Thursday, April 11, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -14

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -१४
दत्तदासांना अभय प्रदान
मी (शंकरभट्ट) थोडे दिवस प्रवास करून ''मुंताकल्लु'' या गावी पोचलो. वाटसरूना विचारले तेंव्हां कळले की अजून थोडया दिवसातच कुरवपूरला पोहोचेन. श्रीपाद प्रभूंच्या सगुणस्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती. ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ति हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता. मला त्या ताडीचा वास असह्य होत होता. तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो. ती व्यक्ति सुध्दा आपला वेग वाढवून माझ्याजवळ येऊन पोहोचली. त्याने विचारले ''मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का ?''
मी तेवढयात म्हणालो ''ए, तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम आहे.'' यावर तो जोरात हसला. त्याच्या ताडीचा उग्र वास आला. मी कोण आहे ते जाणून घेण्या अगोदर तू कोण आहेस ? कोठून आलास ? कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे. ताडी विकणारे सुध्दा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ आहेत वाटतं. त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले. तेथे लोकांचा जमाव झाला. त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला ''मित्रानो, मी या प्रांतात ताडी विकणारा आहे. मी धर्माने जगतो. ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे. मी झाडावर चढून ताडी आणी पर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पहात उभा होता. मी ब्राह्मण असून सुध्दा ताडी पिण्याची मला सवय आहे. परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत. थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला. मी नाही म्हणालो. परंतु जेंव्हा मी तयार झालो तेंव्हा लोकांची ये, जा सुरु झाली. चार लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे. आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार, खरे पाहता, आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे. अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर याने पाणी फेरले. हे पूज्य लोकहो, तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि पापा पासून माझे या रक्षण करा. तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते. त्यांनी त्या ताडी वाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडी वाल्याने मला ताडी बळजबरीने पाजविली. त्यानंतर सगळे लोक निघून गेले. मी अत्यंत दु:खी झालो. उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून नीच अशी ताडी प्यालो. माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले. परम पवित्र अशा श्रीपादाचे मुख कमल आता कसे पाहू ? जळलं माझं कर्म, नशीब माझे. माझ्या कपाळी विधिलेखच असा होता तेंव्हा वेगळे कसे होणार ?
माझे पाय लडखडु लागले. तोंडाला असह्य वास येत होता. माझ्या नशीबाला दोष देत, श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो. मार्गात एक तपोभूमी दिसली. तेथे कोणी महात्मा राहात होते. त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती. मी माझ्या रस्त्याने चाललो होतो. तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला, ''अरे शंकरभट्टा ! थांब, तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे.'' मी दैवाची लीला पाहून चकित झालो. मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले. करूणाभरित नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले. स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली. श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले, ''अरे शंकरभट्टा ! दत्तात्रेयांच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवढी करूणा दृष्टी आहे. त्यांनी तुला आपल्या अमृत हस्तानी अमृत पाजवले. त्यांना तू गौड कुलातील ताडी विकणारा समजलास. त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताडी समजलास, किती ही भ्रामकता !''
मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरे समोर एक एक येऊ लागले. त्यानंतर अनंत चैतन्य शक्ति महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला. अनंत अशा त्या सत्ता शक्तिमध्ये अत्यंत हीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला. ''मी'' म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारे नव्हते. एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो. माझ्यामध्ये परिमित असणारा ''मी'' नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्या प्रमाणे वाटत होती.
तेवढयात स्वामींनी माझ्यावर मंगल जल प्रोक्षण केले. त्यांच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले. मी प्रकृतीच्या आधिन झालो. काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो. प्रकृतिस्थ असणारा मी लगेच स्थुलतत्वात फसत जात असल्याचे लक्षात आले
श्री स्वामी म्हणाले, ''पूर्वीच्या एका जन्मात तू गौड कुळात होतास. जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास. तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाइट सवय लागली असती व तू पतित झाला असतास. तुझ्या पत्रिकेत अनेक गंडातरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृत्यू दृष्टीने त्यांचा तुझ्या न कळत परिहार होतो. श्री गुरुंच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो ? वेद सुध्दा नेति, नेति म्हणत मौन झाले.''
यावर मी म्हणालो ''श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत. त्यांच्या लीलांमधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. हे ऐकून स्वामी म्हणाले ''वेदऋषींचे तत्त्ववेत्तेपणाचे ते प्रमुख लक्षण आहे. अध्यात्म्यातील दडलेली सत्यवचने त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतानी सांगितली आहेत हेच आत्मसत्य. वस्तुत: कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्य, यज्ञ, जल, अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे. अशा प्रकारांनीच सरस्वती शब्दाचे सुध्दा फार वैशिष्टय आहे. सरस्वती नदी अंतर्वाहिनी आहे. हिचे वर्णन करताना सत्यवाक्यांचा बोध करणारी, महार्णवाची माहिती समजाऊन देऊन आपल्याच चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचे सांगितले आहे. श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोध शक्ति , प्रबोधिनी प्रवाह. त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसेच परमसत्य आणि अंतज्र्ञान आपल्यात स्थिर करते. वेदातील ''यज्ञ'' हे अंत:प्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे. यज्ञ द्वारा मानव त्याचे जे स्वत:चे असते ते देवाला अर्पण करतो. त्याला प्रत्युपकारा प्रीत्यर्थ देवता गोधन, अश्व देतात. गोधन म्हणजे तेज संपदा, अश्व म्हणजे शक्ति संपदा, या प्रमाणे देव आपणास तप शक्ति (प्रसाद) देतात. वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांनाच समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे.''
औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान,
नृसिंह सरस्वतींच्या अवताराचे वैशिष्टय
श्रीमहाविष्णु हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहांच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी प्रह्लादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले. कांही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रह्लाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रहलादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयानी दर्शन दिले होते व ज्ञान बोध केला. प्रह्लादास द्वैतसिध्दांता विषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन, श्री दत्त प्रभूंनी कलियुगात यतीवेश धारण करून दीन जनांचा उध्दार करशील असा आशिर्वाद दिला होता. परम पवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्रीदत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुध्दा वर द्या अशी प्रार्थना केली तेंव्हा श्रीदत्तात्रेय म्हणाले ''प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्या मधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नांव धारण करून अवतार धारण करीन. असे माझे वचन आहे.''
स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले ''महाराज श्रीपीठिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेले असते.''
श्रीपादांच्या अद्भूत लीला
स्वामी म्हणाले, ''लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे. शब्द तोतरे येत. त्यामुळे सगळी मुले माझी थट्टा करीत. मला एक अनामिक आजार झाला. पांच वर्षापासून तो वाढू लागला. एक वर्ष लोटल्यावर दहा वर्षे उलटल्या सारखे झाले. मी दहा वर्षाचा झालो तेंव्हा पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली. त्यावेळी बापनार्युलु पीठीकापुरम येथे यज्ञ करीत होते. माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते. त्या वेळी त्यांचे वय सहा वर्षापेक्षा जास्त नव्हते. यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते. ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते. तुपातील एक त्रितीयांश (1/3) भाग तो ब्राह्मण घरी लपऊन ठेऊन उरलेला दोन त्रितीयांश (2/3) भाग यज्ञासाठी आणीत असे. यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोडया वेळातच संपत आले त्या वेळी तूप तयार करणे कठीण होते. हा चिंतेचाच विषय होता. श्री बापनार्युलुनी श्रीपादांकडे हेतुपुरस्सर पाहिले. तेंव्हा श्रीपाद म्हणाले, ''कांही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करीत आहेत. परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही. योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन. त्याच्या घरी पत्नी बरोबर शनिदेवाने रहावे अशी आज्ञा करतो आहे.'' एवेढे बोलणे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर असे लिहून दिले ''आई, गंगामाते ! यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे धृत द्यावे. तुझी बाकी माझे आजोबा वेंकटप्पय्या श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपाद वल्लभांची आज्ञा'' हे पत्र त्यानी श्रेष्ठीना दाखविले. त्यांनी ते मान्य केले. त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले. ते पत्र तीर्थराजाला समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले. वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले. ते जल आणत असतांनाच सर्वांच्या समोर त्याचे शुध्द तूप झाले. त्या घृतच्या आहुतीनी यज्ञाची सांगता झाली. सर्वजण आनंदित झाले. वचनाप्रमाणे श्रेष्ठीनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित केले. घृत ओतताना त्याचे पाणी झाले होते.
माझ्या वडिलांनी माझी दु:स्थिती श्रीपादांना सांगितली. ते म्हणाले ''थोडावेळ थांबा. रोगाचे निवारण होईल. तोतरेपणा काढून टाकीन. एक घर जळणार आहे. त्याचा मुहुर्त ठरवायचा आहे. प्रभूंची विधाने अनाकलनीय होती. तेवढयात तो वृद्ध ब्राह्मण आला. तूप चोरल्यामुळे कांही हानी झाली का ते पहाण्यास आला. काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याला दृढ विश्वास होता. श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, ''आजोबा ! तुम्ही मुहूर्त शास्त्रात पारंगत आहात. एका घराला परशुराम प्रीती (नष्ट) करायची आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे'' तेंव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणसाठी , भूमीपूजनासाठी मुहूर्त असतात परंतु गृहदाहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले ''चोरी करायला, गृह दाहाला मुहूर्त कसे नसतात ?'' तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही. श्रीपाद म्हणाले ''आजोबा ! किती शुभवार्ता सांगितलीत परम पवित्र अशा यज्ञासाठी जमविलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले. अग्निदेवाला भूक आवरली नाही. धर्मानुसार त्याना मिळावयाला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवीत आहेत. अग्निदेवता आनंदाने उडया मारीत आहेत.''
श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाच्या चेहरा पडला. श्रीपाद म्हणाले ''तुझे घर भस्मसात झाले त्याचे थोडे भस्म घेऊन ये.'' श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसेच संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहित होते. तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला. ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूनी मला आज्ञा केली आणि तीन दिवस पर्यंत असे करण्यास सांगितले. आम्ही श्री बापनार्युलुच्या घरी तीन दिवस राहिलो. आणि ते भस्मयुक्त पाणी पिले. माझा तोतरेपणा पूर्णपणे नाहिसा झाला आणि मी स्वस्थ झालो. श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेऊन शक्तिपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले. त्यानंतर ते म्हणले ''आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिध्द होशील. गृहस्थाश्रम स्विकारून लोकांना तारशील. धर्मबोध करशील. तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता. व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता. एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलाऊन प्रेमाने खीर खाऊ घातलीस. त्या खिरीत विष कालवलेले त्या ब्राह्मणास माहित नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि कांही वेळाने तो मरण पावला. तुला माहित नसताना या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर कांही लोकां करवी जाळले आणि ते जळून भस्म झाले. तुझी पत्नी त्या आगीत जळून मेली. घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास. पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास. तुझे घर पुर्वजन्मी याने जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले. या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनापासून मुक्त केले'' श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो. त्यांच्या कृपेने वेदशास्त्र सम्पन्न पंडित झालो. त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्मानी नविन घर बांधून दिले. श्रीपादांच्या कृपाप्रसादाने दोघांचा कर्म बंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले. श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य व अगाध आहेत.
दत्तानंद पुढे म्हणाले, ''अरे शंकर भट्टा ! सर्व देवता तेजातून निर्माण झाल्या आहेत. अदिती माता हीच सर्व देवांची माता आहे. देवताच मानवाच्या प्रवृत्तीला, विकासाला कारक आहेत. देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात. त्या सत्यपोषक असतात. तेच सत्य लोकाचे निर्माते आहेत. मानवाच्या संपूर्ण मोक्षाला, अव्याज आनंदाला कारणीभूत होतात.
ब्राह्मण-भूलोकीच्या देवता
सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत. हे विश्व देवाधीन आहे. अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत. ते मंत्र सद्ब्राह्मणांच्या आधीन आहेत. म्हणून ब्राह्मण भूमीवर देवतासमान आहेत.
शब्द हा साधारण पणे पंचेद्रियांनी ग्रहण करता येतो. शब्द प्रकाश, गमन, स्पर्श, शितोष्ण, विस्मृति, बल प्रयोग, वेग, गमन वगैरे अत्यंत थोडया प्रमाणात असलेले प्राथमीक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात. भाषेची प्रगती होत असतांना क्रमाने भाषेमध्ये भावाची विविधता, निश्चितता वाढीस लागते. यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्चलतत्व भौतिक अंशामधून, मानसिक अंशामध्ये, व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पध्दतीने भाषेची वृद्धी होऊन वाढू लागते.
पवित्र ग्रंथ पठण विशेष फलदायी
तुमचा श्रीपाद प्रभुंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे. हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळग्रंथाच्या पाठणाचे फल सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही, कोठेही पठन केल्यास स्वत: श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात. या संबंधीची एक कहाणी सांगतो. सावधान होऊन ऐक.
श्रीपाद सात वर्षाचे झाले. त्यांचा वेदोक्त विधिने उपनयन संस्कार झाला. त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहिकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापनार्युलुच्या आनंदाला तर सीमा नव्हती. त्यांनी आपल्या जाती बांधवाना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्त चरित्र ऐकण्यास आले होते. दत्तदासानी दत्तचरित्र सांगण्यास सुरवात केली. (ते म्हणाले) ''पूर्वयुगात अनसूया आणि अत्रिमहर्षी या परम पावन दांपत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ति झाली. त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते. तेच परंज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पीठीकापुरम मध्ये अवतरले. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेज:पुंज दिसू लागले. अशा दीनजन उध्दारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे.''
हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते. असे त्रेपन्न (53) वेळा कथन झाले. दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृत दृष्टी पडली. उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत. जाण्याचे कारण विचारले तेंव्हा श्रीपाद म्हणाले ''विशुध्द अंत:करण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्याय असे समजल्यास त्रेप्पन्न अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील त्रेप्पन्न अध्याय श्रध्देने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्य:फलीत लगेच त्याला द्यायचे आहे.''
श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जाती कुलाचा भेद नाही
श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही. तेंव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले ''तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना व्रूच्रतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्या वर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दींमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व, तुमचे अधिकार, त्यांची सेवकवृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील. माझे वचन म्हणजे काळया दगडावरील रेघ आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही. तुम्हा ब्राह्मणा मधील जे धर्मबध्द होऊन दत्तभक्ति करीत आपले जीवन व्यतित करतील त्यांची मी डोळयात तेल घालून रक्षा करीन.''
श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलानी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोडया वेळाने ते शांत झाले व त्यानी मौन धारण केले.
नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले. त्यानी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्विकारली. त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले. त्यांनी आपल्या दिव्य हस्तानी सर्वाना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यानी आशिर्वाद दिला. ''बाबा शंकरभट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभुचे प्रेम. ते भावनेनेच संतुष्ट होतात. त्याना कुल, गोत्रासी, भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो. दत्तप्रसाद अंत्य कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तीभावाने स्विकार करावा. त्याच्या कडे दुर्लक्ष्य केले अथवा प्रसाद अस्विकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो.''
शश्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने
1) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
2) मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळयात तेल घालून संभाळ करतो.
3) श्री पीठीकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्याह्न काळी भिक्षा स्विकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.
4) सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
5) (अन्न हेच परब्रह्म-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
6) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
7) तुमचे अंत:करण शुध्द असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
8 ) तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरुंची उपासना कराल ती मलाचप्राप्त होईल..
9) तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/आशिर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.
10) श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.
11) श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिध्दपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
12) तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"