Tuesday, August 27, 2019

श्री दत्त - नाथ संप्रदाय

श्री दत्त - नाथ  संप्रदाय
🍁🍁🍁🍁🍁🍁

उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन-विष्णू-हसकमलासन-अत्री-दत्तगोपाळ-वेडा नागनाथ-निबंजनाथ- जनार्दन – एकनाथ-दत्तभाऊ -केशवबुवा-अंतोबादादा-दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.

दत्तसंप्रदाय- नवनाथ संप्रदाय

श्री नवनाथ संप्रदाय

नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत 'ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया' असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.

माहिती संकलनः श्री दीपक कुळकर्णी.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"