Monday, March 18, 2019

पंचकैलास

कैलास म्हटलं की एकच कैलास डोळ्यासमोर येतो. पण एकूण पाच कैलास आहेत.
यालाच पंचकैलास म्हणतात. एक तिबेटमधील मानससरोवर जवळील कैलास. बाकी चार भारतात आहेत. हिमाचल प्रदेशात. 

१) किनौर कैलास
एक मित्र जाऊन आलाय इथे. भारतातील सगळ्यात धोकादायक मोटोरेबल मार्गाहुन येथे जावं लागतं. छातीत आणि छातीतल्या हृदयात आणि फुफ्फुसात दम असेल तरच या मार्गावरून जावं. अत्यंत अरुंद ओबडधोबड रस्ता. एका बाजूने जबडा वासलेल्या दऱ्या. दुसऱ्या बाजूने गवताचं पातंही न उगवलेला उग्र हिमालय रांगा. पण (शिवशंभो )विश्वास टाकून जाणाऱ्याने जावं. हिमाचल रोडवेज सरकारी बसेसचे चालक अफलातून गाड्या चालवतात. 

शिमला सारख्या टुमदार, गूडी गूडी रोमँटिक जागेहून किन्नर कैलासला जायला बसेस मिळतात. बहुतेक लोकांच्या गाड्या, हृदये, मन, आयुष्य सिमलामध्येच अडकतं.  शिमलाच्या मायेच्या पुढेच वैरागी शिव भेटतात जणू.
सिमलाहुन पुढे चीनची बॉर्डर जवळ आहे. तेथिल गावांच्या नावांवरही चीनी भाषेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 

किन्नर कैलासला जाण्याचा प्रमुख गाव 'रिकाँग पीओ'.
मागच्या महिन्यात धर्मशाळाला बसस्टॉपवर बसच्या पाटीवर रिकाँग पीओ बघता डोळ्यांत चमक आली होती. भावना उचंबळून आल्या.  रिकाँग पीओहुन पुढे किन्नर कैलासला जावं लागतं. फक्त याच गावात दोन एटीएम आहेत. ज्यातील एक एसबीआयचं आहे. आणि तेच बहुतेकवेळा काम करतं.
शिमलाहुन बाराहुन जास्त तास लागतात रिकाँगपीओला जायला. तेथून जंगलातुन ट्रेक. 
एक गूढ जागा, तेथील तलाव. समोर किन्नर कैलासचा सुळका. लोक जातात दर्शनाला जीवावर उदार होऊन. सुळक्याच्या खोबणीत असलेले दोन पक्षी लोकांच्या हालचालीवर जणू लक्ष ठेऊन असतात. प्रचंड गूढ जागा. एक्सट्रोवर्ट व्यक्तीही इथे मनाने स्तब्ध होतो. इन्ट्रोवर्ट व्यक्तीची गोष्टच सोडा. त्याचा बुद्ध, शिवच होतो. काहीवेळासाठी का होईना.

२) श्रीखंड कैलास:- हे गढवाल रेंज मध्ये येतं. वर्षभर आजूबाजूला बर्फ असतो फक्त या सुळक्यारूपी शिवपिंडीवर बर्फ साचत नाही. १९००० फुटांवर हा कैलास आहे. ऑक्सिजनची कमतरता इथे जाणवते म्हणतात.

3) आदी कैलास:- याला मिनी कैलासही म्हणतात. तिबेटमधील मानससरोवराजवळील प्रसिद्ध कैलासला जाताना हा आदी कैलास लागतो. दिसतो. पण त्यासाठी कैलास ला जाणाऱ्या पारंपरिक मार्गाने जावं लागतं. नेपाळ किंवा सिक्कीममधून नव्या मार्गाने जाताना हा सुंदर कैलास, तिबेटमधील कैलासचं प्रतिरूप दृष्टीस पडत नाही. याच मार्गावर प्रसिद्ध ओम पर्वत ही दिसतो.

४) मणीमहेश कैलास:- 
हा चार अप्रसिद्ध कैलासमधील जास्त प्रसिद्ध कैलास आहे. मणीमहेश कैलासच्या दर्शनाला जाणारे लोक सूर्योदयाची खास वाट बघतात. सूर्यबिंब सुळक्यारूपी शिवलिंगाच्या माथ्यावर येतो. प्रचंड तेजस्वी मणी शंकराच्या पिंडीवर ठेवलाय असा भास होतो.
जे येथे गेले आहेत त्यांनी सांगितलं की मणी दिसू लागला की लोक अगदी बेभान होऊन शंकराचा गजर करतात, कोणी रडू लागतात. कधीही न विसरू शकणारा तो क्षण असतो असं म्हणतात.

५) तिबेटमधील मानस सरोवर जवळील कैलास:-
याबद्दल एक शब्दही बोलायची गरज नाही. फक्त अनुभव, अनुभूती महत्वाची.
जवळील गूढ स्तब्ध रावण ताल, विरघळलेला नीलममणी मानस सरोवर. त्याच्या मागे अद्भुत कैलास पर्वत.

असे पंच कैलाश. या सर्व कैलासला पावसाळ्याने मध्य गाठला की जाता येते. तेही फक्त तीस ते चाळीस दिवसांत. वर्षभर बाकी रस्ते बंद असतात. शिव आपल्या समाधीत, ध्यानात मग्न असतो. 

"भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी.."

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"