Friday, April 19, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -23

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -२३
शिवयोगी भक्त महिमा - शिवपूजा रहस्य विवरण
मी कृष्ण-युवल बड्डूतून कुरवपुरास प्रयाण करीत असतांना धर्मगुप्त नावाचे एक सद्वेषधारी गृहस्थ भेटले. ते श्रीपादांच्या दर्शनास कुरगड्डीस निघाले होते. ते सुध्दा योगायोगाने पीठिकापुरमला असणाऱ्या वेंकटप्पय्या श्रेष्ठीचे जवळचे नातेवाईक होते. मला याचे आश्चर्य वाटले की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते. ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते. यामागे काहींतरी विशेष हेतू असावा हे नक्की. श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक एक वर्ष झाले की त्यात घडलेल्या घटनांच्या थोडा मागचा भाग मला कळलेला असे. त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी सबंध असे. आता पर्यंत श्रीपाद प्रभूच्या दहा वर्षापर्यंत घडलेल्या लीलाच मला माहित होत्या. त्या क्रम बध्द पध्दतीने त्यांच्या कडून मला कळल्या होत्या मी मनांत विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लीला मला कळतील का ? श्रीपाद प्रभू क्षण क्षण लीला विहारी आहेत. श्री धर्मगुप्त म्हणाले ''अरे शंकरभट्टा, मी शिवभक्त आहे. श्रीपाद अकरा वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला. तो अत्यंत विद्वान होता. तो केवळ करतल भिक्षाच घेत असे. तो आपल्याजवळ झोळी, भांडे, थाळी असे काहींच बाळगीत नसे. तो दिसण्यास एखाद्या वेडया पुरुषाप्रमाणे दिसे. तो एके दिवशी कुक्कुटेश्वराच्या मंदिरा जवळ आला. त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला देवळातील पूजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिले नाही. तो देहाचे भान नसलेला अवधूत होता. तो सतत ''ॐ नमो शिवाय'' हा शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता. मी माझे मेहुणे, वेंकटपय्या श्रेष्ठींच्या घरी घोडयावरून गेलो होतो. वाटेत असलेल्या कुक्कुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती. मी वैश्य प्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली. त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पध्दतच होती. मी पांच वराह त्या अर्चकांना दिले. त्यांनी आपआपसात वाटून घेतले. देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे अनेक कष्ट या विषयी सांगितले आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या सारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. तेवढयात बाहेर आलेला शिवयोगी आत आला. त्या बरोबर दोन नागसर्प ही आत आले. ते पाहून अर्चकांच्या तोंडाचे पाणी पळाले. शिवयोगी म्हणाले ''अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवाची आभूषणे आहेत. पुत्र ज्या प्रमाणे आपल्या पित्याला प्रेमाने आलिंगन देतो तसेच हे नाग आपल्या पित्यासम कुक्कुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतूर आहेत. ते आपले स्नेही समान आहेत. आपण आपल्या स्नेह्यांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे. अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले. नागभूषण कुक्कुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रध्देने पूजा केली पाहिजे. रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजने म्हटली पाहिजेत. अर्चक स्वामी तेथेच बसून होते. मंदिरात येणाऱ्या भक्तगणांत कोणी धनवान होते तर कांही भक्त साधारण गरीब होते. विशेष धन दान देणाऱ्या भक्तांशी अर्चक स्वामी अधिक आत्मियतेने भाषण करीत. या अर्चकामध्ये पीठिकापुरम मधील सूर्यचंद्र शास्त्री नांवाचा एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित होता. त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल भक्ति प्रेम होते. तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक-चमक सुस्वरात आणि रागयुक्त आलाप गात म्हणत होता. तेथे आलेल्या नागांना त्याचे गाणे आवडले होते ते सुध्दा आपले फणे हालवत आपला आनंद प्रकट करीत होते. शिवयोग्याला घेऊन सूर्यचंद्रशास्त्री बापनार्युलुच्या घरी आले. तेथे त्यांना संतृप्तिकर भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले. श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ति स्वरूपात दर्शन दिले. त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिति प्राप्त झाली. अशा अवस्थेत तो तीन दिवस होता. त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी त्याला जेवू घातले.
श्रीपाद म्हणाले ''ए मुला, सनातन धर्मात सांगितल्या प्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरून जा. पुराणात विषयांच्या कल्पना किंवा असत्य असे काही नसते. त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो. अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतर अर्थ, आणि गूढ रहस्य अंत:करणात स्फुरते. भूतकारकाना चंद्रसूर्यात सूर्य परमात्म्याचे प्रतिक आणि चंद्र मनाचे प्रतिक वाटते. चित्स्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्याना चंद्राशिवाय सृष्टीकार्य चालत नाही असे वाटते. अमावास्या ही मायेचे प्रतिक आहे. ही माया पूर्वीच्या काळी वसुगुल नावांच्या कलेने जन्म पावत होती. चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो. ज्या प्रकारे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते. त्याच प्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ठ होतात. माया असो अथवा अमावास्या असो त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्या पासून निर्माण झालेले जगत त्याच्या चिरकाल सान्निध्याने चित्तजडात्मक आहे. वसंत ऋतु ज्या प्रमाणे सृष्टीतील फूल फळाच्या उत्पत्तिसाठी कारणीभूत होतो तसेच स्त्री सुध्दा शिशुच्या जन्मास कारणीभूत होते.''
मृत्यु लोकात जीवाला जन्म-मरण असते. पाताळ लोकात सूर्य कांतीमुळे कांतीवान दिसणाऱ्या लोकांना वृष्ण असे म्हणतात. सप्त पाताळात वेदांच्या अधिष्ठातृ देवता असतात. मनाचे ज्या ठिकाणी निवास स्थान असते ती भूमी सप्त पाताळ या नावाने संबोधिली जाते. याची अग्नी आदि देवता आहे. या अष्ट देवतांना अष्टवसु असे नांव आहे. सूर्य कांतीमुळे शोभायमान होणाऱ्या देवतांना वसू असे म्हणतात. ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या ''वासवी'' या नावाचे हे गूढ रहस्य आहे. या अष्ट गोलकांच्या मध्ये असलेल्या वायु स्कंदाला सप्त समुद्र असे नांव आहे. सामान्य जन या सप्त समुद्राला जल स्वरूप समजतात परंतु ते खरे नाही.
शिव महिमा - आंध्र प्रदेशातील अकरा शिवक्षेत्रे आणि त्यांचे स्वरूप
शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे. आंध्र प्रदेशात अकरा शिवक्षेत्रे आहेत. त्यांचे दर्शन घेतल्याने महाफल मिळते. ती क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत. 1) बृहत्शिला नगरातील नगरेश्वर 2) श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन 3) द्राक्षारामम् येथील भीमेश्वर 4) क्षीरा राम येथील राम लिंगेश्वर 5) अमरावती येथील अमर लिंगेश्वर 6) कोटीफली क्षेत्रातील कोटी फलेश्वर 7) पीठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर 8) महानंदी येथील महानंदीश्वर 9) काळेश्वर येथील काळेश्वर 10) कालहस्ती येथील कालहस्तेश्वर 11) त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर.
शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते. शिवलिंग आत्म्यात तेवणारे ज्योतीस्वरूप आहे. सिध्दि प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनरूपात असणारी निर्मलता म्हणजेच ''स्फटिक लिंग'' आहे. आपल्या शरीरात असणारा मेंदु त्याला ज्ञान मिळविण्या साठी सहकार्य करणारा रुद्र आहे. मानेपासून नाडी रूपात मानेच्या खाली पर्यंत व्याप्त असणाऱ्या नाडयांना रुद्रजटा असे म्हणतात. शिवाच्या हटयोगी रूपात लकुलीश्वर आहेत. शिवप्रभु भिक्षाटन करून जीवाची पाप कर्मे हिरावून नेतात. या सृष्टीतील तालबध्द असलेली सृजन , स्थिति आणि लय यातील महस्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात. शिव परमानंदकारक असून ते आपल्या अनन्य भक्तांना मोक्ष सिध्दि प्रदान करतात. चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश. आकाश रूपात असणारा तो चिदंबर (चित्त+अंबर = चिदंबर) आहे. तुम्ही पहात असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्रस्वरूपच आहे. द्वादश ज्योर्तीलिंगात राशीचक्रातील बारा राशींचे हा प्रतिक आहे म्हणून शिव काल स्वरूप आहे. आठ दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत. पंचभूते शिवाची पंचमुखे आहेत. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत. यालाच एकादश रुद्र असे म्हणतात. शिवाचे उमामहेश्वर रूप नित्य प्रसन्नरूप आहे. त्रिगुणांचे भस्म करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे. ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे. शिवांच्या जटाजूटातून परम पावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगामाता उगम पावते आणि धरतीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम्, सुफलाम् करते. आद्र्रानक्षत्र आकाशात चमकत असतांना शिवप्रभु दर्शन देतात. मिथुन राशी जवळ जाण्यासाठी अगोदर वृषभ रास ओलांडून जावे लागते. ही वृषभ रास नंदीश्वराचे प्रतिक आहे. तो धर्मस्वरूप आहे. दोन भुवयातील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा. योगस्थिति मुळे उद्भवलेल्या कामवासने मुळे स्त्री, पुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितिस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजेच अर्धनारीनटेश्वर. लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर, हे ज्योती स्वरूपात विलसत असते. असे वेद सांगतात.
शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरुकटाक्ष असेल तरच समजते. भौतिक रूपातील पिठापूर जसे आहे तसेच ज्योतीर्मय स्वरूप असलेले स्वर्णपिठापूर एक आहे. त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो. तो कितीही दूर असला तरी स्वर्ण पीठिकापुरातच वास करतो. अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ-प्राय असतात.
भौतिक पीठिकापुरम मधील कुक्कुटेश्वर मंदिरातील अर्चकस्वामी प्रमदगणांचे अंश रूपाने जन्माला आले होते. भूत-प्रेत, पिशाच्चादी महागण अनेक असतात. योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या त्या भूत प्रेतांना रोखून ठेवतात . हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होत. श्रीपाद प्रभू म्हणाले ''माझ्या आजोळच्या घराच्या अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे असे अनेक वेळा मी सांगत आलो आहे. माझा संकल्प अमोघ आहे. मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसेच माझे भक्त लक्षानुलाक्ष आहेत. योगीगण माझ्या संस्थांनाचे धर्मपालन योग्यरीतीने करतील. कोण, कितीजण, कोठून केंव्हा कशा प्रकारे येणार ते मीच ठरवितो . पीठिकापूर येथे वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे. माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल. त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करीन. अयोग्य व्यक्तीला माझे दर्शन मृगजळासारखे वाटेल.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"