॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -२१
श्री दंडीस्वामींचे कुक्कुटेश्वर येथे आगमन साधकांची स्थान शुध्दि, भाव शुध्दी आवश्यक
मी महागुरुंच्या आज्ञे प्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्राम दर्शनासाठी निघालो. जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या. अध्यात्मा बद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणां कडून समजावून घेत होतो. श्री गुरुचरणांना मी म्हणालो, ''विश्वधानींचा अंश असलेली व्यक्ति माझ्या संस्थानात पूजारी म्हणून आली आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले. ही व्यक्ति महत्भाग्यवान आहे. ती आहे तरी कोण ? ती कोणत्या वेळी येईल ?'' यावर श्रीगुरुचरण मला म्हणाले,''अहो शंकरभट्टा ! अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभु म्हणाले होते. त्या महा संस्थानात कोणी एक महा तपस्वी येणार असल्याचा प्रभुंचा संकल्प होता. त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की येथे येईल. दीर्घकालाच्या ध्यानाने, आराधनेने, पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रध्देने केलेल्या पूजा विधानाने येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुध्द झाले आहे. विश्व अंतराळातील दशदिशेतील भावतरंग तेथे नेहमीसाठी प्रस्फुटित झाले आहेत. पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनाचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनाचा अनुभव येतो. एखाद्या ठिकाणी वायुमंडळातील भाव तरंग प्रबळ शक्ति संपन्न होऊन कांही प्रयत्न न करिता सुध्दा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पध्दतीद्वारा त्या विशिष्ठ स्थानास आकर्षित होतात. यात आश्चर्य वाटण्या सारखे कांही नाही. त्यामुळे साधक स्थळ शुध्दि होऊन तेथे राहू शकतात. भावशुध्दी झालेल्या साधकास हे शक्य आहे. अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे. द्रव्य शुध्दि आणि अन्न शुध्दि असलेल्या साधका कडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे. वेदवेदांतील महापंडित म्हणविल्या जाणाऱ्या व्युप्तन्न ब्राह्मणांना सुध्दा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तास सहजपणे होतो. मी पौंड देशात (ओरिसा राज्यात) जगन्नाथ पुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो. तेथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तिमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. माझ्या बरोबर आलेल्या तीन-चार भक्तांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या इष्ट देवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तत्काळ स्वत:च्या रूपात दर्शन दिले. सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौन बोध त्यांनी केला.''
दंडी स्वामीचा गर्वभंग
''आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडीस्वामी आपल्या एकशे आठ शिष्या सह आले होते. कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती. आम्ही दंडी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला. आणि काय आश्चर्य तत्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्यांना काही बोलता येईना. आम्ही सर्वानी श्री दंडी स्वामीना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंचे चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामीचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून कुतर्काने म्हणाले ''श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांचे शिष्य सुध्दा क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या क्षुद्र विद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्याची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले. आमचे गुरु श्री दंडीस्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. ते पीठिकापूरमला जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्रचर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पत्र घेऊन येतील यात शंकाच नाही.'' पीठिकापुरम् मधील प्रजाजनांनी श्री दंडी स्वामीच्या स्वागतासाठी एका महान रथाचे आयोजन केले होते. आम्ही ते एकून निरुत्तर झालो.
जेंव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्यभावाने शरण जातो तेंव्हा ते आपल्या लीला विधानांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात. आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुध्दा श्रीपादच. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तभक्तांना अनुभव करून देत. कांही दिवसांनी दंडीस्वामींनी पीठिकापुरम् क्षेत्री प्रवेश केला. माझ्या भाग्यामुळे मी (शंकर भट्ट) सुध्दा पीठिकापुरमला आलो होतो. श्री बापनार्युलु, श्री अप्पळराजू आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुध्द असणाऱ्या लोकांची पीठिकापुरम् गावात कमी नव्हती. श्री दंडी स्वामींनी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयांचे सुध्दा दर्शन घेऊन ते म्हणाले ''येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे, असे सांगून पुढे म्हणाले की, त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे.'' त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुंकुम, विभूती या सारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरवात केली. पीठिकापुरम् मधील ब्राह्मणांनी वेदमंत्राच्या गजरात दंडी स्वामींचे स्वागत करून त्यांना कुक्कुटेश्वराच्या मंदिरात नेले. गावात दंडी स्वामी आल्याची दवंडी पिटविली. स्वत: दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्री बापनाचार्युलूंनी दंडी स्वामीचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली. श्री अप्पळराजू शर्मा यांनी श्री दंडी स्वामीचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एक काळया पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली. वेंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवैश्य समितीचे संम्मेलन झाले. या संम्मेलनात एक ठराव सर्वमते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या अकृत्यांना, श्रीपाद प्रभू, अप्पळराजू शर्मा आणि बापनाचार्युलु सहकार्य देणार नाहीत. नरसिंहवर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला.
श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. दिव्यकांतीच्या कळा पसराविणाऱ्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून श्रेष्ठींना गहिंवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून कांही अश्रुबिंदु ओघळले. बापनार्युलु, श्री अप्पळराजू शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या मुखारविंदाचे अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले. श्रीकृष्णा सारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती. त्यांची आजी राजमंबाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांडयात दहीभात आणला. श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला. तो भात खाल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले. बापनार्युलुनी वेदघोष करण्यास सुरवात केली. त्यांच्या बरोबर श्री अप्पळराजू शर्मा व स्वत: श्रीपाद प्रभु सुध्दा वेद घोष करीत होते. नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुध्दा अत्यंत आनंदाने सुश्राव्य स्वरात वेद पठनास प्रारंभ केला. तेथील वातावरण या वेद घोषामुळे ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झाले होते. याच वेळी कुक्कुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले. स्वयंभू दत्तात्रेयाच्या तोंडाजवळ दहीभाताची शिते दिसू लागली. पुजाऱ्याने ती दोनतीन वेळा पुसली तरी पुन्हा तेथे ती येत होती. अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भूत लीला होती. दंडीस्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पीठिकापुरमहून बाहेर जाण्यास निघाले. ते सर्वजण एकामागून एक पाऊले टाकीत चालले होते. त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती. ते किती तरी वेळ चालत होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते. या प्रमाणे या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला. सर्वाना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. तेवढयात दंडी स्वामींच्या हातातील दंड तूटून त्याचे दोन तुकडे झाले. दंडीस्वामीना मात्र आपल्या शरीराचेच दोन तुकडे झाल्यासारखे वाटले. पीठिकापुरम् मधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली. श्रीदंडीस्वामीना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की, श्रीपाद श्रीवल्लभ आपणापेक्षा कैकपट अधिक शक्ति संपन्न आहेत. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल, अशी त्यांची खात्री पटली. अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली.
मोहनाश म्हणजेच मोक्ष
पीठिकापुरममध्ये अब्बन्ना नांवाचा एक गृहस्थ राहात होता. तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजिविका चालवित असे. तो एकदा बापनाचार्युलुंच्या घरी आला. श्रीपादांनी त्या वेळी वेदघोष थोडा वेळ थांबबिण्यास सांगितले. अब्बनाला पोटभर जेवण दिले. नंतर त्यास बोलावून म्हणाले ''येथून एक भांडे पाणी घेऊन श्रीकुक्कुटेश्वराच्या मंदिरात जा. दत्तप्रभूंचा एक अवतार त्यांच्या करणचरणद्वयांबरोबर संचार करीत असताना अकारण ज्यांनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुक्कुटेश्वर मंदिरात आहेत. त्यांना मृत्यूनंतर पिशाच्च योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकित करून ठेवले आहे. मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापांचा परिहार कसा करावा याचा उपाय शोघून काढला आहे. भूमातेने सुध्दा तसा आग्रह केला आहे. तू तेथे जाऊन भूमातेस शांत राहण्याचा माझा निरोप सांग. श्रीपादांच्या दर्शनास उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संम्मती घ्यावी लागेल. त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर. माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सुब्बय्याच्या घरी जाऊन दहीभाताचा महाप्रसाद सर्वांना दे. अब्बय्या सुब्बय्या वगेरे तिकडेच गेले आहेत ते सर्वांना बापनाचार्युलुच्या घरी घेऊन येतील.'' श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले ''आहो दंडीस्वामी ! एक महान तपस्वी असून किती गर्व केलात ? तुम्ही ज्यांची दत्तस्वरूपात आराधना करता तेच श्रीपाद श्रीवल्लभ रूप घेऊन भक्तांसाठी अवतरीत झाले. त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. तुमचे शिष्यगण सुध्दा तुमच्या प्रमाणेच मूर्ख आहेत. पिठापुरमचे तुमचे नविन शिष्य अज्ञानी आहेत. तुम्ही आम्हाला काय करू शकता ? समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेसमक्ष तुमचे अस्तित्वच ते काय ? तुमचे सामर्थ्य ते किती ? दैवदुषणासारखे महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शत वर्षे पिशाच्च योनीत राहावे लागणार असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे. अव्याज करूणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे. मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपले आयुष्य घालविणार आहात. असा आदेश दिला आहे. तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोडया शिक्षेतून करीत आहे. श्रीपाद श्रीवल्लभस्वरूप महा अग्निसमान आहे. अग्निशी खेळल्यास महा प्रमाद संभवेल. माझ्या मायेस किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणले असताना मोक्ष म्हणजे काय ? असा विचार तुम्ही करता. खरे तर मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष आहे. कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो. ''दिव्यानंद परवश्य'' अशा माझ्या पूर्वस्वरूपी अतित सुखस्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास मी तत्काळ ती स्थिति प्राप्त करून देतो. माझ्या दृष्टीने निर्गुण, निराकार, सगुण साकार, मोक्ष आणि बंधन असा भेदच नाही. प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी , स्थिति आणि लय यात मी व्यस्त असतो. जीवांच्या उन्नत स्थिति किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी कांही परिमिती किंवा सीमा नाही. मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे. त्यांनी किती शत वर्षे त्या स्थितित रहावे, कोणत्या लोकांत त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व मी माझ्या संकल्पा प्रमाणे ठरविण . संपूर्ण विश्वाचा नाटक सुत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे. तुम्ही मला सध्या साकार रूपात पहात आहात. हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुध्दा मी सर्वदा तुमच्याकडे पहात राहीन. हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे. त्या महा उन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे. महा योग्याच्या योग शक्ति लोककल्याणार्थ, लोकरक्षणार्थ उपयोगात आणायच्या असतात. लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही. आपल्या पेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या नि:सहाय स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे, मदत करणे हा मानवी धर्म आहे. मी धर्ममार्ग कर्ममार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो. मी सर्व धर्माचे मूळ असलेले एकैक सत्य, सर्व धर्माचे मूळ असलेला एकैक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असलेले एकैक कारण आहे. माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहींच घडत नाही. मी नसलेले या सृष्टीत काहींच नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस, ही सृष्टी आहे. या पेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू ? तू हिमालय पर्वतावर जाऊन नि:संग होऊन तपाचरण कर. तुला शिष्य संघटनेची गरज नाही. तू मोक्ष मिळविलास किंवा उध्दरून गेलास तरी या सृष्टीचे किंवा माझे असे काहींच नुकसान होणार नाही. सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थित पणे यथाविधि पार पडतील. हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे. तुझ्या सोबत तू पिठापूरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल. उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असे होईल. परस्परानी एकमेकांच्या प्रशंसेचे पूल बांधले तरी यथार्थ स्थिति काही बदलत नाही आणि ती निराळीच असते.''
अरुंधती वशिष्ठ संबंध
त्यावर मी म्हणालो ''अहो गुरुचरण, अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे. तिचा विवाह वशिष्ठ ऋषी बरोबर कसा झाला ?'' यावर गुरुचरण म्हणाले पूर्वी वशिष्ठांनी हजार वर्षे तपाचरण केले होते. त्या वेळी अक्षमाला नांवाच्या एक चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तम रितीने सेवा केली. तिच्या सेवेने प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर त्या कन्येने म्हटले ''वशिष्ठ मुनी माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे.'' तेंव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले ''अक्षमाले ! तू एक चांडाळ कन्या आहेस. मी एक सच्छील ब्राह्मण आहे. मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन ?'' या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली ''अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केले आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता ?'' वादोषाच्या भीतीने वशिष्ठ मुनी म्हणाले, ''तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संम्मती आहे काय ?'' त्यावर अक्षमालेने होकार दिला. वशिष्ठ मुनींनी तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले. असे त्यांनीं सात वेळा केले सातव्या जन्मी तिचे चांडाळ वशांतील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली त्यावेळी वशिष्ठ मुनींनी तिच्या बरोबर विवाह केला. वशिष्ठ मुनीनी केलेल्या शुध्दिकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याने तिचे नांव अरुंधति असे पडले. आणि त्याच नांवाने ती प्रसिध्दी पावली. ही हकिकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना श्री प्रभूंनी सांगितली होती. शूद्र जातीत जन्म झाला असला तरी ब्राह्मणाची कर्मे करणारा सातव्या जन्मी उपनयन झाल्या नंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुलात स्वीकारला जातो. त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असे. ही समाजाच्या दृष्टीने हितकर योजना होती. परंतु कांही कालानंतर ही विभागणी कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली. पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेला ब्राह्मणांची नियत कर्मे न करिता वाणिज्य करीत असेल तर तो वैश्याच्या वर्णास योग्य होई. तसेच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तिचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकत असे. श्री दत्त प्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यते प्रमाणे शिष्यत्व देत. त्यांचे भक्त कोणत्याही कुलात जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितित असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु, आरोग्य, ऐश्वर्य, श्री दत्तगुरु आपल्या भक्तांना देत. जन्म-जन्मांतरीची कर्मबंधने तोडून उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लीला होती.
दत्त भक्तांना स्वामींचे अभय वरदान
आम्ही श्रीपाद प्रभूंचा महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मंचाला या ग्रामी येऊन पोहोचलो. मंचाल ग्रामदेवतेने आम्हास दर्शन देऊन धन्य केले. तिने आपल्या दिव्य हस्तांनी आम्हास प्रसाद दिला. ती ग्रामदेवता म्हणाली ''पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोघ केलेले श्री दत्तात्रेयच भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो. येणाऱ्या शताब्दींमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम गुरु अवतरतील. हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिध्दि पावेल. असे श्रीपाद प्रभूंनी स्वत: मला सांगितले होते. तुमचे सारे शुभ मंगल होवो.'' असे बोलता बोलताच ती आपल्या पूर्व रूपात आली. आम्ही तेथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नांवाचा एक व्यापारी तेथे आला. मंचाल ग्रामदेवतेने त्याला सुध्दा प्रसाद दिला आणि फुलाची एक माळ दिली.
आम्ही तिघे (गुरुचरण, कृष्णदास आणि शंकरभट्ट) कुरुगड्डीस जाण्यास निघालो. सर्व दत्त भक्तांचे कूळ एकच असते. त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्ताने दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात. आमच्या बरोबर प्रवासात कृष्णदास आल्यामुळे नवा उत्साह आला होता. बोलता, बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले यज्ञादि कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा सोळा, एकशेसोळा, आणि एक हजार सोळा अशी असावी. ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या 2498 या संख्ये प्रमाणेच आहे.परमात्म्या पासून ज्या प्रमाणे जगताची निर्मिती होते त्याच प्रमाणे पित्यापासून पुत्रांची निर्मिती होते. नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या अग्नी देवतेस प्रार्थना करीत असे की ''हे अग्नीदेव, मला या वधु पासून दहा पुत्रांची प्राप्ति व्हावी.'' दहा कन्या-पुत्रांची प्राप्ति झाल्यानंतर त्याने पत्नीस मातेच्या स्वरूपात पहावे असे शास्त्र वचन आहे.
कृष्णदास पुढे म्हणाले ''पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे. म्हणून तो रुद्ररूप समजला जातो. या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारे ते शून्यच असते. त्या महा शून्यातच सर्वांचा लय होतो. विष्णुस्वरूप म्हणजे अनंत धर्मतत्त्व. सृष्टीच्या स्थिति स्वभावासाठी अनंत तत्त्व आवश्यक आहे.''
श्रीपाद प्रभूंचे सोळा कलापूर्णत्व
गुरुचरण म्हणाले ''अरे शंकरभट्टा, कोणत्याही वस्तुचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शुन्यासारखाच असतो. असे असंख्य शुन्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो. या कारणाने शिव आणि केशव अभिन्न आहेत. पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णुस्वरूपच आहे. दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रास श्री विष्णु म्हणाले'' मूल प्रकृती आणि ईश्वर यांच्या निमित्ताने पार्वती माता, राक्षसांशी युध्द करणारी दुर्गामाता आणि कोपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूपे आहेत. श्रीपाद प्रभूंना षोडश कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे. सोळा वर्षाचे वय असतानाच श्रीपाद प्रभू पीठिकापुर सोडून गेले. ते स्वयं ब्रह्मा, विष्णु आणि रुद्र स्वरूप असल्यामुळे त्यांना सोळा कला परिपूर्ण असे मानले जाते.
सावित्रीकाठक यज्ञाचे फलित म्हणजेच श्रीपाद प्रभूंचा अवतार
सकल जनांच्या बुध्दिमत्तेस प्रेरित करणारी आणि सर्वातील मंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजेच गायत्री माता. तिची चोविस प्रतिके आहेत. नउ (9) ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतिक आहे. आठ (8) हे महास्वरूपाचे द्योतक आहे. त्रेतायुगातील भारद्वाज मुनीनी पीठिकापुरम् या क्षेत्री सावित्रि काठक यज्ञाची योजना केली होती. त्या वेळी मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पीठिकापुरम मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. ते शक्ति स्वरूप असून अर्धनारी नटेश्वर आहेत. ते त्यांच्या स्वरूपाने साधकांची बुध्दि आणि प्रवृत्ति वाढवून, धर्ममार्गाने जीवन व्यतित करण्यास प्रेरित करतात. हे त्यांच्या या महाअवताराचे वैशिष्टय आहे. त्यांच्या बोधपर वाक्यांचे आणि लीलेचे व्याकरण अनाकलनीय आहे. या नवीन व्याकरणाचे ते स्वत:च कर्ता असल्याने ते केवळ त्यांनाच समजते. मला (शंकरभट्टास) कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली. यात अनेक नविन गोष्टींचे ज्ञान झाले. पांडित्य पूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूंच्या कृपाकटाक्षाचा लाभ होत नसे.
कृष्णदास म्हणाले ''श्रीपाद प्रभू हे पिपीलिका पासून ते ब्रह्मा पर्यंत सर्वत्र व्याप्त आहेत. एकदा नरसिंह वर्माच्या शेतात श्रीपाद श्रीवल्लभ आणि वर्मा विश्रांती घेत होते. तेवढयात तेथे दोन नाग आले. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले. नरसिंह वर्माना गाढ निद्रा लागली होती. त्यांच्या जवळच अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या. तितक्या मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या. चावून वर्माची झोप मोड होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूनी त्या सर्व मुग्यांना मारले. मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीग समोर होता. थोडयाच वेळात नरसिंह वर्माना जाग आली. त्या मेलेल्या मुंग्याना पाहून त्यांना दया आली. त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित हास्य करून म्हणाले, ''राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते. हा प्रकृतीचा नियम आहे. या अद्भूत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भूत जादुगर आहे.'' तेवढयात एक पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्या पेक्षा मोठी व कांतीमान मुंगी तेथे आली. ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती. तिने मेलेल्या मुंग्याभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या. श्रीपाद प्रभू मंदहास्य करून म्हणाले ''या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ति प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले.'' अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी या सृष्टीत आहेत. ते वर्मास पुढे म्हणाले ''तुमची इच्छा असले तर प्रतिक्षणि मी तुला अनेक लीला दाखवू शकेन.'' तितक्यात नरसिंह वर्मांचे लक्ष मरून पडलेल्या दोन नागांकडे गेले. त्यांना पाहून ते चकित झाले. ही सुध्दा श्रीपाद प्रभूंचीच लीला असल्याचे त्यानी जाणले. श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळले आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला. ते दोन्ही नाग जिवंत होऊन, श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले.
ते नाग कशासाठी आले ? श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले ? या बद्दल त्यांना विचारले तेंव्हा ते म्हणाले ''राहु ग्रहाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोड द्यावे लागते. आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो. यालाच कांही लोक कालसर्प योग म्हणतात. राहू हा सर्व देवतांची आदिदेवता आहे. या प्रकारे येणाऱ्या संकटांचे निर्मुलन कसे करावे ते कोणीहि जाणत नाही. परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुख संतोष मिळेल अशी योजना करतो.''आम्ही कुरुगड्डीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो. श्रीपाद प्रभूंचे मंगल दर्शन घेतले. त्यांनी आम्हास हसत मुखाने आशिर्वाद दिले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"