Sunday, March 10, 2019

नृसिंहवाडी

दत्त महाराजांच्या नृसिंहवाडी या  राजधानीच अप्रूप प्रत्येक दत्त भक्ताला का वाटत ? असा प्रश्न पडल्यास एकदा तरी या राजधानीला आवर्जून भेट देऊन या असं म्हणावसं वाटत .नवसाला पावणारा हे शब्द कुठेही न लिहिलेला ,कार्यकर्त्यांची आणि पावती पुस्तकांची रेलचेल नसलेला ,समाजाच्या सर्व थरांकरिता एकच दर्शन रांग असलेला हा अवतार नित्य प्रचिती देत असतो .

अहो दत्त महाराज हे इथे सन्यस्त स्वरूपात आहेत तेव्हा त्यांना कोणत्याही भौतिक वैभवाची  गरज नाही . आजही इथे दत्त महाराजांच्या वैभवात केवळ दत्त भक्तांच्या संख्येची आणि त्यांच्या उपासनेची भर पडली आहे .रेशमी महावस्त्र नकोत ,सोन्यामोत्याचे अलंकार नकोत काही नको .केवळ जलाभिषेक ( तो देखील गार ) प्रिय असणाऱ्याला आणखी कोणत्याही उपचाराची गरज वाटत नाही . छाटी हेच त्यांचे महावस्त्र आहे . गंधलेपन हेच ज्यांना प्रिय भूषण  आहे ,शेवंती आणि बेल तुळशी हार हेच ज्यांचे अलंकरण आहे . भिक्षा पदार्थाच्या त्यांच्या आवडीनिवडी तरी किती वेगळ्या असाव्यात -- जे जो देईल ते दत्त महाराज मध्यान्हाला स्वीकारतात हा त्यांचा गुण आहे त्यामुळे जोंधळ्याच्या कण्या असोत किंवा घेवड्याची भाजी काहीही भिक्षारूपात चालू शकते . मध्यान्हाला केवळ दूध हा आहार मिळाल्यास देखील जो संतुष्ट होतो त्याबद्दल काय बोलावे ? नृसिंहवाडीला दत्त महाराजांच्या महापूजेच्या वेळी अत्यंत सात्विक आहार असलेल्या भोजनाचा नैवेद्य दाखविला जातो . 

इथे दत्त महाराजांचा पुजारी वर्ग कधीही अमुक सेवा प्रकार करा असे सांगत नाही . इच्छा असेल तर करा अन्यथा केवळ प्रदक्षिणा आणि तीर्थस्नानात देखील आपले कल्याण आहेच . कोणत्याही कार्याकरिता अडवणूक हा प्रकार नाही ,आपली पात्रता असेल त्यानुसार करा हेच त्यांचे सांगणे असते . धोतर आणि उपरणे हाच ज्यांचा भक्ती वेष आहे ,त्यांना आजही आपल्या पूर्वजाना महाराजांनी पूजेकरिता नेमले याचा अभिमान आहे आणि अशा वंशात उत्पन्न झाल्याची धन्यता आहे . कितीही संख्येने आलेल्या भक्तांचे स्वागत हा आणखी एक गुण ,अतिथी सत्कार करणे जणू त्यांच्या अंगवळणीच पडले आहे अशा पुजारी वर्गाला आपल्याकडून काही अधिक दिले जावे या विचारात आलेले भक्त असतात . 

नृसिंहवाडीतील सर्व दुकानात एकाच दराने मिळणारी मेवामिठाई दत्त महाराजांना अर्पण करून त्यातील शेष प्रसादरूपी आपण घेऊन जातो आणि आधीच मिठाई त्यात प्रसादरूपाने त्याच्या वाढलेल्या चवीने आपण ते अल्पावधीत फस्त करून पुन्हा नृसिंहवाडीला कधी जायचे याचे व्यवस्थापन करू लागतो  . 
*!!! श्री गुरुदेव दत्त !!!*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"