Friday, February 1, 2019

दीर्घायुष्यासाठी मन:स्वास्थ्य आवश्यक*

*दीर्घायुष्यासाठी मन:स्वास्थ्य आवश्यक*
--------------------------------------------------
अनेक लोक भरपूर वर्षे जगतात. त्यांना त्या मागचे रहस्य विचारल्यावर ते आपल्या परीने उत्तर देतात. ते दीर्घायुषी असतात पण त्यांनी सांगितलेले त्यामागचे रहस्य खरे आणि शास्त्रशुद्ध असतेच असे नाही. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे ९९ वर्षे जगले. त्यामागचे कारण आणि रहस्य विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, स्वमूत्र प्राशन हेच माझ्या दीर्घायुष्याचे रहस्य होय. त्यांचे बघून अनेक लोक हा प्रयोग करायला लागले पण ते लोक काही फार जगले नाहीत. असाच प्रकार ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या बाबतीत घडला. ते ९४ वर्षे चांगले आयुष्य जगले. त्यांना या प्रदीर्घ जगण्यामागचे रहस्य विचारले असता ते म्हणाले, सिगारेट ओढणे हेच माझ्या दीर्घायुष्याचे रहस्य.

या बाबत डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा सिगारेट ओढल्याने माणूस दीर्घायुषी होतो या दाव्याची चर्चाही होणे शक्य नव्हते. पण ब्रिटनचा पंतप्रधान राहिलेला माणूस ज्या अर्थी असे म्हणतो त्या अथीं त्यात काही तरी तथ्य असणारच असे सामान्य लोक बोलायला लागतात.मात्र हे दोन नेते पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचे वैद्यकीय ज्ञान चांगले आहे असे मानण्याचे काही कारण नाही. ते दीर्घायुषी आहेत पण त्यांच्या दीर्घायुष्याचे कारण त्यांनाच नीट माहीत नाही. खरे कारण त्यांची प्रबळ इच्छाशक्ती हे आहे. या एका गुणावर त्यांना नव्वदीपेक्षाही अधिक असे निरोगी आयुष्य लाभले होते. म्हणून डॉक्टर आणि वैद्यकीय संशोधक आता असे म्हणायला लागले आहेत की निरोगी जीवनात चांगल्या आहाराचे, नियमित दैनंदिनीचे आणि व्यायामाचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व मन:स्वास्थ्याचेही आहे.

अनेक विद्यापीठात यावर संशोधन झाले आहे. निवृत्त झालेल्या वृद्धांना अचानकपणे मोकळेपणाला सामोरे जावेला गते आणि ते त्यामुळे अस्वस्थ होतात पण त्यांचा जनसंपर्क चांगला असेल तर त्यांच्या आयुष्यात निवृत्तीमुळे आलेली पोकळी भरून निघते. एखादा छंद त्यांना जीवनातला आनंद मिळवून देतो. त्यातल्या त्यात घरातले वातावरण त्यांच्या जगण्यावर परिणाम करीत असते. याची कारणमीमांसा करताना अमेरिकेतल्या मानसशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, एकट्या पडलेल्या वृद्घांना मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी घरातले कोणी तरी जवळ असावे लागते. त्यातून मन मोकळे होऊन त्याच्या मनावरचा भार कमी होतो आणि आरोग्य चांगले रहाते. मात्र असे कोणी नसेल तर असे लोक विशेषत: पुरुष लवकर मरतात पण ज्यांना मन मोकळे करण्याची संधी मिळते ते प्रदीर्घकाळ जगतात.
=≠====================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच‌ समुह*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"