Saturday, April 27, 2019

शरीर काळाचे भांडे तसेच हे मिथ्या आहे.

जंव या वायूचा प्रकाशु।
तंव या भांडियाचा विश्वासु।
वायो निघोनिया गेला।
ठाईचाच जाला उदासु रया॥
काळाचे भातुकें श्रृंगारिलें कौतुकें।
जातसे तें देख परी न चले कांही॥
ठाईचेचि जाणार की नव्हे राहणार।
यासी जतन ते काई।
जेथील तेथे निमोनियां गेलें।
उपचार नचलेचि काही॥
हे काळांचे भांडे की अवघेंचि लटिकें।
जैसे आहे तैसे सांगेन पुढती।
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि सकळहि।
जीवांचा सांगाती रया॥

जोपर्यंत शरीरामध्ये प्राणवायुचा प्रकाश म्हणजे संचार आहे. तोपर्यंत शरीररुप भांड्याचा विश्वास आहे. एकदा काय शरीरातून प्राण निघून घेला की जागच्या जागी विद्रूप होऊन जाते.शरीर काळाचे खाद्य आहे. त्याला कोडकौतुक करुन श्रुंगारले तरी मृत्यू घेवून जात असता ते त्याच्या तावडीतून सुटण्याला काही एक उपाय चालत नाही. मूळातच हे शरीर जाणारे आहे ते राहणार नाही. त्याचे रक्षण तरी काय करणार. नष्ट होते वेळी त्याला टिकविण्याकरिता कितीतरी प्रयत्न केले तरी त्याचा कांही एक उपयोग होणार नाही.शरीर काळाचे भांडे तसेच हे मिथ्या आहे. याच्या विषयी जो खरा विचार आहे तो विचार एवढाच की, रखुमादेवीवर बाप जो श्री विठ्ठल तोच एक व्यापक असून जीवाला सर्व दुःखातून सोडविणारा तोच खरा सोबती आहे असे माऊली सांगतात.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"