्व अर्थाने सुखी यशस्वी होण्याकरता धर्म, अर्थ, काम यांचा वैवाहिक जीवनात आनंद उपभोग घेताना मर्यादेचे उल्लंघन करणार नाही असा निश्चय  / वचन वराने द्यावे लागते .

विधी :वराने पूर्वेकडे व वधूने पश्चिमेकडे तोंड करून पाटावर बसावे.  उत्तरेकडे तोंड करून वधूच्या आई-वडीलांनी पाटावर बसावे.  संकल्प झाल्यावर चौघेहीजण उभे राहतात.  वधूच्या ओंजळीवर वराची ओंजळ व त्यावर वधूचे वडील त्यांचा उजवा हात निमुळता धरतात.  ओंजळीखाली कोरी काशाची वाटी ठेवलेले ताम्हन धरतात व वधूची आई वधूच्या वडीलांच्या हातावर पाण्याची संततधार सोडते जे वधू-वराच्या ओंजळीमधून खालील काशाच्या वाटीत पडते.  वर वधूच्या उजव्या खांद्याला स्पर्श  करतो व वधूच्या वडीलांना "मी  धर्म, अर्थ व काम याचे उल्लंघन करणार नाही" असे तीन वेळा प्रतिवचन देतो. वधूचे वडील वराला त्यांच्या ऐपतीप्रमाणे वस्तू  देतात (पाणी, भांडी, खाण्याचे पदार्थ, गाय, म्हैस, घोडा, हत्ती, नोकर-चाकर, जमीन, वाहन, अलंकार, इत्यादीपैकी शक्य आहे  ते).  किमान ताम्हन, तांब्या, पंचपात्र व समई (पळी नको) या वस्तू तरी द्याव्यात.  वधू-वर हे लक्ष्मीनारायणस्वरूप आहेत असे समजून फक्त लग्नाच्या दिवशी वधूच्या आई-वडीलांनी वर-वधू दोघांना वाकून नमस्कार करण्याची प्रथा आहे.
वर वधूच्या उजव्या कंबरेला स्पर्श करतो व वधू-वरांवर ताम्हनात पाणी घेऊन, त्यात सोन्याचे नाणे टाकून "सुवर्णाभिषेक"  केला जातो. वधू-वर दोघांच्याही मानेभोवती व कंबरेभोवती सलग सूताचे ५ किंवा ४ वेढे घेतात.  नंतर ते सूत काढून घेऊन, त्यात एकेक हळकुंड गुंफतात.  दोघांनी एकमेकांच्या मनगटावर  हे कंकण बांधावे.  यानंतरही  एकमेकांनी एकमेकांच्या डोक्यावर अक्षतारोपण करावे.
नंतर वराची आई व आणखी काही सुवासिनींनी वधूच्या दोन्ही पायाचा अंगठयाजवळील दोन्ही बोटात जोडवी व आणखी काही दागिने घालावयाचे असल्यास घालावेत.  वराने वधूच्या गळयात छोटे मणीमंगळसूत्र व २ सोन्याच्या वाटया असलेले मोठे मंगळसूत्र, वाट्यांमध्ये हळद-कुंकू भरून घालावे.  त्यानंतर वधूची ओटी भरावी.  यामधे साडी, ब्लाउजपीस, विडा, तांदूळ, नारळ, गजरा/फूल, इ. असते. नंतर वधू-वर दोघांना शेजारी बसवून सर्व वृद्ध व वडील मंडळींनी दोघांच्या कपाळी ओल्या अक्षता लावायच्या असतात. वधूच्या करवलीने वधू-वरांच्या उत्तरीयाची  गाठ मारावी.

 

सुवर्णाभिषेक : कान्यादानानंतर पाणी मंत्रवून ब्राह्मण वधूवरांवर अभिषेक करतात .

 

कंकण बंधन : वधूवरांच्या भोवती मंत्रघोषाने सुत्रबंधन करण्याचा विधी . वधूवरांना एकत्र बांधून टाकणारा सुत्रावेष्टनाचा हा संस्कार आहे  कन्यादानाच्या विधी नंतर वर कन्येच्या उजव्या कुशीला स्पर्श करून देवाकडे आवडती संतती देण्याची आकांक्षा करतो.नंतर दोघांना समोरासमोर बसवून दुधात भिजवलेल्या पांढ-यासुताने त्यांच्या कंठाला व कटीला चार अथवा पाचवेळा वेढे देतात नंतर कटीचे सुत दोघांच्या वरून व कंठाचे सुत जमिनीवर ठेवून ते काढून घेतात त्याला हळद व कुंकू लावून हळकुंड बांधून कमरेजवळच्या सुताने केलेले कंकण वराच्या उजव्या मनगटाला वधू बांधते. व कंठाजवळच्या सुताने केलेले कंकण वर वधूच्या डाव्या मनगटाला बांधतो. याला कंकणबंधन असे म्हणतात.व्रतस्थ असणा-या वधूवरांनी बंधनात (नियमावलीत) राहावे म्हणून हे बंधन. हे चार दिवसांनी सोडतात.

 

मंगळसूत्रबंधन :- वरमातेने दिलेले वस्त्र परिधान केल्यानंतर वराने मंगळसूत्र वधूच्या कंठात बांधायचे. यामागचा उद्देश असा असावा की मंगल म्हणजे पवित्र ,सूत्र म्हणजे दोरा, वस्त्राने लज्जारक्षण होते. मंगळसूत्रातील काळ्या मण्यांमुळे दृष्टीबाधा होण्यापासून संरक्षण मिळते. दोन वाट्या चार मणी हे सुवर्णाचे हवे त्यापैकी एक वाटी दोन मणी सासरचे व एक वाटी दोन मणी माहेरचे. हे सोन्याचे करण्यामागे कन्येला अलंकृत करणे हा हेतू. मंगळसूत्र हे सौभाग्यचिन्ह विशिष्ट रीतीने गुंफून ते घालायचे व सासर-माहेर दोन्ही कुटुंबे एकत्र करून संसार माळेसारखा बांधून ठेव असा संदेश कन्येला द्यायचा. मंगळसुत्रामुळे विवाहित स्त्रीला प्रतिष्ठा मिळते. धर्माने मंगळसूत्र हे रक्षणार्थ दिले आहे कायद्याने ते बंधनकारक नसले तरी मंगळसुत्रातून संरक्षणाचा विश्वास दिला आहे म्हणजे स्त्री हि अबला आहे असा अर्थ काढू नये.

अन्य सौभाग्यअलंकारामध्ये जोडवी, बांगड्या, यांचा समावेश होतो. जोडवी घालण्यामागे शास्त्राधार आहे मधल्या बोटाच्या नसा विशिष्ट प्रकारे दाबल्या जातात (Acupressure) .त्यामुळे शरीरावर योग्य परिणाम होतो. कुंकू लावण्यामागे देखील शास्त्र आहे की मधल्या बोटाने कपाळावर विशिष्ट ठिकाणी ऊर्ध्व दिशने दाब देऊन कुंकू लावतात. त्या ठिकाणी मेंदूकडे जाणारी नस असते ती दिवसातून ३ – ४ वेळा दाबली तर मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो. पुरुषांनी गंध लावण्यामागे हाच हेतू. कुंकुवामुळे भालप्रदेशाला शोभा येते .

 

विवाहहोम :
वधूच्या वडिलांनी  दिलेले सोवळे नेसून वराने वधूसहित बसायचे असते.  होमामध्ये तुपाच्या ५ आहुत्या दिल्यानंतर पाणिग्रहण व लाजाहोम असतो.  वधूच्यासमोर  वराने उभे राहून तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला उभे करावे. याला  'पाणिग्रहण' म्हणतात.  होमाभोवती ३ वेळा प्रदक्षिणिक फेरे मारून लाह्यांच्या ४ आहुत्या होमामध्ये वर-वधू एकत्र आपल्या ओंजळीमधून देतात.  यालाच 'लाजाहोम' म्हणतात.  नंतर एक प्रथा म्हणून वधूचा भाऊ वराचा कान पिळतो व त्याचा मान म्हणून त्याला आहेर केला जातो.  याला 'कानपिळी'  म्हणतात.
नंतर होमकुंडाच्या उत्तर दिशेस एकेका तांदूळराशीवरून स्वतःच्या पायाचा अंगठा पुढे सरकवत वधूने ७ पावले पूर्वेकडे तोंड करून चालायचे असते. याला सप्तपदी म्हणतात.  इथे वधूची बहीण/करवलीने  वधूच्या उजव्या पायाचा अंगठा दाबण्याचा प्रघात आहे. तिचा आहेर देऊन मान केला जातो.  वराने पश्चिमेकडे तोंड करून  वधूच्या कपाळाला कपाळ टेकवावे.  गुरुजींनी कलशातल्या  पाण्याने दोघांवर  अभिषेक  केल्यावर  परत दोघांनी होमासमोर जाऊन बसावे. गृहप्रवेशनीय होमाप्रीत्यर्थ तुपाच्या ४ आहुत्या होमामधे दिल्यानंतर शिल्लक तुपातले थेंबभर तूप वराने वधूच्या हृदयाला लावावे व होम पूर्ण करावा. वराने होमामधे स्थापन केलेला अग्नी स्वतःच्या हृदयात स्थापन करावा. वराच्या बहिणीने दोघांच्या उत्तरीयाची गाठ उखाणा घेऊन सोडवावी.  वराने वधूला ध्रुव, अरुंधती, सप्तर्षी, इ. तारका दाखवाव्यात.  आपल्या दोघांचेही स्थान या तारकांप्रमाणेच अढळ असावे ही श्रद्धा त्यामागे आहे.

विवाह होम – लाजा होम – सप्तपदी – गृहप्रवेश होम: वैदिक मंत्राधारित विवाह होम आणि त्याच्या अंतर्गत सात विधी १) होम २) पाणी ग्रहण ३) लाजा होम ४) अग्निप्रदक्षिणा ५) अश्मारोहण ६ ) सप्तपदी ७ ) ध्रुव दर्शन  हे केंद्रबिंदू मानून विवाह संस्कारांची रचना केली आहे . घर चालवणे , संतत्तीचे  पालन पोषण या जबाबदाऱ्या निसर्गानेच  स्त्रीवर सोपवल्या आहेत .
या जबाबदाऱ्या तिच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्त करणे हे विवाहोमांतर्गत विविध  विधींचे उद्दिष्ट असावे .

वैदिक विवाह संस्कारांमध्ये आवश्यक मानलेले सात प्रमुख विधी –

१)  होम : विवाहहोम ही गृहस्थाश्रमाची स्वीकार केल्याची साक्ष होय . या होमात प्रजापतीला आयुष्य प्राप्तीसाठी भूपती ,चंद्र , अग्नी ,इंद्र , वरुण यांना धनासाठी व यम ,धर्माला स्त्री पुरुषांना अकाली मरण येऊ  नये म्हणून आहुत्या दिल्या जातात .

२ ) पाणी ग्रहण : विधीपूर्वक वधूचा हात स्वीकारणे .

३ ) लाजा होम : वधूवरांच्या समृद्धी प्रीत्यर्थ हा विधी असतो . या वेळी जे तीन मंत्र म्हणतात यामध्ये पतीशी 'चीरसंयोग' , 'पितृकुलविमोचन', ' पतीला दीर्घायुष्य' , व बांधवांची समृद्धी अशी प्रार्थना आढळते .

४) अग्निप्रदक्षिणा : संत्तती, संपत्ती आणि आरोग्य या ऐहिक सुखांच्या प्रित्यर्थ वधू वरांद्वारा हा विधी केला जातो .

५ ) अश्मा रोहण : वधूने वराच्या आयुष्यात आजन्म अचल (स्थिर ) रहावे आणि सहधर्मचारिणी बनून वराला धीर देणारी आणि त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारी मैत्रीण बनावे अशी अपेक्षा  अभिप्रेत आहे .

६) सप्तपदी :या विधीमध्ये वाधुसमावेत सात पावले टाकताना वराच्या वधूच्या संबंधी अपेक्षा, तसेच तिच्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव याचे दिग्दर्शन आहे .

या विधीतील सप्तपदी विधीचे रूपाने आपण उभयता विष्णू – लक्ष्मी स्वरूप असून त्यांच्या प्रमाणेच उदात्त व आदर्श गृहस्थाश्रमी जीवन जगायचे आहे हे वधूवरांना सुचवायचे असते. जालाभिषेकाद्वारा पत्नीची जणू गृहस्वामिनी पदावर वराने नियुक्ती केली आहे असे दिसते. याचे उलट 'हृदयस्पर्शन' विधीच्या द्वारा वधूवरांचे मनोमिलन सूचित केले आहे .

वधू-वर एकत्र सात पाऊले चालतात त्यावेळी वधू तांदुळाच्या राशीवर चालते. त्याला सप्तपदी म्हणतात. प्रत्येकपाऊल चालताना वरमुलगा वधूला सात पाऊलांचा अर्थ सांगतो

पहिले पाऊल :- तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू.

दुसरे पाऊल :-  तू माझ्याबरोबर दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेऊन कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ.

तिसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करून देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करू.

चौथे पाऊल :- तू माझ्याबरोबर चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू.

पाचवे पाऊल :- तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू.

सहावे पाऊल :- तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो.

सातवे पाऊल :- तू माझ्याबरोबर सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करू.

 

७) ध्रुव : अरुंधती -सप्तर्षी यांचे दर्शन : सप्तपदी झाल्यानंतर रात्री वधू वर उघड्यावर येऊन ध्रुव, अरुंधती ,सप्तर्षी यांचे दर्शन घेतात .ही एक प्रकारची प्रतीकोपासना आहे. ध्रुव हे  अढळ्तेचे प्रतिक , अरुंधती ही स्त्रियांची आदर्श आणि सप्तर्षी आपले पूर्वज म्हणून त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रमाणे वागण्याचा निश्चय करणे असा या विधीचा उद्देश आहे .

या विशिष्ट दृष्टीने या विधींकडे पाहिल्यास हे संस्कार प्रतीकालकता व सुचक्ते द्वारे वधू वरांना भावी आयुष्यातील कर्तव्यांबाबत जाणीव करून देतात असे ध्यानात येते .

 

ऐरणी दान :- वरमातेचे यथाशक्ती पूजन करून तिची पांढरी साडीचोळी, सौभाग्यवायन (आरसा, कंगवा, कुंकू, मणी, मंगळसूत्र ) दिले जाते. नंतर सुपात / रोवळीत सोळा दिवे ठेऊन प्रथम उमा-महेश्वराची पूजा करून हे दिवे कन्येचा पिता प्रथम कन्येच्या मग वराच्या मग सासू सासऱ्यांच्या डोक्यावर धरत जातात.  आई दिव्याखाली कापड धरते . नंतर ते सूप अथवा रोवळी वरमातेला दान केली जाते. दिवे डोक्यावर धरण्याचा अर्थ असा कि आज पासून त्यांनी मुलीची जबाबदारी तुच्यावर सोपवली आहे. याठिकाणी वेळूपासून तयार केलेले पात्र वापरण्यामागचे कारण असे कि वेळू म्हणजे बांबू ; हे झाड कापले तरी त्यातून पुन्हा कोंब फुटून नवीन झाड तयार होते ते मरत नाही, असाच आमच्या वंशाचा विस्तार होत राहावा हा उद्देश. सूप व रोवळी यांना वंश पात्र या करताच म्हणले जाते.
गौरीहरासमोरून देवी उचलली कि त्या पाट्यावर वराकडच्यांनी सौभाग्यवायन ठेवायचे असते, त्याला पाट्यावरचे वाण असे म्हणतात हे मुलीच्या मामीकरता असते.ते स्थान रिकामे राहू नये म्हणून हे वाण मांडले जाते.
ह्या  ठिकाणी वरपक्षाची प्रार्थना केली जाते त्याचा थोडक्यात अर्थ असा कि हि मुलगी आजपर्यंत आम्ही आमच्या मुलाप्रमाणे वाढवली आहे ती आता तुमच्या घरची सून आहे तिला तुमच्याकडील रिती-रिवाज या बद्दल माहिती नाहीये तरी तिला तुमच्याकडील सर्व गोष्टी समजावून सांगून तिचा तुमच्या मुलीप्रमाणे सांभाळ करा.

वराचे वडील-आई, वर व वधू पाटावर क्रमाने बसतात.  त्यांच्या मागे/बाजूला वराकडील सर्व ज्येष्ठ मंडळी बसतात.  वधूचे आई-वडील सुपारीवर उमा-महेश्वर यांचे आवाहन करून पूजा करतात. एका सुपामधे कणकेचे  १६ दिवे ठेवून ते सूप वराच्या आईच्या हातात दिले जाते.  वधूचे वडील वराच्या आई-वडीलांची प्रार्थना करतात ती अशी 'आजपर्यंत माझ्या कन्येचा मी मुलाप्रमाणे उत्तम सांभाळ केलेला आहे. ही कन्या तुमच्या पुत्राला देत आहे तरी तिचा स्नेहाने सांभाळ करावा'.  वधूची आई  वराच्या  आईची  पांढरी  साडी, विडा, नारळ, तांदूळ, गजरा, याने ओटी भरते.  तोंड धुण्याचे सामान म्हणून चहा-साखरेचे डबे, चहाचे भांडे, कपबशा, २ पातेली, साबण, आरसा, कंगवा, तेल, पावडर, इ. वस्तू देण्याचा प्रघात आहे.
वधूची आई खणाची / ब्लाउजपीसची चुंबळ करून वराचे वडील-आई व इतर सर्व बसलेल्या मंडळींच्या डोक्यावर क्रमाने धरते व वधूचे वडील सुपातले कणकेचे १६ दिवे पेटवून ते सूप त्यावर धरतात.  वधूची जबाबदारी आता वराकडील मंडळींवर आहे असा त्याचा गर्भितार्थ आहे.  याला 'ऐरिणीपूजन' / 'झाल' म्हणतात.

 

सुनमुख :– पौराणिक संदर्भ : पूर्वीच्या काळी बालविवाह होत असत. होणारी सून हि बालिका (१२ वर्षां पेक्षा लहान ) असे. सासूने प्रथम सुनेचे मुखावलोकन करणे याला सुनमुख असे म्हणतात,धर्माने कोणत्या मांडीवर कोणाला बसवावे ह्याचे विवेचन केले आहे. सून हे अपत्य म्हणून स्वीकारायचे म्हणून सासूला मध्यभागी बसवून एका मांडीवर सुनेला व दुस-या मांडीवर मुलाला बसवायचे व आरश्यात सुनेचा चेहेरा पहायचा, तिच्या पाठीवरून हात फिरवायचा तिची वेणी घालायची.आरश्यात पहायचे कारण असे कि अलंकृत अश्या मुलीला दृष्ट लागू नये कारण प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही 'रूप हे आरश्यात पहायचे व स्वरूप हे डोळ्यात साठवून ठेवायचे.मुलीची बावरलेली नजर आरश्यात दिसते तिला सासूने धीर द्यायचा थोडक्यात यापुढे आईची माया तिला द्यायची जबाबदारी सासूची. सासूने मुलीच्या भांगेत कुंकू घालून तिला सौभाग्याची जाणीव करून द्यायची.

आधुनिक संदर्भ : वराची आई आपला मुलगा व सून(वर-वधू) या दोघांना आपल्या दोन्ही बाजूना बसवते, कंगव्याने तिचे केस विंचरते व मधे आरसा धरून त्या दोघांचे प्रतिबिंब आरशात पाहते.  नंतर दोघांच्याही तोंडात साखर किंवा पेढा भरवते. याला 'सुनमुख' म्हणतात.

 

वधूची पाठवणी :
वधू-वराला गौरीहराजवळ बसवून वधूची आई वधूची मालत्यांनी ओटी भरते.  याबरोबरच चांदीच्या ५ मालत्या देण्याचीही प्रथा आहे.  यानंतर वधूची असोल्या नारळाने ओटी भरली जाते. वराने गौरीहराच्या बाजूला असलेल्या गडूमधे गौरीहर पूजलेली देवीची (अन्नपूर्णेची) मूर्ती (काही ठिकाणी बाळकृष्णाची मूर्तीही) उचलून ठेवावी व गडूवर लाडू ठेवावा.  देवी उचलल्यावर वराच्या आईने किंवा वराकडील सुवासिनीने ती जागा वस्त्राने (ब्लाउजपीसने) झाकावी व तिथे सौभाग्यवायन (साडी, आरसा, कंगवा, बांगडया, जोडवी, मंगळसूत्र,  इ.) ठेवावे.  ( हे सौभाग्यवायन नंतर वधूच्या मामीने घ्यावयाचे असते).  तिथून निघताना वधूच्या आईने वराच्या हातावर दही द्यावे.  वराने वधूकडील सर्व ज्येष्ठ  मंडळींना नमस्कार करावा व वधूला घेऊन बाहेर पडावे.

 

लक्ष्मीपूजन :
चांदीच्या ताटात सोन्याच्या तारेने वराने वधूचे नाव लिहावे. वधुचे नामकरण – कन्येचा विवाह हा तिचा पुनर्जन्म मानला गेलेला आहे. ज्याप्रमाणे लग्नानंतर गोत्र बदलते त्याप्रमाणे नावही बदलले जाते. ते नवीन नाव  उखाण्यातून सर्वांना सांगावे. वधूने उखाणा घ्यावा. वराच्या आईने वधूची ओटी भरावी. तिला साडी, ब्लाउजपीस, विडा, नारळ, गजरा, पेढा, एखादा दागिना, इ. द्यावे.  लक्ष्मीपूजन हे खरं तर वराच्या घरी गेल्यानंतर करावयाचे असते.  सांप्रत काळी ते कार्यालयातच करवून घेतात.

देवकोत्थापन :
जर देवक कार्यालयात बसवले असेल तर त्याची पंचोपचार पूजा करून, देवताविसर्जन करावे.

लग्नाची पंगत :
वधूच्या आई-वडीलांनी वर व वराच्या आई-वडीलांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे असते.  चांदीच्या वाटीत ५  मोती व ५ सोन्याचे मणी (ऐपतीप्रमाणे) घालून अक्षतांबरोबर वाटीसह द्यायचे असते. त्यादिवशी तो त्यांचा मान आहे. जेवणाच्या पंगतीत मुलाकडील मानाच्या माणसांच्या ताटाभोवती रांगोळ्या काढाव्यात.  चांदीची ताटे, उदबत्त्या लावून, पंचपक्वान्ने वाढून सनईच्या मंद सुरात भोजन समारंभ करावा.  वधू-वरांनी उखाणा घेऊन एकमेकांना घास भरवावा. जेवणानंतर वधूच्या आईने वराची आई व इतर मानाच्या सुवासिनींना हात धुण्यासाठी गरम पाणी, हातावर साखर,चांदीची लवंग द्यावी.

 वरात :

वधू वरांच्या हातावर दही साखर देऊन त्यांना निरोप दिला जातो व नंतर वाजत गाजत वधूला घेऊन वर आपल्या घरी जातो .

नंतर आपल्या कुलप्रथेप्रमाणे ऋतुशांती – सत्यनारायण पूजा, गोंधळ, कुलदेवता दर्शन इत्यादी गोष्टी कराव्यात.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"