Tuesday, March 5, 2019

पाताळात केलेली सफर....

पाताळात केलेली सफर....

सकाळी गोविंद उठवायला आला होता वेळ पहाटेचे पाच वाजले होते...गोविंदने उठवल्यावर मी पटापट आवरायला घेतले.. आवरून मी खाली आलो तेव्हा सकाळचे सहा वाजले होते बाकीचे सगळे लोकं तयार होऊन खाली आलेले होते...सर्व आलेले बघितले आणि गाड्यांचा ताफा एकत्रच निघाला. आज गोविंद आम्हाला पाताळात घेऊन जाणार होता...मला त्याबद्दल खूप उत्सुकता होती....तसं बघायला झालं तर आज आमच्या आधीच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे मुन्शीयारी या ठिकाणी जायचं होतं, पण सतत बिघडणारे हवामान, पाऊस आणि सातत्याने सुरू असणारा हिमवर्षाव यामुळे मुन्शीयारीला जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता....तिथे जाणाऱ्या रस्त्यावर चांगलं फूट दोन फूट बर्फ साचलेलं होतं.....नाईलाजाने सुरक्षेसाठी आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला....मुन्शीयारी उत्तराखंड पिथोरगड पासून दोन-तीन तासांच्या अंतरावरचं एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ.....येथे मी पुन्हा खात्रीने येणार....असो

ज्या रस्त्याने, ज्या घाटामधून आम्ही वर पिथोरगडमध्ये आलो होतो त्याच रस्त्याने आम्ही पुन्हा खाली उतरायला सुरवात केली.... आता सकाळचे ऊन पडले होते....पाऊसही नव्हता....रस्ता खराब होता पण ऊन पडलं असल्याने सुस्पष्ट दिसतं होतं...... येताना जो त्रास झाला त्याच्यापेक्षा त्रास कमी जाणवतं असल्यामुळे उत्साहात होतो....

अगदी काही वेळात कुठलाही त्रास न होता तो घाट उतरून खाली आलो....आता गाडीने जरा वेग घेतला.....रस्त्यात अगदी घरगुती अशा एका ठिकाणी चहा-समोसा असा नाष्टा केला व पुढे निघालो.....रस्त्यात एका देवीचे दर्शन घेतले.... आता गोविंद आम्हाला पाताळात घेऊन जाणार होता....माझी उत्सुकता वाढलेली होती....आम्ही दुसऱ्या एका घाटातला प्रवास करत होतो.....एका ठिकाणी गोविंदने मुख्य रस्त्यावरुन उजव्या बाजूला वळणाऱ्या एका अरुंद रस्त्यावर गाडी घ्यायला सांगितली....येथून पाताळाकडे प्रवास सुरु झाला होता.....मुख्य रस्त्यापासून उजव्या बाजूला वळल्यावर साधारण आठ किमी गाडी सलग नागमोडी वळणावळणाने गाडी खाली खाली जात होती.....शेवटी एका ठिकाणी हा उतरता वळणावळणाचा रस्ता संपला.....तेथे गाड्या लावल्या आणि पुढचा प्रवास पायी सुरू झाला.....साधारण पुन्हा अर्धा पाऊण किमी चालतं पुन्हा काही नागमोडी वळणे घेत आम्ही एका मंदिरापाशी पोहोचलो.....

या ठिकाणाचं नाव आहे पाताळ भुवनेश्वर....

येथून पुढे खरे पाताळ दर्शन सुरू होणार होते....मंदिराच्या ऑफिसमध्ये आपल्या सर्व चिजवस्तू, सामान-सुमान जमा करावे लागते.....फोटो घेण्यास परवानगी नसल्याने अगदी मोबाईल सुध्दा जमा करावे लागतात....सगळी सोपस्कार आटोपून तिकीट वगैरे काढून आम्ही निघालो...मंदिर प्रशासनाचा एक गाईड आमच्या बरोबर माहिती देण्यासाठी होताच....

त्याठिकाणी पाताळात म्हणजे भूगर्भाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक अगदी छोटेसे प्रवेशद्वार आहे...(त्याचा फोटो पोस्ट केलेला आहेच)....त्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकलं की खाली खोल जाण्यासाठी अगदी अरुंद,निमुळता, अतिशय घसरडा असा दगडांच्या मधून खोल खोल खाली जाणारा भुयारी मार्ग आहे.....अगदी एक माणूस कसा बसा जाईल अशा त्या भुयारी मार्गातून खोल जाताना कधी सरपटत, तर कधी उलट पाठीवर घसरत तर कधी पोटावर शरीर घासत, कधी अंगाचे वेडेेवाकडे प्रकार करून स्वतःला त्यातून घुसवत पुढे रेटावे लागते....जराशी चूक केली की आजूबाजूचे गुळगुळीत झालेले आणि काही सुळक्यासारखे दगड आपला शिक्का आपल्या अंगावर उमटवतात...काहींना हे खाली खाली खोल अंधाऱ्या मार्गाने जाणे भितीदायक आणि धडकी भरणारे वाटू शकतं....बाहेर मंदिर प्रशासनाने तसा सावधगिरी  इशारा देणारा बोर्ड लावलेला आहे....आणि झालं ही असंच.... आमच्यातले दोघे घाबरून मागे फिरले...सगळ्यात पुढे मंदिराचा गाईड आणि त्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे मी सर्वात पुढे आणि बाकीचे माझ्या मागे असा सरपटता प्रवास सुरु होता....एका ठिकाणी तर इतकी बारीक कपार होती की आता यातून माझ्या पोटाचा सिंगल पॅक माठ कसा पास होणार याची मला चिंता वाटू लागली....पण दोन्ही हात वर करून पाय ताठ करून सगळे शरीर एका सरळ रेषेत आणून स्वतःला हळूहळू ढकलतं त्यातून पुढे निघालोच....

साधारणपणे शंभर सव्वाशे फूट असं सरपटत गेल्यावर खाली आलो आणि समोरचे दृश्य बघून आश्चर्याने डोळे विस्फारले.....खाली एक प्रचंड अशी मोठी गुहा आहे....अगदी प्रचंड.....खाली उतरून जरा वरती डोक्याकडे बघितले....आपल्या डोक्यावर प्रचंड मोठा हिमालयाचा एक पर्वत असून त्याच्या अगदी पोटात खाली आपण उभे आहोत याचा डोळ्यावर विश्वास बसतं नव्हता....डोक्यात आलं साल या हिमालयाने उगाचंच जरासा आळस दिला तर खाली आपलं काय होईल.....पुन्हा मिसळ आठवली...आपल्या क्षणभंगूरतेची पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणीव झाली....निसर्गाच्या या अफाट उत्तुंग अशा आविष्कारासमोर आपण किती कणभर आहोत याचा पुन्हा प्रत्यय आला....

सगळे हळूहळू खाली आले...सगळे एकत्र जमा झाले आणि तो गाईड माहिती सांगू लागला...

आपल्या पुराणातील असंख्य गोष्टी येते शिला स्वरूपात बघायला मिळतात....असं म्हणतात की तेहतीस कोटी देवतांचा अधिवास येथे आहे....आपली पृथ्वी ही शेषनागच्या फण्यावर उभी आहे...येथे प्रत्यक्ष त्या गुहेत शेषनागचे मस्तक, फणा आणि त्यावर हा भला मोठा पहाड म्हणजेच आपली पृथ्वी असं शिलारुपात बघायला मिळतं ...ही गुहा आतमध्ये खूप खूप खोलवर गेली आहे...आणि ती आतमध्ये जाणारी जी पायवाट आहे त्यावर अक्षरशः सापाच्या त्वचेवर जसे खवले खवले असतात तसे खवले त्या मार्गावर असलेल्या पायवाटेच्या दगडावर स्पष्ट दिसतात....ही आत-आत जाणारी पायवाट म्हणजेच या शेषनागाचे शरीर....आपण प्रत्यक्ष त्या खवल्या खवल्यांच्या वाटेवरून चालतं असतो....

या पायवाटा आत खूप खाली खाली दूरवर गेल्या आहेत....काही अंतर अजून गेल्यावर तिथे चार दिशेने चार मार्ग दिसतात....असं म्हणतात ते आपल्या पुराणात सांगितल्या प्रमाणे युगांचे दार आहेत....डाव्या आणि उजव्या बाजूला असलेले रस्ते किंवा द्वार हे मोठाल्या शिळेने बंद केलेले दिसतात ते म्हणजे द्वापार आणि त्रेता युग जे होऊन गेले आहेत....आपण चालत जातो ते म्हणजे कलियुग जे सुरू आहे.....आणि जी वाट समोरच्या दारातून पुढे जाते ते म्हणणे सतयुग जे आता येणार आहे....

येथे खूप गोष्टी अगदी अदभूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत....येथे याच गुहेच्या खूप आत गेलं की काही मार्ग याच गुहेच्या गर्भातून खूप दूरवर गेलेले दिसतात जे खूपच अरुंद आणि खडतर असे आहेत....असं म्हणतात की या पाताळमार्गे चारधाम जोडणारे ते मार्गे आहेत...एक मार्ग हरिद्वार येथे निघतो....एक थेट रामेश्वर येथे निघतो...तर एक मार्ग केदारनाथला....येथे जो मनुष्यप्राणी येतो त्याला याच एका जागी चारीधाम यात्रा केल्याचं पुण्य लाभतं अशी मान्यता आहे.....

याच गुहेत काल-भैरवाचे मुख दर्शन होते आणि त्यांची ती आक्राळविक्राळ जिव्हा दिसते..असं म्हणतात त्यांच्या त्या मुखातून एक अतिशय अरुंद असलेला एक मार्ग आहे...जो कोणी या काल-भैरवाच्या मुखातून प्रवेश करून त्या मार्गाने प्रवास करून पलीकडल्या शेवटाकडे निघेल त्याला मोक्ष प्राप्त होईल...त्या प्रवेशद्वाराला मोक्षद्वार असेही म्हणतात....

अगदी खोदून विचारलं तेंव्हा समजलं की अपवादात्मकरित्या येथे एका ठिकाणी श्राद्ध कर्म करायला परवानगी आहे आणि येथे श्राद्ध कर्म केले की पुन्हा त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध करायची गरज भासतं नाही कारण त्या आत्माला मोक्ष प्राप्ती होते...

अजून एक विस्मयकारक गोष्ट बघायला मिळाली आणि ती म्हणजे जेंव्हा गणपती बरोबरच्या युद्धात शंकराने गणपतीचे मस्तक उडवले ते बालगणेशाचे मूळ मस्तक येथे शिलारुपात आहे....हे मस्तक खाली जमिनीवर असून एक नवलाची गोष्ट अशी की त्यावर सतत वरच्या बाजूने एका टोकदार अशा पाषाणातून सतत पाण्याचा अभिषेक सुरू असतो....तेथे आजूबाजूला कोठेही पाणी नाही.....सगळीकडे कोरडे ठणठणीत पाषाण आहेत पण केवळ याच ठिकाणी पाणी येते आणि ते सतत गणपतीच्या या मस्तकावर पडतं असते....पाणी कुठून झिरपत येते हे काही कळतं नाही....कारण डोक्यावर भला मोठा दगडांचा अवाढव्य हिमालय असतो....

जेंव्हा गणपतीचे मस्तक उडवले गेले तेंव्हा पार्वती देवीच्या कोपापासून वाचवण्यासाठी गणपतीला नवीन शीर लावून जिवंत करणे आवश्यक होते....आणि म्हणून समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या ऐरावत हत्तीचे मस्तक गणपतीला लावण्यात आले...

या ऐरावत हत्तीला सात मस्तके होती, त्यातले एक गणपतीला लावण्यात आले....म्हणून ऐरावत हा कधीही सहा तोंडाचा दर्शवला जातो, जो मुळात सात मस्तकांचा आहे....हाच ऐरावत हत्ती जो इंद्रदेवाचे वहान आहे तोही येथे या गुहेत शिला स्वरूपात बघायला मिळतो....अतिशय अवाढव्य... सहा मस्तक, सहा सोंड असलेला आणि एक हजार पाय असलेला तो हत्ती या गुहेत पाषाण रुपात स्पष्ट दिसतो....आणि विशेष म्हणजे तो अधांतरी आहे जमिनीपासून दीडएक फुटावर आहे....आपण खाली वाकून अक्षरशः त्या ऐरावताचे पाय बघू शकतो ....एवढंच नाही तर त्याखाली सरपटत जाऊन अगदी दूरपर्यंत पसरलेले ते हत्तीचे पाय मोजूही शकतो....

याच गुहेत समुद्रमंथनात मिळवलेली कामधेनु गाय आणि कल्पवृक्ष सुध्दा बघायला मिळतो...

कामधेनु गायीला एकचं सड होता म्हणजे आहे आणि त्यातून पाझरणारे पांढरे दूध वरून खाली दगडावरून स्पष्ट दिसते...आश्चर्याने आपल्या तोंडाचा आ झाल्याशिवाय रहात नाही...

येथे भगवान शंकराच्या जटा आणि त्यातून भगिरथाच्या अथक प्रयत्नातून पृथ्वीवर अवतरणारी  गंगा स्पष्ट बघायला मिळते....विशेष म्हणजे जेंव्हा त्या जटातून ही गंगा पाझरून बाहेर येत खाली जमिनिवर येते त्या संपूर्ण पाषाणावर कोठेही शेवाळ किंवा दगडावर सतत पाणी वहात असल्यावर जी घसरण निर्माण होते ते अजिबात नाही...मी स्वतः हात लावून पाहिला....जराही चिकटपणा किंवा शेवाळ असं नाही....त्या पाण्याचा स्पर्श इतका वेगळा आणि अदभूत होता की मला तो शब्दात मांडताही येणार नाही....तळहाताला पाण्याचा तो स्पर्श एक वेगळाच असा आल्हाददायक प्रसन्नता देणारा वाटला....त्या पाण्यात एक जडत्व, एक भारलेलंपण होतं....या आधी माझ्या आयुष्यात कधीही पाण्याला स्पर्श करताना असा भास झाला नाही....या पाण्याच्या स्पर्शाची अनुभूती खूप वेगळी होती....हे खूप वेगळं होतं...

अशा आणि अनेक विस्मयकारक गोष्टी येथे आहेत.... पुराणातल्या असंख्य कथा, दाखले आपल्याला येथे पाहायला मिळतात.....आतलं सगळं वातावरण गूढ गंभीर पण तरीही आश्वासक आणि प्रसन्न आहे....आत खूप प्रचंड काळोख आहे पण मंदिर प्रशासनाने आता दिव्यांची व्यवस्था केली आहे....

आपण जसजसे आत जातो तसतसा आतला प्राणवायू कमी कमी होतं जातो...धाप लागायला लागते....डोळे मोठे होतात...

या आतल्या पाताळाची सर्व माहिती स्कंदपुराणातील मानसखंडात लिहिलेली आहे आणि त्याचाच अभ्यास करून येथे आपल्या पुराणातल्या गोष्टींचे संशोधन चालते...आम्ही अजून आत जाताना तेथे नुकत्याच एका गुहेचा शोध लागलेला होता...याचं गुहेत पांडवांनी काही दिवस अज्ञानवासात काढले अशी माहिती मिळाली...ही गुहा तशी खूप आत आणि पुन्हा अशाच कपारी कपारीतून वर सरपटत चढून जाणारी होती....आत प्राणवायू खूपच कमी होता....आम्ही जवळपास आता पाचशे फूट खोल आलो होतो....

या गुहेत जाण्याआधी त्या गाईडने स्पष्ट बजावले की आत ऑक्सिजन खूप कमी आहे, ज्यांना जमणार नाही त्यांनी जाऊ नये....अर्थात मी थोडीच मागे हटणार होतो.....नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी चढून मी वर गेलो....ते काही फूट अंतर सरपटत चढायला वीस मिनिटे लागली....माझ्या मागे अजून काही आले....त्या गुहेतील वातावरण खूपच अदभूत आणि गूढ होतं....एक प्रसन्न निरव शांतता त्यात गुहेत भरून गेलेली होती...'शांततेचा पण आवाज असतो' हे प्रत्यक्ष जाणवलं....क्षणभर डोळे मिटून ती अनुभूती तनामनात साचवून घेतली....पुन्हा आयुष्यात या ठिकाणी यायला मिळेल नाही मिळेल म्हणून त्या क्षणाशी तादात्म्य पावतं... एकरूप होतं...ते क्षण मनाच्या कप्प्यात कुलूप बंद केले...काही सेकंदाची ती समाधी अवस्था मनाला जो परम आनंद देते ते व्यक्त करणे खरंच अशक्य आहे....

आपण स्वतःला किती मी मी करतो ना???....आताही वर बघा ' सर्वात आधी 'मी' वर आलो' हे सांगताना माझाही 'मी' वर आला होता...या इथल्या गुहेत आपली क्षुद्र नश्वरता, आपली क्षणभंगुरता, आपला शून्य अस्तित्व, आपण बाळगतं असलेली बेगडी मानसिक स्वत्वपणाची लक्तरे अशी भसाभस समोर येतात....क्षणभर आपल्यालाच आपली लाज वाटते....काय आपण?...कोण आपण?... का आपलं अस्तित्व?...कशासाठी हा उपद्व्याप?.. असे असंख्य प्रश्न मनात घोंघावू लागतात.....

असं वाटतं बस आता हे येथेच थांबावे....ही शांतता, ही प्रसन्नता संपूच नये....आहे हा क्षण असाच थिजून जावा....आणि एका हलक्या निर्वात पोकळी कडे आपण जाणारा हा मार्ग थांबूच नये.....मन आणि शरीर एका अनामिक तरल पातळीवर झुलतं रहावे....डोळे मिटून मी त्याची अनुभूती घेतली....

काही वेळ मनाला लागलेली समाधी भंगली....अजून काहीजण वर आल्याने ऑक्सिजन खूप कमी झाला आणि मग माघारी फिरलो...आपल्या अस्तित्वाचे मागे सोडलेले पाश आपल्याला पुन्हा आपल्या विश्वात घेऊन येतात....खाली आलो.

त्याच गुहेत एका ठिकाणी एक बारीकसा दगड निमुळता होत वर आलेला आहे...त्याचे टोक वरच्या छताकडील पाषाणाकडे आहे....असं म्हणतात की या निमुळत्या पाषाणाची उंची हळूहळू हळूहळू आपोआप वाढते आहे...वरच्या कातळापासून हा खालचा पाषाण काही इंच अंतरावर आहे...ज्यादिवशी हा खालचा निमुळता वर वर जाणारा दगड  छताच्या वरच्या पाषाणाला स्पर्श करेल त्यादिवशी पृथ्वीचा विनाश सुरू होईल....हा खालचा वाढतं जाणारा दगड हा कलियुगाचे प्रतीक मानले आहे....

अशा आणि अनेक अदभूत गोष्टी येथे आहेत....मला आठवल्या लक्षात राहिल्या त्या सर्व मी मांडायचा प्रयत्न केलाय....आयुष्यात पुन्हा कधी संधी आली तर येथे अभ्यास करून पुन्हा नक्कीच जाईन हे खात्रीने....

पुन्हा वर चढायचा सरपटता प्रवास सुरू झाला....बाहेर आलो तर अंगावरील कपड्यांची वाट लागलेली होती....सगळे कपडे मळलेले होते...पण मन मात्र सतेज, निर्मळ आणि प्रसन्न झाले होते...मनाची लाभलेली सुंदरता, प्रसन्नता मळलेल्या कपड्यांची पेक्षा खूप मोठी होती...

कुलकर्ण्यांचा " पाताळ-प्रवासी " प्रशांत...

तळतीप - पुढच्या भागात अजून एका तिथल्या एका प्रसिद्ध मठाविषयी....आपल्या फेसबुकचा मालक झुक्या सुध्दा येथे नतमस्तक व्हायला येतो...ते पुढच्या भागात....

1 comment:

im writing under "Comment Form Message"