भगवती कृष्णा हि विष्णुस्वरूपिणी आहे आणि म्हणूनच भगवान विष्णूंची चारही आयुधे ,शंख चक्र गदा पद्म हि कृष्णामातेच्या हातात दिसून येतात . सोबत येऊन कृष्णेला मिळालेली वेण्णा हि शिवस्वरूपिणी आहे त्यामुळे या कृष्णामातेचे रूप हे हरिहरस्वरूपिणी आहे . थोरले महाराज कृष्णालहरीत म्हणतात ,
रसज्ञा मे दत्ता मुनिनमितदत्तात्रजपदे
मुदे तस्यापीयं प्रभवति न किं साधुलहरी
हरीशात्मा कृष्णा यत इयमभूद्दत्तदयिता
नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते ll ५ ll
सनकादिक मुनी ज्यांच्या चरणी नम्र आहेत ,अशा श्रीदत्त चरणी माझी जिव्हा अर्पण केली आहे हि गोष्ट खरी ,पण या सुंदर अशा कृष्णालहरीने श्रीदत्ताना आनंद होणार नाही काय ? अवश्य होईल . कारण वेणी नामक नदीसह असणाऱ्या हरिहर स्वरूपिणी कृष्णेच्या तीरावर प्रेमाने वास केल्याने ती त्यांना आवडणारी झाली आहे . मुलाचा गौरव जसा मातेला प्रिय होतो त्याप्रमाणे दत्त महाराजांना प्रिय अशा कृष्णेचे स्तवनही आवडेल . आपल्या स्तुतीने तितका आनंद होत नाही पण आपल्याला जे प्रिय आहे त्याच्या स्तुतीने ,स्तवनाने जास्त आनंद होतो . हे कृष्णे तुला नमस्कार असो .
प्रत्यक्ष श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज आणि सनकादिक यांच्या दर्शनाचे , स्पर्शाचे भाग्य लाभले त्या कृष्णामातेचे जल केवळ स्पर्शाने सर्व पापे जाळून टाकते यात शंका नाही . कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराजांच्या सहवासाचे भाग्य मातेला लाभले आहे , गुरुचरित्रात अनेक लीलांची कृष्णामाई साक्षीदार आहे ,गुरुमहाराजांच्या बारा वर्षे सान्निध्याचे भाग्य ,आणि महाराजांच्या स्पर्शाने जलाचे तीर्थात रूपांतर होण्याचे भाग्य कृष्णामाईला लाभले आहे ,लौकिकदृष्ट्या महाराजांनी गाणगापूरला प्रयाण केले असले तरी आजही गुरुमहाराज तिथे वास्तव्य करून आहेत .खेरीज योगिनी देवता कायम सन्निध आहेत .
थोर दत्त भक्तांच्या सहवासाचे क्षण कृष्णामातेने अनुभवले त्यात एकनाथ महाराजांनी हा दत्त महाराजांच्या समोरचा घाट बांधून घेतला अर्थात एकनाथ महाराज इथे काही दिवस राहून गेले आहेत ,सनकादिकांच्या लीला देखील या कृष्णामाईने पाहिल्या आहेत . रामचंद्र योगींचें वास्तव्य ,नारायण स्वामी महाराजांना कृष्णा जळात गुरुमहाराजांनी नेऊन दिलेली संन्यास दीक्षा ,नारायण स्वामी महाराजांकडून कुष्ठ झालेल्या मनुष्याचा रोगपरिहार ,मौनी स्वामी महाराजांनी कृष्णाजलाच्या तुपात केलेल्या रूपांतराची लीला ,थोरल्या महाराजांचे वास्तव्य ,गोविंद स्वामी ,गोपाळ स्वामी यांचे वास्तव्य ,दीक्षित स्वामी महाराजांचा नौका विहार आदी लीला कृष्णामातेने पाहिल्या आहेत .
आजही पावसाळ्यात कृष्णामाई दत्त महाराजांच्या पादुकांना वंदन करण्यासाठी घाट चढून वर येते आणि आपल्या जलाने महाराजांना स्पर्श करून वंदन करते ,आमच्या लेखी हा जरी महापूर असला तरी कृष्णामातेचा हा वंदन विधी असतो यात शंका नाही .श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"