Monday, February 18, 2019

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!

'कर्मण्येवाधिकारस्ते..' साधारणपणे 'फळाची आशा न धरता कर्म करा' असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं, कधी मिळेल यावर तुमचा हक्क नाही. म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका, असं म्हणणं जास्त उचित.

आत्म्याची अमरता व स्वधर्मपालन याविषयीचं मार्गदर्शन करून भगवंतांनी अर्जुनाला 'लढणं' हेच तुझं कर्तव्य आहे, तोच तुझा धर्म आहे, हे सांगितल्यानंतरही आपल्या हातून आप्त-गुरुजनांचा मृत्यू घडल्यास आपल्याला घोर पाप लागेल, ही अर्जुनाच्या मनाची धारणा त्याला त्रास देत होती. निर्णय घेण्यापासून परावृत्त करत होती.

अर्जुनाची ही मनस्थिती पाहून भगवंतांनी त्याला पुन्हा समजावलं. भगवंत म्हणाले, ''अर्जुना, अरे पाप-पुण्य, जय-पराजय या गोष्टी युद्धाच्या अंती परिणामांच्या रूपाने समोर येतील. युद्ध सुरू होण्याच्या आधीच परिणामांच्या विचाराने तू हताश झालास तर तुझी युद्धकर्तव्यातील एकाग्रता नाहीशी होईल. युद्धाच्या वेळी अशी अस्थिर मनोवृत्ती असणं चांगलं नाही. मनाचा समतोल ठेवून युद्ध कर. तुझ्या  हातून घडणारं युद्धासारखं कर्मसुद्धा 'कर्तव्य व स्वधर्मपालन' असल्याने त्याचं तुला पातक लागणार नाही. तू कर्मबंधातून सुटशील.''

या ठिकाणी भगवंत 'कर्मबंध' असा शब्द वापरत आहेत. कर्माचं बंधन म्हणजे कर्मबंध. कर्माचा साधा अर्थ आहे कोणतीही क्रिया! प्रत्येक कर्माचं फळ ठेवलेलंच आहे, असा कर्माचा सिद्धांत आहे. हेच त्याचं बंधन आहे. कर्मावर आधारित एक फार प्रसिद्ध श्लोक गीतेत आहे :

   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥२.४७॥

साधारणपणे 'फळाची आशा न धरता कर्म करा' असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. पण खरं तर या श्लोकात जो 'अधिकार' हा शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. गीता सांगते, ''तुझा फक्त कर्म करण्यावरच अधिकार आहे. कोणतं कर्म करायचं? कसं करायचं? हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं व कधी मिळेल यावर तुमचा काहीच हक्क चालत नाही. म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका, असे म्हणणे उचित ठरेल. 

खरं तर, सर्वसामान्य माणूस जेव्हा एखादं कार्य करायचं ठरवतो, तेव्हा त्याला त्यापासून काही ना काही मिळवण्याची अपेक्षा असते. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सकाळच्या चहाच्या कपापासूनसुद्धा समाधान किंवा तरतरी अपेक्षित असते. इतर सर्व कामंसुद्धा शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा फळांसाठीच केली जातात. काही नको असेल किंवा काही मिळणार नसेल तर माणूस काहीच हालचाल करणार नाही. म्हणजेच फळाची आशा असतेच! 

मग हा श्लोक काय सांगतो? फळाची चिंता करता करता काम करायला लागाल तर प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष होईल. तुम्हाला जे फळ अपेक्षित आहे ते तसंच मिळण्यासाठी तुमचं कर्म त्या फळाच्या कसोटीला उतरेल इतकं व्यवस्थित व्हायला हवं. भविष्याच्या काळजीपायी वर्तमानाकडे लक्ष रहाणार नाही. शिवाय जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्यावर विचार करण्यात काय अर्थ आहे? तेव्हा फळाची आसक्ती न धरता, पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते कर्म जास्तीत जास्त सुंदर, योग्य, विवेकपूर्ण करा. जसं कर्म तसं फळ मिळेलच. चांगल्या कर्माचं चांगलं फळ उपभोगायचं तर वाईट कर्माची वाईट फळं भोगायची. या कर्माच्या सिद्धांतापासून सुटका नाही. हे माहीत असल्यामुळेच नरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनाची अशी स्थिती झाली होती. 

गीतेला मनुष्यप्राण्याची गमतीशीर मनोवृत्ती चांगलीच माहीत आहे. म्हणून श्लोकाच्या दुसऱ्याच ओळीत भगवंत बजावत आहेत की, फळाकडे ध्यान द्यायचं नसेल तर काही कर्मच करायचं नाही, असंही तू करू नकोस. कारण कोणीही कर्म केल्यावाचून क्षणभर राहू शकत नाही. तेव्हा कर्मच न करणं हा विचार चुकीचाच आहे. अशा परिस्थितीत काही जण म्हणतील की आम्ही कर्म करणार आणि फळं चाखणार. काही म्हणतील की फळ मिळणार नसेल तर कर्मच करणार नाही. गीता सांगते, 'कर्म तर कराच, पण फळ सोडा. फळाची आसक्ती फळावरचं ध्यान, चिंतन सोडा. कुठल्याही बाजूचं फळ मिळालं तरी मनाचा तोल ढळणार नाही अशी मनाची तयारी करा. जय-पराजय, सुख-दु:ख, लाभ- हानी अशा कुठल्याही परिणामाने विचलित होणार नाही अशी सम-भावना मनात ठरवून घ्या.

अशा प्रकारे गीता, मानवी मनाच्या विकासाची एक पायरी सांगते. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानराचा नर झाला आणि शारीरिक विकास परिपूर्ण झाला. इथून पुढे विकास व्हायला हवा तो मानसिक-तरच नराचा नारायण होईल. गीता आपल्याला या मार्गाची ओळख करून देते. अपेक्षा न ठेवता कर्म करीत रहाणं व फळाची आशा न ठेवणं हा मानसिक विकासाचा टप्पा आहे.

मनात कुठलीही कामना न धरता जेव्हा कार्य केलं जाईल तेव्हा ते निष्काम कर्म होईल. गीता निष्काम कर्माला महत्त्व देते. मनातील कर्तव्याची इच्छा आणि बुद्धीचा त्या दृष्टीने वापर अशी सांगड घालून एकाग्रतेने व कौशल्याने कर्म कराल तर बुद्धी कर्माशी साधली जाईल. योगबुद्धी होईल. कारण 'योग' म्हणजे सांधणे-जोडणे. कर्मापेक्षाही कर्म करताना कोणत्या विचाराने किंवा हेतूने कर्म युक्त आहे हे महत्त्वाचे असते. 

या ठिकाणी गीता 'योग' या शब्दाच्या दोन सुंदर व्याख्याच सांगते. 'समत्व योग उच्यते' आणि योग कर्मसु कौशलम्'! समतोल व स्थिर बुद्धी असेल तर कर्म कौशल्यपूर्ण आपसूक होईल. योग साधेल.

माणसाला जीवनात सुख व शांती यांचीच आस असते. सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते. पण मनाची शांती तेव्हाच मिळेल जेव्हा भविष्यकाळाची चिंता नाहीशी होईल. 'आपण आपलं काम नीट करू , मग काय व्हायचं ते होईल,' अशी मनाची धारणा एकप्रकारची शांती देईल. आपली इंद्रियं सतत वखवखलेली असतात. त्यावर थोडा काबू ठेवला की आपोआप गरजा, अशांती, चिंता या गोष्टींपासून सुटका होईल. अशा तऱ्हेने मनोवृत्ती विकसित करता येईल व मनाला, बुद्धीला स्थिरता येईल.

भगवंत सांगतात, की 'अशा समबुद्धीने व स्थिर चित्ताने कर्तव्य करणारे लोकच कर्मबंधातून मुक्त होतात. निष्काम कर्म कर, असे झाल्यास तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. निष्काम कर्म, स्वधर्मपालन, समतोल व संयमी बुद्धी, इंद्रियांवर पूर्ण ताबा, काम-क्रोधावर विजय या सर्व गोष्टींमुळे तू पूर्ण स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ होशील व तुला 'ब्राह्मी' स्थिती प्राप्त होईल.   
कर्मयोग म्हणतो की, 'निरंतर कर्म करा. परंतु कर्मावरील आसक्तीचा त्याग करा.' कशाशीच एकजीव होऊन जाऊ नका, कशालाच चिकटून राहू नका. मन स्वाधीन ठेवा. आपल्या आयुष्यातील दुख,  कष्ट या पैकी काहीच चिरस्थायी नाही. दारिद्रय, समृद्धी, सुख इत्यादी सर्वच क्षणिक आहे. त्याचा आपल्या खऱ्या स्वरूपाशी काहीच संबंध नाही. स्वरूपत आपण सुखाच्या आणि दुखाच्या, प्रत्यक्षाच्या किंवा कल्पनेच्या अगदी पलीकडचे आहोत आणि तरीही आपल्याला अखंड कर्म आचरीत गेलेच पाहिजे- नान्य पन्था!'    

-स्वामी विवेकानंद

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"