*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*🌸 प्रवचने :: ०२ जून 🌸*
*भगवंतावर अकारण प्रेम करावे .*
खरोखर, जगात आणि लौकिकांत आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल.
आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय ,परमार्थ साधत नाही.
मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे.
जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट, जिथे खरे समाधान आहे, तिथे चांगल्या शक्ति मदत करतात.
आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही.
देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे; म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल.
स्वार्थ सुटताना पहिल्या पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल. पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निःस्वार्थी राहील.
खरोखर, परमार्थ हे एक शस्त्र आहे; त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा; पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे.
भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे.
भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ.
परमार्थाला डोके शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ति दिसू लागली. झाले ! त्याला वाटले की देव आपल्याला भेटला. पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे.
परमार्थाची काळजी करू नये; ती काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणार्या गुणांचे आहे.
आपण साधन करीत असताना, आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये. समजा, आपण आपल्या परसात एक झाड लावले, आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो, तर ते झाड वाढेल का ? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे.
मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते.
*१५४. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही. तो निव्वळ स्वतःकरिता आहे.*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"