एका गांवात एक रामभक्त राहात होता . कोणीही काहीही विचारले तरी मला काय कळते . ते सारं रामजी जाणे . हे तूं केलेस ? मी कुठं काय केले ते रामजींनी केले . कोणी काहीं दिले तर मंदिरात रामासमोर ठेवणार मग घरी नेणार . कालचक्राच्या प्रवासात मुलं मुलगी मोठी झाली . मुलीच लग्न ठरले , म्हणून गांवच्या सावकारांकडे जाताना रामरायांना सांगून गेला . घर गहाण ठेऊन लग्नाला पैसे कर्जाऊ आणले . लग्न यथासांग पद्धतीने पार पडले . मुलांनी कामधंदा बघितला नोकरी धरली . आलेले पैसे जमा करत सांठवले . हे सारे प्रभूंना सांगून चालले होते . शेवटी एकदाची रक्कम सांठली .ती घेऊन रामरायांसमोर ठेवली . त्यांना सांगून सावकाराला परत फेड पूर्ण रकमेची केली . सावकाराने तशी पावती बनवली व दुसरी पावती करून त्याला सही करायला सांगितले . तो म्हणाला मला लिहीता वाचता येत नाहीं .हे सगळे श्रीरामांना सांगून तुमच्याकडे आलो . जो व्यवहार झाला तो तुम्ही आणि रामराय जाणे . सावकाराने मान डोलावली . आणि पावतीवर त्याने त्याचा अंगठा घेतला व पावती त्याच्या हातात सोपवली . आणि निरोप घेतला . तो निघाला ते तडक मंदिरात आला देवासमोर पावती ठेवली . चरणावर माथा ठेवला . पावती घेऊन घरी आला कारभारणीला पण आनंद झाला . मुलांना ही आनंद वाटला . हा आनंद फार टिकला नाहीं . सावकाराचा माणूस येऊन सांगून गेला . सावकार पुढल्या आठवड्यात घराचा ताबा घ्यायला येणार आहे . सगळ्या घरावर अवकळा पसरली . मुलांनी वडीलांशी बोलून खात्री केली . दुसऱ्या दिवशी रामभक्त देवळात गेला . ऊरफुटेपर्यंत रामासमोर रडला . देवा अशी बेअब्रू होण्यापासून तूच वांचवू शकतोस . तुला सांगून पैसे तुझ्या चरणी ठेऊन , मगच त्या सावकाराला दिले . त्याने पण परत फेडीबद्दल धन्यवाद मानले आणि पावती दिली . रामराया ती पण तुझ्या चरणी ठेवली . मला लिहिता वाचता येत नाहीं ; हे तुला पण माहिती आहे . त्याने अंगठा घेतला आणि मी दिला . बाकीचे देवा तुम्हांलाच माहिती .
तो सावरकर शहरातील कोर्टात गेला दावा दाखल केला . त्याला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . पै न् पै वसूल झालेला होता आणि अक्कल हुशारीने घरपण घशात घालायला मिळणार होते . कोर्टात दावा दाखल झाला सावकारांने पुराव्यानिशी सर्व कागदपत्रे दाखल केली . रामभक्त न्यायालयात हजर झाला .
. न्यायाधीशांनी त्याला विचारले , " तुझ्या बाजूने साक्षीदार कोणी आहे ."
" होय आहे ना ! "
"कोण आहे ? "
" श्री राम . पत्ता राघवदास मंदिर "
" या नांवाने समन्स काढू ते हजर होतील ? " न्यायाधीशांनी विचारले . . " हो ! " एवढेच उत्तरला .
गांवांत येऊन रामासमोर हात जोडून भावपूर्ण उभा राहिला . साश्रू डोळ्यांनी सर्व कथन करून , आता तुलाच माझी लाज म्हणून शांतपणे घरी गेला . न्यायालयाचा शिपाई ते समन्स घेऊन गांवात घर न घर फिरला. शेवटी राघवमंदिरात तो आला. पुजारी महाराज पुढे आले. त्यांचे नांव राघवदास होते. त्यांच्या हातात श्रीरामाचे समन्स दिले . तारखेला रामभक्त मंदिरात येऊन काकुळतीला येऊन बोलला . तो गेल्यावर पुजारी महाराज देवाला म्हणाले , " राजारामा आज समन्स तुमच्या नांवाचे आहे . देवा तुम्ही खरंच जा . तुमच्या शिवाय त्याचे कोणीही नाहीं ." असं बोलून आपल्या सजल नेत्रांनी चरण भिजवले .
इकडे न्यायालयात केसची वेळ आली . रामभक्त आंत न्यायाधीशांसमोर हात जोडून उभा राहिला . न्यायाधीशांनी विचारले तुझे साक्षीदार कुठयंत . तो म्हणाला , "आलेले असतील पुकारा द्यावा ." श्रीराम राघवदास राघवमंदिर वासी हाजिर हो . असा तीन वेळा पुकारा झाला . तोच दरवाज्यातून एक वयस्कर व्यक्ती आत येत होती . हातात उंची पेक्षा जास्त उंचीची श्वेत दंडिका . पायात कुर्र कुर्र आवाज करणाऱ्या कलाकुसरीच्या मोजड्या. अंगात बाराबंदी व पिवळे गर्भरेशमी धोती . अतिशय दमदार पावलं टाकत रामभक्त आणि शिपाई यांच्या मधे उभे राहिले . शिपायाने हाताच्या इशाऱ्याने साक्षीदाराचा पिंजरा दाखवला . रामभक्त त्यांना बघून भांबावल्या अवस्थेत बघत राहिला . तिकडे सावकाराने कपाळावर धोतराचा सोगा फिरवला .
आपले नांव मी श्रीराम राघवदास , अवधपुरी . श्रीराम राघवदासांच्या समोर शपथेसाठी गीता धरण्यात आली . त्यांनी शपथ घेऊन सांगण्यास प्रारंभ केला . न्यायाधीश साहेब हा व्यवहार माझ्या साक्षीने झाला आहे. सावकाराने सर्व पैसे मिळाल्यावर त्याच्या खासगी वहीत पैसे मिळाल्याची तारीख वार नोंद केलेली आहे . त्याच वहीत ती पहिली पोच पावती आहे . ती वही यांच्या झोपण्याच्या खोलीतील अशा वर्णनाच्या कपाटात या खाण्यात आहे . सावकाराने आपल्या मुनीमाला दमदाटीने तोंड बंद ठेवण्याचा मोबदला कबूल केलेला आहे . हे सारे मागवून घ्यावे . सर्व सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ होईल . सावकाराला न्यायालयाने ताब्यात घेतले . आणि घरी शिपाई पाठवून मुनीम वही पावती न्यायालयात हजर करवले . श्रीराम राघवदास शांतपणे न्यायालयातून निघून गेले . रामभक्ताला तिथंच हुंदका फुटला . समन्स बजावणारा व्यक्ती पाहून भोचक्का झाला होता.
सर्वच उघडे पडल्यावर मुनीम महाशय व सावकार हतबल होऊन कबूल झाला . रामभक्ताला मूळ पावती न्यायालयामार्फत मिळाली . सावकाराला व मुनीमाला फसवणूकी बद्दल ताब्यात घेतले . आणि न्यायालयाने सरकार तर्फे त्याच्यावर दावा दाखल करून घेतला .
पुढे शिपायाने सांगितले , " साहेब समन्स ज्या राघवदासाच्या हातात दिले . ती ही व्यक्ती नव्हे ." न्यायाधीश महाराज बुचकळ्यात पडले . इतकं बरोबर सांगणारी व्यक्ती ही त्यांच्या डोक्याला भुंगा लावून गेली . त्याच रविवारी ते त्या गांवच्या राघव मंदिरात गेले . त्यांना राघवदास भेटले . रामभक्त पण भेटले . पण श्रीराम राघवदास भेटले नाहीं . म्हणून न्यायाधीश साहेब मंदिरात मूर्ती समोर उभे राहिले . अंगातील बाराबंदी सगळं सांगून गेली . त्या केसचा निवाडा करून , राजीनामा देऊन रामसेवेला निघून गेले .
. बाह्य़ देह आणि विश्व यांचा विसर पडतो . तो त्या दैवताशी एकरुप होऊन गेलेला असतो . तो साधक आपले कर्म अर्पण करतो म्हणजे कर्म फळ पण अर्पण करतो. प्रत्येक कर्म त्याच्या साक्षीने क्रियमाण करतो . म्हणून सर्वव्यापी भगवंताने साक्षीदाराची भूमिका निभावली.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"