॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -२०
श्रीपादांचे दिव्य मंगलस्वरूप
मी सकाळीच श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला आलो. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे मला दिसले. त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान, ज्योती स्वरूपात ओसंडत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करूणा, प्रेम ज्ञान यांची कांही प्रयास न करता प्राप्ति होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभुस्वरूप होते. निराकार तत्त्व साकार होऊन, सगुण रूपाने मानवाकार घेऊन डोळयासमोर दिसल्याने मी आनंदाने भावविभोर झालो.
श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या मुखाकडे पहाताच एक अलौकिक शांती, वात्सल्य, प्रेम माझ्या अंतरंगात व्यापून माझ्या मन, शरीर आणि हृदयास अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रध्दाभावाने स्पर्श केला. माझे शरीर त्या स्पर्शाने हलके हलके वाटू लागले. माझ्या डोळयातून तेज बाहेर आल्यासारखे वाटले. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला. तो आकार माझ्या सारखाच होता. श्रीपादांनी मंद हास्य करीत मला प्रश्न केला ''तुझ्या सारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळले का ?'' मी म्हणालो ''स्वामी तो आकार मी पाहिला तो माझ्या सारखाच वाटला. परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही. ती आकृती कोणाची होती तेही कळले नाही. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले'' ''ते तुझे पापशरीर होते. तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो. ह्या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेंव्हा निघून जातो तेंव्हा तिच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्मानी उध्दार करावा. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेतांना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे. अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानाच्या पापांचे वाटेकरी व्हावे लांगते. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुणरूपी अग्नीत दहन करावे. अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणच ब्राह्मत्वास पात्र होतो. अन्यथा तो जातीनेच केवळ ब्राह्मण असतो. ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे. आमचे आजोबा बापनाचार्युलु, वडिल अप्पलराजाशर्मा हे दोघे सद्ब्राह्मण होते. माझी आजी आणि माता सुमती महाराणी या दोघी परम पवित्र स्त्रिया होत्या. त्यांचे केवळ स्मरण केल्यानेच लक्ष लक्ष पापे नाहिशी होतात.'' असे बोलणे झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केले. नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटानी भूमीस स्पर्श केला त्या वेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. कांही मधुर फळे, सुवासिक फुले, थोडे सोने, चांदी आणि नवरत्नाचा हार तसेच दिव्य अग्नि प्रकट झाला. माझ्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करु लागला. श्रीपाद प्रभूंनी त्या पाप पुरुषाला नेत्रानीच अग्नित भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नित पडून भस्मसात् झाला. माझ्या शरीरात अग्निचा भडका उडाला. ''स्वामी मला वाचवा'' अशी विनंती केली. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला. माझे शरीर त्या तरंगाने शीतल झाले. माझी कुंडलीनी शक्ति जागृत झाल्यासारखे वाटले. माझ्या नाडीचे स्पंदन थांबले, हृदयाचे ठोके थांबल्या प्रमाणे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेलो
माध्यान्ह काळ झाला होता. त्या दिवशी गुरुवार होता. श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्त जनांनी समर्पित केलेल्या भिक्षा अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडलुतील जलाने, जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले. भिक्षेतील थोडे अन्न काकबळी साठी काढून ठेवले . अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामीनी मला नांवाने हाक मारली आणि सगळयांना भोजनाची अनुज्ञा दिली. मला त्यांच्या जवळ बोलावून घेतले. क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहाळ नजरेने पाहिले. त्याच वेळी त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले. त्यात हलवा भरलेला होता. श्रीपाद प्रभु म्हणाले ''शंकर भट्टा माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशने बांधून ठेवतात . मी निरपेक्ष भक्तीभावाला भुलुन जातो. श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जुन हलवा करीत असे. मी जेवल्यावरच तिचे समाधान होई. त्यांची नात लक्ष्मी वासवी हिने माझ्या हातात राखी बांधली होती. तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचे एका ज्योतिष्याने सांगितले होते. तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशिर्वाद द्यावा. मी तिला अखंड सौभाग्याचा आशिर्वाद देऊन फुले, बांगडया, आणि कुंकवाचा प्रसाद दिला. तिच्या आज्जीने-वेंकट सुबम्माने प्रेमभावाने तयार केलेला हलवा तिने मला दिला. या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रध्दाभावाने दाखविलेल्या नैवेद्याचे मी त्यांचे घरी सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतो. परंतु श्रेष्ठांच्या घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकार करतो.'' सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असे श्रीपादांनी सांगितले. या प्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोणाला करता येईल? प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला. तो नभो-मंडळात विलिन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला, तो भूमातेने स्वीकार केला. तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला. कोणासही निराश करायचे नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव होता. कितीही प्रसाद वाटला तरी तो कमी होत नव्हता. याच वेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नांवाचा एक भक्त तेथे आला. त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला. तो त्याने मोठ्या श्रध्दाभावाने खाल्ला. नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचे पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिले.
यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले ''पद्मशाली कुलातील माडेय गोत्र असणारे लोक कालांतराने मांस भक्षण करणारे झाले. माझ्या सान्निध्यात कांही कारण नसलेले कार्य कधीच होत नाही.'' गुरुचरणा तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून ''श्रीगुरु शरणम्,'' ''स्वामी शरणम्'' असे नामोच्चारण करीत पवित्र जीवन व्यतित करीत आहेस. आज तुला श्री गुरुंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेले गुरुतत्व या शंकरभट्टास सांग. आम्ही माध्यान्ह समयी योगनिद्रेत असतांना मानस संचार करतो. त्या वेळी कोणास दर्शन देत नाही. आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये.''
श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता. त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. त्याला शंकरभट्ट म्हणाला ''हे महापुरुषा गुरुतत्त्वाचे ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावे.'' यावर गुरुचरण म्हणाले ''अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ति, स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रानेच होते, असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकर स्वरूपातून श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतरित झाले आहेत. त्यांना साकार समजणे महादोषास्पद आहे. कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत. सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. ते सर्व योगमार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत. सृष्टीतील अनेक महर्षीनी आपआपल्या साधन वैशिष्टाने साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचे स्वरूप म्हणजेच श्रीपादांचे दिव्य रूप होय. पूर्वकाळापासून महर्षीना अनेक दिव्य शक्ति प्राप्त होत्या. वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत. विश्वामित्र ऋषी हव्यसामुग्री शिवाय यज्ञ करीत. जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचे अनुकरण करीत. आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकाराच्या यज्ञांचे समर्थन करीत. कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळया पध्दतीने करण्यास त्या कर्माचे आणि मंत्रांचे रहस्य जाणण्यास ते समर्थ होते. श्रीपाद प्रभु सर्व समर्थ असून सर्व कर्मांचे रहस्य जाणणारे असल्याने त्यांना त्या त्या व्यक्तींच्या आचरणाचे सूक्ष्म ज्ञान होते. बापनाचार्युलु, नरसिंहवर्मा, वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते. सर्व शक्ति मध्ये प्रेमशक्ति सर्वात श्रेष्ठ आहे. या तिघांना श्रीपाद प्रभूंची वात्सल्य भक्ति प्राप्त होती. त्यांच्या प्रेमशक्तिमुळे ते स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करवून घेत. श्रीपाद स्वामी सुध्दा त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने सुसंपन्न करीत असत.
श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहून सहज स्वभाव, सहज वात्सल्याने शिशुप्रमाणे वर्तन करीत. त्या स्त्रिया सुध्दा स्वामींची शिशुरूपातच प्रेमभावाने आराधना करीत. हीच महामाया ! योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेला निर्गुण, निराकार, परब्रह्मरूप दिव्य शिशु पीठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांनी सर्वांचे चित्त आकर्षित करीत असे. या शिशूच्या लीलांचे वर्णन करणे अतर्क्य होते. दैवमार्गाने, योग मार्गाने, ज्ञान मार्गाने, वेद शास्त्राच्या अध्ययनाने साधना करणाऱ्या साधकांना, त्यांच्या त्यांच्या मार्गाने श्रीपाद श्रीवल्लभांच्याच कृपेचा लाभ होतो. यानंतर शंकरभट्ट त्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, ''महाराज आपणास श्रीपाद स्वामींचे प्रथम दर्शन कसे झाले तो कथा प्रसंग सांगून माझा उध्दार करावा.''
गुरुचरण म्हणाले ''हे ब्राह्मणोत्तमा ! तुम्ही अत्यंत धन्य धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे समक्ष दर्शन पूर्व जन्मीच्या सुकृतामुळेच घडले. तुम्हास प्रतिदिन स्वामींच्या करूणा कटाक्षाचा लाभ होतो. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणा पासूनच मी आमचे कुलदैवत श्रीदत्तप्रभूं ची भक्ति करीत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी दत्तात्रेयांची अत्यंत श्रध्देने आराधना करीत होतो परंतु समस्या कमी होत नव्हत्या. आमच्या गावातील कांही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा नाही. तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्यांची आराधना कर. असे केल्याने तुझे संकटातून निवारण होईल. मी त्यांच्या मतास सहमत होऊन रात्री झोपलो. मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमाने शेळयांचा सांभाळ करीत असे परंतु दररोज तो कांही शेळयांचा बळी देत असे. त्याच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला ''मी दत्त आहे. तू कोणत्याही देव देवतांची आराधना केली तरी त्या स्वरूपात मीच असतो. तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपाने बदललेस तरी मी बदलणारा नाही. मी तुला कधिच सोडणार नाही. तू माझी छाया आहेस. माझी छाया मला सोडून कशी राहील ? समस्त देव देवतांच्या संकल्पांना आणि समस्त कोटी मानव संकल्पना चालविणारा महासंकल्प मीच आहे. भगवत् अवतारातील भगवत् स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्म मीच आहे. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटु शकेल परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधिही सोडून जाऊ शकणार नाहीस. दत्त भक्तांनी सिंहाच्या छाव्या प्रमाणे शूर असावे. आणि भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते. ते त्यांच्या बरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्याने तुझा वध करीन. तुझे रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही.
मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याच वेळी माझा स्वप्न भंग झाला. घरातील लोक काय झाले असे विचारु लागले. मी त्यांना स्वप्नातील वृतांत कथन केला. आमच्या आर्थिक समस्या दिवसेदिवस अधिकच वाढत होत्या. कोणत्या जन्मात केलेल्या कर्माचे फलस्वरूप ही दरिद्र अवस्था आम्हास भोगावी लागत होती ते कळत नव्हते.सकाळ होताच एक हरीदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळया होत्या. तो हरीनामाचे गायन करीत होता. त्याच्या डोक्यावर तांदुळाचे टोपले होते. हा एक विचित्र हरीदास होता. त्याच्या टोपलीत एक औदुंबराचे रोप होते. तो दारा समोर उभा राहून तांदुळ देता का ? असे विचारित होता. मी घरात तांदुळ शोधीत असताना एक मूठभर कण्या मिळाल्या. त्या कण्यांचा स्विकार करून तो म्हणाला ''महाराज काल रात्री एका कसायाने गुरुचरण नांवाच्या एका दत्त भक्ताची हत्या केली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्त भक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रोपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्त प्रभुंचा निवास असतो असे प्रमाण आहे. हे रोप असामान्य आहे. गोदावरी मंडलातील पीठिकापुरम् एक महान क्षेत्र आहे. तेथे श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात वास्तव्य करीत आहेत. श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचेच हे रोप आहे. हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील'' त्या हरीदासाचे वक्तव्य ऐकून मी भ्रमितच झालो. मी म्हणालो, ''गुरुचरण मीच आहे, माझी हत्या झाली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता तो मला मारून टाकीन असे म्हणाला होता.''
औदुंबरवृक्ष महिमा
एवढयावर हरिदास जोराने हसला आणि म्हणाला ''तू म्हणतोस ते खरे का ? नाही म्हण. या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गाचे आदिगुरु म्हणजे दत्तच आहेत. ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्या समोर आपण अगदीच क्षुद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात. तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दु:ख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्मप्रदान करतात. दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ति देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राण शक्तिद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुध्दिचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तिमुळे ते जिवंत आहेत. खरे तर ती प्राणशक्ति औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीरव्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राण शक्ति भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ति परिपूर्ण असते. कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय प्रतिष्ठित असतात.'' हरिदासाने सांगितलेला वृतांत आश्चर्यचकित करणारा होता. कृष्णदास नांवाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो. काही दिवस असेच गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक, रेशमी कापडाचा व्यापार करीत असत ते वृद्ध झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. माझ्यावर त्यांचे प्रेम होते. ते आमच्या घरात वास्तव्याला होते. त्यांनी थोडे धन देऊन रेशमी कपडयाचा व्यापार करण्यास सांगितले. ते सुध्दा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास भक्तीभावाने प्रदक्षिणा घालून श्रीदत्तप्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणतीही आपत्ति अथवा संकट आले असता आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालून आमचे दु:ख निवारण करण्यास सांगत असू. आमच्या याचना दत्त प्रभूंना कळत असत. आमची संकटे दत्तकृपेने दूर होत होती. श्रीदत्तप्रभूंना नवस केला असता तो औदुंबराच्या वृक्षाकडून पूर्ण होत असे. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणे दत्त भक्तांचा महत्वाचा विधि होता. घरात औदुंबराचे झाड असणे म्हणजे साक्षात दत्तात्रेयच घरात असल्या सारखे होते. औदुंबराचा महिमा वर्णावा तितका कमीच.''
पाप कर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म
मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्याने पीठिकापुरम् क्षेत्री येऊन पोहोचलो. श्री बापनाचार्युलूचे घर शोधून काढले त्यावेळी श्रीपाद प्रभू बापनाचार्युलू बरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक काटयाचे झाड होते. त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रध्दाभावाने प्रतिदिन पाणी घालीत असत. बापनाचार्युलू श्रीपादांना म्हणाले ''हे काटयाचे झाड तुला एवढे प्रिय का आहे ? संजीवनी वृक्षाचे रोप असते तर त्यावर प्रीती करणे योग्य झाले असते. तू त्या झाडास श्रध्देने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते वाढणारच आहे'' त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, ''आजोबा, हे काटयाचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घराण्यातील ''विश्वावधानी'' होते. स्वयंभू दत्तात्रेय, बापनाचार्युलुच्या नातवाच्या रूपाने अवतरीत झाले आहेत. केवढे हे आश्चर्य. परंतु विश्वावधानी, आजोबा परिहासाने म्हणत केवढा हा देवद्रोह. तेच या जन्मी काटयाच्या झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थित आहेत. मी, आई, मोठे भाऊ, श्री विद्याधरी, राधा, सुरेखा, वेंकट सुब्बय्या श्रेष्टींच्या घरी आणि नरसिंह वर्माच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करीत असू. हे आमचे वर्तन विश्वावधानी आजोबाना मुळीच आवडत नसे. ते क्रोधाने म्हणत मल्लादी आणि मंदकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना, ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा. आज तेच आजोबा काटयाच्या वृक्षरूपात दिसत आहेत.'' श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रेय आहेत याचे प्रमाण काय ? असे तर्क कुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत असे सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ''माझी आई सर्व सौंदर्य स्वरूपिणी-सुमती महाराणीस श्रेष्ठी आत्याघरची लेक मानीत. एकदा त्यांनी तिला सन्मानाने जेवणास बोलावून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरली. यामुळे त्यांना आपला जन्म धन्य झाल्या सारखे वाटले. नरसिंह वर्मा आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत. त्याने आपल्या आजोबाची मृत्युनंतर उत्तर-क्रिया व्यवस्थित पणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता. त्या काटेरी झाडास पाहून व पूर्ववृतांत जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली. त्यांनी त्या झाडावर थोडे पाणी शिंपडून ते अंगणातून बाहेर आले. श्रीपादांचे मुग्धमनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते आले आणि नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणकमलावर आपले मस्तक अत्यंत नम्र भावाने टेकविले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने मला कुरवाळले आणि म्हणाले ''हे गुरुचरणा, उठ हा काय वेडेपणा. तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस.'' मी कापडांचा व्यापारी असल्याचे ओळखून बापनाचार्युलू म्हणाले ''आमच्या सोनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय ?'' मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले. श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले ''आता तुला एक गम्मत दाखवितो ती तू बघ'' त्यांच्या बरोबर बापनाचार्युलू सुध्दा होते श्रीपाद प्रभू सर्वाना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले ''हे विश्वन्ना आजोबा ! तुमच्या मुलानी श्रध्दारहित श्राध्दकर्म केल्याने आणि बापनाचार्युलू सारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म आला. हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे. याच्या हातून श्रध्दापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करवून घेईन. यासाठी तुमची संम्मति आहे ना ?'' हे प्रभूंचे वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानीचा प्रेतात्मा म्हणाला या पेक्षा मोठे भाग्य ते कोणते ? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नि देण्यास सांगितले. गुरुचरणाने श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले व नंतर स्नान केले. स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले. यावेळी श्रीपाद म्हणाले. ''भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महायोगी महान तपस्वी, महान भक्त महान सिध्द पुरुष, यांच्या मृत्यु नंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र विभूती असते. शिव प्रभूच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्य स्थितित विश्राम करतात. वानर, सर्प, गाय या पशुंची न कळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तर क्रिया करावी. त्यांचे श्रध्दापूर्वक दहन करून अन्नदान करावे. मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधि करण्याची आवश्यकता येथे नाही. आपल्या पूर्वऋणानुबंधाने कोणत्या जीवाची न कळत हत्या झाल्यास त्याचे श्रध्दापूर्वक दहन करावे. असे केल्याने पापकर्मांचा नाश होतो. आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते.
पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षि होते. त्यांची पत्नी अहल्या एक महान पतिव्रता स्त्री होती. ते विश्वशांतीसाठी कोटी कमलाने यज्ञ केला होता. गौतम महर्षि आपल्या तपोबलाने घरासमोर अन्न धान्याचे पीक उगवीत असत. मानवाला आहारा शिवाय जीवन जगणे शक्य नाही. महर्षि गोधनाची सुध्दा वृद्धी करीत. तसेच गोअमृतासारख्या पदार्थांची निर्मिती करीत. श्रीपाद प्रभु पूढे म्हणाले, ''यज्ञ याग न केल्यास विश्वनियंता, देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होऊन धर्माला ग्लानी येते. माया निवारणासाठी, गोहत्येचे पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या सहाय्याने अवतरित झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जन समुदाय त्यांचा अत्यंत ऋणी आहे.
विश्वावधानी हा गौतम गोत्रातीलच होता परंतु त्याचा संबंध या गोत्रात जन्म घेण्या पुरताच होता. त्रेता-युगात पीठिकापुरम या क्षेत्रात ''सावित्रि काटक'' नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षिचा मोठा भाग होता. विश्वावधानीच्या भाग्यानेच त्याला पीठिकापुरम् येथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन त्यास घडले. तो अयोग्य असला तरी माझ्या निर्व्याज प्रेम, करुणेने त्यास सद्गति मिळाली. ही सद्गति श्रीदत्तात्रेय प्रभुंच्या कृपाप्रसादानेच प्राप्त झाली. ऋणानुबंध नसेल तर कुत्रासुध्दा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी. परंतु निष्ठुर होऊ नये. जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणास मी सुध्दा तुमच्या बरोबर तसेच वर्तन करीन. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूल कारण मी आहे. मी सर्व सत्याचे ''सर्वमय परम सत्य'' आहे. वेदात सुध्दा असे सांगितले आहे की ज्ञानाचे अंतिम सत्य ब्रह्म आहे.'' श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून बापाचार्युलुच्या डोळयातून आनंदाश्रु वाहू लागले. मोठ्या प्रेमभावाने श्रीपादांनी ते आपल्या बाल हातांनी टिपले. आणि म्हणाले ''आजोबा तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्या सारखेच रूप धारण करणार आहे. हे त्रिवार सत्य आहे.'' बोलताना श्रीपादांनी आजोबांचा हात हातात घेतला होता. यावेळी बापनाचार्युलु म्हणाले ''श्रीपादा माझ्या मनांत कित्येक दिवसा पासून एक शंका आहे. विचारू का ?'' त्याच क्षणी श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले ''माझ्याकडे काय शंका आहे ? मी दहा वर्षाचा बालक तुमच्या शंकेचे समाधान कसे करू शकेन ? प्रयत्न करून पाहीन'' यावर बापनाचार्युलुनी प्रश्न विचारण्यास आरंभ केला. ते म्हणाले ''सृष्टी , स्थिती आणि लय याचे कर्ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश आहेत ना ?'' श्रीपाद म्हणाले 'हो' यात शंकाच नाही. ''त्यांच्या स्त्री शक्तिस्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना ?'' यावर श्रीपादांनी होकारार्थी मान हालविली. ''या त्रिमूर्तीना आणि त्यांच्या तीन शक्तींना निर्माण करणारी आदि पराशक्ति आहे ना ?'' श्रीपाद म्हणाले 'हो'. यावर बापनाचार्युलु म्हणाले, ''तर त्यांच्या समोर तू कोण आहेस ? तू नेहमी माझ्या बांधवाना सांगतोस ती वासवी कन्या कोण ? तुम्ही दोघे भाऊ बहिण आहात याला कांही शास्त्राधार आहे काय ?''
श्रीपाद सर्व देवस्वरूप - सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभूच
एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले ''आजोबा आताच तुमच्या दृष्टीसमोर काटयाच्या झाडास सद्गति दिली. मी केलेल्या कामास कांही शास्त्र प्रमाण आहे काय ? यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही. मी योगी असून सर्व योगक्रियांत असतो. यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो. सृष्टी ही माझी मायाच आहे. तिलाच आपण सृष्टी मानतो. संपूर्ण सृष्टीत एकच भगवत् चैतन्य भरून राहिले आहे. ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशिभूत होऊन राहिले आहे. या परिणामक्रमाला कालाचा आधार आहे. कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने परिणाम चक्र अनुभवास येते. या कालाची गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतीमानाने कळते.''अत्रि महर्षिंना त्रिकालाचे आणि तीन अवस्थांचे ज्ञान होते. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनसूया माता प्रसिध्दि पावली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ''मला, सृष्टी , स्थिति आणि लय, तसेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा तीन देहाबद्दल आणि भूत, भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल, एकाच कालात अनुभव येतो. यामुळे माझे नित्य वर्तमानच असते. घडून गेलेले, घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. अशा स्थितीत त्रिमूर्ती, त्रिशक्ति माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्टी नाही. त्रिमूर्ती, त्रिशक्ति सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर आदि-पराशक्तीच्या रूपाने होत्या. ही गोष्ट खरीच आहे. मी आणि आदिपराशक्ति दोघे अभिन्न स्वरूप आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदिपराशक्ति रूपाने विलसत असतो. तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. त्यातूनच त्रिमूर्ती, त्रिशक्तींचा अविर्भाव झाला. त्या आदिपराशक्तिस शक्ति निर्माण करण्याचा संकल्प असो किंवा सृष्टी रचनेचा संकल्प असो तो कसा संभव आहे याची प्रबोधन शक्ति मीच आहे. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिध्दिसाठीच आदि पराशक्तीचा अविर्भाव झाला. तसेच त्रिशक्तीचा अविर्भाव झाला तो महा संकल्प रूपच परम गुरुस्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळताच तो तत्काळ सिध्द होतो. संकल्प होणे आणि सिध्दी पावणे हे दोन्ही एकाच वेळी घडत असते. सर्वशक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ति मीच आहे सृष्टीतील माता-शिशु संबंध, पिता-पुत्र संबंध, पती-पत्नी संबंध, भाऊ-बहिण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधाना आदर्श स्वरूप म्हणून देवि-देवता पृथ्वीवर अवतरीत होतात. जीव म्हणजे मायेची शक्ति . मी मायेच्या अतित असलेली महाशक्ति आहे. मायाशक्ति असो अथवा महाशक्ति असो ती योगशक्ति मुळेच फलद्रूप होत असते. जी महाशक्ति स्त्री स्वरूपात वासवीकन्यका म्हणून ओळखली जाते तीच महाशक्ति पुरुष स्वरूपात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरली आहे. या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुध्दा महासंकल्पाला अनुसरूनच आहे. आदिपराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ति आणि त्रिशक्ति अंतर्लिन होतात. या दैवि संबंधांना आणि त्यांच्या तत्त्वांना त्या त्या स्थितितील अनुभूती केवळ साधनासंपन्न जीवाना अवगत होते.''
श्रीपाद प्रभुंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापाचे निवारण
''मृगाजवळ जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणे निरर्थक असते. संस्कृत शिकून त्या नीच योनीतून मुक्तता मिळवावयाची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थतता असणाऱ्या व्यक्ति कडून व्याकरण शिकले पाहिजे. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार आणि मलीनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्नान संध्या जपादिकामुळे जीवांची मलीनता मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पहाता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपआपल्या कुलदैवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. ती पूजा केल्याने मिळणारे महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो. तुम्ही कर्म न केल्यास तुम्हास फळ मिळणे शक्य नाही. म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचे आचरण करतो. मी अनंत चैतन्य असल्याने उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तत्काळ मिळवून देतो. माझे आदि गुरुस्वरूप आहे. माता-पिता, धन-दौलत, याचे हक्कदार मुले असतात. त्याच प्रमाणे गुरुंच्या तपोशक्तीचे , त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णांनी गीतेत सुध्दा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे.''
शमाझ्या तपाराधनेला समाप्ति नाही
''श्रीदत्तात्रेयांप्रमाणेच मी सुध्दा सुलभ प्राप्त दैवत आहे. इतर देव देवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरुस्वरूप असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात. ते अनुग्रह करणारे परम कारुण्यमूर्ती स्वरूप आहेत. आजोबा, मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात. सर्वांचे मूळ असलेले गुरुरूप मीच आहे. हे महान करूणेने अवतरित झालेले परम गुरुतत्व स्वरूप असल्याने या अवताराला समाप्ति नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तत्काळ साद देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पहात असतो. साधकांनी माझ्याकडे एक पाऊल टाकले तर मी त्यांच्या कडे शंभर पावले चालून जातो. आपल्या डोळयाच्या पापण्या ज्या प्रमाणे डोळयांची काळजी घेतात याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून, अडचणीतून सोडवितो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे.'' श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर मी त्याना प्रश्न केला, ''हे महागुरो ! मी सोमलता आणि सोमयागाबद्दल अनेकांकडून ऐकले आहे. कृपा करून त्या बद्दल विवरण करून सांगावे'' यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात. तुला ती पहायची आहे काय ?'' मी होकारार्थी मान हालविली तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली. त्यानी ती मला मोठ्या सन्मानाने दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ''ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वत श्रेणीत, काश्मीर मधील मानस सरोवराजवळ, सिंधु नदीच्या उगम स्थाना जवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सहयाद्रि, महेंद्र देवगिरी, विंन्ध्यपर्वत श्रेणी, बदरी अरण्य प्रांतात मिळते. या मुळीच्या प्रभावानेच लक्ष्मणाची मुर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या सेवनाने अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपाने आकाशगमन सिध्दि प्राप्त झाल्यासारखे वाटते. सेवनाने हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवणशक्ति सुधारते, या मुळीच्या प्रभावाने अग्नीभय, जलभय आणि विषभय दूर होते. या मुलिके मुळे अष्ट सिध्दि प्राप्त होतात. ह्या संजिवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरवाती पासून रोज एक एक पान येऊन पोर्णिमे पर्यंत पंधरा पाने येतात. कृष्ण पक्षाची सुरवात होताच प्रत्येक दिवशी एक एक पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते. या वाळलेल्या झाडाची एक फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्रि पर्वत श्रेणी, भीमाशंकर पर्वता जवळ 'व्रूच्र मृग ' ह्या संजीवनी मुळीचे रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुध्दा, दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते.''
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''हे गुरुचरणा, या प्रमाणे चोविस प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत. या सर्व अत्यंत पवित्र आहेत. यांचा आश्रय देवता शक्ति घेतात. पवित्र अशा वेद मंत्रांचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या चोविस औषधी मुलिका अशा आहेत.
1) सोम 2) महासोम 3) चंद्र 4) अंशुमान 5) मंजुवान 6) रजीत प्रभु 7) दुर्वा 8) कनियान 9) श्वेतान 10) कनकप्रभा 11) प्रतानवान 12) लालेवृत 13) करदीर 14) अंशवान 15) स्वयंप्रभा 16) रुद्राक्ष 17) गायत्रि 18) एष्टम 19) पावत 20) जगत 21) शाकर 22) अनिष्टम् 23) रैत्तच् 24) त्रिपाद गायत्रि.'' मी श्रीपादांचा निरोप घेऊन पीठिकापूरम हून निघालो.
मी शंकरभट्टाला हा वृतांत विवरण करून सांगितला. महागुरुंचा मानस संचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली. मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्तानी फळाचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले ''कृष्णा नदी ओलांडून मांचाल ग्रामास जा. या गावाची ग्राम देवता तुम्हास आशिर्वाद देईल. तिचा आशिर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या. तुम्ही माझ्या जवळ असा किंवा दूर असा माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते हे ध्यानात असू द्या.'' भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल. एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिध्द होईल. या महापुरुषाच्या लीला अद्भूत असतील. पीठिकापूरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे. तेच सुवर्ण पीठिकापुरम ते माझ्या शरिरास वेढून तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील व्यक्ति असो माझ्या नेत्र कटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्ण पीठिकापुरात सुप्रतिष्टित होते. हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. सुवर्ण पीठिकापुरातून जीवनचैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहेत. त्यांना मी जन्मजन्मांतरी सांभाळित राहीन. पितासमान शंकरभट्टा, अनेक शत संवत्सरा नंतर माझ्या अंगणात महा संस्थान उभारण्यात येणार आहे. ते माझ्या आजोबांच्या घरी जेथे माझा जन्म झाला त्या ठिकाणी औदुंबर वृक्षाच्या छायेत असेल. माझा पुढचा अवतार श्री नृसिंह सरस्वती या नावाने होणार आहे या अवताराची मूर्ती सुध्दा या महासंस्थानात स्थापित होईल.'' श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले ''हे पहा मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे.'' असे म्हणून त्यांनी गुरुचरणांच्या आणि माझ्या भ्रूमध्यावर दृष्टी रोखून ठेवली . ते सुंदर दृष्य पाहून आम्ही धन्य धन्य झालो. त्यांचा संकल्प अमोघ आहे त्यांच्या लीला अद्भूत आहेत. आम्ही पुढे जाण्यास निघालो तेंव्हा श्रीपाद प्रभु म्हणाले ''वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त माझ्या संस्थानात पूजारी म्हणून येईल.'
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"