🙏🏻 *सद्गुरू श्री जंगली महाराज* 🙏🏻
सद्गुरू श्री जंगलीमहाराज
जन्म: ख्रिस्ताब्द १८०३
आईवडिल: ज्ञात नाही
कार्यकाळ: १८०३-१८९०
गुरु: नाथपंथीय स्वरूपनाथजी
समाधी: चैत्र शु.१४ दि.४-४-१८९० पुणे येथे
जन्म व बालपण
महाराजांचा जन्म वैशाख शुद्ध ५ या दिवशी कर्नाटकात झाला. हुबळीजवळ एका खेड्यात त्यांचे वडील अध्यात्म चिंतनात आपला काळ घालवीत होते. ब्राह्मणोचित अशा आठव्या वर्षी त्यांचे उपनयन झाले. लवकरच माता व पिता यांच्या वियोगाचा प्रसंग त्यांच्यावर आला. तेव्हा आपल्या नातेवाईकाकडे ते राहू लागले. पण एका संध्याकाळी कोणी एक योगीपुरुष आला आणि त्याने महाराजांना घराबाहेर बोलाविले ते कायमचेच. त्यानंतर महाराज पुन्हा त्या घरातच काय पण गावातही गेले नाहीत. त्या पुरुषाने महाराजांना आपल्याबरोबर नेले. पदयात्रा करीत हे दोघेही माहेश्वर येथे गेले.
विश्वरूपानंद महाराज नांवाचे एक मोठे योगी होते. त्यांच्या स्वाधीन महाराजांना करुन तो पुरुष अदृश झाला. श्री विश्वरूपानंद महाराज यांच्याकडे त्यांनी योगाभ्यास केला. त्यात त्यांना पूर्णत्व आल्यावर श्री महाराजांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. केवळ एक वस्त्र व कमंडलु हे त्यांचे या यात्रेतील सहायक होते. नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ते हिमालयात गेले. तेथे १२ वर्षेपर्यंत त्यांनी वास्तव्य केले. त्याचवेळी त्यांनी नाथसंप्रदायाची दीक्षा घेतली. तेंव्हा त्यांचे दीक्षा नाव 'जागरनाथ' असे ठेवले गेले. त्यानंतर त्यांनी नाथसंप्रदायी लोकांबरोबर बराच प्रवास केला.
सद्गुरू श्रीजंगलीमहाराजांचा जन्म ख्रिस्ताब्द १८०३ मध्ये बडोदे येथील झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याशी संबंधित असलेल्या जहागीरदार घराण्यात झाला असेही काहींचे मत आहे. लहानपणापासून त्यांना व्यायामाची आवड असल्याने तरूणपणात त्यांनी चांगली शरीरसंपदा मिळविली होती.
महाराज पुण्यात असतांना ते वारंवार देहू-आळंदी येथे जात. देहू येथे त्यांनी एक धर्मशाळाही बांधलेली आहे. प्रतिवर्षी दासनवमीस ते सज्जनगडास जात. 'सच्चिदानंद सद्गुरू' असे दासस्मरण नेहमी त्यांच्या मुखी असे. *आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व महाराज यांचा स्नेह होता. त्यामुळे नृसिंह सरस्वती स्वामी पुणे येथे येवून महिना महिना महाराजांच्याजवळ रहात असत. त्यांचे महाराजांचे नेहमी एकांतात बोलणे होई.* ते खूप उंच असल्याने व त्यांची प्रकृती सुदृढ असल्याने ते भरभर चालत. त्यांचे बरोबर इतरांना चालणे जमत नसे.
चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १८१४, दिनांक ४-४-१८९० या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ते समाधिस्थ झाले. त्यांच्या दर्शनार्थ हजारो लोक जमले व रोकडोबा मंदिरापासून समाधी स्थानापरयंत त्यांची प्रचंड मिरवणूक निघाली.
१८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात एक सैनिक म्हणून त्यांनी कार्य केले. स्वातंत्र्य समरात पराभव झाल्यानंतर संन्यास घेऊन सर्व भारतात त्यांनी परिभ्रमण केले. महाराष्ट्रात आल्यावर ते कृष्णेच्या काठी कऱ्हाडजवळील रेठरेहरणाक्ष या गावी स्थायिक झाले. तेथे गावाजवळ असलेल्या नदीतीरावरील शंकराचे मंदिरात प्रतिदिनी सकाळी ५-६ तास ध्यान करीत. नंतर गावात भिक्षा मागून नदीच्या वाळवंटात भोजन करीत. कृष्णेला पूर आला म्हणजे पाण्यावर घोंगडे टाकून व त्यावर बसून ते परतीराला जात. ह्याचे तेथील जनतेला आश्चर्य वाटे. त्यांचे भक्त औंध येथील कृष्णराव कदम यांची भेट रेठरे या गावी झाली हे श्री कदम यांनी लिहून ठेवले आहे.
रेठरे येथून महाराज पुणे येथे आले व त्यांनी भांबुर्ड्यात रोकडोबाचे मंदिर बांधून तेथे वास्तव्य केले. प्रतिदिनी नियमाने ते रोकडोबाचे दर्शन घेत व पहाटे नदीवर स्नान करुन पाताळेश्वराजवळील टेकडीवर निवडुंगाच्या बनात ध्यान करीत. माध्यान्हपर्यंत त्यांचे ध्यान संपवून ते भांबुर्डे गांवात येत व भिक्षा मागून चरितार्थ चालवीत. त्यांची योग्यता कळल्यावर लोक त्यांना रोकडोबाच्या मंदिरातच प्रतिदिनी भोजन आणून देत. दोन प्रहरी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आदि गंथांचे वाचन ते करीत. त्यावेळी ते लोकांच्या शंकांचे निरसन करीत. ते अधूनमधून बाहेरगावी प्रचारालाही जात. त्यांची किर्ती ऐकून दूरदूरचे लोक धार्मिक विषयावर त्यांच्याशी संवाद करण्यास येत. त्यामुळे रोकडोबाचे धर्मशाळेत भाविकांची सतत रीघ लागलेली असे. प्रसिद्धीचा त्यांना तिटकारा असे. यामुळे ते स्वत: जे अभंग करीत ते लिहून घेण्यास त्यांचा विरोध असे. त्यांचे अभंग एकदा एक शिष्य कागदावर लिहून घेत असता त्यांनी तो कागद त्याच्या हातातून घेऊन पेटत्या पणतीवर जाळून टाकला. कित्येक छायाचित्रकारांनी त्यांची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी प्रचार कार्यार्थ ठिकठिकाणी हिंडून कारजगे, रेठरे आदि गावी मठस्थापना केली. एकदा ते मिरज येथे गेले असता रखमाबाई गाडगीळ या नांवाच्या एका बाईंनी आपणास महाराजांनी शिष्य करून घ्यावे अशी विनंती केली. तेंव्हा महाराजांनी त्या बाईस संसारत्याग करुन मिरजेत भिक्षाटन करण्याची आज्ञा दिली. अशा तऱ्हेने सतत बारा वर्षे त्या बाईंनी मिरज येथे भिक्षाटन केल्यावर महाराजांनी त्यांना गुरूपदेश दिला. त्यानंतर रखमाबाई पुण्यास येऊन राहिल्या. तरी आठवड्यातून एक दिवस त्यांना भिक्षाटन करून आपला चरितार्थ चालविण्याची महाराजांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या जन्मभर आचरण करीत. रखमाबाई पुण्यात आल्या तेंव्हा त्यांच्या बरोबर महाराजांचे शिष्यत्व पत्करून दुसऱ्या बाई आल्या, त्यांचे नांव तुळसाक्का, महाराज जेंव्हा समाधिस्त झाले तेंव्हा त्यांचा संप्रदाय चालविण्याची योग्यता असलेल्या रखमाबाई व तुळसाक्का या दोघींनी त्यांचे कार्य त्यांच्यानंतर दहा वर्षे चालविले. रखमाबाईंनीच खटपट करून रोकडोबा मंदिरासमोर राम मंदिर बांधून घेतले व रामाचा उत्सव, पारणे नऊ दिवस पहारा, कथाकीर्तन आदि कार्यक्रम सुरु केले. रखमाबाईंना गावातले लोक आईसाब म्हणत. रखमाबाईंच्या मृत्यूनंतर तीनच दिवसांनी तुळसाअक्काने देह ठेवला. रोकडोबा मंदिराच्या समोरील राममंदिराचे आवारात या दोघींच्या समाध्या आहेत.
महाराज हे योगातील अधिकारी पुरुष होते. त्या बाबतीत त्यांनी पुष्कळ चमत्कार केले आहेत. एकदा महाराज आजारी पडले असता मिरजेच्या राजेसाहेबांनी त्यांना औषध देण्यासाठी, यांची प्रकृती तपासण्यासाठी आपल्या राजवैद्यास पाठविले. ते राजवैद्य आले तेंव्हा महाराजांनी समाधि लावली. वैद्यबुवांना वाटले की अशक्तपणामुळे महाराजांना ग्लानी आली आहे. म्हणून त्यांनी महाराजांना तपासण्यास प्रारंभ केला. परंतु नाडीचे ठोके, ह्र्दयाचे ठोके यांचा त्यांना पत्ताच लागेना. तेंव्हा वैद्यराज व महाराजांची शिष्यमंडळी चिंतातुर झाली. इतक्यात महाराजांनी समाधि उतरविली व हसून वैद्यराजांना म्हणाले, काय रोगनिदान झाले का? वैद्यराजांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवून आपला अधिकार फार मोठा आहे असे त्यांना सांगितले. एखाद्या सुगंधित फुलाचे अस्तित्व जसे त्याचा सुगंध दाखवून देतो तसेच त्या सिद्धपुरुषाचेही झाले.
कोणीतरी एक सिद्धपुरुष, एक अवलिया ह्या जंगलात रहायला आला आहे ही गोष्ट हळूहळू प्रगट झालीच. काहींनी शोध घेतला तेंव्हा एका सिद्धाचे अस्तित्व त्यांना दिसून आले. कोणी एक बाबा जंगलात येऊन राहिला आहे अशी वार्ता अशिक्षितांत पसरली. त्यांनी शोध घेतला. त्यांनाही तो सिद्धपुरुष दिसला. ती भाविक अडाणी जनता वैराग्यशील सिद्धाला 'महाराज महाराज' म्हणू लागली. जंगलात राहणारा महाराज म्हणून जंगलीमहाराज असे नांव त्या भाविक जनतेकडून त्या सिद्धाला मिळाले आणि आजतागायत तेच नांव लोकप्रिय होऊन बसले आहे.
आज पुण्यात, पुण्याबाहेर, उभ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सर्वत्र श्रीजंगलीमहाराज यांचे असंख्य भक्त आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही सारखेच प्रिय असे हे दैवत आहे आणि या गोष्टीचा मागोवा घेतला तर जंगलीमहाराज हिंदु होते का मुसलमान होते हा उपस्थित होणारा प्रश्न मागे पडतो आणि आजही दोघांनाही प्रिय अशा पंथाचे अशा संप्रदायाचे म्हणजे 'नाथपंथाचे-नाथ सांप्रदायाचे' ते होते.
नाथपंथीय योग्याबद्दल हिंदू आणि मुसलमान दोन्ही जमातींना सारखाच नितांत आदर वाटत असतो. मुसलमानात सुफी या नांवाचा जो पंथ आहे त्याचे तत्त्वज्ञान तर हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाशी बहुतांशी मिळते जुळते असेच आहे असे म्हटले तर फार अतिशयोक्ती होणार नाही. भारतात वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या या दोन जमातींच्या पिढ्यान पिढ्या इथेच जन्माला आल्या आहेत-येणार आहेत. इथेच वाढलेल्या आहेत-वाढणार आहेत आणि शेवटी याच भूमित विसावल्या आहेत-विसावणार आहेत. काही स्वार्थसाधू मंडळींच्या मुळे वितुष्ट निर्माण झाले आणि अशी मंडळी हे वितुष्ट जोपासण्याचे कार्य करीत असली तरी हे वितुष्ट नष्ट व्हावे म्हणून उभय जातींच्या साधू संतांनी अंत:करणपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. अद्यापही तसे प्रयत्न होत आहेत हे नाकबूल करता येत नाही.
श्री गुरुचरित्रात सद्गुरूंनी आपल्या यवन भक्तांना दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. असेच भक्त कबीर हे यवन संत प्रभू रामचंद्राचे कट्टर उपासक होते ही गोष्ट सर्वश्रुत अशीच आहे. संत एकनाथ महाराज यांच्या बालपणी त्यांचे गुरु जनार्दनस्वामी यांनी एकनाथांना श्री दत्तात्रयांचे दर्शन देण्यासाठी खुलताबाद जवळील शूलभंजन पर्वतावरील अरण्यात नेले असता त्यांना श्री दत्तात्रयांचे प्रथम दर्शन मलंग वेषातच झाले ही हकिगत एकनाथी भागवत ग्रंथात नमूद केलेली आहे. अकबर बादशहाने सुद्धा या दोन्ही जमातींच्या धर्मग्रंथामधून चांगल्या निवडक गोष्टींच चांगल्या निवडक गोष्टींचे एकत्रीकरण करून मदिने इलाही' या नांवाचा एक धर्म प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तत्कालिन विचारवंतांच्या सहाय्याने व सहकार्याने केला होता. हिंदु-मुसलमानांच्या ऐक्याबद्दल वरील गोष्टीत जशी आपुलकी दिसून येते तशीच आपुलकी सद्गुरु श्री जंगलीमहाराज यांच्याही अवतारकार्यात दिसून येते. म्हणून या दोन्ही जमातींना प्रिय असा जो नाथपंथ तोच त्यांनी स्वीकारला. सांगावयाचे तात्पर्य एवढेच की पीर ही जरी मुसलमानांची गुरूवाचक संज्ञा असली तरी नाथपंथात तशीच परंपरा अद्यापि सुद्धा चालू आहे.
कोणी म्हणतात जंगलीमहाराज बडोद्याच्या बाजूचे तर कोणी म्हणतात साताऱ्याकडील रेठरे गांवाचे तर कोणी म्हणतात विजापूर नजीकच्या बागलकोटचे. ते नेमके कुठले या वादात पडू नये. त्यांचा जन्म कुठलाही असो, ते अचानक भांबुर्ड्याला आले आणि अलौकिक कार्य करुन समाधिस्त झाले हे सत्य आहे.
दोन अडीच दिवसांचा सातारा येथील नाथपंथीच्या मुक्काम हलवून झुंड पुढील मुक्कामासाठी निघाली. तेंव्हा झुंडीत अचानकपणे पन्नाशी उलटलेला एक अत्यंत तेजस्वी पुरुष दिसून आला. सर्वांना त्या पुरुषाकडे पाहून आश्चर्य वाटले. कारण एक तर तो पुरुष सातारच्या मुक्कामात कोठेही नव्हता आणि दुसरे म्हणजे साताऱ्याला झुंड येण्यापूर्वीही तो बरोबर कधीही नव्हता.
अचानक आलेला तो पुरुष होताही तसाच अलौकिक. पन्नाशी उलटलेले वय, पण अंगपिंडाने सशक्त, उंचनिंच, देखणा, गोरा, अपूर्व तेजाने चमकणारे डोळे ही तर वैशिष्ट्ये होतीच पण चटकन नजरेत भरणारे वैशिष्ट्य म्हणजे विशाल कान आणि अजानुबाहुत्व. एक अवतारी पुरुष म्हणूनच माझे डोळे त्या अचानक आलेल्या पुरुषाला ओळखू लागले. अंगावरची वेशभूषाही तशीच विचित्र. रामदासी म्हणावा तर रामदासी नव्हे, फकीर बैरागी म्हणावा तर संन्यासीही नव्हे. त्याहूनही आश्चर्यात भर टाकणारी आणखी एक गोष्ट आणि ती म्हणजे त्यांच्या उजव्या पायात असलेला सोन्याचा तोडा राजघराण्याशिवाय पायात सोन्याचे तोडे घालण्याचा अधिकार कुणालाही नसतो. राणी लक्ष्मीबाई हिच्या तांबे घराण्याशी महाराजांच्या घराण्याचा नातेसंबंध होता. झुंडीतील सर्वजण त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागतो. पण कोणीही त्यांच्याशी बोलले मात्र नाही.
झुंड दीड मैल पुढे गेली. तो अलौकिक पुरुषही झुंडीबरोबरच होता. मग मात्र पात्रदेवतेबरोबर असणाऱ्या पाच योग्यांनी हास्यमुखाने त्यांना आपल्यात सामावून घेतले. नाथपंथाची झुंडीत वागण्याची पद्धति त्यांनी हातोहात आत्मसात करून घेतली. झुंडीचा मुक्काम विश्रांतीसाठी एका डेरेदार वृक्षांखाली पडला असतांना राजे स्वरूपनाथजी यांनी त्यांना समोर बोलावून आम्हा सर्वांसमक्ष त्यांच्या नांवा-गावाची चौकशी केली. प्रथमत: ते काहीही बोलायला तयार नव्हते. पण जेंव्हा खोदून खोदून आपण कोण, काय, कुठले असे प्रश्न विचारले. तेंव्हा मात्र थोड्या फार निरिच्छेने ते जे काही बोलले ते केवळ अपूर्व होते.
एखाद्या दीक्षाप्राप्त योग्याप्रमाणे राजे स्वरूपनाथजी यांना आदेश करून ते निर्भयपणे म्हणाले, "एखाद्या लहान मुलासारखे पन्नाशी उलटलेल्या मला आपण नावागावाचा प्रश्न विचारता यांचे मला नवल वाटते. करायची काय ती नावागावाची उपाधी? ज्याकरिता परमेश्वराने जन्म दिला ते कार्य तर अजून दूरच आहे. ते कार्य हातून व्हावे म्हणून हा देह आजपर्यंत झिजवला. भारतभर भ्रमण करून निरनिराळे, अनुभव घेतले. या भारतभर केलेल्या भ्रंमतीत अनेक प्रदेश पाहिले. अनेक प्रकारची माणसे पाहिली, त्यांचे आचारविचार, रीतिरिवाज पाहिले, अनेक जाती, अनेक पंथ यांचा अभ्यास केला. त्या भ्रमंतीत विचारवंत तत्त्वज्ञानी भेटले तसे कर्तव्यपराङमुख पाखंडीही भेटले. ध्येयाकरिता अहोरात्र तळमळणारे भेटले तसे धर्मभोळे, अडाणी आणि भोळसटही भेटले. प्रसंगोचित स्वीकारलेल्या अज्ञातवासात अनेक साधू, संत, फकीर, बैरागी यांच्या भेटी होऊन सहवासही लाभला. त्यात खरे सच्छील वृत्तीचे भेटले तसे भोळ्या भाबड्या जनतेला फसवून स्वार्थ साधणारे भेटले. हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन, जैन सर्वांची विचारसरणी अध्ययन करण्याची संधी लाभली. त्या अध्ययनात काही दिवस घालविल्यानंतर विचारांची उकल होण्याऐवजी गोंधळ मात्र वाढला. मतामतांच्या गलबल्याचा गोंगाटच अधिक झाला. एकाग्रतेवर भर देऊन त्या गोंगाटातून निष्कर्षाचा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला, पण हवा तो शोध लागला नाही. मनाचा संदेह मिटला नाही. मी कोण आहे? मी कोठून आलो? का आलो? ज्याने मला जन्म देऊन पोसले, जन्माआधी मातेच्या उदरात संरक्षिले त्या परमेश्वराची जवळीक मला लाभेल का? जीवनात तो परमेश्वर भेटल का? आणि भेटला तर कसा भेटेल? कुठे भेटेल? कधी भेटेल? हे सगळे काही समजावून घेण्यासाठीच मी आपणांस शरण आलो आहे. तो तेजस्वी पुरुष म्हणाला, योगी स्वरूपनाथजी यांच्याबरोबर हिमालयात गेल्यानंतर माझ्या सेवेवर संतुष्ट झाल्यामुळे तेथे मला नाथपंथीय योगदीक्षा मिळाली आणि तेव्हापासून नाथपंथीय या देहाला 'योगी जागरनाथजी' ही संज्ञा प्राप्त झाली, हेच जंगली महाराज. त्यावेळी त्या अलौकिक पुरुषाचे डोळे हिऱ्याप्रमाणे चमकले आणि काही वेळा त्यांची अवस्था देहातीत झाली. त्या वेळी तो दिव्य पुरुष महान योग्याच्या अनिर्वाच्य अवस्थेप्रत जाऊन पोहोचला. देहभान विसरून गेला.
मानेवरून कमरेपर्यंत रुळणारा पिंगट काळसर जटाभार, अर्धोन्मीलित दृष्टी, दणकट आणि सतेच देहयष्टि, कंबरेला फक्त लंगोटी आणि गुडघ्याच्या खाली पोहचतील असे उभय बाहुदंड असे ते स्वरूप आताही माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसते. पण त्यांना 'योगी जागरनाथजी' असे नांव दिले गेले. अत्यंत कमी निद्रा ही एक योगातील स्थिती आहे. अत्यंत कमी निद्रेमुळे दिवसच्या दिवस आणि रात्रीच्या रात्री म्हणजे जवळ जवळ सदैव जागृत अवस्थेत धुनीपुढे बसून ध्यानमग्न राहणे ही महान योगसाधना आहे. अशा अवस्थेला पोहोचणारे फारच थोडे असतात. तो तेजस्वी पुरुष त्यापैकीच एक होता आणि म्हणूनच त्याला 'योगी जागरनाथजी' असे नांव मिळाले.
अलाहाबादच्या मुक्कामात ती हकिगत जागरनाथजी यांच्याकडून समजली. आता पुढील योजना काय? या माझ्या प्रश्नाचे उत्तर देतांना जागरनाथजींनी सांगितले की, 'योगाच्या पुढील अभ्यासासाठी मी काय करावे' असा प्रश्न मी योगी स्वरूपनाथजींना विचारला असता त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात पुण्यापासून नऊ-दहा मैलांवर आळंदी येथे सद्गुरू ज्ञानेश्वर माउली यांची समाधी आहे तेथे जा. त्यांच्या करवीच आता तुला पुढील योगसाधना प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच त्या आज्ञेप्रमाणे ते इकडे आले.
श्री ज्ञानेश्वर माउलीकडून योगमुद्रेची कृपा व्हावी म्हणून हिमालयात वास्तव्य करून राहिलेले चोचीस्वामी नावाचे एक योगी जागरनाथजी यांच्याबरोबर इकडे आले होते. त्या उभयतांचा मुक्काम आळंदीत सिद्ध बेटावर कित्येक दिवस होता. तेथे योगावस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जागरनाथजींचा निरोप घेऊन चोचीस्वामी हिमालयाकडे निघून गेले आणि कर्नाटक वगैरे भागाची यात्रा करून जागरनाथजी पुन्हा पुण्यात आले. आज ज्या ठिकाणी जंगली महाराज मंदीर आहे हा बराचसा भाग सुधारलेला आहे. पण काही वर्षापूर्वी हा भाग खरोखरच जंगलमय होता. जसे या ठिकाणी बोरी, बाभळी आणि निवडुंग यांचे प्रस्थ होते तशीच उंच उंच डेरेदार झाडे खूप होती. जागरनाथजींनी ही जागा अशासाठी पसंत केली की एक तर लोकवस्तीपासून ही जागा थोडी फार दूर आहे. दुसरे म्हणजे थोडे फार का होईना घनदाट जंगल आणि काट्याकुट्यांनी भरलेले म्हणून वर्जित असे स्थान होते. थोड्याच अंतरावर स्नान जपादि नित्यकर्म करावयास रम्य असा नदीकाठ आहे. ध्यानधारणेला अत्यंत उपयुक्त अशी निवांत एकांताचा लाभ देणारी पांडवलेण्यासारखी गुंफा आहे आणि त्यातल्या त्यात विशेष गोष्ट म्हणजे याच कंटकमय घनदाट जंगल भागातून ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या पालख्या जाण्यायेण्याचा व त्यामुळे साधुसंताच्या सत्संगाचा लाभ मिळण्याची संधी आहे म्हणूनच हा तिवठा किंवा तिकटीवरील थोड्याशा उंचवट्यावरील ही जागा त्यांनी पसंत केली. एका सिताफळीच्या झाडाला खाकेतील झोळी अडकवून एका जुनाटशा कांबळीवर ते बसत असत. समोर अखंड धुनी प्रज्वलित असे. प्रातर्विधी आणि स्नान याशिवाय आपली जागा सोडून ते फारसे कोठे जात नसत. श्री रोकडोबा मंदिर आणि टेकडी ही त्यांची आवडती दोन स्थाने होती. त्या तिकटीवरील ती उंचवट्याची जागा ऊर्फ टेकडी श्री जंगलीमहाराज यांनी का पसंत केली ह्या योगी हरिनाथजींनी निवेदन केलेल्या माहितीला पुष्टि देणारा असा एक अनुभव व त्या अनुभवावरून काढलेला निष्कर्ष सांगण्यासारखा आहे.
पुण्याच्या सोमवार पेठेतील बरके आळीत पॉवर हाऊसच्या अलीकडील सारस्वत कॉलनीच्या रस्त्यावर हल्ली मोटारचे जुने पाटे विकले जातात. याठिकाणी पूर्वी बखळीसारख्या रिकाम्या पडीक जागेत एका औदुंबर वृक्षाच्या आसपास टांग्याचे घोडे बांधलेले असत. त्याठिकाणी सियाजीनाथ माळी या नांवाचे एक सश्रद्ध भाविक रहात असत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय टांग्याचाच होता. बऱ्याच वर्षांच्या नित्योपासनेनंतर त्या औदुंबर वृक्षाखाली त्यांना दृष्टांत झाला की याच जागेत एका नाथपंथीय योग्याची समाधि व पादुका आहेत. त्या दृष्टांताप्रमाणे थोड्या परिश्रमानंतर खरोखरीच एक समाधि व पादुका त्यांना सापडल्या. त्या समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांच्या जीवनात अपूर्व बदल घडून आला आणि ते 'माळी महाराज' झाले.
असाच काहीसा प्रकार जंगलीमहाराज यांच्या बाबतीतही झालेला असावा. माउलीच्या कृपेसाठी नित्य आळंदीला जाणे येणे असल्यामुळे माउलीची कृपा होऊन वरील दृष्टांताप्रमाणे दृष्टांत झालेला असावा. कारण तिकटीवरील उंचवट्याच्या जागेवरही अशीच एक पुरातन समाधि असून ती जंगलीमहाराज यांनी समाधि घेण्यापूर्वीची आहे ही गोष्ट भांबुर्ड्यातील कित्येक जुन्या मंडळींना माहित आहे. इतकेच नव्हे तर या समाधीचा जीर्णोद्धार खुद्द जंगलीमहाराज यांनीच केलेला आहे, असेही कित्येक जुन्या मंडळींचे मत आहे. अशाच प्रकारचा स्पष्ट उल्लेख श्री नारायण बळवंत पुरोहित यांच्या हस्तलिखित वहीत सुद्धा आढळतो. या समाधीवर शिवलिंग आहे ही गोष्ट आजही समक्ष पहावयास मिळते. या समाधीला कुणी कुणी राजबक्ष यांची समाधी म्हणतात. मात्र ही समाधी कुणातरी नाथपंथीय योग्याची असावी असे वाटते. समाधीच्या जीर्णोद्धारानंतर माळी महाराजांच्या जीवनात असा अपूर्व बदल घडून आला तसाच प्रकार या समाधीच्या जीर्णोद्धारानंतर जंगलीमहाराज यांच्याही जीवनात घडलेला असावा. म्हणूनच माउलींच्याकडून दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी हीच जागा पसंत केली असावी.
उंचवट्यावरील त्या जागेत धुनी प्रज्वलित करून कोणीतरी एक बाबा येऊन राहिला आहे ही गोष्ट हळूहळू भांबुर्डेगांवात राहणाऱ्या काही मंडळींच्या लक्षात आलीच आणि ती गोष्ट खरी आहे असे समजल्यानंतर भांबुर्ड्यामधील अनेक स्त्री-पुरुष मंडळी त्यांच्या दर्शनासाठी जाऊ-येऊ लागली. त्यात श्री बळवंत बाबाजी तांबेकर (सध्याच्या विश्वस्तांचे पूर्वज) व श्री शिरोळे नित्य दर्शनासाठी जात असत. त्यांच्याकरवी किंवा अन्य इतर भक्तांच्या करवी उपजीविकेची तरतूद जागच्या जागी होऊ लागल्यामुळे जागरनाथजीही सहसा कोठे जात नसत. तरी पण संध्याकाळच्या वेळी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुरोधाने जागरनाथजी असे प्रतिपादन करीत की ऐकणारी मंडळी मंत्रमुग्ध होऊन जात. हळूहळू ही नित्य प्रवचनाचीच वेळ होऊन बसली. ही प्रवचने रोकडोबाच्या मंदिरातही होत असत. अधिकार तैसा करु उपदेश अशी त्यांची पद्धती होती. त्यामुळे आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, अशिक्षित-सुशिक्षित आणि जातनिरपेक्षता यामुळे सर्वांच्या अंत:करणात त्यांनी आदराचे स्थान प्राप्त करून घेतले. त्यामुळे त्यांचा भक्तगणही खूप वाढला. काही शिष्यांच्या आग्रहावरून ते त्यांच्या घरीही जात असत. श्री बळवंत बाबाजी तांबेकर यांच्या भवानी पेठेतील तंबाखुच्या पेढीवर ते जात असत. त्यांचेकडे त्यावेळी महाराजांनी एक पितळी पेटी व एक गाठोडे प्रसाद म्हणून दिले व त्यांची नित्यनेमाने पूजा करावयास सांगितली. त्याप्रमाणे आजतागायत श्री तांबेकर यांच्याकडे त्या पेटीची व गाठोड्याची नियमित पूजा अर्चा होते.
अशिक्षित पण काही भाविक मंडळी त्यांना बाबा म्हणत तर काही महाराज म्हणत. जंगलात राहणारा बाबा किंवा महाराज म्हणून त्यांचे नाव जंगलीबाबा किंवा जंगली महाराज असेच पडले. त्यांच्या नावासंबंधी जर कुणी तशी खास चौकशी केलीच तर ते आपले नांव 'जागरनाथजी' असेच सांगत. ते नाथपंथीय महान योगी होते ही गोष्ट आजही फारच थोड्या मंडळींना माहित असेल.
गुरूकृपेने नाथपंथीय दीक्षा प्राप्त झाल्यानंतर जागरनाथजींनी सुद्धा आपल्या उजव्या पायातील सोन्याच्या तोड्याचा विनियोग त्याच अर्धकुंभ मेळ्यासाठी जमलेल्या सर्व साधूसंतांना प्रीतिभोजन देण्यासाठी आमच्या समक्ष केला. तेंव्हा ते कृतार्थपणे म्हणाले, मी नव्या नवसाचा मुलगा म्हणून पूर्वजांनी राखून ठेवलेला सोन्याचा तोडा माझ्या आईवडिलांनी माझ्या पायात घातला होता. आज त्याचा सदुपयोग झाल्यामुळे अत्यानंद झाला. मी कृतकृत्य झालो….धन्य झालो.
विजापूर मुक्कामात शमसुद्दीन काकांच्या वडिलांनी जंगलीमहाराजांची मन:पूर्वक सेवा केली होती. त्या सेवेवर संतुष्ट होऊन महाराजांनी असाध्य रोगावरील काही औषधींची माहिती त्यांना दिली होती तसेच त्यांच्याकडून काही माहिती करून घेतली होती. त्या हकीम पितापुत्रांनी महाराजांची अधिक जिज्ञासेने चौकशी केली असता मी पुण्याला भांबुर्ड्यात जवळजवळ जंगलात राहतो म्हणून मला सर्वजण जंगलीमहाराज म्हणतात. पण नाथपंथीय या देहाला जागरनाथजी अशी संज्ञा असल्याचे त्यांनी सांगितले होते. शमसुद्दीन काकांच्याकडून समजलेली ही अत्यंत विश्वसनीय अशी माहिती आहे. विजापूरात त्यांचा मुक्काम पंधरावीस दिवसापेक्षा जास्त नसावा, कारण पुन्हा एके दिवशी ते भांबुर्ड्यात आपल्या नेहमीच्या जागी सर्वांना दिसून आले.
शमसुद्दीन काका व त्यांचे वडील या हकीमद्वयांची कीर्ति ऐकून औरंगाबादेतील काही मुसलमान मंडळी औषधोपचारासाठी विजापूरात त्यांच्याकडे गेली असतांना जंगलीमहाराजांनी दिलेली औषधी त्या हकिमांनी त्या मंडळींना दिली. पण आणखी पुण्याला जाऊन महाराजांचे दर्शन करुन येण्याचा सल्लाही दिला. त्याप्रमाणे रोगमुक्त झालेली ती मुसलमान मंडळी पुण्याला आली व त्यांनी जंगलीमहाराज ऊर्फ योगी जागरनाथजी यांचे दर्शनही घेतले. औरंगाबादला परत गेल्यानंतर त्या मंडळींनी त्या पितापुत्र हकीमांना जी पत्रे लिहिली ती उर्दू भाषेत लिहिलेली असून त्या पत्रात आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही पुण्याला जाऊन जंगली महाराज ऊर्फ जागरनाथजी यांचे दर्शन घेऊन पावन झालो असा स्पष्ट उल्लेख केला आहे. जंगली म्हणजे काय?
जंगलात राहतात म्हणून जंगलीमहाराज असे नांव ठेवले गेले असे लोक समजतात, पण ते बरोबर नाही. योगामध्ये जांगल नांवाचा एक पंथ असून त्याचे काही विशिष्ट आचार आहेत. त्यात एक आचार असा आहे की या पंथाचे लोक आच्छादन असलेल्या कोणत्याही स्थलात रहात नाहीत. ऊन, वारा, पाऊस ही सहन करुन उघड्यावर राहण्याचा यांचा सांप्रदाय आहे व तो ते अत्यंत कडक रितीने पाळतात. म्हणून या पंथाला प्रतिक्षेची पराकाष्ठा करावी लागते. योगातील या पंथाचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. श्री जगद्गुरू भगवान पूज्यपाद श्री शंकराचार्य महाराज यांनी आपल्या योगतारावली या स्तोत्रात नमस्काररूप मंगल करीत असतांना 'जांगलिक' असा उल्लेख केला आहे. तो जांगलिक पंथ हाच आहे. त्याच पंथाचे अनुयायी महाराज होते म्हणून त्यांना प्राकृत भाषेत जंगली असे म्हटले जात होते.
महाराजांची शरीराकृती ही मुळातच दिव्य होती. ते आजानुबाहू होते तसेच योग्याची दिव्य लक्षणे जन्मत: त्यांचे अंगी होती. हिमालयात दुसऱ्या यात्रेच्या निमित्ताने ते हिंडत असतांना त्यांची व श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची भेट झाली. नानासाहेबांनी आपल्या स्वातंत्र्य युद्धाची अंधुक कल्पना श्री महाराजांना दिली होती पण आपण साधू आहोत तेव्हा आपण काय मदत करू शकणार असे महाराज म्हणाले तेंव्हा नानासाहेबांनी आशिर्वाद मागितला. तेव्हा आशिर्वाद देण्याचे माझे सामर्थ्य नाही पण मी आपणास योगाने सहाय्य करीन असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष युद्धाचा वणवा पेटल्यावर महाराज नानासाहेबांचे सेनापती श्री तात्या टोपे यांना भेटले व त्यांनी सैनिकांना अन्न पुरविण्याचे काम हाती घेतले. आपल्या शिष्याकडून व आपण स्वत: ते अन्नाची रसद सैनिकांना पोहचवीत असत. कित्येक प्रसंग असे आले की तात्यांच्या फौजेचा पराभव होऊन त्यांच्याकडील सर्व सामग्री इंग्रज पक्षीय लोकांनी लुटून नेली तरी दुसरे दिवशी तात्यांचे सैनिकांना अपेक्षित अन्नसामग्री मिळालेली दिसत होती. याचे आश्चर्य इंग्रज पक्षीय लोकांप्रमाणेच तात्यांच्या लोकांना वाटत असे. महाराजांनी स्वत: शस्त्र हातात घेतले नाही. पण अनेक युद्धात ते जातीने अगदी महत्त्वाच्या ठिकाणी उपस्थित असत. त्यामुळे तलवारीचे कितीतरी वार महाराजांच्या अंगावर झाले होते. चार महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना गोळ्या लागल्या होत्या. तीन महिने त्यांनी हे काम पूर्ण केले. त्यानंतर तात्यांना त्यांनी एका विशिष्ट ठिकाणी तू पायांनी चालत जा असे सांगितले. तात्यांचे शरीर थकून गेले होते. तात्यांनी तो आदेश पाळण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्णपणे पाळला गेला नाही. म्हणून तात्या इंग्रजांना सापडले. पण तात्यांवरील हे संकट टळावे म्हणून त्यांनी १० तरी तात्यांसारखे लोक निर्माण करून इंग्रजांची खोड मोडली होती. श्रीमंत नानासाहेबांनी तो आदेश पाळल्यामुळे नानासाहेब इंग्रजांच्या हाती कधीच सापडले नाहीत.
सैनिकांना अन्नपुरवठा करतांना त्यांनी शिधासामग्री कोठून आणली याचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही. फक्त ते कामात श्री जगद्गुरु श्रीशंकराचार्य महाराज यांचा कनक-धारा या स्तोत्राचा अहर्निश पाठ करीत असत. यापेक्षा त्यांच्या या उद्योगाची माहिती कोणासही लागली नाही. महाराजांच्या जीवनातील हा मोठा चमत्कार नाना व तात्या या दोघांनाही विस्मयकारक वाटत होता. याची जाणीव नानांनी नेपाळ-नरेशांना करून दिली होती. तेव्हा अशा साधुचे दर्शन व्हावे अशी नेपाळ नरेशांची इच्छा होती. त्यांनी नानांना साधूचा पत्ता विचारला पण नानांना तो नीट सांगता आला नाही. श्री क्षेत्र काशी येथील विश्वेश्वर मंदिरात पुण्याच्या साधूने एक सोन्याचा तोडा अर्पण केला आहे अशी नोंद आहे. हा साधू कोण याचा शोध घेतला असतांना तो श्री जंगलीमहाराज होते असे दिसून येते. या तोड्यासंबंधीतला इतिहास असा आहे की एका साधूसंमेलनात आताचे साधू हे नामधारी असून त्यांचे सामर्थ्य नष्ट झाले आहे. सर्वच लोक ढोंगी आहेत असे विवेचन एकाने केले. त्यावर महाराज म्हणाले साधू ढोंगी नाहीत यासाठी आपणास काय प्रमाण देऊ? त्यावर प्रथम वक्ता म्हणाला ही समोर बाई बसली आहे तिच्या पायात चांदीचे तोडे आहेत ते आपण सोन्याचे करा. त्याबरोबर ठीक आहे असे म्हणून त्या बाईला उभे राहण्यास सांगितले. त्याबरोबर तिच्या पायातील तोडे सोन्याचे झाले. सर्व सभा चकित झाली.
त्या बाईने त्यातील एक तोडा महाराजांना अर्पण केला. त्यांनी तो काही दिवस वापरलाही व शेवटी विश्वेश्वरास अर्पण केला. महाराजांची ही कीर्ति नेपाळ. नरेशांच्या कानावर गेली तेव्हा नाना सांगत होते तो हाच तर साधू आहे..याची त्यांना प्रचिती आली
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"