॥ ब्रह्मांडनायक श्रीस्वामींच्या हातातील गोटीची कथा ॥
श्रीस्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, 'अरे सख्या, तुला पाहायचे आहे का, ते काय आहे?' असे म्हणून त्यांनी गोटी टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले. सहजलीलेने श्रीस्वामीदेवांनी ते आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. ती भगवन्मूर्ती पुढे म्हणाली, 'आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे. आम्ही सोडले की सारे संपले.'
हा रोमांचकारी संवाद श्रीस्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे या संस्थेचे अध्वर्यु शिरीषदादा कवडे यांच्याबरोबरील चर्चेवेळी समजला. मामासाहेबांची परंपरा श्रीस्वामीदेव व थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती अशी आहे. मामांचे पट्टशिष्य असलेल्या दादांकडून श्रीस्वामींच्या 'ब्रह्मांडनायक' बिरुदाविषयी जशी स्पष्टता होते, तशाच स्वरूपाचा एक वेगळा अनुभव श्रीस्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे तथा श्रीस्वामीसुतमहाराज यांनी लिहून ठेवला आहे.
श्रीस्वामीसुतांनी लिहिलेल्या 'श्रीस्वामी समर्थ जन्मकांड' प्रकरणात स्पष्ट उल्लेख आहे की हस्तीनापुर नजीक भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत आहे. ॥ विजयसिंगे ही गोटी । वटवृक्षछायेस गोमटी । भगवंत मानोनिया जगजेठी । मांडोनिया खेळतसे । नाव घेऊनी भगवंताचे । गोटी आहे कौतुक त्याचे ॥ असा तो खेळताना काय करत आहे पहा! एकटाच बोले आपसांत। म्हणे देवबापा खेळ वेगी॥१९॥ असे म्हणत तो स्वत:चा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वत:च खेळत होता. अशाप्रकारे भगवत्स्वरूपात नित्य मग्न असलेल्या आठ वर्षांच्या विजयसिंगाच्या निमित्ताने भगवान श्रीगणेशांच्या साक्षीने श्रीस्वामी समर्थ प्रकटले.
श्रीस्वामी आपल्या भक्तासोबत खेळण्याची लीला दाखविताना त्या वडाखाली एक श्रीगणेश मंदिर असून, त्या मोरयाचे नाव श्रीवक्रतुंड होते. विशेष म्हणजे श्रीस्वामीदेवांच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत श्रीवक्रतुंड मोरया मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून चालत बाहेर आले. या खेळात रामसिंग, हरिसिंग हे दोन भक्तगणही आहेत. हे हरिसिंगच पुढे श्रीस्वामीरायांचे सुत म्हणून गणले गेले. कर्मधर्मसंयोगाने या नव्या जन्मातही त्यांचे नाव हरिभाऊ असेच होते!
या सर्वांच्या खेळावेळी जी मौज घडली त्याचे अवलोकन करता श्रीस्वामी समर्थ स्वरूपाच्या एका वेगळ्याच दर्शनाने आपण भारावून जाल. या वर्णनाच्या आरंभी श्रीस्वामीसुत म्हणतात, दत्त माझा अवतरला । दीन भक्ताच्या काजाला ॥ हा श्रीदत्तप्रभूंचा झालेला उल्लेख श्रीस्वामी समर्थांना उद्देशून नाही, हे इथे विशेष आहे. स्वामीसुत म्हणतात, गोटी गोटीचा हा वाद म्हणजे खेळ चालू असताना हरीसिंग हसतो आहे. वक्रतुंड गजाननही अपुल्या चरणांतील नूपुरांचा नादब्रह्म वातावरणात उमटवित, आपली गजशुंडा प्रेमभावाने हलवित दाद देत आहेत. तेव्हा तेथील मंदिराच्या एका खांबातून भगवान श्रीविष्णु प्रकटले. तर श्रीस्वामीदेवांनी टाकलेल्या एका गोटीतून - ती फोडून श्रीदत्त बाहेर आले. विष्णू स्तंभी प्रकटले । दत्त गोटी फोडुनि आले ॥ माझ्या स्वामींची करणी । कंप होतसे धरणी॥ असे श्रीस्वामीसुत म्हणतात.
श्रीस्वामीमहाराजांचे स्वरूप हे असे आगळे आहे. हळूहळू समजून घ्यावे. ईश्र्वरीय कृपेने ज्यांस सद्गुरु लाभतील, अशा भाग्यवंतास त्या सुयोग्य श्रीगुरुंच्या माध्यमातून श्रीस्वामी समर्थांचे समग्र दर्शन होईल. श्रीस्वामीरायांच्या हाती गोटी आहे, ब्रह्मांड आहे नि त्यात विविध देवताही आहेत. वाचकहो, आता अभिप्रेत आहे तुमच्या प्रतिक्रियांची दिव्य पुष्पे श्रीसमर्थ चरणी कशी वाहिली जातात ते! हे श्रीस्वामीवैभव आमचे मित्र म्हणून तुम्हाला दिसते तसेच ते तुमच्या देवभक्त मित्रांना दिसते आहे का? नसेल तर त्यांच्या Timeline वर share करा. आणि होऊ द्या प्रदीर्घ चर्चा या महत्त्वपूर्ण विषयावर!
- संजय नारायण वेंगुर्लेकर
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"