Friday, August 23, 2019

*दास विषयाचा झाला । सुखसमाधानाला आंचवला

I।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २० ऑगस्ट  🌸*

*दास  विषयाचा  झाला ।  सुखसमाधानाला  आंचवला ॥*

सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय ॥ त्यातच देहाला दुखणे । म्हणजे दुःखाचा कळस होय ॥

मिठाचे खारटपण ।साखरेचे पांढरेपण ।यांस नसे वेगळेपण । तैंसे देह आणि दुःख जाण ॥

देहाने जरी सुदृढ् झाला । तेथेही दुःखाचा विसर नाही पडला ॥

सांवली जशी शरीराला । तैसा रोग आहे शरीराला ॥ 

रामकृष्णादिक अवतार झाले । परी देहाने नाही उरले ॥
स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥

देहदुःख फार अनिवार । चित्त होई अस्थिर ॥ 
देहाचे भोग देहाचेच माथी । ते कोणास देता येत नाहीत । कोणाकडून घेता येत नाहीत ॥

आजवर जे जे काही आपण केले । ते ते प्रपंचाला अर्पण केले । स्वार्थाला सोडून नाही राहिले ॥

अधिकार, संतति, संपत्ति । लौकिकव्यवहार, जनप्रीति, ।या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते । अखेर दुःखालाच कारण होते ॥

जो जो प्रयत्न केला आपण । तेच सुखाचे निधान समजून ।कल्पनेने सुख मानले । हाती आले असे नाही झाले ॥

ज्याचे करावे बहुत भारी । थोडे चुकता उलट गुरगुरी ।ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन । हे ओळखून वागावे आपण ॥

प्रपंचात आसक्ती ठेवणे । म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे ।म्हणून आजवर खटाटोप खूप केला । परि कामाला नाही आला ॥

विषयातून शोधून काढले काही । दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही ॥
म्हणून प्रपंचाने सुखी झाला । ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ॥

ज्याची धरावी आस। त्याचे बनावे लागे दास ॥
दास विषयाचा झाला । तो सुखसमाधानाला आचवला ॥

ज्या रोपट्यास घालावे खतपाणी । त्याचेच फळ आपण घेई ॥
विषयास घातले खतजाण । तरी कैसे पावावे समाधान ? ॥

प्रपंचातील संकटे अनिवार । कारण प्रपंच दुःखरूप जाण ॥
आजवर नाही सुखी कोणी झाला । ज्यानी विषयी चित्त गुंतविले ॥
कडू कारले किती साखरेत घोळले । तरी नाही गोड झाले ।तैसे विषयात सुख मानले । दुःख मात्र अनुभवास आले ॥

प्रपंचातील उपाधि । देत असे सुखदुःखाची प्राप्ति ॥
संतति, संपत्ति, वैभवाची प्राप्ती, । जगांतील मानसन्मानाची गति, ।आधुनिक विद्येची संगति, । न येईल समाधानाप्रति ॥
प्रपंचातील सुखदुःखाची जोडी । आपणाला कधी न सोडी ॥

नामातच जो राहिला । नामापरता आठव नाही ज्याला ।परमात्मा तारतो त्याला । हाच पुराणीचा दाखला ॥

*२३३.  नका  करू  आटा आटी ।  राम  ठेवावा  कंठी  ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*
[21/08 6:15 am] Om Sadashiv katkr: *।।  श्री राम जय राम  जय जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २१ ऑगस्ट  🌸*

*सुख  स्वत : वरच   अवलंबून  आहे .*

सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. 

मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. 
याचे कारण असे की, सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. 

आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. 

समजा, आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ; ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, 
तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. 
त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. 

समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का, की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे ? 
तसे, जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभवसारखाच येणार. 
म्हणजे, सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. 
त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची ? 

ईश्वराने मनुष्याला बरेवाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे. ती इतर प्राण्यांना नाही. 
त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून, 
आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. 
वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही.
 
सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या; आणि हे सर्व करताना सर्वकाळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. 

जगाकडून सुख मिळेल, ही कल्पनाच चुकीची आहे. 'तुझे आहे तुजपाशी । परि जागा चुकलासी ॥' 

आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे ? 

गीतेमध्ये भगवान सांगतात की, 'मन हे मीच आहे.' 
भगवंतावाचून मनाची तयारी होणार नाही. 
म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे, आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदासर्वकाळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. 
वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते.

*२३४ .  आपल्याला  हव्या  त्या  गोष्टी  देण्यामध्ये  भगवंताची  खरी  कृपा  नसून , असेल  त्या  परिस्थितीमध्ये  आपले  समाधान  टिकणे  ही  त्याची  खरी  कृपा  होय .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"