#रेकी - वैश्विक प्राणशक्ती
#प्रा. दयानंद सोरटे
अनेक वाचक मित्रांच्या आग्रहावरून मी आज या ठिकाणी रेकी आणि त्यामुळे मला आलेले काही अनुभव या ठिकाणी कथन करणार आहे. खरे तर रेकी हा जपानी भाषेतील शब्द आहे. रेकी या शब्दाचे स्पष्टीकरण करायचे म्हटले तर रे - म्हणजे वैश्विक आणि की - म्हणजे ऊर्जा किंवा प्राणशक्ती होय. ज्या शक्तीला आपण हिंदू धर्मामध्ये कुंडलिनी शक्ती या नावाने देखील ओळखतो. पूर्वीच्या काळी योगाभ्यासाचा सहाय्याने किंवा गुरु मार्फत शक्तिपात करून आपल्या शरीरातील षटचक्र जागृत करून कुंडलिनी शक्ती जागृत केली जात असे. परंतु त्याकाळी केवळ क्षत्रिय आणि ब्राह्मण या केवळ दोनच वर्णांना योगाभ्यास शिकण्याचा धार्मिक अधिकार होता. त्यामुळे सर्वसामान्य जण या विद्येपासून अलिप्त राहिले. त्यांना या शक्तीचा परिचय झाला नाही.याच शक्तीच्या बळावर पूर्वीचे ऋषीमुनी निरोगी दीर्घायुष्य जगत असत. वैदिक पूर्व काळामध्ये तर स्रियांना देखील योगाभ्यास करण्याचा अधिकार होता. देवी संध्या यानी ऋषीमुनींच्या सानिध्यात राहून योगाभ्यास करून अनेक दुर्मिळ विद्या अवगत केल्या होत्या. रामायण काळामध्ये देखील वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना कुंडलिनी जागृत करण्याकरिता योगाभ्यास शिकवल्याचा दाखला आहे. याच शक्तीच्या सहाय्याने नवनाथ आपले शरीर वज्राहून कठीण आणि कापसापेक्षा हलके करू शकत होते. याच शक्तीचा वापर करून हनुमानाने एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला होता. पुराणात असे अनेक दाखले आहेत. अलीकडच्या काळात म्हटले तर संत ज्ञानेश्वरांनी याच शक्तीच्या सहाय्याने आपल्या पाठीवर मांडे भाजले होते आणि याच शक्तीच्या सहाय्याने चांगदेव १४०० वर्ष जगला होता. पण जसजसा काळ बदलला तशी हि विद्या लुप्त होऊ लागली. आणि काही लोकांनी ती आपल्यापुरतीच मर्यादित ठेवली. याचे कारण , या विद्येचा कुणी दुरुपयोग करू नये हे देखील होते.
प्रत्येक जीवात्मा हा त्या परमात्म्याचा अंश आहे. जो प्रत्येक जीवांमध्ये अदृश्य स्वरूपात वास करतो. ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध दिसत नाही तो केवळ अनुभवता येतो त्याचप्रमाणे परमेश्वराच्या अस्तित्वाची केवळ अनुभूती करता येते. ज्यावेळी मुलाचा जन्म होतो. म्हणजे जेव्हा मूल मातेच्या उदरातून बाहेर येते. त्यावेळी हि तेजस्वी शक्ती आकाशमार्गाने येऊन मुलाचे टाळू भेदन करून सहस्त्रार चक्राद्वारे प्रवेश करून शेवटच्या म्हणजे मूलाधारचक्रामध्ये ( कमरेच्या माकड हाडाजवळ ) स्थिरावते. ती सापाप्रमाणे तीन वेटोळे घालून त्या ठिकाणी साधारणपणे सुमारे साडेतीन वर्ष स्थिर अवस्थेत असते. आणि साडेतीन वर्षानंतर ती ऊर्ध्व दिशेने म्हणजे वर सरकायला सुरवात करते. म्हणजे ती मूलाधार चक्रातून स्वाधिष्ठान चक्राकडे सरकण्याचा प्रयत्न करते. म्हणून तीन वर्षापर्यंत मुलाला जेवढे चांगले संस्कार करता येतील तेवढे करावेत. कारण तेव्हा त्याला षड्रिपूंनी ग्रासलेले नसते. त्याला तुझे - माझे कळत नसते. या दरम्यान त्याच्यावर केवळ चांगले संस्कार झाले तर हि शक्ती नैसर्गिकरित्या सहजतेने स्वाधिष्ठान चक्रामध्ये येते. पण या दरम्यान मुलावर चुकीचे संस्कार झाल्यास ती शक्ती मूलाधार चक्रामध्येच स्थिर होते. तिची गती स्थगित होते.
म्हणूनच लहान मुलाची टाळू कमजोर असते. ती शक्ती त्या टाळूचे भेदन करून आत गेल्याने लहान मुलाच्या टाळूचा भाग कमजोर असतो. काही लोकं पायाळू असतात. म्हणजे त्यांचा जन्म पायाकडून झालेला असतॊ . अशा लोकांच्या पायाच्या तळव्यातून ती शक्ती आत शिरते. आणि मूलाधार चक्रात जाऊन स्थिरावते. त्यामुळे अशा लोकांच्या पायामधे एक प्रकारची दैवी शक्ती आलेली असते. तुम्ही अनेकदा ऐकले किंवा पाहिले असेल. कि मानेमध्ये किंवा पाठीमध्ये चमक भरल्यास पायाळू लोकांकडून पाय उतरून घेतल्यास चमक लगेच उतरते. याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे हे मला ठाऊक नाही पण अध्यात्मिक कारण सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता काही मित्र म्हणतील कि अशा मुलांची देखील टाळू उडत असते. पण हि शक्ती त्यांच्या टाळूतून देखील आत शिरते पण ती अंशतः असते. कारण अशा मुलांचा जन्म पायाकडून झाल्यामुळे त्या शक्तीचा आघात त्यांच्या तळपायावर जास्त होतो त्यामुले त्याचा लाभ त्यांच्या पायाला जास्त होतो. याचाच अर्थ असा होतो कि जन्मताच हि शक्ती तुमच्या - माझ्या किंवा सर्वांच्याच शरीरामध्ये स्थित असते. केवळ आपल्यावर होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट संस्कारांमुळे तिची गती मंदावलेली असते. स्वामी समर्थ, साई बाबा , गौतम बुद्ध , येशू ख्रिस्त यांच्या अगोदरपासूनच हि शक्ती त्यांच्या आज्ञाचक्रामध्ये स्थिरावलेली असल्यामुळे हे महात्मे कोणताही चमत्कार करू शकत होते. हि झाली रेकी किंवा कुंडलिनी शक्तीची ओळख . आपण पुढच्या भागामध्ये या शक्तीचा नव्याने शोध कसा लागला आणि तो शोध कुणी लावला हे जाणून घेऊ पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार !
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"