Thursday, June 6, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ७ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचन  ::  ०७  जून  🌸*

*नित्यनेम  म्हणजे  काय ?*

नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नेम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण ? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ, जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे ? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे, हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम होय. 

आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही; आणि देह हा जड, अशाश्वत असल्यामुळे देहाने, नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. 

म्हणून, देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे, आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे, असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे.

 इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नानसंध्यादि नित्यकर्मे, वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये. एवढाच हट्ट क्षम्य आहे.

शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे, नामाने भावना शुद्ध होत जाते. 

खरे म्हणजे, मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरूरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरूरी, परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. 

भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात, आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. 

शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय, काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून, मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते, आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. 

लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना, तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते, असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे.

*१५९.  ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले, तरी त्याने नाम सोडले नाही.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"