Tuesday, August 27, 2019

उपासना अनुष्ठान व परमर्थातील सिद्धी

उपासना अनुष्ठान व परमर्थातील सिद्धी

तपश्चर्येचे सर्वांत शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही; त्यालाच शरणागती म्हणतात; आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्‍गुरूचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्‍गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी.

रोज नियमाने परमार्थपर काहीतरी वाचावं. थोड वाचावं पण ते रोजच्या आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करावा. कारण परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे. आपल्या घरातील मंडळी ही भगवंतानेच आपल्याला दिली आहेत ही भावना ठेवावी. त्यांना कसलाही त्रास होणार नाही असेच आपण वागावे. आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करावे. कोणतीही गोष्ट मनापासून करण्याची सवय लावून घ्यावी. कर्म अगदी मनापासून होऊ लागले की त्यामध्ये आपण स्वतःला विसरायला लागतो. यामध्येच फलाची आशा सुटण्याचा मार्ग आहे. स्वतःचा विसर पडण्या मधेच भगवंताच्या अस्तित्वाची खरी खूण आहे. रोज थोडावेळ तरी स्वतःला विसरायला शिकावं. हे साधण्यासाठी भगवंताच्या स्मरणाची फार आवश्यकता आहे. भगवंताच्या चरणीं वृत्ती लीन होणे यालाच समाधी असे म्हणतात.
वासनेच्या म्हणजे हवेपणाच्या तीन अवस्था आहेत, एक आस, दुसरी हव्यास, आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे; हव्यास मध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो, त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या, म्हणजेच आपले हवे-नको पण, आधी तोडाव्या, आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले, तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल; आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवद्‌स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे ? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का ? आणि चांगल्या वासनासुद्धा नीति आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो, आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो. जो जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे राहण्याने वासना क्षीण होईल.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"