🌳🌳*मोक्षकाष्ठ*🌳🌳
भारत हा शेतीप्रधान देश आहे, इथे विविध प्रांतात अनेक प्रकारची पिके घेतली जातात ज्यातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो.
जे पीक शेतकरी घेतात, त्यातील साधारण पंचवीस टक्के हिस्सा मनुष्यास खाण्यास उपयुक्त असतो, जवळपास चाळीस टक्के भाग जनावरांचा चारा म्हणून उपयोगात येतो. उरलेला पस्तीस टक्के भाग कोणत्याही प्राण्यांना उपयोगात येत नाही त्याला शेतकरी तुराटी, पराटी, धाटे, सड अश्या विविध नावांनी ओळखतात.
हा शेत कचरा बहुतांशी शेतकरी शेतात आग लावून पेटवतात, हे दृश्य आपल्याला रस्त्याने जाताना नेहेमीच दिसते. या पेटवण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की शेतकचरा नष्ट करणे, या नंतर नवीन पीक घेण्यासाठी शेताची मशागत करणे सोपे होते.
ही पद्धत भारतातील सर्व प्रांतात कमी अधिक प्रमाणात सारखीच अवलंबली जाते, याचे फार गंभीर परिणाम दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब येथील शहरी जनतेला भोगावे लागतात हे आपण बातम्यात पाहतो, या मुळे प्रदूषणाची मात्रा सहन करण्यापलीकडे पोहोचते.
शेतकरी ह्या कृतीने दोन प्रकारे नुकसान करतात, प्रथम अशी आग लावल्यामुळे शेतातील गांडूळे ज्यांना शेतकरी मित्र म्हणतात, होरपळून मरतात, ज्यामुळे पिकाला त्यांची मदत होत नाही, दुसरे असे की हा शेत कचरा हे बहूमूल्य इंधन आहे जे अश्या तर्हेने विनाउपयोग नष्ट होते.
आम्ही या कचऱ्यातून उत्कृष्ठ प्रकारच्या विटा बनविल्या ज्याला *मोक्षकाष्ठ* असे नाव दिले आहे. याचा वापर स्मशान घाटावर दहन विधीसाठी करून लाकडांच्या वापरावर आळा बसविण्यास मदत केली आहे, ज्यामुळे आम्ही वृक्ष संवर्धन करण्यास बहुमूल्य योगदान देत आहोत.
नागपूर शहराने ही पद्धत साधारण दोन वर्षांपूर्वी अंबाझरी घाटावर सुरू केली, त्याला लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. जानेवारी 2019 अखेर पर्यंत 3400 पेक्षा जास्त लोकांचे मोक्षकाष्ठ वापरून दहन करण्यात आले, यामुळे आम्ही 7000 पेक्षा जास्त झाडांना जीवदान मिळवून दिले आहे.
यवतमाळ येथे ही पद्धत आम्ही लॉयन्स क्लबच्या सहकार्याने सुरू आहे. नुकतेच (एप्रिल 2018) सांगली महानगरपालिकेने ही पद्धत सुरू केली याचे स्थानिक जनतेने कौतुक केले. यामुळे स्मशान घाटाच्या जवळ राहणाऱ्या रहिवाश्यांनी कमी प्रदूषण होत असल्याची पोच पावती दिली आहे. येणाऱ्या वर्षात संगलीकरांच्या या कृतीने हजारो झाडांचा जीव वाचेल याची मला खात्री आहे.
*एक मृतदेह लाकडांचा वापर करून दहन केल्यास पंधरा वर्षे वयाच्या दोन झाडांना कायमचे मुकावे लागते.* ही निसर्गाची न भरून निघणारी हानी आहे, हे पटत असूनही भारतीय समाज दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव लाकूड वापरून प्रिय व्यक्तीचे दहन करतो.
आम्ही हा सक्षम पर्याय देऊ शकलो, ज्याचा नागरिक मोठया प्रमाणात वापर करू लागले आहेत. या कृतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होऊ लागला आहे, शेतातील गांडूळे वाचल्यामुळे शेतीसाठी त्यांचा उपयोग होऊ लागला आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमुळे दोन झाडांची होणारी हानी टळली आहे, यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषणाची पातळी घटण्यास मदत होत आहे. हे इंधन सुकलेले असल्यामुळे, कमी इंधनात सुद्धा दहन विधी पूर्ण होतो, ज्या मुळे नगरपालिकेला किव्वा नातेवाईकांना कमी खर्च लागतो.
हिंदू धर्मात पर्यावरण संरक्षण करण्यावर खूप भर दिला गेला आहे, परंतू आजपर्यंत कळत न कळत आपण माहीत असूनही केवळ चांगला पर्याय नसल्यामुळे लाकूड दहन करत आलो आहोत, आणि पर्यावरणाची न भरून निघणारी हानी करत आहोत, याचा पर्याय म्हणजे *मोक्षकाष्ठ* ज्याचा वापर सुरू झाल्यामुळे मृत आत्म्यास मोक्ष मिळण्याच्या मार्ग सुकर झाला आहे. याचा प्रसार देशभर व्हावा असा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
मोक्षकाष्ठ बनविण्याचे कारखाने गावोगावी सुरू व्हावेत यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो, सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायात उतरू शकतात. एक कारखान्यात किमान दहा अकुशल कामगारांना नोकरी मिळू शकते. म्हणजे रोजगाराचे नवीन दालन उघडले असे म्हणू शकतो.
इतर शहरातील जनतेनेही स्वतःच्या शहरात ही योजना राबवावी अशी मी आग्रहाची विनंती करतो. हा लेख जास्तीत जास्त लोकांना पाठवा.
जे चांगले कर्म करून आपण जाऊ त्याची आठवण मागे रहावी, यालाच मोक्ष म्हणत नसतील का? आपण जीवनात जर झाडे लावून वाढवली नसतील तर निसर्गाची दोन तोडून ती संपवण्याच्या आपल्याला अधिकार आहे का? जे कमावले नाही ते खर्च केले की कर्जबाजारी होतो, अशानं मोक्ष व मुक्ती मिळेल का?
मराठीत चिता व चिंता यात केवळ टिंबाचा फरक आहे, पर्यावरणाला मात्र त्याची जबर किंमत मोजावी लागत आहे "स्वतःच्या चितेचा विचार सोडा, येणाऱ्या पिढीची चिंता करा,"
धन्यवाद
*विजय लिमये* (9326040204)
*ईको फ्रेंडली लिविंग फाऊंडेशन*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"