Friday, August 16, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १७ अॉगस्ट 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय   राम  ।।* 

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १७ ऑगस्ट  🌸* 

  *निष्ठेचा  परिणाम  फार  आहे .*

भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. 

आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा-बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. 
ती दोघे आपसात बोलत होती की, "आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको. तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ" 
त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, "तुम्ही का घाबरता ? आम्ही बरोबर आहोत ना ! आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो आहो; तेव्हा आपण जाऊ या." या नवराबायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही. 
पुढे एका दरीत गेल्यावर, त्या लोकांनी त्या बाईच्या नवर्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. 

पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, "रामा ! मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस !" 
एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले, आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले, आणि त्यांना घरी पोहोचवले. 
घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, "तसे जाऊ नका, थोडे गूळपाणी घेऊन जा." 
ते म्हणाले, "नको, आम्हाला फार कामे आहेत." ती म्हणाली,"थांबा जरा, मी आत्ता आणतेच." म्हणून ती आत वळली, तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. 

आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. 

सगुणभक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की, जेव्हा रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावे, "रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन, पण तू माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलो आहे." 
आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धिमेपणा म्हणजे धीर पाहिजे. 

जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सार्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे.

*२३० .  भगवंतावर  पूर्ण  निष्ठा  ठेवून  प्रपंच  करा ,  तो  खात्रीने  सुखाचा  होईल .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"