Thursday, March 7, 2019

एकनाथांना झालेले दत्त दर्शन

एकनाथांना झालेले दत्त दर्शन 
भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते. 

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा…. 
समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।। 

नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की, 
`श्रीदत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती-स्थिती-लय या तीनही तत्त्वांचे मीलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत.
दत्तात्रेयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी-मुनींना, देवांनासुद्धा श्रीदत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्येसुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की, त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे. शब्दातीत आहे. 

( ॐ श्री सदगुरु देवाय नमः )

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त…. जन्म-मरणाचा पुरलासे अंत।।

श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना नाथ महाराज म्हणातात, `ब्रह्मा म्हणजे रज, विष्णू म्हणजे सत्त्व आणि शिव म्हणजे तम. अशा तीन मुख्य देवांचा हा त्रिगुणातीत अवतार आहे. जे हवे ते प्रेमाने देणारा श्रीदत्त प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारच्या चिंता मिटवणारा परमेश्वर आहे. म्हणून तर माझे हे प्राणप्रिय दैवत माझ्या आत आणि बाहेर तेज फाकून आहे'. 
नाथ आवर्जून एक गोष्ट सांगतात की, `श्रीदत्तात्रेय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत. 

परा-पश्यती-मध्यमा-वैखरी या चारही वाणी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करायला असमर्थ आहेत. त्या चारही वाणी अक्षरशः माघारी फिरल्या आहेत. परावाणीलासुद्धा दत्तात्रेयांचे वर्णन करणे जमले नाही. अशा या ब्रह्मांडव्यापी दत्तात्रेयांचे अवतार-रहस्य सामान्य वृत्तीच्या अभागी लोकांना कसे काय कळणार? ज्यांना श्रीदत्तात्रेयांचे अवतार-रहस्य कळेल, ते भव्य स्वरूप सततच्या चिंतनाचा विषय होईल, त्या भाग्यवान भक्तांच्या जन्म-मरणाच्या फेर्या निश्चित संपुष्टात येतील.

दत्त येऊनिया उभा ठाकला… जन्ममरणाचा फेरा चुकविला।।

नाथ समाधी लावून बसले होते. मुखात `दिगंबरा दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा'।।
हा सिद्धमंत्र अक्षरशः घुमत होता. ध्यानावस्थेत असताना नाथांच्यासमोर भगवान श्रीदत्तात्रेय आपल्या अतिभव्य मूळ रूपात प्रकट झाले. नाथांना तर परमानंद झाला. सगुण साकार झालेल्या श्रीदत्तात्रेयांना नाथांन साष्टांग नमस्कार घातला. नाथांची ही अपूर्व भक्ती पाहूनच श्रीदत्तात्रेय नाथांवर प्रसन्न झाले होते. भगवान दत्तात्रेयांनी नाथांना अलगद उठवले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. आशीर्वाद दिला. नाथांच्या लक्षात आले की, आपली उपासना पूर्ण झाली. आपला जन्म-मरणाचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात आला. प्रत्यक्ष दत्तगुरूंनी चौर्याऐंशी लक्ष योनींचा दुर्धर प्रवास एका क्षणात संपवला. नाथ भारावून गेले आणि पुन्हा पुन्हा वंदन करू लागले.

`दत्त दत्त' ऐसें लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन।
 `मी-तू'पणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान।।

नाथांच्या मुखात `दत्त दत्त' असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हारपले. 
सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. मी-तूं पणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली. आपले सद्गुरु हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली. नाथ दत्तध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"