पंचांग म्हणजे काय ? का आहे पंचांगाची आवश्यकता?
पुढील लेख हा येकदम शांतपने आन निवांतपणे वाचा बरका!!
कालचक्र हजारो वर्षापासून, पृथ्वीच्या निर्मितीपासून अव्याहत चालू आहे. माणूस जसा उत्क्रांत होत गेला तसा एकमेकांशी बोलण्यासाठी भाषांचा जन्म झाला. त्याचबरोबर त्याला काळाचं मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली. या गरजेतूनच पंचांग जन्माला आलं. ऋषी मुनींनी हे ज्ञान पिढ्यानपिढ्या संक्रमित केलं. काळ मोजण्यासाठी जे प्रमुख घटक लक्षात घेतले जातात व त्यांची साद्यंत माहिती ज्यात असते त्याला पंचांग असे म्हटले जाते. जसे आपल्याला अंतर मोजायचं असेल तर आपण ते किलोमीटर, मैल इत्यादी परिमाणात मोजतो. वेळ मोजण्यासाठी आपण तास, मिनिट, सेकंद हि परिमाण वापरतो तसेच आपल्या हिंदू संस्कृती म्हणा किंवा धर्म म्हणा, काळ मोजण्यासाठी वार, तिथी, नक्षत्र, योग, करण हे पाच घटक कालामापनासाठी वापरले जात आले आहेत.
आपल्या ज्योतिष शास्त्रात याचा उपयोग यासाठी होतो कि एखाद्या विशिष्ट वेळी एखादा विशिष्ट ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या राशीत आहे, हे कळल्यावर त्याद्वारे फलादेश देता येतो. जातकाचा जन्म एखाद्या विशिष्ट योगावर, करणावर झाला असता त्याचा स्वभाव, त्याच्या आयुष्यात येणारा बरा वाईट काळ, घडणार्या चांगल्या वाईट घटनांचा अंदाज घेता येतो.
प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट नक्षत्रात व राशीत असतो त्याप्रमाणे तो इतर ग्रहांबरोबर काही विशिष्ट योग तयार होतात त्यांचे मानवी जीवनावर निश्चित असे परिणाम होतात या सर्व गोष्टींचा अभ्यास करून फलादेश देण्याकरिता पंचांगाची आवश्यकता असते. विविध प्रकारच्या कुंडली तय्रार करण्याकरिता पंचांगाची गरज असते. स्पष्ट ग्रह साधन, स्पष्ट भाव साधन इ गोष्टी पंचान्गाशिवाय होणार नाहीत. वार, तिथी, नक्षत्र, योग, करण या प्रमुख घटकांच्या व्यतिरिक्त संवत्सर, संवत, ऋतू, अयन, घटी, पळे, पक्ष, मास यांचा सुद्धा पंचांगात समावेश होतो.
दिवस, वास्तविक आपली सर्वसाधारणपणे दिवसाची व्याख्या काय आहे? रात्री १२:०० ते रात्री ११:५९ हा आपला एक दिवस. असे ३६५ दिवस म्हणजे आपले एक वर्ष. हे वर्ष आपण १२ महिन्यात विभागले ज्यांना आपण जानेवारी, फेब्रुवारी मार्च इ नावांनी ओळखतो. कालमापनाची हि पद्धत सर्वात जास्त जगभर प्रचलित आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला गणेश चतुर्थीचे व्रत करायचे आहे, होळी साजरी करायची आहे, चैत्र पाडवा साजरा करायचा आहे, दिवाळीत लक्ष्मी पूजन करायचं आहे. अगदी तुमच्या दिवंगत मातेचे किंवा पित्याचे श्राद्ध घालायचे आहे. दूरच्या प्रवासाला निघायचे आहे, नवीन वाहन खरेदी करायचे आहे अशावेळी आपल्याला इंग्रजी महिना आणि तारीख नव्हे तर तिथी, वेळ आणि मुहूर्त जाणून त्याप्रमाणे प्लान करावा लागतो, इथेच पंचांग आपल्या मदतीला येते. आता या पंचांगातील विविध घटकांची थोडक्यात माहिती आपण करून घेऊ. थोडक्यात यासाठी म्हटले कि जर विस्तृत माहिती घ्यायची म्हटले तर एक एका घटकासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
१) वार : पंचांग आणि आपली हिंदू संस्कृती या प्रमाणे एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंत च्या कालावधीला वार असे म्हणतात. म्हणजे रोजच्या सूर्योदयाला वार बदलतो. त्यालाच एक सावन दिवस असे सुद्धा म्हणतात . आता ज्यांना मंगळवारचे उपवास करायचे आहेत त्यांनी पार्टीला जाताना हा विचार केला कि रात्री १२ नंतर बुधवार लागतो तर हाणा चिकनवर ताव तर देवा, सबूर. तुम्हाला बुधवारच्या सूर्योदयापर्यंत थांबावे लागेल आणि सूर्योदयाची वेळ पंचांगामध्ये दिलेली असते, त्याप्रमाणे आपला उपवास आणि ओली -सुकी पार्टी प्लान करावी.
२) तिथी: आपले कालमापन जेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर अवलंबून असते तेव्हा तिथी हा शब्द जास्त व्यापक प्रमाणात आपल्याला गरजेचा होतो. आपलं जे क्रांतीवृत्त आहे त्याचे ३६० समान भाग गणिताच्या सोयीसाठी केले आहेत त्यापैकी प्रयेक एका भागाला अंश असे म्हणतात. चंद्र सूर्य सकट सर्व ग्रह एका विशिष्ट वेळी या क्रांतीवृत्ताच्या कुठल्याना कुठल्यातरी अंशावर असतात. आणि रोज त्यांचा त्यांच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे ते आपली जागा बदलतात काही अंश पुढे जातात यालाच त्या ग्रहांचे गोचर म्हणतात. तसेच प्रत्येक ग्रहाची गती हि वेगवेगळी आणि परस्परांच्या तुलनेत वेगळी असते. सर्वात जलद गती चंद्राची असते. क्रांतीवृत्ताच्या ३६० अंशाच्या चंद्राच्या प्रवासात तो १२ राशी आणि २७ नक्षत्रातून प्रवास करतो, म्हणजे एका विशिष्ट वेळी चंद्र कुठल्याना कुठल्यातरी राशीत आणि नक्षत्रात असतो. आज चंद्र कुठल्या राशीत आणि कुठल्या नक्षत्रात किती वाजेपर्यत आहे याची माहिती पंचांगात दिली असते. उदा. जर मला माझ्या नवीन गाडीची डिलिव्हरी घ्यायची असेल तर मी पाहीन कि चंद्र एखाद्या वायू तत्वाच्या राशीत आणि नक्षत्रात असावा त्याप्रमाणे मी पंचांग पाहून प्लान करीन. (एक एका राशीवर आणि नक्षत्रावर लिहायचं तर ३९ लेख होतील ) परत आपल्या मुळ विषयावर येऊ. चंद्राला सूर्यापासून १२ अंश पुढे जाण्यास जो काळ लागतो त्याला तिथी असे म्हणतात. आणि हा काळ कमी जास्त असल्यामुळे एक तिथी म्हणजे २४ तास असे समजणे चुकीचे होते. एक तिथी २४ तासापेक्षा कमी किंवा जास्तही असू शकते. चंद्राच्या या प्रवासात तो आपल्याला आकाशात दिसेनासा होतो त्यालाच आपण अमावस्या असे म्हणतो आणि कधी चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो त्याला आपण पौर्णिमा असे म्हणतो. म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी आहेत. एका अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत च्या चंद्राच्या प्रवासाला तिथी मध्ये विभागले आहे त्यांची नावे अशी - १ - प्रतिपदा, २- द्वितीय, ३- तृतीय, ४ - चतुर्थी, ५ - पंचमी, ६- षष्ठी, ७-सप्तमी, ८ -अष्टमी, ९- नवमी, १०- दशमी, ११- एकादशी, १२- द्वादशी, १३ - त्रयोदशी, १४ - चतुर्दशी, १५ - पौर्णिमा किंवा अमावस्या. चंद्राला एक तिथी पूर्ण करण्यास जो वेळ लागतो त्याला एक चान्द्रदिवस असे म्हणतात. असे ३० चान्द्रदिवस मिळून एक चांद्रमास (मास - महिना) होतो. एक चांद्रमास हा २ पक्षात विभागला जातो १५ तिथींचा मिळून एक पक्ष होतो. आता प्रत्येक पक्ष हा १५ दिवसांचाच असेल असे नाही. एक पक्ष हा १३ ते १६ दिवसांचाही असू शकतो. अमावस्या संपल्यानंतर पौर्णिमा पूर्ण होई पर्यंतच्या काळाला शुक्ल किंवा शुद्ध पक्ष असे म्हणतात आणि पौर्णिमा संपल्यानंतर अमावस्या पूर्ण होईपर्यंतच्या काळाला कृष्ण किंवा वद्य पक्ष असे म्हणतात. शुक्ल पक्षातील तिथींना शुक्ल प्रतिपदा, शुक्ल चतुर्थी, शुक्ल सप्तमी तर कृष्ण पक्षातील तिथींना कृष्ण पंचमी, कृष्ण अष्टमी, कृष्ण दशमी असे म्हणतात. पंचांगात प्रत्येक गोष्टीचा समाप्ती काळ दिलेला असतो. पूर्वी तो घटी व पळे या परिमाणात दिलेला असायचा पण सोयीसाठी आता तो तास व मिनिटे या परिमाणात दिलेला असतो. उदा. आज चतुर्थी समाप्ती २६:१३ असे दिलेले असेल तर रात्री १२ नंतर २४, २५, २६ असा मोजायचा म्हणजे चतुर्थी तिथी हि मध्यरात्री २ वाजून १३ मिनिटांनी समाप्त होते असा त्याचा अर्थ घ्यायचा. (२६:१३ म्हणजे मध्यरात्री २:१३ असा त्याचा अर्थ होतो.) मध्यच थोडे विषयांतर करू. हे अंश, कला, विकला काय कन्सेप्ट आहे ते पाहू. ३६० अंश मिळून एक क्रांतीवृत्त होते. एका अंशाचे ६० भाग केले १ कला होते. एका कलेचे ६० भाग केले कि एक विकला होते. म्हणजे ६० विकला म्हणजे एक कला. ६० कला म्हणजे १ अंश आणि ३६० अंश म्हणजे एक क्रांतीवृत्त जे १२ राशी आणि २७ नक्षत्रात विभागले आहे. ३६० अंशाच्या क्रांतीवृत्तात प्रत्येक राशीला ३० अंश दिले आहेत (१२ गुणिले ३० = ३६०) आता मूळ वर येऊ. आपण ज्या तिथी या कन्सेप्ट बद्दल माहिती घेतोय त्या तिथींना क्षय किंवा वृद्धी असते. तिथी हि सूर्य चंद्राच्या गतीवर अवलंबून असते. चंद्राची गती सूर्यापेक्षा जास्त आहे. चंद्राची गती जलद असल्यामुळे एखादे दिवशी तिथी सूर्योदयानंतर सुरु होते व दुसर्यादिवशी सूर्योदयापूर्वी समाप्त होते अशा तिथीला क्षय तिथी किंवा तिथीचा क्षय असे म्हणतात. एकाच पक्षात २ तिथींचा क्षय झाला तर त्याला क्षय पक्ष म्हणतात. तो पक्ष अनिष्ट असतो. अशाच प्रकारे चंद्राची गती जेव्हा मंद असते तेव्हा तिथी सूर्योदयापूर्वी सुरु होऊन दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत किंवा थोडा जास्त काळ विद्यमान असते तेव्हा याला तिथीची वृद्धी असे म्हणतात. थोडक्यात असे कि जी तिथी लागोपाठ दोन्ही दोन्ही सुर्योदायांना असते तेव्हा तिथीची वृद्धी झाली असे म्हणतात. मुहूर्त शास्त्रात या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे.
अशा या तिथींचे ५ प्रकार असतात. १. नंदा तिथी, २. भद्रा तिथी, ३. जया तिथी, ४. रिक्ता तिथी व ५. पूर्णा तिथी. प्रतिपदा, षष्ठी, एकादशी या नंदा तिथी आहेत. द्वितीया, सप्तमी, द्वादशी या भद्रा तिथी आहेत, तृतीया, अष्टमी, त्रयोदशी या जया तिथी आहेत. चतुर्थी, नवमी व चतुर्दशी या रिक्ता तिथी आहेत. (बरेचसे गणेश भक्त संकष्ट किंवा विनायकी चतुर्थीला आपल्या नवीन गाडीची डिलिव्हरी घेण्यासंबंधी आग्रही असतात. नवीन कार्यारंभ करतात त्यांना असे सुचवावेसे वाटते कि चतुर्थी हि रिक्ता तिथी असल्यामुळे अशा कामांना अनिष्ट असते सबब कुठलेही शुभ काम करणे टाळावे.) पंचमी, दशमी किंवा अमावस्या यांना पूर्णा तिथी असे म्हणतात. मुहूर्त शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यास शुक्ल पक्षातील (म्हणजे अमावस्या संपल्यानंतर) पहिल्या ५ तिथी अनिष्ट, षष्ठी पासून दशमी पर्यंत मध्यम. पुढील ११ पासून १५ पर्यंतच्या तिथी उत्तम असतात. कृष्ण पक्षात पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत उलट क्रम लावावा.
३) नक्षत्र : जे आपल्या जागे पासून किंचितही हलत नाहीत त्या तारकांचा समूहाला नक्षत्र असे म्हणतात. असे एकूण २७ नक्षत्र आहेत. क्रांतीवृत्ताच्या ३६० अंशाचे २७ समान भाग केले आहेत. प्रत्येक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. म्हणजेच क्रांतीवृत्तात प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती हि १३ अंश २० कलांची होते. पंचांगात रोजचे नक्षत्र दिलेले असते यालाच चंद्र नक्षत्र असे म्हणतात म्हणजे चंद्राचे गोचर भ्रमण त्यादिवशी त्या ठराविक नक्षत्रात असते. थोडक्यात चंद्राला क्रांतीवृत्तातील नक्षत्राच्या व्याप्तीचा १३ अंश २० कला भोगण्यास (भ्रमण करण्यास) लागणारा काळ म्हणजे एक चंद्र नक्षत्र होय. ज्योतिष शास्त्रात नक्षत्र हि अतिशय महत्वाची मानली गेली आहेत. कालनिर्णय करण्यासाठी नक्षत्र महत्वाची ठरतात. मुहूर्त शास्त्रात सुद्धा नक्षत्र महत्वाची ठरतात. प्रत्येक नक्षत्राची अधिपती ग्रह असतात. देवता असतात. स्वभाव असतात. तत्व असतात. त्याच्या बलाबलाप्रमाणे फलादेश अवलंबून असतात. (नक्षत्र यावर लिहायचे झाल्यास एक स्वतंत्र पुस्तिका निर्माण होईल, तेव्हा विस्तार भयास्तव एवढेच लिहितो.)
४) योग: योग हा शब्द मुल युज या संस्कृत धातूपासून तयार झाला. योग म्हणजे जोडणे. एकत्र करणे. रवी आणि चंद्र यांच्या भ्रमणाच्या अंशाची बेरीज १३ अंश २० कला झाली कि एक योग पूर्ण होतो. असे एकूण २७ योग असतात. ते पुढील प्रमाणे. विष्कम्भ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यतिपात, वरीयान, परीघ, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्मा, ऐंद्र, वैधृती. वरील पैकी हिरव्या अक्षरात लिहिलेले योग हे शुभ योग आहेत. ओनात्याही कार्याची सुरुवात या योगांवर केली असता यश मिळते. लाल अक्षरात लिहिलेले योग हे अशुभ आहेत. या योगांवर कुठलेही शुभ कार्य करू नये. बाकीचे योग हे संमिश्र फळ देतात.
५) करण: पंचांगाचे हे पाचवे अंग. करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. म्हणजे एका तिथीमध्ये २ करण येतात. केऊन ११ करण आहेत. १. किस्तुन्घ्न, २. बव, ३. बालव, ४. कौलव ५. तैतिल ६. गरज ७. वानिज ८. विष्टी ९. शकुनी १०. चतुष्पाद ११. नाग.
पंचांगाच्या या पाच प्रमुख घटकांव्यतीरिक्त आणखी काही कन्सेप्ट आहेत ते आपण पाहू.
चंद्र राशी: पंचांगामध्ये चंद्र रोज कोणत्या राशीत कधीपर्यंत आहे ते दर्शवलेले असते. क्रांतीवृत्ताचे ३० समान भाग केले असून प्रत्येक राशी हि क्रांतीवृत्ताचे ३० अंश व्यापते. एकूण १२ राशी आहेत हे सर्वज्ञात आहेच. चंद्र कोणत्या राशीत आहे त्यावरून दैनंदिन भविष्य वर्तवले जाते. पंचांगामध्ये ग्रहराशी प्रवेश यासंबंधी माहिती असते. म्हणजे कुठला ग्रह कुठल्या दिवशी कुठल्या तिथीला कुठल्या राशीत प्रवेश करणार हे दर्शवलेले असते. त्यावरून जन्म लग्न कुंडली बनविली जाते. स्पष्ट ग्रह साधन केले जाते.
पंचांगात आणखी काही शब्द प्रयोग आढळतात त्याविषयी माहिती घेऊ.
भद्रा: ज्या दिवशी विष्टी करण असते त्या काळालाच भद्रा किंवा कल्याणी असे म्हणतात. यावेळी शुभ व मंगल कार्ये करु नयेत. जारणमारण, उच्च्चाटन स्तंभन असले अघोरी प्रयोग करण्याकरिता हा काळ प्रशस्त मानतात. अर्थात ते आपले काम नव्हे.
घबाड योग: हा एक शुभ योग असून शुभ कार्याकरिता उत्तम असतो.
अमृतसिद्धी योग: रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असे योग म्हणजे अमृतसिद्धी योग असे म्हणतात. सर्व कार्यास शुभ असा हे योग मानतात पण गुरुवारी अमृत सिद्धी योग विवाहास वर्ज्य, शनिवारी अमृतसिद्धी योग प्रवासास व्यर्ज व मंगळवारी अमृत सिद्धी योग गृह प्रवेश व वास्तुशांती करिता वर्ज्य असा शास्त्रार्थ आहे.
मृत्यू योग: रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृगशीर्ष, शुक्रवारी आश्लेषा व शनिवारी हस्त नक्षत्र असता मृत्यू योग होतो. हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यास अयोग्य मानावा. मृत्युयोग म्हणजे मृत्यू होईल असे नव्हे.
यम घंट योग : रविवारी मघा नक्षत्र, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मुळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी, शनिवारी हस्त असे योग असता यम घंट योग असतो. हा योग अत्यंत अशुभ योग असून या योगावर कुठलेही शुभकार्य कधीही करू नये. या योगावर जन्म झाला असता जनन शांती करावी.
दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी, आणि शनिवारी नवमी असताना हा योग होतो. एक अशुभ योग असून सर्व कार्यास निषिद्ध मानतात. कपिलाषष्ठी योग : भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला सूर्य हस्त नक्षत्रात असेल, मंगळवार असेल, व्यतिपात योग असेल व चंद्र नक्षत्र रोहिणी असेल तर कपिलाषष्ठी योग निर्माण होतो. अत्यंत शुभ योग असतो. मंगळवार ऐवजी रविवार असतानासुद्धा हा योग निर्माण होतो. अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे.
प्रदोष: सूर्यास्तापासून पुढे ७२ मिनिटाचा कालावधी म्हणजे प्रदोष. चंद्र मासातील प्रत्येक पक्षातील त्रयोदशी जर प्रदोषकाळी ज्यादिवशी असेल त्यादिवशी पंचांगात प्रदोष असे लिहिलेले असते. सोमवारी, मंगळवारी व शनिवारी असा योग आला असता विशेष महत्वाचे मानतात. शिवपूजन, सत्यनारायण, उपवास इत्यादी धार्मिक कार्यास अनुकूल.
होरा: एका सूर्योदयापासून दुसर्या सुर्योदयापर्यंतच्या काळाला होरा असे म्हणतात. एक होरा साधारण १ तासाचा असतो. प्रत्येक वराला प्रत्येक होरा हा विशिष्ट ग्रहाच्या प्रभावाखाली असतो. उदा. रवीचा होरा रविवारी सूर्योदयापासून १ तास असतो. सोमवारी चंद्र, ,मंगळवारी मंगळ असे. याप्रमाणे त्यापुढील होरे ठराविक क्रमाने येतात. हा होरा ज्योतिष शास्त्रात महत्वाचा मनाला जातो. जातकाने ज्या होर्यावर प्रश्न विचारला असेल त्या होरा स्वामीच्या कारकत्वाखाली गोष्टींबाबत जातकाचा प्रश्न असतो. या व्यतिरिक्त पंचांगामध्ये नदी, योनी गण इत्यादी विषयी माहिती असते. अ व क ह डा चक्र असे एक कोष्टक असते. तर मंडळी याविषयी स्वतंत्र लेख अवश्य लिहीन तूर्तास आपली रजा घेतो. !!!
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"