स्वामींचे स्वरूप, स्वामी असे आहेत
स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकलसे खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही.
स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे 'स्व'रूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार (अघटित लीला) कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी 'अवधूत' म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, सांप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम (सर्वोत्कृष्ट) आहेत. स्वामी तपोमय अजर यतिश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि ऋद्धी-सिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत.ते सर्वसाक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील 'अर्थ', आनंद, प्रेम आणि 'सुख'रूप आहेत. आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म वअतिविराट वटवृक्षासारखे, वटवृक्षाच्या तळी व मुळात (दत्तनगर मूळ मूळ) आहेत. म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदायास्तापलीकडेचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत. स्वामी सर्व जीवांचे (पापी किंवा पुण्यवान) सुहृद म्हणजेच जीवलग आहेत. जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्युलोकात घेतलेला आहे. स्वामी अंतःसाक्षी (प्रत्येकाच्या हृदयात असणारा) व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही, निरहंकारी, तुल्यनिंदा, स्तुतिमोंनी व निर्विकारी 'साक्षी' आहेत. म्हणून ते म्हणायचे "मला नमस्कार करा किंवा करु नका. माझे नामस्मरण, पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. स्वामी 'अहंभावहीनं प्रसन्नात्मभाव' असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्याच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागावतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तीरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध तापहर (जन्म, जरा, मरण,- या अवस्थांतील यातना) आणि अधिभौतिक, आधिदैविक आणी आध्यात्मिक ताप हरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम - भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश आहेत. इष्ट इति ईश्वर:- या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुखसमाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या नादी लागल्याने (तिच्या मोहात पडल्याने) केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी संगविवर्जीत म्हणजे मोहमायेपासून दूर असल्याने संयमी (जागर्ति संयमी) असे आहेत. म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत. त्यांच्या दृष्प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. (सुंदराबाईची मनमानी) सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरुपात धरून ठेवले आहे. तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी रागावत नाहीत, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले, 'मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती.'
स्वामी भावविनिर्गत आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित् आणि दिक् हेच ज्यांचे वस्त्र आहे, असे विराटरूपी ते चिन्मय-चैतन्यरूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. म्हणजे मायास्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदासिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत, ते कृतनाश, कृतांत, कृतलक्षण आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. (उत्पत्ती, स्थिती, लय) स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती (श्रवण), स्मृती (स्मरण) यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत- 'कथित' आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत. म्हणजेच ब्रम्हा, विष्णु, महेश व माया अशा चार स्वरुपात वावरणारे-मन चित्त, बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य, शुद्ध, मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामी धि (बुद्धी) पती, श्री (लक्ष्मी) पती, पृथ्वीपती, यक्षपती व देवाधिपती (सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार) आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज, प्रदीप्तमूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते, म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"