।। श्री ।।
कल्याणा छाटी उडाली!🌷🌷🌴🚩॥श्री॥🚩🌴🌷
सज्जनगडावर असताना एकदा जोराचा वारा सुटला त्यामुळे समर्थांच्या अंगावरील वस्त्र (छाटी) वा-याने उडाले समर्थ उद्गारले "कल्याणा छाटी उडाली" हे वचन ऐकताच कल्याणस्वामीनीं त्या कड्यावरून तात्काळ उडी टाकली आणि समर्थांचे वस्त्र हवेतच झेलले. सज्जनगडावर आजही ही जागा कल्याणछाटी स्मारक म्हणून दाखवतात. आपल्या सद्गुरुचे वस्त्र मलिन होऊ नये म्हणून केलेले हे साहस होते.
खांडुकची गोष्ट :
आसेच एकदा समर्थांना पायाला खांडुक(गळु) झाल्यामुळे अत्यंत तीव्र वेदना होत होत्या. त्यावरचा उपाय म्हणजे ते खांडुक चोखून मोकळे करणे हा होता. पण या कामास कोणीच तयार होइना. हे पहताच कल्याणस्वामींनी समर्थांचा पाय हातात घेतला आणि त्या खांडुकावरील पट्टी सोडून त्याला तोंड लावले, तो त्यातून अत्यंत सुमधूर आंबा निघाला. शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी समर्थ अनेक लीला करीत असत श्रीकल्याणस्वामींची गुरूभक्ती पाहून सर्वजण आवाक झाले.
समर्थांच्या वस्त्रांना नमस्कार :
नेहमीप्रमाणे कल्याणस्वामी नदीवर वस्त्र धुण्यासाठी घेऊन गेले त्यांनी स्वतःचे व समर्थांचे वस्त्र वेगळ्या ठिकाणी ठेवले. आधी समर्थांचे वस्त्र धुवून त्याला नमस्कार केला. हे पाहून तेथील इतर लोकांनी त्यांना यामागचे कारण विचारले तेव्हा कल्याणस्वामी म्हणाले "ही वस्त्रे माझ्या गुरुंची श्री समर्थ रामदासस्वामींची आहेत म्हणून ती मला पूज्य आहेत". हे ऐकून ते लोकही कल्याणस्वामींबरोबर समर्थांच्या दर्शनाला गेले.
विड्याची पाने :
एकदा समर्थ आपल्या शिष्य परिवारासह रामच्या घळीमध्ये होते. अगदी मध्यरात्री समर्थांनी पान खाण्याची इच्छा व्यक्त केली परंतु तेव्हा तिथे विड्याची पाने नव्हती म्हणून कल्याणस्वामी इतक्या काळोख़ात त्या घनदाट अरण्यात पाने आणण्यास गेले. परंतु ते बराच वेळ परत न आल्यामुळे स्वतः समर्थ त्यांच्या शोधात निघाले तर काही अंतरावर कल्याणस्वामी निपचित पडलेले दिसले. त्यांना विषारी सापाने दंश केला होता. त्यानंतर समर्थांनी ते विष उतरवले व सर्वजण परत घळीमध्ये आले.
ब्रह्मपिसा :
एके दिवशी श्रीसमर्थांनी शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मपिस्याचे सोंग घेतले. जटा सोडल्या, कपाळावर शेंदूराचा मळ्वट भरला व हातामधे तलवार घेऊन रौद्ररूप धारण केले. सज्जनगडाव्रील शिष्य भयभीत झाले, भोजन भाऊ चिंताग्रस्त झाले. तेंव्हा कल्याणस्वामी गडावर नव्ह्ते. मग काही शिष्यांनी कल्याणस्वामींना बोलावून घेतले व समर्थांना वेड लागले आहे असे सांगु लागले. तेंव्हा हासून कल्याणस्वामी समर्थ जिथे होते तिकडे निघाले. कल्याणस्वामींना पहातच श्रीसमर्थ म्हणाले "कल्याणा जवळ येऊ नकोस नाहितर तुझी खांडोळी करून टाकीन". तरीही कल्याणस्वामी शांतपणे समर्थांच्याकडे जाऊ लागले. तेंव्हा कल्याणस्वामी म्हणाले "गुरूसेवा करताना गुरूच्या हातून आलेला मृत्यू हाच मोक्ष". कल्याणस्वामींची ही गुरूनिष्ठा पाहून समर्थांनी हातातील तलवार टाकून दिली व कल्याणस्वामींना आलिंगन दिले. आजही सज्जनगडावर हे स्थान दाखविण्यात येते.
श्रीसमर्थांचे महानिर्वाण :
माघ वद्य नवमी शके १६०३ रोजी समर्थ रामदासस्वामी यांनी सज्जनगड येथे अवतार समाप्ती केली. आपल्या सद्गुरूंनी नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे दर्शन अपल्याला लाभले नाही. हे कळताच कल्याणस्वामींना दुःख अनावर झाले. समर्थ दर्शनाच्या ओढीने ते सज्जनगडावर आले. श्री समर्थांच्या समाधीला अश्रूंचा अभिषेक घातला. आपला प्रिय शिष्योत्तम कल्याण आपल्या दर्शनासाठी आला आहे हे पाहून समर्थांनी कल्याणस्वामींना सगुणरूपात दर्शन दिले. समाधी दुभंगली. समर्थांचे ज्योतीर्मय सगुणदर्शन घेऊन कल्याणस्वामी सज्जनगडावरून खाली आले. त्यांना समर्थांनी सांगीतले की, मी देहरूपाने जरी नसलो तरी दासबोध, आत्माराम हे ग्रंथ माझीच रूपे आहेत. त्यामुळे दुःखी होऊ नये. मी निरंतर आहे. समर्थांचा हा गुरू उपदेश घेऊन कल्याणस्वामी गड उतरले. परंतु त्यानंतर मात्र ते परत कधीही सज्जनगडावर गेले नाहीत. सज्जनगडावर सर्वत्र समर्थांच्या वास्तव्याच्या खुणा आहेत. त्यामुळे त्यांना सर्व सज्जनगडच समर्थरूप वाटू लागला. प्रतिवर्षी ते सज्जनगडच्या पायथ्याशी जात व तेथूनच श्री समर्थांना नमस्कार करत असत.
धन्यही गुरूभक्ती.
आत्मारामस्वामी म्हणतात, || कल्याणस्वामी सत्सिष्यमोठा| सद्गुरूपायी जडलीसी निष्टा|| हृदयी झालासे परमार्थसाठा| सदा संतुष्टांमाजी वसतु||
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"